माझं सोनूलं
माझं सोनूलं
माझं सोनूलं सोनूलं
कसं हसतं खेळतं
हात छोटेच असती
काम आईचं करतं
गोळे कणकेचे छोटे
छोट्याशाच हाती घेते
गोल आकार देऊन
पोळी छानशी लाटते
छान भाजी बनविली
येतो खरपूस वास
पाणी तोंडाला सुटते
वाटे घ्यावा एक घास
काम करे जेव्हा आई
टक लाऊनिया पाहे
काम शिकून घराची
जसे आई बनू पाहे
राहो हिच्या डोईवर
सदा सुखाची सावली
जेथे जाईल त्या ठायी
राहो सुखात छकुली
अशी सुंदर देखणी
गोड फुलासम परी
देवा नारायणा लेक
देई प्रत्येकाच्या घरी