कविता -सुख या परते नाही ...!
कविता -सुख या परते नाही ...!
ओढीने येतो दरवेळी भेटण्यासाठी तुला
नि भेटतेस सस्मित तू, सुख यापरते नाही||
नजरेच्या नजर खेळातले आपले हे सारे
शब्दाविना सांगता येणे, सुख यापरते नाही||
विवंचना आधीच त्या, भर त्यात काळज्यांची
आधार-स्पर्श एकमेका, सुख यापरते नाही||
रस्ते चालू सोबतीने आता, एकट्याने ते नाही
दो सावल्या भासू दे एक, सुख यापरते नाही||
घरात दोघांच्या आपुल्या, स्वर संवाद साधण्या
यावीत माणसे आपुली, सुख यापरते नाही||