रम्य सकाळ
रम्य सकाळ
1 min
860
पूर्व दिशेला गुलाल
उधळीत कोण आले
होता उदय रवीचा
जग प्रकाशित झाले।।१।।
अलगद भूपाळीचे
सूर कानावर आले
ताजे तवाने होऊन
मन प्रसन्न जाहले।।२।।
कुणी ललना उठून
करी सडा सारवण
दारी रांगोळी काढून
सजवते हो अंगण।।३।।
पक्षी किलबिल गाती
गाणे मंजूळ स्वरात
ओढ वासराची लागे
गाय हंबरे गोठयात।।४।।
आकाशात सूर्यदेव
हळू डोकावून पाहे
चराचर सृष्टी सारी
कशी जागी होत आहे।।५।।
रवी किरण पडता
फुले गवताची फुले
फुलावर दवबिंदू
पाहुनिया कळी खुले।।६।।
अशी रम्य सकाळ ही
ओढ लावते जीवाला
भाव भरल्या मनाने
धन्यवाद त्या देवाला।।७।।