वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
1 min
524
स्वप्न बहरून जावे
ओल्या त्या दवबिंदूचे
धुंद सांजवेळी मज
वेध गुलाबी थंडीचे
हिरवळ चहुकडे
धुके पहुडले रानी,
आठवणी मखमली
पांघरल्या मनोमनी !
खुदकन हसे पर्ण
फुल सजे वेलीवर,
कशी सावरू स्वतःला?
दाटे मनी गहिवर !
साथ तुझी जणु सख्या
आच्छादन चांदण्यांचे,
अंधारल्या सावलीत
चंद्र-रात मिलनाचे !
भाव मनीचा जाण तू
छळू नको ना थंडीत,
हात हाती घे तू प्रिया
हवे जीवन रंगीत !
सांजवेळी परतून
सूर्यकिरणेही जाती,
तुझी वाट पाहताना
पिल्लं थकून निजती !