ओवी
ओवी
पहिली माझी ओवी ग | तुकोबांच्या चरणी ग |
नतमस्तक होते ग I उगवत्या दिसाला ॥१॥
दुसरी माझी ओवी ग | तुकोबांच्या अभंगा ग |
गाते तेच आनंदे ग I काम उरकायला ॥२॥
तिसरी माझी ओवी ग | वृक्षवल्ली सोयरे ग |
दाणा पाणी ठेवते ग I अंगणी पाखराला ॥३॥
चवथी माझी ओवी ग | इंद्रायणी पाण्याला ग |
कर्जखते बुडवी ग | देती कर्ज मुक्तीला ॥४॥
पाचवी माझी ओवी ग I गुरु, शिष्य नात्याला ग I
शिवराय भेटती ग | ऐकती किर्तनाला ॥५॥
सहावी माझी ओवी ग I ' तुकारामगाथा ' स ग I
घरोघरी वाचती ग | चला पारायणाला ॥६॥
सातवी माझी ओवी ग Iआपेगांव पैठण ग I
सन्यासाची ती पोरं ग | होती या रहायला ॥७॥
आठवी माझी ओवी ग | निवृत्ती व सोपान ग I
ज्ञानेश्वर तो सान ग | बहिण मुक्ताबाईला ॥८॥
नववी माझी ओवी ग I भिक्षेची असे झोळी ग |
ताटी लावून बसे ग I मुक्ताई अभंगाला ॥९॥
दहावी माझी ओवी ग | बोलतेय मराठी ग I
धर्मज्ञान हे त्यात ग I वंदू ' ज्ञानेश्वरीला ' ॥१०॥
पुढची माझी ओवी ग l महाराष्ट्र भुमीला ग |
चालती ही पाऊले ग | आषाढी कार्तिकीला ॥११॥
शेवटी माझी ओवी ग I माता, पिता गुरुला ग
" ग्यानबा तुकाराम " ग | गोड वाटे कानाला ॥१२॥