Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

परेश पवार 'शिव'

5.0  

परेश पवार 'शिव'

रंग पावसाचे

रंग पावसाचे

1 min
163


संध्याकाळपासून सुरु असलेला तुफान पाऊस.. रात्री कधीतरी मंदावतो..

आणि मग बराच वेळ बडबड करत बसलेल्या पाहुण्याला आपल्या कंटाळ्याची जाणिव होऊन तो जायला निघावा, तसा पाऊस हळूहळू काढता पाय घेतो..

आणि लपाछपीत लपलेल्या भिडूसारखा मी, अलगद खिडकी उघडून तो गेल्याची खात्री करतो..

तेव्हा त्याचा घोंगावणारा आवाज कानात अजूनही घुमत असतो..

पण एखाद्या नाजूक क्षणी परमोच्च सुखाचं टोक गाठून नुकतंच झोपी गेलेल्या जोडप्यासारखं खिडकीबाहेरचं जग शांत झालेलं असतं...


घराच्या ओढीनं भरभर निघालेल्या वाटसरूची लगबग,

वाऱ्याची शांत लय,

पानांची सळसळ,

त्यावरुन घसरत रस्ता भिजवणारे थेंब..

आणि खिडकीत उभा असलेला मी..

इतकाच काय तो सजीवपणा या सगळ्यांत..

मंद मंद वाहत कानापाशी रुंजी घालणारा वारा, अलगद कानात शिरतो अन् अंगावर गोड शहारा आणतो..

रस्ता ओलाच पण तो आता वाहत नसतो..

घराच्या छतावरुन कुशलतेने अंगणात साचलेल्या पाण्यात सूर मारणारे थेंब पाहताना विचारांची मालिकाच चालू होते मनात...


दुपारी शांत मंद भुरभुरणारा पाऊस..

आपल्या बालमित्रासारखा..

सोबत खेळण्यासाठी साद घालणारा..

मग मघाशी तो रोरावणारा वारा घेऊन घाबरवणारा पाऊस..

अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडणारा मित्रच जसा..

पण आता..?

आता ही निरव शांतता..

काळजाचा ठाव घेणारी...


सगळ्या जखमांवर हळूवार फुंकर घालणारी..

प्रेयसीसारखी..

तुमच्या डोळ्यांतलं काहूर दिसताच तुम्हाला कवेत घेणारी..

तुमच्या छातीवर अलगद डोकं टेकवणारी..

आणि तुम्हांला शांत झोपी गेलेलं पाहताना,

तिच्या डोळ्यांतही हाच पाऊस असतो..

.

.

या पावसाचे नक्की रंग तरी किती..?


Rate this content
Log in