आम्ही वारकरी
आम्ही वारकरी
आम्ही वारकरी,
या ज्ञान मंदिराचे,
व्रत शिक्षणाचे
सेवाभावी || १ ||
मजलागे वाटे
शाळा हे मंदिर
विद्यार्थी सुंदर
देवरूपे || २ ||
देवतांच्या मूर्ती
किती सारे आकार
विविध प्रकार
अंगभूत || ३ ||
शिक्षणाची वारी
मजला भारी आवडे
विद्यार्थी रुपडे
शाळांतील || ४ ||
प्रसाद सेवेचा
रोज सेवन करता,
समाधान चित्ता
मिळतसे || ५ ||
विद्यार्थी विठ्ठल
शाळा ही पंढरी,
पेटवू अंतरी,
ज्ञानज्योती || ६ ||
आम्ही वारकरी,
रोजची ही वारी,
सकलास प्यारी,
ज्ञानगीता || ७ ||
ज्ञानामृत प्यावे,
ऐसे मज वाटे
विठुराया भेटे
विद्यार्थ्यांतून || ८ ||