गर्भातली कळी
गर्भातली कळी
फुलण्या आधी कळीला, अशी तोडू नको गं।। धृ।।
गर्भात आईच्या मुलगी, संसार मांडते गं।
अपराध काय माझा, जो जन्मा अशीच केला।
म्हणून आज माझ्या, जन्मास विरोध झाला।।
होते आजी-आजोबा म्हणून, जन्मास आली तू गं।
का वेड लागले तुला, मज गर्भात मारते गं।।१।।
तुझ्याच संस्काराची, घेऊन येता शिदोरी।
का उगाच मारता गं, गर्भातल्याच पोरी।।
काय भीती कुणाची, आज तुला वाटते गं।
कुलदीप घरी हवा, मग ज्योती का नको गं।।२।।
तू होती जशी अडाणी, मला ठेवू नको गं।
माझ्या वाढत्या वयाची, तुला भीती नको गं।।
पंखात भरारी घेण्याचे बळ, शिक्षणाने येऊ दे गं।।
जन्मा आधी मुलीला, आता मारू नका गं।३।।
का मारते बढाया, उगा देवी-दैवताच्या।
का मारणार तू गं, बीजांकुरास त्यांच्या।।
प्रित तुम्हा दोघांची, तुझ्या गर्भात वाढते गं।
मी येत आहे गं आई, तू भिऊ नको गं।।।४।।