Nagesh S Shewalkar

Comedy

3.5  

Nagesh S Shewalkar

Comedy

स्फोटक बॅंक

स्फोटक बॅंक

8 mins
208


 नानासाहेब यांनी दुपारची वामकुक्षी घ्यावी या हेतूने दिवाणखान्यातील दिवाणाला लागून स्वतःची पथारी लावली. दिवाणावर त्यांच्या पत्नी नानी या दररोजप्रमाणे पहुडल्या होत्या. चटईवर अंग टाकताना नानासाहेब म्हणाले,

"बा.. बा... बा.. थकलो बुवा. आता थोडी विश्रांती घेतली की..."

"थोडी? अहो, तुमची वामकुक्षी म्हणजे चांगली दोन- अडीच तासांची निश्चिंती असते शिवाय वामकुक्षीच्या नावाखाली असे घोरता ना की माझा डोळ्याला डोळा लागत नाही."

"माणसाने थोडेतरी खरे बोलावे ग. घोरण? माझे? उलट तुझे असे सप्तसूर लागतात ना की माझी झोपमोड होते. शिवाय मध्येच तुझे फोन चालू होतात. नेमका दुपारच्या विश्रांतीसाठी पाठ टेकली ना टेकली की एकतर माझ्या बहिणीचा नाहीतर तुझ्या बहिणीचा फोन येतो. मग 'ठेवू का? ठेवू का?' असे विचारत अर्धा- अर्धा तास बोलत बसता. अग, फोन सायलेंट केलाय ना?..." नाना बोलत असताना त्यांचाच फोन वाजला. ती संधी सोडतील त्या नानी कसल्या? त्या म्हणाल्या,

"बघा. आता बसा अर्धा तास काय तासभर बोलत..." तिकडे नाना अनोळखी क्रमांक पाहून म्हणाले,

"बोला. कोण बोलतंय?"

"मी स्फोटक बँकेतून बोलतोय..."

"ही कोणती बँक म्हणावी? गुन्हेगार लोक घरात पिस्तूल, तलवारी, स्फोटके, बाँब इत्यादी स्फोटक वस्तू लपवून ठेवतात. ती सारी स्फोटके रीतसर आपल्या बँकेत जमा करावीत म्हणून तर ही आपली स्फोटक बँक निर्माण झाली नाही ना? बरे, आपल्या बँकेच्या शाखा कुठे कुठे आहेत हो?" नानांनी विचारले.

"हाऊ ज्योकिंग! सर, मी आपल्या इमारतीच्या खालून बोलतोय. मी व्हेरीफिकेशनसाठी आलोय."

"व्हेरिफिकेशन? काय म्हणता? अहो, मी आयुष्यात मोठमोठे बाँब तर सोडा पण दिवाळीत साधी टिकलीची डब्बी कधी घरात आणली नाही हो..."

"सर, तुम्ही लोनसाठी अप्लाय केले होते..."

"म्हणजे? तुमची बँक आता स्फोटके खरेदीसाठी कर्जपण देतीय का? पण मी अर्ज देऊन कर्ज वगैरे मागितले नाही."

"असे कसे म्हणता? आमच्याकडे जो कर्जाचा प्रस्ताव आलाय त्यावर हाच क्रमांक नोंदवला आहे म्हणून घरी येण्यापूर्वी तुम्हाला फोन केला."

"कर्जाचा प्रस्ताव मी दिला? आयुष्यात कधीही कुणाकडे कर्जासाठी हात पसरला नाही..."

"एक- एक मिनिट! प्रस्ताव सुप्रिया फाटके यांनी दिला आहे. या आपल्या कोण? सूनबाई की सुकन्या?"

"सुप्रिया फाटके? या नावाची ना मला मुलगी आहे, ना सून आहे."

"आपल्या मुलीचे किंवा सुनेचे नाव सांगा ना. कसे आहे, हा प्रस्ताव सुनेने दिला असेल तर तिचे माहेरचे नाव सुप्रिया फाटके असू शकते किंवा आपल्या मुलीचा विवाह झाला असेल तर तिच्या..."

"सासरचे नाव सुप्रिया फाटके असू शकते..."

"मी तेच म्हणतोय. बरे, तुमचे नाव काय?"

"मिस्टर स्फोटक, तुम्ही जे नाव सांगताय त्या नावाचा आणि या घराचा दूर दूर संबंध नाही आणि संबंध नसताना मी माझे नाव का सांगू?..." असे म्हणत फोन बंद करताना नाना कुरकुरले,

'म्हणे सून... मुलगी... नाव सांगा. मुर्ख समजतात हे मला. बनावट माणसे. लोकांना फसवणे सोपे वाटते काय यांना..." तितक्यात त्यांचा भ्रमणध्वनी पुन्हा वाजला.

'आता कोण तडफडले?' असे म्हणत नानांनी भ्रमणध्वनी हातात घेतला त्यावर अनोळखी क्रमांक होता. तो पाहताच कपाळावरील आठ्यांचे जाळे घट्ट करीत ते म्हणाले,

"मी स्फोटक बँकेतून बोलतीय..."

"अरे, व्वा! मॅडम, तुम्ही मनकवड्या आहात का हो?"

"काय झाले सर?" पलीकडून मंजूळ आवाजात विचारले.

"त्याचे काय आहे, माझ्याकडे ना काही गावठी पिस्तूल, गावठी बाँब, अत्याधुनिक पिस्तूल, एके पिस्तूल, काही क्षेपणास्त्रे आणि हो ते परवाच बोलावलेले राफेल विमान आहे. मला तुमच्या स्फोटक बँकेच्या लॉकरमध्ये ते जमा करावयाचे होते. मिळेल का लॉकर?"

"मस्त विनोद करताय सर, तुम्ही! मी तुम्हाला म्हणजे सुप्रिया फाटके यांना फोन केला होता..."

"अच्छा! अच्छा! त्यांना बोलायचे होते का?"

"हो ना. त्यांनी की नाही आमच्या बँकेकडे होम लोनसाठी अर्ज केलाय..."

"हो का? अरे, हे तर मला माहितीच नव्हते. त्यांनी काय प्लॉटवर घर बांधण्यासाठी कर्जाची मागणी केलीय की फ्लॅट घेत आहेत..."

"एक मिनिट हं... त्यांनी की नाही एक फ्लॅट घेण्यासाठी कर्ज... पण ह्या सुप्रिया मॅडमनी तुम्हाला काही कसे सांगितले नाही..."

"अहो, ही आजकालची मुले काही म्हणून काही सांगत नाहीत. एखादे प्रकरण अंगावर आले किंवा एखादे चांगले काम केले की मग एखादा दिग्विजय मिळवावा त्याप्रमाणे फुशारकी मारल्याप्रमाणे सांगतात."

"ह्या सुप्रिया तुमच्या लागतात कोण?"

"कुणीच लागत नाही. आत्ताच तुमच्या माणसाचा फोन आला होता. त्यालाही मी हेच सांगितले..."

"होय ना. ते आमचे फिल्ड ऑफिसर आहेत. त्यांनीच मला फोन करून सांगितले की, ते गृहस्थ माझी डाळ शिजू देत नाहीत..."

"तुमची डाळ शिजावी म्हणून तुम्ही फोन केलात का? अहो, हा राँग नंबर आहे. त्यांनाही तेच सांगितले..."

"बरे, सर, तुमचे नाव काय?" त्या बाईने विचारले.

"मॅडम, नावच काय हो, तुम्हाला माझी पूर्ण जन्मकुंडली पाठवली असती परंतु आता उपयोग नाही हो. माझे लग्न होऊन चाळीस वर्षे होत आहेत..."

"इश्श! अहो, माझ्याही लग्नाला बेचाळीस वर्षे होत आहेत."

"मग ठेवा आता. राँग नंबर आहे. कशाला उगाच परिचय वाढवताय?" असे म्हणत नानांनी फोन बंद केला. तशा नानी म्हणाल्या,

"का हो, बिचारीची फिरकी घेतली. त्या कोणत्या बाईने तुमचा नंबर दिला म्हणून... का हो, नानासाहेब, ही सुप्रिया कोण आहे हो?" नानींचे मंद स्मित पाहून चिडलेले नाना म्हणाले,

"आता मला कसे समजणार? मी काय तिला भेटलोय की काय?"

"हो क्का! मला वाटले उगाच बँकेची कटकट नको म्हणून तिने तुमचा नंबर दिलाय. तुम्ही नाही का, कुठेही माझा नंबर न देता माझ्या नावासमोर तुमचा नंबर देता त्याअर्थी... नाही म्हणजे तिच्याजवळ तुमचा नंबर कसा आला म्हणावा?"

"केवळ 'ध चा मा' हा प्रकार आहे. नंबर देताना एखादा अंक इकडे तिकडे झाला असावा आणि त्याची फळं मला भोगावी लागतात..." तितक्यात नानांचा फोन पुन्हा वाजला. त्यावर आलेला अनोळखी क्रमांक पाहून नाना नानीला म्हणाले,

"बहुतेक त्याच बँकेचा आहे आता तू बोल बरे..." नानींनी 'तुमचे आपले काही तरी...' अशा अर्थाचा कटाक्ष नानांकडे टाकून फोन उचलून म्हणाल्या,

"बोला. कोण हवय?"

"आपण सुप्रिया फाटके बोलताय का? बरे झाले, तुम्हीच फोन केलात ते. अहो, आतापर्यंत राँग नंबरच लागत होता. कुणीतरी खडूस म्हातारा फोनवर अद्वातद्वा बोलत होता. बरे झाले आता तरी योग्य क्रमांक लागला."

"क्रमांक योग्य लागला हो पण तुम्हाला हवी असलेली व्यक्ती मी नाही..."

"म्हणजे? पुन्हा राँगच लागला का?"

"नंबर योग्यच आहे पण व्यक्ती राँग आहे..."

"तुमचे नाव काय आहे?"

"नाव सांगू की, माझी जन्मपत्रिका पाठवू? नाही मला तसे कर्तव्य नाही कारण माझ्या कर्तव्याचा माझ्या घरच्यांनी चाळीस वर्षांपूर्वी लिलाव केला हो..." नानी तसे बोलत असताना नानांनी फोन घेतला आणि म्हणाले,

"अहो, तोच तोच क्रमांक पुन्हा पुन्हा का लावताय? निक्षून सांगतोय हा राँग नंबर आहे." असे म्हणत नानांनी फोन ठेवला आणि नानीकडे पाहून हसत म्हणाल्या,

"तूही काही कमी नाहीस की गं. चांगली टर उडवली त्याची..."

"मग बायको कुणाची आहे, नानासाहेब?" नानीही हसत म्हणाल्या.

"एकूण काय तर वामकुक्षीचा बोजवारा उडाला..."

"आज तुमच्यामुळे उडाला बरे. मला म्हणू नका..." असे म्हणत नानींनी पुन्हा दिवाणवर अंग टाकले.

नानासाहेबही अंग टेकवत असताना पुन्हा त्यांचा फोन खणाणला. वैतागलेले नाना म्हणाले,

"ही स्फोटक बँक माझ्याच फोनवर का एकानंतर एक स्फोट करीत असावी..." उठता उठता नानांनी नाव, क्रमांक न पाहता फोन उचलला आणि संतापाने म्हणाले,

"कळत नाही का हो तुम्हाला? किती वेळा सांगितले तरीही लक्षात येत नाही का तुमच्या? स्फोटक बँकच आहे की एखादा अतिरेक्यांचा 'स्फोटक बँक' नावाचा समूह आहे तुमचा? ती कोण तुम्ही म्हणता ती सुप्रिया फटाके तुमच्या गँगची सदस्य तर नाही ना?..." नानांना मध्येच थांबवून पलीकडून आवाज आला,

"भाऊजी... भाऊजी, रिलॅक्स! काय झाले? कोण ही सुप्रिया फटाके आणि ही कोणती बँक?"

"तुम्ही आहात का? वैताग आणलाय, चीड आणलीय का बँकेने नि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी..." असे म्हणत नानांनी त्यांच्या मेहुण्याला सारा वृत्तांत ऐकवला. तसे मेहुणे म्हणाले,

"भाऊजी, खरे आहे तुमचे? हे बँकवाले, विमावाले, मॉलवाले, सराफा दुकानदार आणि आपण जिथे जिथे खरेदी करताना आपला क्रमांक दिलाय ना ते सारे एकतर फोन करतात किंवा लांबलचक संदेश पाठवतात. राँग नंबरचेही तसेच. राँग नंबर म्हणून सांगतिले तरीही, 'तुम्ही कोण बोलता? कुठून बोलता? हा नंबर अमक्याचा आहे, माझ्याकडे सेव्ह आहे. मी याच नंबरवर सतत बोलत असतो...' असा भडीमार करून वैताग आणतात..."

"खरे आहे, तुमचे. काय करावे नि काय नाही. मला तर संताप आलाय."

"भाऊजी, कधी कधी चांगलेही वाटते हो कुणाचा राँग नंबर आला की..."

"म्हणजे? असे काय होते?"

"कालचीच गोष्ट सांगतो, मला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला..." असे म्हणत मेहुण्यांनी घडलेला प्रसंग जशाला तसा सांगितला...

        सायंकाळची वेळ होती. मेहुणे बाहेर फिरायला जाण्याची तयारी करीत असताना त्यांना फोन आला. क्रमांक अनोळखी होता. मेहुण्यांनी तो उचलून बरोबर कानालाही लावला नाही तर तिकडून आवाज आला,

"तुला थँक्स म्हणायला फोन केला रे डियर! सकाळपासून प्रयत्न करतेय पण तुझा नंबर लागतच नाही रे. एकदा- दोनदा लागला पण तू उचलला नाहीस रे. काल तू दिलेले जेवण, सिनेमा आणि बागेतल्या... त्या प्रसंगाची आठवण दिवसभर येत आणि मग कसेसेच होत आहे. वाटते पळत पळत जावे आणि तुला... जाऊ दे. पण तू रागावलास का रे? काल तुझा 'तो' हट्ट मी पूर्ण केला नाही म्हणून. हरकत नाही. ती तुझी कालची अतृप्त इच्छा आज पूर्ण करूया. आता अबोला सोड आणि लगेच कुठे यायचे ते कळव. येतोस ना रे राजा?..."

"अरे, बाप रे! सोयरेहो, मोठीच मेजवानी होती की! मग काय कळवले?"

"सारे ऐकून राँग नंबर सांगितला आणि दिला ठेवून..."

"अरेरे! मेहुणे, हे काय केलेत? बिचारीची काय अवस्था झाली असेल हो?" नाना हसत म्हणाले आणि कुणाचा तरी फोन येत असल्याचे पाहून म्हणाले,

"थोडे थांबा. त्या स्फोटक फटाक्याचा फोन येतोय..."

"अरे, व्वा! भाऊजी, माझ्यासारखा मुर्खपणा करु नका. असले आमंत्रण तर करा स्वीकार!"... मेहुणे म्हणाले आणि हसतच नानांनी फोन कट केला आणि येत असलेला फोन उचलला. हाही फोन निनावीच होता. नक्कीच स्फोटकचाच असणार या शंकेने नानांनी तो उचलला. ते काही बोलणार त्यापूर्वीच तिकडून आवाज आला,

"मला माहिती आहे, हा फोन तुम्हाला आवडणार नाही पण काय करणार सर, मजबूर आहोत. सुप्रिया फटाके यांनी त्यांच्या प्रस्तावावर एकमेव संपर्क क्रमांक दिला आहे तोही तुमचाच. सर, या नंबरवर हा शेवटचा कॉल असेल कारण आता मी ह्या नंबरपुढे 'राँग नंबर' असेच लिहिणार आहे. फक्त एक सांगा..."

"मला वाटते तुम्ही बँकेचे व्यवस्थापक बोलत आहात. खरेच हा राँग नंबर आहे. ही सुप्रिया हिला मी ओळखण्याचे सोडा पण कधी पाहिलेही नाही. मी खरेच तुमची काही मदत करू शकत नाही."

"सर, धन्यवाद! तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आभारी आहे." असे म्हणत तिकडून फोन बंद झाला. नानांनी एक सुस्कारा सोडला. तितक्यात नानी चहा घेऊन आल्या. कपबशी नानांच्या हातात देत त्यांनी विचारले,

"लागला का हो त्या फटाकडीचा शोध? राँग नंबर देणाऱ्या बाईचे आडनाव फटाकेच आहे ना?"

"नाही लागला ग..." बोलता बोलता नानांनी कप ओठाला लावला न लावला की त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर पुन्हा आलेला अनोळखी क्रमांक पाहून नाना संतापून म्हणाले,

"काय करावे बुवा आता या फटाकडीला नि त्या स्फोटकला..." फोन उचलून ते म्हणाले,

"बोला..." तसा तिकडून एक अनोळखी परंतु मधाळ आवाज आला,

"सर, नमस्कार. म्मी क्की नाही फटाके बोलतीय..." तिला पूर्ण बोलू न देता नाना ओरडले,

"हे तुम्ही काय करून बसलात? तुम्हाला कर्ज घ्यायचे नव्हते..."

"मला खरेच कर्ज घ्यायचेच नव्हते पण स्फोटक बँकेचा तो एजंट माझ्याकडे सारखा यायचा... म्हणजे तो माझा रेग्युलर कस्टमर होता. प्रत्येक वेळी कर्ज घेण्यासाठी मागे लागायचा. काम झाले की निघून जायचा. 'देणे नि घेणे, फुकटात कार्यभाग उरकणे' असा प्रकार..."

"म्हणजे तुम्ही..."

"होय. बरोबर ओळखले. त्यादिवशी त्याने माझे काही न ऐकता माझा कर्जाचा अर्ज भरला. शेकडो सह्या घेतल्या..."

"अहो, पण गृहकर्ज घेताय मग प्लॉटची कागदपत्रे..."

"कशाची आलीय कागदपत्रे? सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन माझ्या नावावर नाही तर प्लॉट कुठला आलाय?"

"अहो, पण...

"मला काय माहिती कागदपत्रे लागतात म्हणून? त्याने बोट ठेवले मी तिथे सही केली..."

"बाप रे! म्हणजे साराच फ्रॉड म्हणायचा की."

"जाऊ द्या ना. मी सारखे फोन यायची कटकट करू नको म्हणून माझ्या क्रमांकातील शेवटच्या अंकाच्या ठिकाणी एक दुसराच आकडा टाकला..."

"अहो, फटाकडी, तुम्ही सहज केले पण ते माझ्या गळ्यात अडकले ना? सारखे फोन येत आहेत."

"सॉरी! सॉरी!! झाले गेले, पार पडले, विसरून जा ना. या ना एखाद्या सायंकाळी म्हणजे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल तुमची सेवा करण्याची संधी मिळेल..." ती सुप्रिया फटाके बोलत असताना नानासाहेबांना गरगरायला लागले. त्यांच्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला. ते घामाघूम झाले. नानी त्यांच्याकडे धावल्या आणि त्यांनी नानांना सावरले...



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy