झोपडी
झोपडी
नको कुणाची मला हवेली झोपडीच ती प्यारी।
इथेच मिळते मला नेहमी मजा सुखाची न्यारी।।
नभी चांदणे चमचमणारे शीतल प्रकाश देती।
दुःखाने गांजल्या त्रासल्या मनाला शांत करती।।
मंद पवन हा गीत सुखाचे गातो माझ्या कानी।
झोपडीत या स्वर्गसुखाची मिळतसे मेजवानी।।
नको कशाची चिंता घेणे देणे नको कुणाशी।
शांत इथे झोपतो घेऊनि दुःखालाच उशाशी।।
राजमहाली जरी सुखाच्या खाणी भरून दिसती।
इथे न येती चोर दरोडेखोर कशाची भीती।।