जुळले ऋणानुबंध
जुळले ऋणानुबंध
कृष्ण सावळ्या तुझ्यासवे
अतूट जुळले ऋणानुबंध
ध्यानीमनी तुझाच ध्यास
प्रीतिचे दरवळले मधुगंध
मंजुळ पावा मधाळ सूर
स्पर्शून घेई तनामनाला
अद्वितीय किमया सारी
देई उमाळा जीवनाला
नेत्रवेधक प्रांजळ मुद्रा
कमलनयन मनमोहना
यमुना तीरावर गोपिका
कासावीस होई दर्शना
रेशीमगाठ जन्मोजन्मीची
प्रतिबिंब निशदिनी मनात
भावनांची गुंफूनी माळा
जीवन समर्पण चरणात
शाश्वताच्या शोधार्थ कळे
अल्पजीवि असे अहंकार
आयुष्याच्या क्षितिजावर
घडतो ईश्वरी साक्षात्कार