Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

सुखाची गुरूकिल्ली

सुखाची गुरूकिल्ली

7 mins
142


रखमाने आतून आपल्या सुनेला हाक मारली, ' बाय मंजू आज शिदोरी घेऊन शेतावर जाईल का? माझ्या अंगात कणक भरलीया जाईल कां तू?

" होय माय जाईन की" असे म्हणून मंजू जायची तयारी करू लागली. तिच्या सासूने सगळी तयारी करून ठेवली. पाण्याची कळशी भी भरून ठेवली.

अंजूला अर्धा तास झाला तयारी करायला. सासून पुन्हा हाक मारली "मंजे, चल ये बिगी बिगी. लई वखत झालाय. बाप पोरगं भुकेलं असेल !"

शेतावर जायच तरी मंजू बाजारात जायची तयारी केल्यागत नटून तयार झालेली. तिच्याकडे पाहून रखमा गालात फक्त हसली. काही झालं तरी तिच्या भावाचीच पोरगी सून म्हणून आणलेली. आता म्याच साभांळून घ्यायला हवं म्हणून रखमा शांतच राहिली.

मंजू दोन चार वेळा शेतावर गेलेली माय संग. पण आज तिला एकटीलाच जावे लागणार होते. मनात थोडी ती धास्तवली होती तरी सासूच ऐकायला हवं अन् पतीदेवला भी बघता येणार होतं. सासूने तिच्या डोक्यावर शिदोरीची टोकरी व कडेवर कळशी दिली आणि जायला सांगितले. तशी मंजू कोपऱ्यातली चप्पल घालू लागली तशी रखमा बोलली," अगं व्हाण कशापायी घालतीया शेतात तर जायच हाय ना?"

"पण, पायाला दगड लागतील ना"

"काय भी लागत नाय जा तशीच"

मंजू नाईलाजाने तशीच निघाली शेतावर जायला.

त्यांच शेत घरापासून जरा लांबच होते. त्यांच्या शेती अगोदर

आणखी दोघा तिघांची शेते होती. मंजू इकडं तिकडं पाहत डुलत डुलत चालली होती. बांधावरून चालताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडणारच होती पण शेजारच्या शेतात रामू जवळच तिथे काम करत होता . तो तिच्याकडे पाहतच होता. ती पडणार एवढ्यात त्याने तिला साभांळले . शिदोरीची टोकरी रामूने झेलली तरी कळशीतले अर्ध-उणे पाणी सांडलेच.

मंजू घसरताना घाबरलेलीच त्यात रामूने आधार दिल्याने तिची धडधड जास्तच वाढली. कशीबशी सावरत रामूचे आभार मानून ती तिच्या शेताकडे निघाली. तिथे काम करणाऱ्या बाया जोराने ओरडल्या, "अगं मंजे जपून चाल की, घाई कशापाई करतीया. अन् आज तुझी माय नाय तुझ्या संगती?"

"मायला बरं वाटत नाही म्हणून मीच एकटी आलेयं"

"असं व्हय. जा बरं नीट"

नेहमी पेक्षा आज दुपारच्या जेवणाला वेळ झाला होता. शेतात बाकीचे लोक आप आपले जेवण घेऊन बसले होते. मंजूचा सासरा आणि नवरा मात्र अजून शेत नांगरत होते. तिला येताना पाहून गणू त्याच्या बापूला बोलला, "बा मंजी येतयं आता काम थांबवुया" त्याच्या बा ने भी लगेच नांगर थांबवला. आणि बैलाना मोकळं करून गणूला त्यांना चारा पाणी द्यायला सांगितले. हात पाय दोघे धुऊन येई पर्यंत मंजुने दोघांना वाढून ठेवले. आज झुणका भाकर व मिरचीचा ठेचा होता. ते बघून बाप लेक दोघे बोलले,"वाह ! आज झक्कास हाय बेत ! भूक भी जाम लागलीय." घ्या खाऊन मायने भी भरपूर दिल्यात भाकऱ्या" मंजूने सांगितले

"मंजे, तू भी खा आमच्या संगती"

"नको मी माय संगती खाणार"

तेव्हा बापू बोलला, "अगं बाय दोन घास खा. गणू दे तिला तुझ्यातले."

तिने किती ही नाही म्हटले तरी झुणका भाकरीचा घास गणूने तिच्या हाती दिलाच अन् तिला तो खावा लागलाच. नवऱ्याच्या हातून घेतलेला घास तिला आवडल्याने आणखी चार घास कधी खाल्ले तिला कळलेच नाही. त्यांच जेवून झाल्यावर ती परतली. आता ती घाई घाईने चालू लागली. आपण दोन घास खाल्ले माय घरी माझ्याकरता थांबलेली असणार म्हणून ती झपझप चालू लागली. वाटेत दुसऱ्या बायका तिला थांबायला सांगत होत्या पण माय जेवायला थांबलीय असं सांगून ती चालतच राहिली. मागे त्या बायका माय सुनेच्या प्रेमळ नात्याबद्दल बोलत होत्या.

खरंच सासू सुनेचे नाते खूपच छान होते. भावचीच मुलगी आणली तरी आत्या सासू झाली की ती सगळ्या सासवा सारखीच सासू झालेली पाहायला मिळते पण, मंजू खरच भाग्यवती होती. सासू सुनेचे मेतकूट छान जमले होते. भावाची मुलगी मागून आणली तर तिला नेहमी आनंदित ठेऊन आपल्या गणूचा संसार सुखाचा करावा असे ध्येय आत्याचे होते. आणि आता माय असली तरी आपली प्रेमळ आत्या सदा खुश ठेवावी असा विचार मंजू करून एकमेकांना साभांळून राहत होती.

मंजू घरी आली तेव्हा सासू झोपली होती. मंजू त्यांना हाका मारल्या तरी उठली नाही मग तिने "माय , माय उठ ना " असे म्हणून ती त्यांना उठवायला गेली तर मायला खूप ताप भरला होता. तिने त्यांना उठवून घरात होती ती तापाची गोळी दिली आणि मायला पेज करून भरवली. थोड्या वेळाने मायला बरं वाटलं.

संध्याकाळी मायची खबर घ्यायला शेतातल्या बायका आलेल्या. बोलता बोलता मंजू बांधावर पडली असती व रामूने तिला साभांळल ही गोष्ट त्यांनी तिच्या मायला सांगितली. मंजूने हे कुणाला सांगितले नव्हते. तिच्या मते ती मामुली गोष्ट होती. पण बायकांनी तिखट मीठ लावून मायला सांगितली तेव्हा तिला चीढ आली होती. मायच्या खबरेचा बहाणा करून बाया येऊन आग लावून गेल्या. त्या बाया एवढ्यावरच थांबल्या नव्हत्या तर शेतावरून परतताना गणूला पण त्यांनी सांगितले, " आज रामूमुळे दुपारचं खायला मिळाले गणू तुमास्नी रामू नसता तर सगळ सांडल असतं' आणि मंजू कशी पडली असती हे सांगितले.

मंजूने ही गोष्ट दुपारी का नाही सांगितली यावर तो विचार करू लागला. त्याच्या मनात पाल चुकचुकली!

संध्याकाळी बाप-लेक घरी आले तेव्हा मंजूने रोजच्या सारखी चा आणि खायला बिस्कीट आणून ठेवले. पण आज गणूचा मुड नव्हता. त्याने चहा नको म्हटले. मायने विचारले "काय झालं रे कशापायी चा पीत नाही."

तेव्हा त्याच्या रागाचे कारण त्यांने सांगितले. ते ऐकून माय बोलली, " अरे त्या बया इथं भी आल्या व्हत्या.आणि मंजूने मला भी काय झालं ते सांगितलं." मंजूची भी चूक नाय रामू ऐवजी तू असता तर गुमान राहिला असता का तू भी बाईला साभांळलं असतं ना?"

गणू एक सांगते त्या बाया लई वंगाळ हाय. आपला सुखातला संसार त्यांच्या डोळ्यात खुपतो"

"अगं माय ही गोष्ट मंजू मला का नाय बोलली. त्या बायांनी का सांगावी म्हनतो मी"

"त्यात काय सांगायला पाहिजे. दुपारचं जेवण मातीत सांडलं असतं तर तिन पडल्याच सांगितले असतं की"

"माझ्या अंगात कणक भरली होती. आणि नंतर ताप भी भरला होता. मंजूने दवा दिली आणि पेज भी करून भरवली. तेव्हा आता बरं वाटतयं. त्या बाया भी इथं येऊन आग लावून गेल्या.

मेल्याना सुख बघता येत नाय."

हे सगळं ऐकल्यावर गणू शांत झाला. मायने चा गरम करून मंजूला आणायला सांगितले. आणि तिने ही लगेच आणून दिला.

रामून मला सावरलं याचा नवरोबाला राग आल्याच कळल्याने तिचे मन दुखावले व तिला खूप वाईट ही वाटले.

खरं म्हणजे मंजू तालुक्यात राहत होती. दोन चार बुकं भी शिकली होती. त्या मानाने गणू थोडा अडाणीच होता.

तिच्या बापाने व आत्याने त्या दोघांचे पाळण्यात लग्न लावलेले. मंजूला गणू आवडत होता. लहानपणी दोघं बरोबर खेळत बागडत होती. पण वयात आल्यावर लग्नाचा विचार काढला. आणि हुंडा भी काही नसल्याने आपल्या आवडत्या माणसां बरोबर संसार करायचा म्हणून लग्न करून मंजू खेड्यात आली. तिला शेतातली काम येत नव्हती तरी तिच्या आत्याची ती लाडकी सून होती. तिचं वागणं खेड्यातल्या पोरीपेक्षा वेगळे होते. आणि तेच सगळ्यांच्या नजरेत येत होते.

सहसा सगळीकडे सासू सूनेच कधी पटतच नसते. अडाणी अथवा शिक्षित सासू सुनेला एक अभिशाप लागल्यासारखे

रोज खटके उडतातच. आता शिकलेले लोक बाहेर एक अन् घरात वेगळे करतात पण अशिक्षित लोक सासू सुनेचे तंटे जग जाहीर करतात. पण मंजू सुन आणि माय सासू एक अजबच कोडे होते. त्या दोघांचा सलोखा खेडेगावातल्या कागाळ्या करणाऱ्या बायकांना खुपत होता. कुणाचे भांडण ,तंटा झाले तर निवांत बसतांना त्यांना चांगला विषय चघळायला मिळायचा.

मंजूचे लाड सासू करायचीच आणि तिचे सासरे ही तिचे मुली प्रमाणे कौतुक करत होते. तिला लिहिता वाचता येत असल्याने तिला शेत मालाचा जमा खर्च सगळं त्यांनी तिला सोपवले होते. मंजू ही मन लावून चोख कामे करत होती.

गणू रामूमुळे थोडा नाराज झालेला त्याचे मंजूला वाईट वाटले होते. तो राग व्यक्त करण्यासाठी त्या रात्री ती मायला बरं नाही म्हणून माय संगती झोपली होती. आणि गणूने हे बरोबर ओळखले होते. त्या रात्री त्याच्या बापाने सुद्धा चार गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. बाजाराला जाणार तेव्हा तिच्यासाठी एक पातळ भी आणायला सांगितले. बायकांचा राग घालवण्या करता ही एवढी वस्तू दिली की बायका खुश होतात म्हणून सांगितले.

बापलेक आठवड्याच्या बाजाराला तालुक्याच्या जायचे तेव्हा कधी कधी मंजू भी आपल्या माहेरी जाऊन येत असे.

रविवारी बाजारचा दिवस होता. मंजूच भी आईबापूला भेटायला जायचे ठरले होते. पण या वेळेला ती गेली नाही. मायला बरं नाही हेच कारण सांगून ती घरीच थांबली.

गणू ही तिचा राग समजून चुकला होता. बाजाराच सगळं काम झाल्यावर त्याने तिच्या करता साडी, बांगड्या आणि सर्वांकरता जिलेब्याही घेतल्या. बाजारात रामू दिसताच तो मूद्दाम त्याच्याकडे जाऊन बोलला. 

"रामू, काल तुझ्यामुळे दुपारच्याला जेवायला मिळाले. तू मंजूला सावरले म्हणून झुणका भाकर खायला मिळाली. आणि तुझ्यामुळे मंजुला भी काही लागलं नाही. खूप आभार तुझे".

"अरे त्यात काय आभार मानतो? मी बांधा जवळ होतो म्हणून ताईला सावरू शकलो. लांब असतो तर काहीच करू शकलो नसतो."

"आज सांजला ये की घरी. जिलेब्या घेतल्यात. समध मिळून खाऊ"

'बरं बाबा मी भी काही तिखट घेऊन येतो" असं म्हणून तो भजी घ्यायला दुकानात गेला.

संध्याकाळी रामू आणि त्याची छोटी बहीण सुध्दा जिलेबी व भजी पार्टीला आली होती. मायला भी आता खूपच बरं वाटत होते. मंजू भी गणूचा राग विसरली होती . नवीन साडी व आपल्या आवडीचा साडीचा रंग पाहून ती जास्त खुलली होती.

बापाच्या सांगण्याने गणूने मंजुच्या मनाची तेढ भी नाहिशी केली होती.

अख्या गावात कौतुक करून वाखाण्यासारखे त्यांचे घर होते.

चौघाच कुटुंब गुण्या गोविंदाने वावरत होते. कुठे बोट दाखवायला जागा नव्हती. आणि हे सगळं छान जुळले होते. ते चौघेही एकमेकांना समजून घेत होते. सासू लेक च नातं आई व मुली सारखे झाले होते. सहसा असा कौटुंबिक सलोखा आज काल आढळणे कठीण असले तरी,मंजूचे सासर त्याला अपवाद होते. पैसा अडका जास्त नसला, घरदार मोठे नसले तरी आहे त्यात समाधान मानून एकमेकांना जीव लावणारी एकमेकांची नाळ सुखी संसारात गुंतलेली आणि गुण्यागोविंदाने राहणारी ह्यालाच स्वर्ग सुख नाही तर काय म्हणायचे !!

  समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational