डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

3.4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

तिच्या प्रेमाची गोष्ट

तिच्या प्रेमाची गोष्ट

4 mins
160


एखादे लग्न म्हटले की मला आठवते माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची गोष्ट. अगदी फिल्मिस्टाईल वाटणारी ही गोष्ट, तुम्हालाही नक्कीच आवडेल कारण प्रेमाचा सच्चा रंग इथे पुरेपूर भरला आहे....


राशी माझी मैत्रीण, आमच्याच सोबत शिकत असलेली ही आमची मैत्रीण. थोडीशी ठेंगणी पण गोरी, लांब सडक केस असलेली . स्वभावाने अतिशय गोड. हिंदी साईडर. हिचं बोलणं, चालणं इतकं हळुवार होतं की आम्ही सगळे हिला 'स्लो मोशन' म्हणायचो. आमच्याच ग्रुपची असलेली ही आमची खास मैत्रीण. आम्ही हॉस्टेलला राहणाऱ्या असल्याने आमचे खास लाड पुरवणारी आमची ही मैत्रीण अगदी जिवाभावाची होती.


आमचं सगळं नियमित सुरू असतांना वादळ यावं तसा तो तिच्या जीवनात आला. शिव, तिच्या भावाच्या मित्राचा मित्र. त्याचं शिक्षण झालं आणि इथे चांगली ऑफर आल्याने या नव्या शहरात तो वास्तव्याला आलेला. काही दिवसातच त्याची काही समवयस्क लोकांशी मैत्री झाली आणि त्यांच्या थ्रू त्यांच्या मित्रांशी. अशा प्रकारे तो राशीच्या भावाशी मित्रत्वाने जोडला गेला.


आज राशी कडे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनची पार्टी होती. आणि हा दिवस म्हणजे राशीचा जन्मदिवस. त्यामुळे सेलिब्रेशन अजून जोरदार व्हायचं. आज राशीनी पण तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींना बोलवलं होतं पार्टीला. आम्ही हॉस्टेलवाल्या त्यामुळे आम्ही जायचं टाळले पण आमच्या मधल्या तिघी राशीच्या फास्ट फ्रेंड्स घरच्यांची परमिशन घेऊन मात्र या कार्यक्रमाला गेल्या. राशीच्या भावानेही नव्या मित्राला आमंत्रण दिलं. झालं या पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि एकमेकांना आवडायला लागले. हळूहळू नजर भेट, प्रपोज करणे वैगरे गोष्टी झाल्या.

राशी घरी अतिशय लाडाची. अजून एक छोटी बहीण आणि दोन मोठे भाऊ. असा परिवार. भाऊ एकदम चांगले पण या अशा प्रकारांना भावांचा तीव्र विरोध. त्यातल्या त्यात राशी पडली हिंदी साइडर आणि शिव चक्क महाराष्ट्रीय. त्यातल्या त्यात गोरी पान, सुंदर, ठेंगणीशी राशी BAMS होऊन इंटर्नशीपला असणारी आणि उंचपुरा सावळा शिव MSSc pesticides करून नोकरी करणारा. आम्हाला मैत्रिणींना सुद्धा या जोडीचा कुठे काही मेळ वाटत नव्हता.

तर घरचे राजी होतील ही दूरची गोष्ट!


राशी मात्र त्याच्या प्रेमात पूर्ण बुडालेली. हिला कितीही समजावले तरी ही या वाटेवरून ढळणार नाही हे आता आम्हाला पक्कं समजलेलं. तिचा त्याच्यावर इतका विश्वास होता की आम्ही कल्पनाच करू शकत नव्हतो. याआधीची राशी शांत ,सामान्य वाटणारी आणि आताची राशी प्रेमासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असणारी.

आम्हाला मात्र तो जुगार वाटत होता! हिला याच्यापेक्षा अजून चांगला मुलगा मिळू शकतो ही आमची कल्पना! राशी पण आमची मनस्थिती समजून होती. तिनी मात्र पूर्ण विचारांती हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. आमची सगळ्यांची त्याच्याशी भेट घालून दिली. त्याला भेटल्यावर आम्हाला सुद्धा थोडा विश्वास वाटायला लागला. पण राशीचा भाऊ या लग्नाला तयार होणं अजिबातच शक्य नव्हते.


आमची इंटर्नशीप सुरू असलेली. हॉस्पिटलवरून आलो की आमचा सगळा जत्था आमच्या हॉस्टेललाच. त्यातल्या त्यात राशीची लहान बहीण या गोष्टीच्या अगदी विरुद्ध असल्याचे राशीच्या लक्षात आले त्यामुळे आता आम्ही आणि आमचे हॉस्टेल हेच या सगळ्या गोष्टींच्या खलबताचे केंद्र बनले. अगदी निरोपांची देवाण घेवाण पासून तर तिला त्याला भेटायला पोहचवणे इथपर्यंत सगळी कामे आम्ही मैत्रिणींनी पद्धतशीर पार पाडली. एक सुरक्षित उपाय म्हणून नोंदणी पद्धतीने आमच्या एक दोन वर्गमित्र असलेल्या मुलांच्या साक्षीने लग्नही पार पडले.


पण राशी आणि शिव दोघेही अविचारी नव्हते. त्यांनी घरच्यांच्या संमतीनेच सगळे करायचे हे पूर्णतः ठरवलेले. हळूहळू गोष्ट घरी माहित झाली. भाऊ, आईचा, बहिणीचा तीव्र विरोध. वडील मात्र थोडे सुधारणावादी विचारांचे होते. राशीला ते लहानपणापासून ओळखत होते. आपली मुलगी अविचारी नाही हे त्यांनाही माहित होते. मुलाबद्दलही जुजबी माहिती होतीच. वडिलांच्या स्वभावाची कल्पना असल्याने राशीने सुद्धा आपली बाजू त्यांच्या जवळ मांडली आणि राशीचे बाबा मात्र या लग्नाला तयार झाले.

राशीच्या बाबांनी आर्य समाज मंदिर मधून त्यांचे लग्न लावून दिले आणि खऱ्या अर्थाने ते समाजसुधारक असल्याचे दर्शवून दिले. लग्न अतिशय साधेपणाने काही मोजक्या लोकांच्या आणि आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत आनंदात पार पडले. बिचारी राशी बाबा सोडता सगळे या लग्नाच्या विरोधात. त्यामुळे लग्नाच्या वेळी तिच्यापेक्षा आमची तयारी बरी दिसत होती. पण तिच्या लेखी ही क्षुल्लक गोष्ट होती.


आता लग्न तर लागले होते. आता पुढच्या संसाराचे काय? आम्हालाही चिंता होतीच. लग्नानंतर काही दिवसातच शिवच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याकाळात आपली इंटर्नशीप वगैरे सगळे सांभाळून राशीने सासूची खूप सेवा केली. त्यातच तिचे मिसकॅरिएज झाले. सासू बाई गेल्या. .


शिवने आता राशी च्या पंखात बळ भरले होते. तिचा जिद्दी स्वभाव, सेवाभावी वृत्ती आणि कोणतीही गोष्ट तडीस नेण्याची तिची पद्धत हेरून त्याने तिला प्रोत्साहन दिले. जिद्दी राशीनेही नवऱ्याचा विश्वास सार्थ ठरवत अत्यंत मेहनतीने स्वतःचे एक विश्व उभे केले. काही दिवसातच ती एक उत्तम चिकित्सक म्हणून नावारूपास आली.


मधल्या काळात वारंवार होणारे तिचे गर्भपात या सगळ्यांना अडथळा न मानता जिद्दीने ती उभी राहिली. पंचकर्म मधे MD नसतांनाही आपल्या अनुभवातून आपली रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस करून अत्युच्च यश मिळवले. पुढे तीने पंचकर्म मधे MD सुद्धा केले.आज ती एक प्रथितयश डॉक्टर आहे. उशीराने का होईना त्यांच्या संसार वेलीवर एक गोंडस फुलही उमलले आहे .

आज सर्व सुख या जोडीच्या पायाशी लोळण घेत आहेत. दोघांचेही एकमेकांवर अगदी दृष्ट लागेल इतके अतूट प्रेम आहे. या दोघांचे घर म्हणजे आम्हा मैत्रिणींचे माहेरघर आहे.


अशी होती ही एका प्रेमाची सुफळ संपूर्ण कथा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance