रानफुल
रानफुल
1 min
7.6K
रानफुल इवले मी
रंग माझे कितीतरी
रूप मनोहर माझे
डुले पहा वाऱ्यावरी।।1।।
उग्र मंद गंध माझा
पसरला रानामध्ये
मकरंद गोड छान
हसू फुले मनामध्ये।।2।।
अवखळ मी अल्लड
नाते माझे भ्रमराशी
खेळ खेळतो आनंदे
मैत्री फुलपाखरांशी।।3।।
मंद झुळुक वाऱ्याची
गाई माझ्यासवे गाणे
पानाआड लपुनि मी
गातो मंजुळ तराणे।।4।।
मला पाहुनि खुलते
शांत ,प्रसन्न पहाट
सोबतीला माझ्या सदा
वळणावरची वाट।।5।।
शोभा वाढवी रानाची
जरी मी हो रानफुल
साज लेऊनी आगळा
जीवा पाडतसे भूल।।6।।