Nagesh S Shewalkar

Comedy

3.4  

Nagesh S Shewalkar

Comedy

श्वानसुंदरी

श्वानसुंदरी

9 mins
175



          भ्रमणध्वनीवर गजर झाला आणि उदय सकाळी बरोबर चार वाजता जागा झाला. पत्नीकडे पाहिले ती गाढ झोपेत असल्याचे पाहून तो पुटपुटला, 'कशाला हिला उठवायचे? काहीच काम नाही. आत्ता बसस्थानकावर जाऊन असतील तेवढी वृत्तपत्रं घेऊन येतो. झोपू द्या हिला...'

काही क्षणातच तयार होऊन उदय सायकलवर निघाला. पंधरा मिनिटात तो बसस्थानकावर पोहोचला. वृत्तपत्रांचे गठ्ठे येऊन पडले होते. अनेकजण ती गठ्ठे सोडून पुन्हा व्यवस्थित लावून ठेवत असताना उदयने विचारले,

"का हो, 'खरीखुरीप्रभा' आलीय का?"

"हो. पण थांबावे लागेल. आधी बाहेरगावी जाणारे गठ्ठे पाठवावे लागतात. नंतर आपला गठ्ठा सुटेल."

"आपल्या गठ्ठ्यात किती खरीखुरीप्रभा असतील?"

"पाचशे! घेणार का एवढी?" एका जणाने त्रासलेल्या आवाजात विचारले.

"किती रक्कम पडेल?" उदयने विचारले. तसे सर्व काम करणाऱ्या माणसांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. तसे उदय पुढे म्हणाला,

"माझा एक विशेष लेख खरीखुरीप्रभामध्ये छापणार होते. आज प्रसिद्ध लेखक वणवणे यांची जयंती आहे. संपादकांनी मला लेख लिहिण्यासाठी सांगितले होते."

"अरे वा! छानच की! साहेब, गठ्ठ्यात पाचशे पेपर आहेत. आम्ही एक-एक विकले तर दोन हजार रुपये होतील. तुम्ही पंधराशे रुपये द्या.पण मला एक सांगा, पाचशे पेपरचे तुम्ही करणार काय?"

"सर्वांना मोफत वाटणार आहे. हे घ्या... पंधराशे..." असे म्हणत उदयने पाचशेच्या तीन नोटा त्या माणसाकडे सरकावल्या. माणसाने बोटाने दाखवलेला गठ्ठा उचलण्याचा उदयने प्रयत्न केला.दोन- तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर उदयने तो गठ्ठा उचलला. सायकलपर्यंत येईपर्यंत उदयला तो गठ्ठा अनेकदा खाली ठेवावा लागला. सायकलच्या कॅरियरवर लावताना नाकीनऊ आले परंतु शेवटी उदय यशस्वी झाला. घरी परतताना गठ्ठा चार वेळा खाली पडला परंतु उदयने हार मानली नाही.

'कोशिश करनेवालों की हार नही होती' याप्रमाणे उदय शेवटी घरी पोहोचला. भर थंडीत तो घामाने निथळत होता. कसाबसा त्याने गठ्ठा खाली उतरवला, घरात आणला. त्या आवाजाने जागी झालेली पत्नी शयनगृहाच्या बाहेर आली. उदयची अवस्था आणि तेवढा मोठ्ठा गठ्ठा पाहून तिने विचारले,

"अहो, हे काय? एवढे पेपर?"

"अग, मुद्दामच आणले. माझ्या लेखनावर हसणारांना फुकटात पेपर देतो. लेख वाचायला लावून त्यांची चांगलीच जिरवतो..." असे म्हणत उदयने वर्तमानपत्राचा गठ्ठा सोडला. पहिल्या पानावर ठळक शीर्षक होते... 'आज श्वानसुंदरीचा वाढदिवस...' उदयला काही अर्थबोध होत नव्हता. परंतु तिकडे दुर्लक्ष करुन एक अंक घेऊन पाहणार तितक्यात त्याचा भ्रमणध्वनी वाजला.

"नक्कीच, लेख आवडला असल्याचा कुणातरी वाचकाचा फोन असणार... इतक्या लवकर पेपर वाचकाकडे पोहोचला हे आश्चर्यच! महत्त्वाचे म्हणजे त्याने तातडीने वाचून फोनही केला..." असे म्हणत पत्नीकडे बघत त्याने फोन हातात घेतला. त्यावर मेहुण्याचे अर्थात बायकोच्या भावाचे नाव पाहून म्हणाला,

"अग, दादांचा फोन आहे..." म्हणत फोन उचलून त्याने विचारले,

"दादा, अभिनंदनाचा तुमचा सकाळी सकाळी आलेला पहिला फोन पाहून आनंद झाला..."

"उदय, कोणत्या वर्तमानपत्रात तुमचा वणवणे या प्रसिद्ध लेखकाच्या जयंतीनिमित्त लेख येणार होता?"

"दैनिक खरीखुरीप्रभा! मिळाला ना तुम्हाला?"

"होय! मिळाला! सकाळी उठून कडाक्याची थंडी असताना चार किलोमीटर अंतर चालून गेलो. आमच्या कार्यालयात सहकाऱ्यांना द्यावेत म्हणून चांगले दहा अंक विकत घेतले..."

"व्वाह! छान!! दादा, किती छान बातमी दिली तुम्ही?..."

"लेखक महाशय, ऐकून तर घ्या. घरी आलो. एक अंक उघडून पाहिला तर... जाऊ देत... तुम्ही आणलात का अंक?"

"दादा, चक्क पाचशे अंक आणले आहेत. कसा छापलाय लेख? वणवणे यांचे छायाचित्र आणि माझे छायाचित्र टाकले ना? दादा, एक नाही तर विविध अँगलने माझी चांगली पंचवीस छायाचित्रे काढली होती. तुमच्या बहिणीच्या पसंतीची चार छायाचित्रे संपादकांकडे पाठवून दिली..."

"छान! छान!! एक करा, आधी पेपर उघडा आणि मग..." म्हणत उदयच्या मेहुण्याने फोन बंद केला...

       उदय! तिशीतला एक विवाहित युवक! एका कंपनीत नोकरीला होता. वाचनाची आवड होती. त्यातून नकळत लेखनाचा छंद जडला. सुरुवातीचे लेखन म्हणजे वर्तमानपत्रात छोटेखानी पत्रं लिहिणे, चारोळ्या लिहिणे. काही वर्तमानपत्रात त्याचे लेखन प्रकाशित होत असल्याने तो आनंदी असे. वेगळ्या उत्साहाने पुन्हा काहीतरी लिहित असे. खरीखुरीप्रभा हे एका राजकीय पुढाऱ्याचे वर्तमानपत्र होते. नावाजलेले होते. त्या वर्तमानपत्रात उदयचे लेखन प्रकाशित होत होते. अनेक वाचकांचे अभिनंदन, कौतुक करणारे फोनही येत असताना एकेदिवशी खरीखुरीप्रभामधून फोन आला. त्यावर आलेले सहसंपादकाचे नाव पाहून उदय फोन उचलून म्हणाला,

"सर, नमस्कार. आज काय विशेष?..."

"विशेष असल्यामुळेच तर तुमच्यासारख्या प्रसिद्ध लेखकाला फोन केला..."

"क्या बात है, सर! धन्यवाद! आज्ञा करावी." उदय नम्रपणे म्हणाला.

"तुम्ही सुप्रसिद्ध लेखक वणवणे यांना ओळखत असणार..."

"हे काय विचारणे झाले? त्यांना कोण नाही ओळखणार? त्यांचे काय?"

"पंधरा तारखेला त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने तुमचा एक लेख हवा आहे."

"माझे भाग्य! आज पाच तारीख! तुम्हाला कधीपर्यंत हवा आहे? शब्द संख्या किती हवी?"

"बारा तारखेला द्या. जेवढा मोठा लिहिता येईल तेवढा लिहा... सोबत तुमचे आकर्षक, सुंदर छायाचित्र द्या."

"नक्की लिहितो. छायाचित्रही देतो..." असे म्हणत उदयने फोन ठेवला आणि बायकोला खुशखबर देत तो तयारीला लागला. एवढा मोठा लेख आणि तोही सुप्रसिद्ध लेखक वणवणे यांच्या संदर्भात लिहायचा म्हणजे त्यांची अनेक पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून आणावी लागतील, त्यांचा अभ्यास करावा लागेल, टिपणं काढावी लागतील हे सारे करताना नोकरीला जाणे जमणार नाही. साहेब विनासायास सुट्टी देणार नाहीत. कुणाला तरी आजारी... कुणाला कशाला स्वतःच आजारी पडावे लागेल तरच साहेब बिनपगारी रजा देईल असे म्हणत उदयने भ्रमणध्वनीवर साहेबांना एक विनंती अर्ज पाठवला, 'आदरणीय महोदय, सेवेत विनंती की काल दुपारी मला अचानक थंडीताप आल्यामुळे डॉक्टरांकडे गेलो होतो. मला आठ दिवस सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे त्यामुळे मला आठ दिवसांची रजा द्यावी ही विनंती.'

      दुकाने उघडण्यापूर्वी उदयने लेख लिहिताना कोणकोणत्या मुद्द्यांवर लिहावे याची जुळवाजुळव करुन ठेवली. साडेनऊ वाजता जेवण करुन तो घराबाहेर पडला. बाजारात पोहोचला. नुकतीच दुकाने उघडत होती. पंधरा दुकानातून त्याने वणवणे यांनी आणि इतरांनी लिहिलेली पंचवीस पुस्तके विकत घेतली. जवळपास पंधरा हजार रुपये मोजावे लागले. पुस्तकांचा गठ्ठा घेऊन घरी पोहोचला. एक- एक पुस्तक घेऊन त्याने वाचायला आणि वाचताना तिथेच खुणा करायला सुरुवात केली. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत जागून पंचवीस पुस्तके वाचायला त्याला तब्बल तीन दिवस लागले. चौथे दिवशी सकाळी त्याने एक- एक पुस्तक घेऊन लिहायला प्रारंभ केला. दोन दिवसात त्याने भलामोठा लेख संगणकावर टाइप केला. नंतर काही तासात तो लेख पुन्हा पुन्हा वाचत असताना योग्य त्या सुधारणा केल्या. नेहमीप्रमाणे पत्नीलाही वाचायला लावला. पत्नीने सांगितलेल्या एक- दोन सुधारणा केल्या.

     आता छायाचित्र! तो पूर्वी काढलेली छायाचित्रे बघत असताना पत्नी म्हणाली,

"अहो, असे काय करता? एवढ्या मोठ्या लेखकावर, इतका अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. एवढा खर्च केला आहे तर छायाचित्रही थोडे स्टायलिश काढा ना. चला. मी येते स्टुडिओत. तुम्हाला छायाचित्र काढताना संभ्रम होतो."

      पत्नीसोबत तो एका चांगल्या, नावाजलेल्या स्टुडिओत गेला. पत्नी आणि छायाचित्रकार यांच्या सुचनेप्रमाणे बसत होता, डोके फिरवत होता, छाती पुढे काढत होता, हसत होता. असे करता करता काढलेली पंचवीस छायाचित्रे घेऊन ती दोघे घरी परतली. कोणते एक छायाचित्र पाठवावे यावर पतीपत्नी चर्चा करीत होते परंतु दोघांमध्ये एकमत होत नव्हते. शेवटी उदय म्हणाला,

"एक काम करुया. ही सगळी छायाचित्रे लेखासोबत पाठवून देतो. संपादकांना जे योग्य वाटतील ते छापतील. आपण गोंधळून गेलो आहोत."

"सारी नको पाठवायला. तीन चार पाठवूया..." असे म्हणत पत्नीने चार छायाचित्रे निवडली. उदयने अत्यंत आनंदाने तो लेख आणि छायाचित्रे ईमेलद्वारे पाठवून दिली आणि फोनवर म्हणाला,

"संपादक महोदय, नमस्कार. आपल्या आदेशानुसार आत्ता वणवणे यांच्या संदर्भातील लेख ईमेलद्वारे पाठवला आहे."

"हो का? व्वाह! छान!! अगदी वेळेवर पाठवला. वाचून कळवतो तुम्हाला..." असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. उदयने जेवण केले. अनेक दिवसांपासून उदयने अविरत कष्ट घेतले होते. खूप थकला होता. अंथरुणावर पडल्याबरोबर त्याला गाढ झोप लागली. सहसा तो दुपारी झोपत नसे. सायंकाळ होत असताना पत्नीने त्याला बळजबरीने उठवले. पाहतो तर काय सायंकाळचे सहा वाजत होते. उदय चक्क चार तास झोपला होता. उठण्यापूर्वी त्याने जवळचा भ्रमणध्वनी बघितला त्यावर दै. खरीखुरीप्रभाच्या संपादकांचे दोन फोन येऊन गेले होते. गाढ झोपेत असल्याने त्याला जाग आली नाही. त्याने ताबडतोब पुन्हा फोन लावला.

"अभिनंदन! लेखक महोदय, अभिनंदन!! फार उत्कृष्ट लेख लिहिलाय. वणवणे यांच्या जीवनातील बारीकसारीक गोष्टींची नोंद घेतली आहे. लेख परवाच्या अंकात छापत आहोत. पुनश्च अभिनंदन आणि आमच्या मागणीनुसार लेख दिला. खूप धन्यवाद!" असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. तितक्यात पाणी आणि चहाचा कप घेऊन आलेल्या पत्नीला त्याने आनंदाने ती बातमी सांगितली.

"किती आनंद झाला म्हणून सांगू. अभिनंदन! त्रिवार अभिनंदन!! तुमच्या कष्टाचे चीज झाले. तुम्ही घेतलेल्या परिश्रमाची मी एकमेव साक्षीदार आहे. आता संपादकांना भांडून घसघशीत मानधन घ्या म्हणजे मिळवले."

"मानधन? अवघड आहे. अग, एवढे लेखक असताना संपादकांनी माझी निवड केली हाच मान आणि लेख छापून येतोय तेच अक्षरधन..." उदय बोलत असताना पत्नी त्याला अडवत म्हणाली,

"एकूण काय तर मिळाले आम्हा मानधन..." दोघेही हसत कामाला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उदयने नातेवाईक, मित्र, परिचित, कार्यालयीन सहकारी सर्वांना फोन करुन खरीखुरीप्रभा या दैनिकात प्रकाशित होत असलेला लेख वाचण्याची विनंती केली आणि गजर लावून सकाळी सकाळी लवकर उठून बसस्थानकावर जाऊन पाचशे अंक विकत घेऊन आला आणि मेहुण्याचा फोन आला. त्यांचे बोलणे ऐकून त्याने गठ्ठ्यातील एक अंक अक्षरशः ओढून काढला. तसे करताना अंक काही ठिकाणी फाटला. त्याने गडबडीत सारा अंक चाळला आणि त्याला मोठा धक्का बसला. कारण अख्खा पेपर जाहिरातींनी भरलेला होता. त्याचा लेख काय परंतु ज्यांची जयंती होती त्या ज्येष्ठ साहित्यिक वणवणे यांचा साधा फोटोही नव्हता आणि कुठे त्यांचा उल्लेखही केला नव्हता. उदय दचकला, परेशान झाला. थरथरत त्याने अख्खा पेपर नजरेखालून घातला. तो धाडकन सोफ्यावर बसला. तितक्यात पत्नी चहा घेऊन आली तिने विचारले,

"अहो, आलाय ना लेख? तुमचे कोणते छायाचित्र आले आहे?" काही न बोलता उदयने अंक पत्नीच्या हातात दिला. तिनेही पान न पान चाळले. तीही निराश होत म्हणाली,

"असे कसे झाले? एवढ्या मेहनतीने, सुंदर लेख लिहिलाय... अहो, हे काय? तुमचा लेख तर नाहीच पण साधी बातमी नाही. पण ही श्वानसुंदरी कोण आहे? संपूर्ण पेपर तिच्याच छायाचित्रांनी भरला आहे. तिच्यावर शुभेच्छांचा, अभिनंदनाचा, कौतुकाचा वर्षाव झाला आहे..." पत्नी बोलत असताना उदयच्या भ्रमणध्वनीवर पुन्हा फोन आला. फोन एका नातेवाईकाचा होता. उदयने फोन उचलताच पलिकडून आवाज आला,

"उदय, हे काय? तुमचा लेख नाही. अहो, केवढ्या उत्साहाने कडाक्याच्या थंडीत रेल्वेस्थानकावर जाऊन एक नाही तब्बल पाच अंक घेऊन आलो. घरी येऊन पाहतो तर काय तुमचा लेख तर सोडा तुमचे नावही नाही. तुम्ही अगोदरच फोन करुन सांगायला नको होते. लेख आल्याची खात्री करुन मग फोन करायचे ना? फारच उतावळेपणा बुवा तुमचा. आमचा पैसाही गेला, श्रमही गेले..." असे म्हणत उदयला काही बोलण्याची संधी न देता त्यांनी फोन बंदही केला. उदयने पत्नीकडे पाहिले,

"ऐकले मी सारे. जाऊ द्या. लक्ष देऊ नका..." पत्नी समजावून सांगत असताना पुन्हा फोन वाजला तसा पत्नीने स्वतःच्या हातात फोन घेऊन तो कट केला आणि फोन बंद करुन टाकला,

"झाले ते झाले. थोडा वेळ आराम करा. फोन स्वीच ऑफ केलाय. अकरा वाजता संपादकांना फोन करुन जाब विचारा..." असे म्हणत पत्नी बाहेर गेली आणि उदय पलंगावर टेकून बसला. त्याने डोळे मिटले. परंतु राहून राहून त्याला वणवणे यांचा चेहरा, लेखातील काही शब्द, स्वतःची छायाचित्रे आठवत होती. त्याच स्थितीत त्याचा डोळा लागला...

"अहो,... अहो... उठताय ना? किती वेळ झोपणार? अकरा वाजत आहेत." पत्नीने त्याच्या खांद्याला हलवत विचारले.

"अग, आपला खरीखुरीप्रभा आला का ग? लेख आलाय का?" उदय कदाचित झोपेत बरळत होता. ते समजून पत्नीने त्याच्या डोक्याला पुन्हा हलवले. तसा आळस देत उदय उठून बसल्याचे पाहून म्हणाली,

"एक सारखे फोन चालू आहेत..."

"काय करणार? लेख आला नाही म्हणून ओरडत असतील."

"दुसरे काय असणार? मी कुणाचाही फोन उचलला नाही. असे करा, एकदा त्या संपादकांना फोन करुन विचारा आपल्याला कारण तर समजले पाहिजे ना! फोन लाउड करुन बोला. म्हणजे मलाही समजेल. उगीच तुम्हाला त्यांचे रडगाणे मला पुन्हा ऐकवावे लागणार नाही. हे बघा, जे झाले ते झाले. होत असते असे." पत्नी म्हणाली.

     उदयने लगेच संपादकांना भ्रमणध्वनी लावला. काही क्षणात तिकडून आवाज आला,

"उदयजी, सॉरी! रियली सॉरी!! खरेतर मीच फोन करणार होतो. अचानक परवा सायंकाळी मालकांचा फोन आला. तुम्हाला आमचे मालक तर माहिती असतीलच..."

"होय. माहिती आहेत. राजकारणातील आणि राज्यातील बडं प्रस्थं आहे. पण त्यांचं काय?"

"ते म्हणाले, परवाच्या दिवशी त्यांच्या दीड वर्षाच्या श्वानसुंदरीने धावण्याची शर्यत जिंकली आहे..."

"ही कोण श्वानसुंदरी?" उदयने नाराजीने विचारले.

"काय हे लेखक महोदय, आजचा अंक पाहिलाच असेल ना? अहो, अंकात यत्र-तत्र-सर्वत्र फक्त आणि फक्त श्वानसुंदरीच आहे ना? अहो, इतर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय बातम्यांवर जणू बहिष्कारच आहे ना? तरीही तुम्ही विचारता, श्वानसुंदरी कोण म्हणून?"

"अहो, साहेब, ते ठीक आहे पण आपण एका श्वानासाठी गणगणेसारख्या जेष्ठ साहित्यिकाच्या संदर्भातील लेख प्रकाशित करण्याचे सोडा पण एक साधी बातमीही टाकत नाहीत..."

"बरोबर आहे. मला सांगा, अनेकदा तुम्हालाही तुमच्या मालकाच्या, बॉसच्या मागण्या स्वतःची तत्त्व बाजूला ठेवून मान्य कराव्याच लागतात ना?"

"अहो, जाहिराती उद्याही घेता आल्या असत्या ना?"

"उदयराव, आज श्वानसुंदरीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार सोहळा आहे. तेव्हा जाहिराती आजच हव्यात ना? अहो, या श्वानसुंदरीवर, तिच्या पराक्रमावर अनेक लेख आले आहेत परंतु भरगच्च जाहिराती आल्याने उद्या श्वानसुंदरीवरील लेख आणि आजच्या कार्यक्रमाच्या बातम्या असणार आहेत. उद्याचा खरीखुरीप्रभा हा अंक श्वानसुंदरी स्पेशल अंक असणार आहे..."

"ठीक आहे. मग परवाच्या अंकात लेख घ्यावा..."

"नाही. नाही. मालकाचे एक तत्त्व आहे, ज्या दिवशी ज्याचे महत्त्व असेल त्याचदिवशी त्यांच्या संदर्भातील लेख छापायचे. काही तांत्रिक अडचणींमुळे त्या खास दिवशी लेख घेता आला नाही तर पुन्हा घ्यायचा नाही. बरे, उदय, आम्हाला सर्वांना साहेबांकडे कार्यक्रमाच्या तयारीला जावे लागणार आहे. तेव्हा ठेवतो. आणि हो, आमच्या श्वानसुंदरीच्या सत्कार सोहळ्याला नक्की या आणि जमले तर श्वानसुंदरीवर रात्री अकरापर्यंत एक छानसा लेख पाठवून द्या..." असे आमंत्रण देत संपादकांनी फोन बंद केला.

"काय मग, लिहिणार का श्वानसुंदरीवर लेख..." पत्नी अंगठा दाखवून हसतच बाहेर पडली आणि उदयही मनातल्या मनात हसत बसून राहिला...



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy