Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
तीर्थरूप आई
तीर्थरूप आई
★★★★★

© Latika Choudhary

Others

3 Minutes   7.2K    15


Content Ranking

आई,

पत्र लिहिताना वा व्यासपीठावर तू

'तीर्थरूप ' व्हावीस अन दिसावीस अनाथाश्रमात....स्मशानभूमीत...

रस्त्यावर .......!

ज्यांची तू 'नाथ' व्हावी, ज्यांना तू 'उजेड' द्यावा....ज्यांना तू जीवनरुपी स्वर्ग द्यावा 

त्यांनीच तुला.........? ? ?

तरी तू झेलतेस ,पेलतेस तेही जगणे आनंदानं ,त्यांना आनंदित

पहात......

कारण........कारण तू आई आहेस.

तुझ्या आठवांच्या प्रवासात ,

डबडबलेले डोळे अन चिंब झालेले मन ,काळीज कासावीस

होत ,

तुझ्यात मी ,आणि माझ्यात तुला जपत.... जोपासत....जोजवत,

लिन होते तुझ्या प्रतिमेपुढे

आन गोंजारत राहते माझ्या मुलाला .....

ओतत राहते प्रेमामृत....संस्काराचे धडे...

घडे पेलत भयाचे....

भय भविष्याचे असते मनात ......

सांगत असते त्याला तुझा जन्म....

मरण, जन्म ....मरण असा कितीतरी आवर्तने पूर्ण करीत

'आई' होत राहण्याचा प्रवास....!

आई आठवतं का तुला .....

............? ?

आई,

सोन्याचा धूर निघत असलेलं बापाचं घर,

रक्ताची -पाठची नाती सोडून पाठ फिरवत

माहेराला...ओलांडते उंबरठा सासरचा

अन ,पहिल्याच पावलाला घेते प्रतिज्ञा

परक्यांना 'आपलं' करीत,स्वत्व 

विसरून जाण्याची.......!

       

नवलाईतच कळत जातात कळा,

वळणारे अपेक्षाभंगाचे वारे,

पडत जातात हळूहळू फिके मनातले

इंद्रधनुष्याचे सप्तरंग,

दिसणाऱ्या वास्तवाच्या रंगापुढे.....!

बनते हक्काची वस्तू,

अन होते 'वास्तू' वेदना,यातना

अवमानाची.खदखदत राहतात कढ

मनातले. तरीही.....सल पचवत,

आणते उसना आव...जरी कळतो

मिळणारा क्षणिक भाव....!

कारण ,जाणते मोल सुखदुःखाच्या

दोन वाटयांचं अन कुंकुला

तेज मिळावे म्हणून गिळत असते

अंधारासहित....

सारं नको असलेलं....!

वेदीवरच्या शपथा फक्त 'ती'च्यासाठी.

तिच्यासाठीच चटके,चुलीचा धूर....

तरी गात राहतेस कर्तव्याचे गाणे,

लावीत सप्तकातला सूर......!

लुगड्याच्या गाठी बांधून झाकते अंग,

नजरेआड करीत स्वप्ने सुखाची.

कारण,डोळ्यात असतं पोरांचं शिक्षण,

संगोपन. रंगरूपाची तमा न बाळगता

गाळत असते घाम अन जिरवत असते आसू...           

तरी फुटत असतो पान्हा पुन्हा पुन्हा

अन..ओठावर बहाण्याचे हासू......!

संसाराच्या झळांनी कोरडी होतात नाती,

तरी ओलावतात पापण्या, येतात उचंबळून

रक्ताच्या आठवणी रक्ताच्या.....,तेव्हाच

ओलावते काचोळी बाळाच्या रडण्याने

दुष्काळातही......!

घुटमळत नाहीत इच्छा कधी 

दागदागिन्यांभोवती. कारण पोरंच

तिला 'हिरा-पाचू' ...! पाडते पैलू संस्काराचे,

सोसण्याचे, आपल्याच पावलांच्या 

वाटेवरून........!

तुडवत येते अनवाणी काटेरी वाट,

संसाराची...जीवनाची...

उचलत वाटेवरचे काटे.......

कारण ...त्यावरच शिजवायची असते तिला

भुकेल्या पोरांसाठी भाकर.....!

ठसठसती भरपूटं आणि पाठीवरचे

तडाखे...उन्हाचे अन बापाचेही लपवित,

आणते वाळवंटी चेहऱ्यावर फसवं आनंदाचं

मृगजळ..पाहू नये पूर पोरांनी डोळ्यातला

म्हणून........!

अशी ही माय,कधी बनते दुधावरची साय,

तर कधी होते कठोर वज्राहूनही....

कारण....द्यायचं असतं बळ पंखात

पिलांच्या, उडण्यासाठी उंच उंच

आकाशात.......!

मुलं तर घेतात भरारी.पण

होते विस्मरण त्यांना ..तिची माया,ममता,

तिनं खाल्लेल्या खस्ता,खोदलेला रस्ता,

उचललेले काटे,भरलेले खाचखळगे,

'आपलं' घरटं बांधताना......!

उरतात तिच्यासाठी फक्त सुरकुतल्या

कातडीच्या थैलीतली वाकलेली हाडं,

अंधुक नजर,हेटाळणी अन घराचा

कोपरा....कुजका....!

आई,शेवट ठाऊक असल्यावरही तू 

खपलीस....खपतेस... अन खपशील

....कारण....तुझाही जन्म

मुलाच्या जन्माबरोबरच होतो ...!

"हं.... समजलं...तुझ्या जन्मासाठीच

हा खटाटोप..." हा झाला आमचा

स्वार्थी विचार. पण कसं विसरणार

तुझं आमच्यासाठी ओल्यात झोपणं,

उन्हात राबणं, करपणं....

तुला बापानं आणि पावसानं झोडपणं.....!

शिशिराच्या चुगल्यांबरोबर तुझ्या

इच्छांची पानगळ सोसत वाटच पहात

राहिलीस वसंत ऋतूची...

पुन्हा पुन्हा फुटतच राहिलेत वात्सल्याचे

अंकुर....होतच राहिलीस वटवृक्ष,

धीरानं पाळंमुळं गाडत...सावली

देण्यासाठी...ग्रीष्माच्या उन्हातही........!

अपेक्षा काय...फक्त आणि फक्त

ह्या 'वटवृक्षाच्या ' जीर्ण,वाळक्या

डहाळ्या पोरांच्या खांद्यावर 

जाव्या एवढीच.....!

आई,तुझ्या चंदनासम झिजल्या

हाडांची राख भाळी लावताच मीच

चंदन व्हावे एवढा सुगंध भरलाय

गं तुझ्यात ...!

परीस होऊन लोखंडाचं 'सोनं' करतेस,

तरी मनं का होतात 'लोखंडाची'...???

आई, खंत एकच आहे की,.....

का नाही लागला शोध अजूनही अशा

यंत्राचा की कळेल ज्यातून-

सारी नाती जोपासण्याची शक्ती

तुझ्यात येते कुठून ?

कारण गरज आहे आज फक्त

'आई' कळण्यासाठी,तिला हृदयात,

घरात फूटभर जागा देण्यासाठी......!

आई, देण्यात विश्वास ठेवणारी तू

मागत काहीच नाहीस.

गजबजलेलं गोकुळ पाहून भारावतेस,

घेत काहीच नाही ...!

अशी कशी गं तू देहाचंच गोकुळ करून

बसलीस? आम्ही सारे सुखात नांदत

आहोत तुझ्यात, अन तू मात्र 

छेदून घेतलंस स्वतःला ठिकठिकाणी

'वेळूच्या बासरीप्रमाणे'......

आम्हाला सूर देत....बेसूर होत....!

आई, तुझी ही वेंधळी, विसरभोळी....

(की स्वार्थी) माणसांच्या गर्दीत हरवलेली

पाखरे, ज्यांनी उंच उंच आकाशात

श्रीमंत घरटं बांधलंय.... तुला विसरत...!

धरणीला नजर लावून चालणारी तू,

..आम्ही आभाळात...उंचीवर ..

तरी-" लेकरं सुरक्षित असतील ना?,

ऊन,वारा,झळा लागत नसाव्या ना?.."

म्हणत ,'उंचीवरच्या' .....साठी तुझा

जीव टांगणीला लागलेला,

शेवटी 'आई'च ना तू ...!

पण ....आई ,

आमच्यात एक चातकही आहे,

ज्यानं तुझंच चांदणं प्यायलं,

पुंडलीकही आहे,ज्यानं तुलाच

विटेवर पाहिलं...!

श्रावणही आहे,ज्यानं कर्तव्याच्या

तुले त तुझंच पारडं जड केलं,

अन तुझ्यासवे त्याच्याही

जन्माचं सार्थक झालं.....!

कारण......कारण तू बासरी

होऊन सूर भरला साऱ्यांच्या

जीवनात....अन त्याणं तुला अलगदपणे

सोपवलं हातात माधवाच्या...

तुझं पावित्र्य...तुझं मातृत्व...

तुझं मांगल्य जपावं म्हणून ....! ! !

 तुझी कन्या

आई तीर्थरूप आनंद संस्कार जन्म वेदना धूर काटे स्वार्थी बासरी

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..