Sunita madhukar patil ( मधुनिता )

Abstract Tragedy Inspirational

3.9  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Abstract Tragedy Inspirational

वर्तुळ

वर्तुळ

5 mins
234


" आधार कार्ड दाखवा तुमच्या आईचं." ऐंशी वर्षांच्या वसंतरावांनी खालमानेने विचारणा करताच समोर उभ्या तरुणाने आपल्या आईचं आधार कार्ड त्यांच्या पुढ्यात ठेवलं.


' स्मिता राकेश मोहिते...'आधारकार्डावरचं नाव वाचताच त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि खातरजमा करण्यासाठी त्यांनी एकवार त्या तरुणाकडे पाहिलं.


" तुम्ही वाटलं तर थोडे अधिक पैसे घ्या पण माझ्या आईची योग्य ती आणि विशेष काळजी घ्या." वसंतरावांशी नजरानजर होताच त्याने हात जोडले.


" अजिबात नाही! इथे पण राजेशाही थाट हवा आहे का म्हातारीला. मी ठरलेल्या पैशांव्यतिरिक्त एक दमडीही आगाऊ देणार नाही लक्षात ठेवा." त्या तरुणासोबत आलेल्या त्याच्या बायकोने त्याला दमात घेतलं.


पण वसंतरावांचं त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष होतंच कुठे? त्यांनी परत एकदा आधारकार्डावरचं नाव वाचलं आणि 'दृष्टी थोडी अधू झाली आहे नाहीतर आधीच ओळखलं असतं.' स्वतःशीच बोलत त्यांनी डोळ्यांवर चष्मा चढवला आणि त्या तरुणाला निरखून पाहू लागले. राकेश सारखाच तर दिसतो हुबेहूब, रंग थोडा गोरा नाहीतर तेच रुंद कपाळ, धारधार नाक, तपकिरी डोळे सगळंच तर राकेशसारखं. आज काळाचं चक्र फिरत तिथेच येऊन थांबलं आहे. जिथून सुरवात झाली होती. आज एक वर्तुळ पूर्ण झालं. नकळत हा विचार त्यांच्या मनात चमकून गेला.


" हे पहा, तुम्ही स्मिताजींना खोली क्रमांक चारच्या दोन नंबर बेड वर घेऊन जा. मी सगळी व्यवस्था करायला सांगतो." वसंतरावांनी त्या तरुणाचा नाव पत्ता लिहून घेतला आणि त्याला जायला सांगितलं.


थोड्यावेळाने त्यांनी घंटी वाजवून कमलला बोलावलं आणि विचारलं, "आज ज्या बाई, म्हणजे स्मिताजी इथे आल्या आहेत त्यांना तू भेटलीस का?"


" हो साहेब आता तिथेच होते मी."


" कशा आहेत त्या."


" अवस्था फार वाईट आहे साहेब. गुडघ्यातून एक पाय तुटलेला आहे आणि बोलता ही येत नाही बहुतेक कारण त्या मुलाशी बोलताना हातवारे करत होत्या. त्यांची सगळी उठाठेव कशी होणार साहेब. चोवीस तास एक माणूस त्यांच्या दिमतीला ठेवावा लागेल."


" कमल, तुझी चुलत की मावस बहीण आहे ना. तिला कामाची गरज होती. तिला काम मिळालं का?"


" नाही."


" बरं झालं, उद्या पासून तिला इकडे कामाला बोलव. माझी खोली रिकामी कर आणि त्या खोलीत दोन खाटांची सोय कर. एक खाट आज आलेल्या बाईंसाठी आणि दुसरी तुझ्या बहिणीसाठी. तुझी बहीण चोवीस तास स्मिताजींसोबत असेल. त्यांना काय हवं नको ते बघेल. माझं सामान आणि अंथरूण माझ्या ऑफिसात आणून एका कोपऱ्यात लाव. तुझी बहीण फक्त आणि फक्त स्मिताजींच्या दिमतीला असेल. त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या." वसंतराव कमलला सूचना देत होते इतक्यात तो तरुण परत तिथे आला.


" आईला तिच्या खोलीत सोडून आलो आहे, साहेब. तिची नीट काळजी घ्या. मी लाचार आहे नाहीतर..." इतकं बोलून त्याने दाटून आलेला आवंढा गिळला आणि डोळे पुसत झपाट्याने गेटच्या दिशेने चालू लागला. त्याला पाठमोरं जाताना पाहत वसंतरावांनी पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि भूतकाळात हरवले.


वसंतरावांच्या ऐन तिशीतच कसल्याशा आजाराचं निमित्त झालं आणि त्यांची पत्नी रमा देवाघरी गेली. पाच वर्षांचा राकेश आईविना पोरका झाला. आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाची गळ घातली पण लहानग्या राकेशला सावत्रआईचा जाच नको म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला. आपला सगळा वेळ आणि ऊर्जा त्यांनी राकेशला वाढवण्यात खर्ची केली. दिवस सरत होते. उच्चशिक्षित राकेश बेंगलोरच्या एक नामांकित कंपनीत मॅनेजरच्या खुर्चीवर आरूढ झाला आणि इकडे वसंतरावांना आभाळ ठेंगण झालं.


राकेश दर महिन्याला वसंतरावांना पैसे पाठवत होता. सणासुदीला गावी चक्कर होत हाती पण लग्नाचं नाव काढताच तो विषय टाळायचा. दिवसांमगून दिवस जात होते. वसंतरावांना राकेशच्या लग्नाची चिंता लागून राहिली होती. राकेशचं लग्न झालं की सगळी जवाबदारी त्याच्यावर सोपवून म्हातारपण नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवत निवांत घालवायचं होतं.


एक दिवस सकाळच्या न्याहारीनंतर ते अंगणात चहा पित बसले असता गावातला रमेश नावाचा मुलगा त्यांना भेटायला आला. 


" काय चाललंय काका, कसे आहात? मागच्या आठवड्यात इंटरव्ह्यूवसाठी बेंगलोरला गेलो होतो. तिथे राकेश भेटला. काय प्रगती केली आहे राकेशने म्हणून सांगू. लांबलचक गाडी, सुट, बुट आणि वहिनी..! एखाद्या अप्सरेला लाजवेल असं रूप. नशीबवान आहात काका, इतका कर्तबगार मुलगा तुम्हाला लाभला."


'वहिनी' शब्दाचा तिर त्यांच्या काळजाला आरपार छेदत गेला आणि त्यांच्या हातातला चहाचा कप निसटला. तशाच घायाळ अवस्थेत त्यांनी बेंगलोर गाठलं.


त्यांनी राकेशला जाब विचारला असता त्याने वसंतरावांची माफी मागितली पण सून स्मिता काही त्यांच्यासमोर आली नाही पण तिचे काही शब्द मात्र त्यांच्या कानी पडले,


" तो तुझा बाप आहे राकेश. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. तू त्यांना हॉटेलात ठेव नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात. या माझ्या घरात ते मला क्षणभर देखील नको आहेत."


स्मिताचा एक एक शब्द त्यांच्या काळजावर वार करत होता. क्षणभर देखील त्यांना तिथे थांबवलं नाही. त्याचं क्षणी ते गावी परत यायला निघाले. गावी परतल्यानंतर घर, जमीन जी काही चल-अचल संपत्ती होती ती विकून ते इथे आले आणि 'आसरा' नावाचा हा वृद्धाश्रम सुरू केला. आज वयाच्या ऐंशीतही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात ते या वृध्दाश्रमाचा डोलारा सांभाळत होते. भूतकाळातील घटना एखाद्या चलचित्राप्रमाणे यांच्या नजरेसमोरून सरकत होत्या.


" साहेब, उद्या बहिणीला कामाला यायला सांगेन पण तिला पगाराचं काय सांगू." 


कमलच्या आवाजाने त्यांची तंद्री भंगली आणि ते वर्तमानात परतले.


" खाणे-पिणे आणि राहण्याच्या सोयीव्यतिरिक्त आठ हजार महिना देईन." कमल गेल्यानंतर वसंतराव आपल्या ऑफिसात गेले आणि रोजची कामे आटोपू लागले. 


दुसऱ्या दिवशी वसंतराव ऑफिसात आश्रमाच्या खर्चाचा आढावा घेत बसले होते इतक्यात कमलने एक पत्र आणून त्यांना दिले. हिशोबाचा सगळा ताळेबंद बसवल्यानंतर त्यांनी ते पत्र उघडले आणि वाचू लागले. पत्र काल आश्रमात रहायला आलेल्या स्मिताजींनी लिहिलं होतं.


प्रिय बाबा,

सप्रेम नमस्कार,

कमलने जेंव्हा मला दुसऱ्या खोलीत हलवलं आणि माझ्यासाठी वेगळ्या मदतनीसाची सोय केली आहे हे सांगितलं तेंव्हा जास्तीचे पैसे देऊन माझ्या मुलानेच माझ्यासाठी हे सर्व केलं आहे असं वाटलं. पण जेव्हा मी या नवीन खोलीत प्रवेश केला जी तुम्ही तुमच्या या दृष्ट सुनेसाठी रिकामी केली होती तेंव्हा समोरच्या भिंतीवर लावलेला तुमचा फोटो पाहिला आणि सारं समजून चुकले.

राकेशच्या पाकिटात नेहमी तुमचा फोटो असायचा. मी तो पाहिला होता आणि म्हणूनच मी तुम्हाला ओळखू शकले.

राकेशच्या मनात तुमचं स्थान अढळ होतं. मी खूप प्रयत्न करून देखील त्याला धक्का पोहचवू शकले नव्हते. जेंव्हा मला माझ्या चुकांची उपरती झाली तेंव्हा मी राकेशसोबत आपल्या गावी गेले होते पण तूम्ही गाव सोडून गेला होता. मी आणि राकेशने तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागलं नाही. 

दोन वर्षांपूर्वी एका अपघातात राकेश मला कायमचं एकटीला टाकून देवाघरी निघून गेला आणि त्याचं अपघातात मी माझा पाय....! हे कमी होतं की काय म्हणून मागील सहा महिन्यांपूर्वी लकव्याचा अटॅक आला आणि त्यात माझी वाचा गेली. माझ्या कर्माची फळं मी आज भोगतेय. तुमची क्षमा तरी मी कोणत्या तोंडाने मागू. तरीही शक्य झाल्यास मला माफ करा बाबा. मी तुमची अपराधी आहे. 

तुमची दुष्ट आणि अभागी सून,

स्मिता.


पत्र वाचता वाचता वसंतरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तसेच ते उठले आणि स्मिताच्या खोलीत गेले. वसंतरावांना समोर पाहून भरल्या डोळ्यांनी स्मिताने त्यांना हात जोडले.


" गप्प अजिबात रडायचं नाही. तू वृद्धाश्रमात नाही तर स्वतःच्या सासरी आली आहेस पहिल्यांदा आणि हा क्षण तर साजरा व्हायलाच हवा. मी लगेच कमलला सांगून आज जेवणात पुरणपोळीचा बेत करायला सांगतो." वसंतरावांनी डोळे पुसत आपला हात तिच्या डोक्यावर डोक्यावर ठेवला तसं स्मिताला गहिवरून आलं.


सुनिता मधुकर पाटील.

10/12/2022


तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. असेच आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास माझ्या मधुनिता या फेसबुक पेजला नक्की follow करा. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract