Smita Bhoskar Chidrawar

Comedy Inspirational Others

4  

Smita Bhoskar Chidrawar

Comedy Inspirational Others

उदरभरण...स्टाईल अपनी अपनी

उदरभरण...स्टाईल अपनी अपनी

7 mins
334


आम्ही अमेरिकेत आल्यापासून इंडियन रेस्टॉरंट मध्ये पहिल्यांदाच आलो होतो...मस्त बुफे होता...इडली सांबार , डोसा , अनेक चटण्या , भाज्या , गरम गरम तंदुरी रोटी , खीर असा बराच मोठा मेनू होता...आम्ही बसलो त्या टेबल शेजारी एक अमेरिकन कुटुंब बसलं होतं...हे अमेरिकन लोक कधीकधी चेंज म्हणून आपलं भारतीय जेवण जेवतात म्हणे...

तर तो बिचारा अमेरिकन वेटरच्या मदतीने ताट वाढून घेऊन बसला...त्या ताटातील पदार्थ कसे खावेत हे त्याला न सुटलेलं कोड होतं ...

बिचारा ती तंदुरी रोटी चाकू आणि काट्या चमच्याने तोडण्याचा कसंनुसा प्रयत्न करत होता...मला त्या रोटीचे आणि त्या गोऱ्याचे हाल पाहवत नव्हते...अस्मादिक मदतीला तत्पर होते...इतक्या वर्षांच्या सहवासामुळे नवऱ्याने माझे मन लगेच ओळखले आणि डोळे मोठे करून मला गप्प बसण्यास सांगितले .

तो बिचारा सांबार आणि खीर एकत्र करून रोटीच्यावर टाकू लागला तशी मी हादरले....मला काही बसवेना...

दुसऱ्यांना मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे... आणि आपल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये तर ते निभावणे गरजेचे आहे असा कौल मनाने दिला आणि नवऱ्याच्या डोळ्यांकडे आजिबात न बघता मी बाजूच्या टेबलाजवळ गेले आणि अगदी आनंदाने त्या गोऱ्याला मदत करू का ? म्हणून विचारलं ( इथे असं विचारायची पद्धत आहे...डायरेक्ट नाही घुसता येत..) त्याने लगेच हो म्हणून कौल दिला...

मग मी त्याला कशाबरोबर काय खायचं ते सांगितलं...आणि ती ' रोटी हातानेच खायची असते ' अशी सूचना द्यायची विसरले नाही...आपल्यासारखे तुकडे वगेरे करणं त्याच्या बस ची बात नव्हती म्हणून तो मोठा रोटीचा तुकडा डायरेक्ट डीप करून कसा खायचा ते शिकवलं ...त्याच्या कुटुंबाने माझे खूप आभार मानले आणि तिथल्या स्टाफला सुद्धा त्याच्यासारखे लोक आले तर अशी मदत करत जा म्हणून विनवणी केली...

मी माझ्या तेबलाशी परत आले आणि ते अमेरिकन कुटुंब मस्तपैकी हाताने जेवत असल्याचे बघून समाधान पावले... नवऱ्याने मनातल्या मनात मला हात जोडल्याचे मला स्पष्ट दिसले होते...आता प्रत्येक वेळेस एखादा तरी अमेरिकन हाताने जेवताना मला दिसणार होता आणि मी जिंकल्याचा अभिमान डोळ्यात साठवून नवऱ्याच्या डोळ्यात पाहिलं...तो ' धन्य आहे तुझी , काय करशील याचा नेम नाही...खा कसं खायचं ते आता काही म्हणणार नाही मी ' असे हळूच म्हणाला...आणि समोसा हाताने खाऊ लागला...मला काय समाधान वाटलं म्हणून सांगू...

आता गोंधळून जाऊ नका... थोडं फ्लॅश बॅक मध्ये जाऊया म्हणजे नक्की काय घडलंय हे कळेल...

कोणे एके काळी... नवरोबांची मित्रमंडळी जमलेली होती . आमचे नुकतेच लग्न झाले होते. आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो . पिझ्झा , डोसा , नुडल्स असे अनेक पदार्थ मागवले गेले . सगळेजण काट्या , चमच्याने खाणारे ...पण तो डोसा , पिझ्झा चाकूने कट करायचा आणि मग फॉर्क ने खायचा हे काही आपल्या तत्वात बसत नव्हते .मी आपला मस्त हाताने खात आस्वाद घेत होते . नवरोबानि दोन तीनदा खुणवण्याचा प्रयत्न केला पण मी दुर्लक्ष करून ताव मारला . चारचौघात काही बोलता आलं नाही आणि आपल्या इज्जातीचा भाजीपाला झाला असे आमच्या नवरोबला वाटून गेलं...

दुसऱ्याच दिवशी ऑफिस मधून येताना साहेब पिझ्झा घेऊन हजर ...कालच बाहेर खाल्लं आणि आज परत पिझ्झा म्हणून मी विचारणार होते पण नवऱ्याचे मन कशाला मोडायचे म्हणून आनंद प्रकट केला . आता आम्ही जेवायला बसलो आणि नवरोबा घरातही चाकू आणि फोर्क घेऊन आले आणि माझ्या हातात देऊन मला खायला सांगितलं ....पुढच्या वेळी मित्रांसमोर इज्जत जाऊ नये म्हणून केला गेलेला हा प्रयत्न होता ...पण मी मात्र हातानेच खायला सुरुवात केली . तो काही बोलणार इतक्यात कोणाचा तरी फोन आला आणि तो परत आला तेव्हा माझा पिझ्झा खाऊन झाला होता...

दुसऱ्या दिवशी स्वारी मला घेऊन साऊथ इंडियन हॉटेल मध्ये हजर...आपला नवरा बाहेरखाऊ आहे असे समजल्यावर कोणत्याही मुलीला होईल तितका आनंद मला झाला...खाताना पुन्हा माझ्या हातात तो चाकू आणि फोर्क ...मी ते खाली ठेऊन हाताने खायला सुरुवात करणार इतक्यात " अग राणी हाताने नको ना खाऊस.... बरं नाही दिसत ते...तुला प्रॅक्टीस व्हावी म्हणूनच इथे आणलय तुला..." ( म्हणजे अंदर की बात अशी होती तर...)

मग काय पुढचे दोन तीन घास मी चाकू आणि फोर्क च्या साहाय्याने खाऊन दाखवले . नवरा खुश . आणि मग मात्र मी पुन्हा हाताने खायला सुरू केलं ." मला चाकू आणि फोर्कने खाता येत नाही असं नाही पण मज्जा नाही ना त्यात ...तो बिचारा पिझ्झा चाकूने कट करून खाताना कसातरी होऊन जातो ...आणि हा डोसा हाताने खाऊन बघ जास्त टेस्टी लागतो ..." असे म्हणून त्या डोसाचा तुकडा त्याच्या तोंडात कोंबून त्याचं तोंड बंद केलं .

यानंतरही अनेक निष्फळ प्रयत्न झाले पण 'आपला हात जगन्नाथ ' हे काही मी विसरलेली नाही .आता नवरा सोबत कोणी असताना असे पदार्थ मागवायचे टाळतो ...

अमेरिकेत यायचं ठरलं तेव्हा तर नावरोबानी ' आता तिकडे गेल्यावर काय करशील ? खावच लागेल ना आता काट्या चमच्याने ? प्रॅक्टिस सुरू कर आता...' असा टोमणा मारला होता...

त्याचे घाव अगदी वर्मी लागले होते...ते आता पूर्ण भरून गेले आहेत ....

( नवरोबा मला फारसे सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाहीत हे काही वेगळं सांगायला नकोच )


हे झालं काट्या चमच्याने खाण्याचं..पण काही काही लोक सगळं हाताने खातात , अगदी काहीही...

काही प्रांतातले लोक आपल्या हातावर इतकं प्रेम करतात की चमच्याने खाणं त्यांना माहीतच नसतं . चमचे कष्याशी खातात हे त्यांना माहितीच नसतं .

आम्ही नवीनच बंगलोरला शिफ्ट झालो होतो . एका नवीनच राहायला आलेल्या कुटुंबाकडे वास्तूशांतीच आमंत्रण आलं . केळीच्या पानावर जेवण वाढत होते . मीठ , कोशिंबिरी , अनेक भाज्या वाढल्या जात होत्या . ( एकही वाटी नव्हती . सगळं काही डायरेक्ट पानाताच वाढल होतं ) मला काही कळायच्या आतच भाताचा छोटासा डोंगर पानात आला आणि त्या बरोबरच क्षणार्धात सांबार त्या डोंगरावर वाहू लागला . आता सगळ्या पदार्थांनी आपापल्या प्रेमाची कबुली देऊन , एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेल्या जिवाप्रमाणे एकत्र यायला सुरुवात केलेली होती . मीठही त्यात सामील झाले होते .

मला मात्र या सगळ्यांचे प्रेम ओसंडून वाहू लागले तर काय ? याची काळजी होती . त्या प्रेमाला वेळीच बंधन घालने फारच आवश्यक होते . माझ्या मदतीला एकही चमचा , वाटी काहीच नव्हतं . खिरही ग्लासमधे वाढलेली होती . बाकीच्या लोकांनी मस्तपैकी खायला सुरुवात केलेली होती . त्यांचे मोठेमोठे हाताच्या ओंजळीने जाणारे घास आणि माझ्या इवल्या इवल्या बोटांनी माझ्या पोटात जाणारे घास , रस्सा न ओघळू देता खाण्याची पद्धत आणि या सगळ्यात माझी झालेली अवस्था त्या पानातल्या मिठासारखीच होती . हौसेने नेसलेल्या नवीन साडीवर तिथे असणाऱ्या सगळ्या पदार्थांवर आपली छाप पाडली होती . नशीब माझं लहानग कोकरू माझ्याजवळ बसलं होतं . ' मम्मा हे लोक न्यू आहेत ना म्हणून त्यांच्याकडे बाउल्स , स्पून नसतील . आपल्या घरून आणून दे ना तू त्यांना ' असं म्हणून माझी आणि स्वतःची समजूत काढत होतं .

मी मात्र माझ्या साडीवर पडलेल्या डागांसाठी उगीचच माझ्या लेकराला रागवल्यासारख करून जणू त्यानेच माझ्या साडीवर अन्न सांडले अशी इतरांची समजूत करून दिली आणि मनातल्या मनात त्याची माफी मागून मोकळी झाले . ( त्यानंतर काही दिवस मी पर्स मध्ये चमचे घेऊन फिरत होते . )

सकाळची वेळ , नवरा , मुलं यांना घालवून मैत्रिणीसोबत मस्तपैकी मॉर्निंग वॉक घ्यावा आणि मग मैत्रिणींनी डोसे खायला बोलवावे म्हणजे काय आनंद हे मी काय वेगळे सांगायला नकोच .घरी आपण डोसे करतोच पण स्वतः करून खाईपर्यंत थंड होतात आणि सगळी मज्जाच जाते.पण आता गरम गरम आयते डोसे खाण्याचे कश्याला सोडा म्हणून मी मैत्रिणीच्या आग्रहाखातर तिच्या घरी हजर झाले. तिने गरम डोसा माझ्या प्लेट मध्ये वाढला आणि मला काही समजायच्या आतच त्याच प्लेट मध्ये गरम सांबार वाढला . अरे देवा , आता कसं करायचं ? तो बिचारा डोसा केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होता.त्या डोश्याच आणि संबाराच कधीच मिलन झालं होतं आणि दोघेही आता माझ्याकडे अगदी मलूल नजरेने बघत होते . शेवटी कसाबसा तो डोसा संपवला . आता मात्र मी वाटी मागण्याचे धाडस करायचे असे मनोमन ठरवले होते तितक्यात मैत्रिणीने पटकन दुसरा डोसा माझ्या प्लेट मध्ये वाढला आणि मला आवडतो म्हणून यावेळी जरा जास्तच सांबार भस्कन वाढून मोकळी झाली . तिच्या प्रेमाचा तो लगदा कसाबसा संपवून मी पटकन उठणार इतक्यात तिने स्टीलच्या ग्लास मध्ये कॉफी दिली . आता ही कॉफी पिणं म्हणजे माझ्यासाठी फारच अवघड गोष्ट आहे . एकतर हे लोक साखर कॉफी मध्ये मिक्स करत नाहीत ती त्या स्टीलच्या एका छोट्या भांड्यातून ग्लासात अशी वर खाली दोन तीनदा ओतायची आणि मग प्यायची अशी पद्धत आहे .( आधीच तो स्टीलचा ग्लास किती पोळतो आणि त्यात वर खाली न करता कॉफी पिली तर तिची टेस्ट येत नाही म्हणे . ) 

इतक्या भानगडी करत बसण्यात हात पोळतो , मग तोंडही . पण काय करणार आलिया भोगासी...( नंतर आम्ही मैत्रिणींनी मिळून माझ्या आग्रहा खातर या मैत्रिणीला गिफ्ट म्हणून एक डझन कप आणि बाऊलस् दिले होते . आणि मी सुद्धा पर्समध्ये चमच्या सोबत बाऊलस् ठेवण्याचा विचार पक्का केला होता .)

त्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा असाच अनुभव....आमचं ट्रेनिंग होतं आठ दिवसाचं . दुपारचं जेवण तिकडेच असायचं . इथे पोळ्या , भात , दोन ,तीन भाज्या , वरण वगैरे असायचं . इकडे चमचे होते पण पुन्हा बिना बाऊलच खाणं आलं . मी आपली अगदी थोड्या थोड्या भाज्या सोबत पोळी घेऊन खात होते . आता मात्र मी सगळ्यांचे मिलन होऊ न देता खाण्याचा चंग बांधला होता . आणि अगदी व्हीलन प्रमाणे मी ते मिलन रोखण्यात यशस्वी झाले होते . इकडे चमचे मदतीला होते त्यामुळे अजुनच आनंद होता . मी चमच्याने भात खात होते . बाकीच्या लोकांना माझ्या खाण्याबद्दल बरेच प्रश्न पडले होते . बहुतेक सगळेजण अगदी मनसोक्त ताटात भाज्या वाढून पोळीत मिक्स करून खात होते . भात तर विचारूच नका .

माझ्या खाण्याच्या पद्धतीमुळे मी सगळ्या पदार्थांवर अन्याय करते आहे असे वाटून न राहवून एकीने मला ' तू अशी का खातेस ? नीट खा की . असा कसा भात खाते तू ? आम्ही जर असं खाल्ल तर आमच्या घरी ओरडतील ' असे चक्क विचारले .

मी पण उत्तर दिले ' आमच्याकडे असं हात बरबटून खाल्ले तर ओरडतील . पूर्ण हात भरवून तुमच्यासारखा भात खाल्ला तर आजही धपाटे मिळतील आम्हाला . तुम्हाला खायचं तसं खा . मलाही खाऊ दे माझ्या पद्धतीने . नको काळजी करू इतकी .' 

अश्या एक ना अनेक तऱ्हा...पण शेवटी उदर भरण ते कसही करा...शेवटी प्रत्येकाची स्टाईल ज्याची त्याला लखलाभ .

आनंदी राहा ...आनंदाने खात रहा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy