नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

सुगी

सुगी

3 mins
133


मोहनलाल चिंताग्रस्त होऊन आपल्या डोक्याला हात लावून बसला होता. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. दोन दिवस झालं पाऊस एकसारखा चालूच होता. ऐन सुगीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावून मोहनलालची चिंता वाढविली होती. मोहनलाल आणि राधा हे दोघेही शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. स्वतःची एक गुंठा जमीन देखील त्यांना नव्हती, दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून ते कसेबसे आपले व आपल्या दोन लेकरांचे पोट भरत होते. सप्टेंबर व ऑक्टोबर महिना म्हणजे त्यांचा सुगीचा काळ. वर्षभरातील कमाई या दोन महिन्यांच्या सुगीच्या काळात ते दोघे कमावित असत आणि त्याच्यावर त्यांचा वर्षभराचा गाडा चालत असे. या महिन्यात उडीद, मूग, सोयाबीन सारख्या पिकांची कापणी व्हायची आणि त्यांच्या हाताला काम मिळून ते थोडेफार पैसे गोळा करायचे.

यंदा मान्सूनने चांगल्या पावसाची बरसात केली होती आणि सर्व रान हिरवेगार दिसत होतं. यावर्षी खूप पाऊस पडणार असा हवामानाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे स्वारी जाम खुश होती. यावर्षीच्या सुगीत दोन पैसे जास्त कमाई करण्याचा संकल्प दोघांनी मिळून केला होता. राधा देखील तसे स्वप्न पाहू लागली. तिला चार वर्षापूर्वीची तिची अवस्था जाणवू लागली. मोहनलाल सोबत लग्न झालं त्यावेळी मोहनलाल गावातील एक रिकामटेकडा आणि दारू पिणारा म्हणून सर्वाना परिचित होता. एखादी दारूची शिशी मिळाली की, तो पडेल ते काम करायचा. सायंकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि राधासोबत भांडण करायचा. दारूसाठी कधी कधी राधाकडे पैश्याची मागणी करायचा आणि तिने दिलं नाही तर तिला मारहाण देखील करायचा. राधा दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून एक-एक पैसा जमा करायची आणि मोहनलाल तोच पैसा दारू पिण्यात बरबाद करायचा. तिच्या या त्रासाला कंटाळून ती एकदा घर सोडून माहेरी गेली, दोन-चार महिने आलीच नाही. तरीदेखील मोहनलालच्या वागण्यात आणि बोलण्यात काही एक फरक पडला नाही. माहेरी एक-दोघांनी नवऱ्याची दारू सोडविण्यासाठी अमुक गावाला औषध दिले जाते आणि त्याची कायमची दारू सुटेल अशी युक्ती सांगितली. ती युक्ती तिला देखील पटलं होतं. तो प्रयोग आपल्या नवऱ्यावर करावं म्हणून ती परत आली. काही दिवसांनी ती मोहनलाल घेऊन त्या गावाला गेली. त्या गावी जाईपर्यंत मोहनलालला काहीच कल्पना नव्हती. तेथील ते चित्र पाहून तो गोंधळून गेला. मी औषध पिणार नाही असे म्हणू लागला. पण माहेराहून राधाचे काही नातलग तिथे आले होते. त्यांनी मोहनलालला सोडले नाही आणि जबरदस्तीने ते औषध पाजविले. औषध घेतल्यावर त्या व्यक्तीने मोहनलालच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि गावी जाण्यास सांगितलं. त्या दिवसापासून मोहनलाल दारूला कधीही स्पर्श केला नाही. दारू सुटल्यामुळे त्याच्या डोक्यात काहीतरी काम करण्याविषयी प्रकाश पडला. त्याच्या संसार वेलीवर दोन फुले उमलली होती. त्या औषध पाजविणाऱ्या व्यक्तीने कानात काय सांगितले ? राधाने त्याला कित्येकदा विचारलं होतं पण त्याने ते गुपित काही तिला सांगितलं नाही. ते दिवस आठवले की राधाच्या अंगावर आजही काटा उभा राहतो.

श्रावण महिना संपला होता. पावसाची धुमशान बॅटिंग चालूच होती. शेतात उडीद, मूग, सोयाबीन हे पिकं जोरकस वाढत होते. यंदा आपली सुगी चांगली होणार याची दोघानाही खात्री होती. परंतु पाऊस नावाच्या राक्षसाने यांच्या सर्व आशेवर पाणी फिरवत होते. सारख्या पडणाऱ्या पावसाने उडीद आणि मूग हातचे गेले होते आणि आता सर्व काही सोयाबीन पिकांवर अवलंबून होते. तोपर्यंत पाऊस नक्की थांबेल असा त्यांना विश्वास होता. गणेश चतुर्थी संपली, दसरा संपला आणि दिवाळी जवळ आली तरी पाऊस काही थांबत नव्हता. सकाळी अन्यथा संध्याकाळी पाऊस रोज हजेरी लावत होता. यावर्षीची सुगी पावसाच्या पाण्यात वाहून जाते की काय ? अशी अनामिक भीती त्यांच्या मनात येऊ लागली. पावसाचा अंदाज घेत घेत सोयाबीन कापणीला सुरुवात झाली. पहाटे सातच्या सुमारास घराबाहेर पडून सायंकाळी सातच्या सुमारास घरी येऊ लागले. दररोज बारा तास काम करू लागले पण सोयाबीनचे शेतं काही संपत नव्हते. यावर्षी पाऊस जास्त झाल्याचा फायदाच झाला. सारी शेतं ओलं असल्याने मशीन शेतात येऊ शकत नव्हते. गेल्यावर्षी या मशीनने मोहनलाल- राधा सारख्या मोलमजुरांचे अर्धे काम हिसकावून घेतले होते. पण यावर्षी रस्त्याच्या बाजूला असलेले शेतं सोडता बाकीची सर्व शेतातील कापणी यांनाच मिळत होती. त्यांचा 15-20 लोकांचा गट होता. जे की सामूहिक काम करत होते. पावसाने जराशी विश्रांती घेतली आणि मोहनलाल व राधा यांची आनंदात दिवाळी साजरी झाली. लेकरांना नवीन कपडे व काही फटाके विकत घेतली. ' देवा, आमच्या हाताला काम दे, आमची सुगी वाया घालवू नको ' असे म्हणून देवाला पाया पडले.


Rate this content
Log in