Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

परेश पवार 'शिव'

Romance

4.8  

परेश पवार 'शिव'

Romance

ती मी आणि पाऊस..

ती मी आणि पाऊस..

2 mins
816


बाहेर पडणारा पाऊस..

आणि त्यात मनसोक्त भिजणारा रस्ता पाहिला की नजरेसमोर उभा राहतो,

तो आपल्या कॉलेजचा रस्ता..

आपल्याला ओळखणारा..

पाऊस पडून गेल्यानंतरचा..

अंगावरची धूळ-माती झाडून, स्वच्छ आंघोळ करुन, हसून आपलं स्वागत करणारा...

आणि त्यावरून माझी नजर पुन्हा तशीच चालू लागते..

जशी पूर्वी तुझ्यासोबत त्याच रस्त्यावरुन, भर पावसात भिजत चालताना चालायची..

तुला माझा हात हातात घट्ट गुंफावासा वाटायचा..

पण मला मात्र माझा हात तुझ्या खांद्यावर टाकून, माझा तुझ्यावरचा हक्क मिरवायलाच जास्त आवडायचं..!

छान बिलगून चालायचीस तू मला..

एकमेकांना होणारे जाणते-अजाणते स्पर्श अनुभवत..

चोरुन एकमेकांकडे बघताना, आपल्या नजरा आपल्याही नकळत गुलाबी होऊन जायच्या..

रिमझिम पाऊस झेलत..

आपल्या हातांवरचे शहारे एकमेकांना दाखवत,

आपण नुसते भटकत रहायचो..

या रस्त्यावरुन तिकडे, आणि त्या तिथून पलिकडच्या फुटपाथवर..

अगदी वाट फुटेल तिथे..

तसा आपल्यामध्ये मीच थोडासा जास्त मॅच्युअर..!

पण जेव्हा फुटपाथ सोडून,

माझ्या नकाराला न जुमानता..

मला हाताला धरुन, बाजूच्या मैदानावर साचलेल्या पाण्यात अलगद ऊड्या मारायचीस,

लहान मुलासारख्या..

तेव्हा त्या ब्लॅक अँड व्हाइट ढगांच्या बॅकग्राऊंडवर, अल्लडपणाचे गडद गहिरे रंग, बेफिकीरीने उधळणाऱ्या तुला पाहताना मात्र, हेवा वाटायचा तुझा..!

आणि तू..

..तू मात्र..

काळ्याभोर ढगातून, धरतीवर पडणा-या पावसाचा एक थेंब होऊन जायचीस..

स्वैर..

 निरागस..

    स्वच्छंदी...!

तुझा तो सोहळा डोळेभरुन पाहताना, "कुणाची नजर न लागो", असं म्हणत

नजरेनेच तुझी दृष्ट काढायचो मी..

अशा पावसात एकमेकांना बिलगून, कुठलातरी कोपरा गाठून, 'गुलुगुलू' बोलणाऱ्या एखाद्या कपलला पाहून दोघांनाही एकच प्रश्न पडायचा..

"अरे काय बोलतात हे लोक इतका वेळ..?"

कारण, तुझ्या-माझ्यातली संभाषणं म्हणजे निव्वळ थट्टामस्करी वाटावीत अशीच..!

तुझ्यासोबत मला त्यांच्यावर हसताना पाहून,

कितीतरी नजरा, माझी शिकार करायला आसुसलेल्या दिसायच्या..

माझ्यावर पडणारे ते सगळे जळजळीत कटाक्ष झेलत..

आणि त्यांना अजूनच जळवण्यातला असुरी आनंद उपभोगत..

मी तुझ्यासोबत कॉफी शॉप गाठायचो...

तिथे तुझ्या चिंब रुपाकडे पाहताना, माझ्याही नजरेची कसोटी लागायची..

पण तू आपली तुझ्याच दुनियेत..

तुला हेही मी सांगितल्यावर कळायचं की असंख्य नजरा त्याक्षणी फक्त तुलाच पाहताहेत..

आणि खरी गंमत तर तेव्हा यायची,

जेव्हा तुझ्या त्या नाजुक थरथरल्या ओठांची साखर ओतलेली कॉफी तू मला प्यायला द्यायचीस..

जळणाऱ्या असंख्य नजरेतला धुसफुसणारा धूर, मला त्या कॉफीच्या गरम वाफेत जाणवायचा..

कॉफी आणि आपल्या नजरेतलं बरंच काही संपवून..

शॉपमधून एखाद्या फिल्मी कपलसारखं.. हातात हात गुंफुन, आपण मुक्कामी परत यायचो..

तेव्हा आपण तोपर्यंत फिरलेला तो सगळा रस्ता..

माझ्याकडे बघत,

डोळे मिचकावत गोड हसायचा..

बालपणीच्या एखाद्या दोस्तासारखा..

.

.

.

पण हल्ली..

हल्ली मात्र.. तो रस्ता,

मला उदास दिसतो..

माझ्याकडे पाहून हसतही नाही..

मला टाळतो..


माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहतो..


कारण...

कारण, आता माझ्यासोबत हातात हात गुंफलेली..


'तू' त्याला दिसत नाहीस!


फुलपाखरासारखी बागडणारी...

अल्लडपणाचे गहिरे रंग ल्यालेली...

झिम्माड पावसाच्या थेंबासारखी...


स्वैर..

 निरागस..

    स्वच्छंदी...!


Rate this content
Log in