Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

4.1  

Pratibha Tarabadkar

Drama Inspirational

सहल भाग -३

सहल भाग -३

4 mins
149


  रेनबो रिसॉर्टच्या आवारात बस शिरली.विस्तीर्ण अशा प्रांगणात 'सख्ख्या मैत्रिणी मंडळाची'एकुलती एक बस होती.ऑड डे ला रिसॉर्ट चालावे म्हणून सवलतीच्या दरात प्रवेश होता त्यामुळेच आज सहल ठरवली होती.ज्येष्ठ नागरिकांना रविवार काय आणि सोमवार काय, सगळे दिवस सारखेच!

  पार्किंगच्या भल्या मोठ्या आवारात सखारामने बस लावली आणि साऱ्याजणी उत्साहाने उतरू लागल्या.भव्य असे पार्किंगचे पटांगण ओलांडून साऱ्याजणी गेटमधून आत शिरल्या अन् आ वासून समोरील दृश्य बघतच राहिल्या.मोठी मोठी नळकांडी,उंचच उंच घसरगुंड्या ज्यांचे खालचे टोक पाण्याच्या तलावात बुडले होते,उंच उंच चक्र,आडवे तिडवे पसरलेले रुळ....'इथे आपण खेळायचं?'माधवीताईंचा भयचकित स्वर!

'मी मागच्या वेळी आले होते तेव्हा हे सगळे खेळ खेळले होते,'वसुधाबाईंनी आपली नेहमीची टेप वाजवली.

'सुरू झालं हिचं मी मी पुराण, मागच्या जन्मी मेंढी होती की काय कोणास ठाऊक?मेंss मेंsss सरलाताईंनी मेंढीच्या ओरडण्याची नक्कल केली तशा आजूबाजूच्या सर्वजणी फिदी फिदी हसल्या.

   'सख्ख्या मैत्रिणींनो,'उषाताईंनी शिक्षकी पेशातील ठेवणीतील आवाज काढला तशी सर्वजणी त्यांच्याभोवती गोळा झाल्या.'हे सारे खेळ तरुण मुलांसाठी आहेत.आपण ज्येष्ठ नागरिक असल्याने हे खेळ खेळायची परवानगी आपल्याला नाही.आपण बालविभागाच्या सेक्शन मध्ये जावयाचे आहे.माझ्या मागून साऱ्याजणी या.'उषाताई चालू लागल्या आणि त्यांच्या मागून सर्वमंडळ चालू लागले.

'काय हो वसुधाबाई, तुम्हाला कशी काय परवानगी दिली असे तरुणांचे खेळ खेळायची?'कांचनताईंनी वसुधाबाईंना बरोबर पेचात पकडले तशी काही ऐकूच आले नाही असं दाखवत त्या आपला प्रशस्त देह सांभाळत शक्य तितक्या वेगाने चालू लागल्या.

  बालविभागातील कमरे एवढ्या पाण्याचा हौद,छोटी घसरगुंडी इ.खेळ बघून 'सख्ख्या मैत्रिणींनी 'हुश्श केले आणि सावकाशपणे, सावधपणे एकेक करून पाण्यात उतरू लागल्या.एकमेकींवर पाणी उडवू लागल्या.आपल्या ज्येष्ठ मैत्रीणी आपले वय, आपल्या व्याधी, चिंता विसरुन कशा जलविहारात रममाण झाल्या आहेत हे पाहून उषाताईंना सहलीचे सार्थक झाले असे वाटले.

  उषाताईंचे लक्ष शेजारी उभ्या असलेल्या रेणुकाताईंकडे गेले.'हे काय, तुम्ही नाही गेलात पाण्यात खेळायला?', त्यांनी आश्चर्याने विचारले.'छे, रेणुकाताई नाक उडवत 'मला नाही आवडत पाण्यात भिजा...त्यांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच जो काही धो धो पाण्याचा लोंढा त्यांच्या अंगावर कोसळला की त्यांची बोबडीच वळली.वर पाण्याने भरलेल्या बादल्या टांगल्या होत्या आणि रेणुकाताई नेमक्या एका बादलीखाली उभ्या होत्या.

रेणुकाताईंची पंचाईत झाली कारण भिजायचं नाही म्हणून त्यांनी जास्तीचे कपडे आणले नव्हते.मग काय,वसुधाबाईंचा जादाचा आणलेला ढगळ, अजस्त्र पंजाबी ड्रेस घालून त्या बुजगावणे दिसू लागल्या.

 तासभर पाण्यात डुंबून दमलेल्या पण उत्फुल्ल चेहऱ्याने एक एक जण बाहेर येऊ लागल्या आणि कपडे बदलून जेवणासाठी तयार झाल्या.

 जेवण झाल्यावर खुर्च्यांचे रिंगण करून बसल्या.श्रांत,क्लांत आणि सुस्त!


 राधिकाताईंचा मोबाईल वाजला.हलक्या आवाजात बोलून त्यांनी फोन ठेवला आणि भरुन आलेले डोळे हळूच पुसले.सर्वजणी त्यांच्या कडे बघताहेत हे लक्षात येऊन त्या बोलू लागल्या,'आज दोन वर्षे झाली,माझे मिस्टर अर्धांगवायूने अंथरुणावर पडून आहेत.मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत मग मलाच सारं पहावं लागतं.आज आमच्या सखूबाईला त्यांची काळजी घेण्यास सांगून आले आहे.'अबोल, क्वचितच मंडळात येणाऱ्या राधिकाताईंच्या घरी एवढी मोठी समस्या असेल हे कोणाला माहितच नव्हते.

 'आम्ही दोन महिन्यांनी 'संध्याछाया' old age care center 'मध्ये रहायला जाणार आहोत,कायमचे ',माधवीताईंनी बॉंबच टाकला.'दोन्ही मुलं परदेशात,मग आम्ही म्हाताऱ्यांनी काय करायचं? आम्हाला काही झालं तर? ते म्हणतात आमच्या कडे येऊन रहा पण वठलेलं झाड दुसरीकडे कसं रुजेल ?'थोडे क्षण निःशब्द शांततेत गेले.

  'तुम्हाला वाटत असेल, मी या वयात एवढी खादाड कशी म्हणून!'मीनाताई बोलू लागल्या,'अहो माझी सून अतिशय कजाग आहे, रोज सकाळी एक कपभर चहा दुपारी फक्त एक चपाती आणि भाजी वाढते आणि त्यानंतर एकदम रात्रीच जेवायला मिळतं ते ही अगदी मोजके.मग माझी भूक कशी भागेल सांगा?सतत भुकेनं आग पडलेली असते पोटात ', मीनाताईंच्या बोलण्याने साऱ्या थक्क झाल्या.कोणी इतकं दुष्टपणा ने कसं काय वागू शकतं?

 'मी किती कंजूस आहे असं तुम्हाला वाटत असेल,'विद्याताई म्हणाल्या,'अहो माझ्या मुलाने बिझनेस करण्यासाठी खूप कर्ज काढलं, दुर्दैवाने तो बुडाला मग डोक्यावर कर्जाचा डोंगर,आमची अर्थव्यवस्था पार कोसळली.माझी आणि मिस्टरांची पेन्शन कर्ज फेडण्यात जाते.इतकी वर्ष इमानेइतबारे नोकरी केली आणि आता अशी पाळी आली ', बोलता बोलता विद्याताईंचा गळा भरुन आला.शेजारी बसलेल्या वासंतीताईंनी अभावितपणे त्यांच्या पाठीवर हात ठेवला.

 'माझा मुलगा आज बेचाळीस वर्षांचा आहे पण अजून लग्न जमले नाही,'रेणुकाबाईंनी आपली व्यथा मांडली.

  प्रत्येक जण आपापली व्यथा मांडू लागल्या आणि आणि आश्चर्य म्हणजे मोकळेपण अनुभवू लागल्या.आनंदी चेहऱ्यावरील मुखवटा जसजसा दूर होऊ लागला तसं त्या आवरणामागील सत्य दृश्यमान होऊ लागलं आणि आपण सारे एकाच बोटीचे प्रवासी आहोत याची जाणीव होऊन एकमेकींबद्दल अतीव आपुलकीने मन भरून गेले.

 'सुख बांटनेसे बढता है और दुख बांटनेसे कम होता है ',या वाक्याचा प्रत्यय येऊ लागला.

 साऱ्याजणी आता मनाने खऱ्याखुऱ्या सख्ख्या मैत्रिणी झाल्या होत्या.

हाउजी आणि पासिंग द पार्सल खेळ बाजूला पडलेले कोणाच्या लक्षातही आले नाहीत.

चहा आला तेव्हा उषाताईंचे लक्ष घड्याळाकडे गेले.परत निघायची वेळ झाली होती.

एकमेकींच्या सख्ख्या मैत्रिणी ज्यांना चालायला त्रास होत होता त्यांचा हात धरुन बस पाशी आणत होत्या, बसमध्ये चढताना शांततेत, रांगेने चढत होत्या, काही जणींना बसची पायरी नीट चढता येत नव्हती त्यांना हात देवून वर घेत होत्या.

सखाराम ड्रायव्हर आणि धोंडीराम किलिंडर ते दृश्य डोळे फाडफाडून बघत होते.वॉटरपार्कने अशी काय जादू केली होती त्यांना कळेना.

बस सुरू झाली आणि माधवीताई उत्स्फूर्तपणे गाऊ लागल्या,

'आता विश्वात्मके देवे.... आणि साऱ्या जणी त्यांच्या सुरात सूर मिसळून आर्तपणे देवाला आळवू लागल्या 

'जो जे वांछील तो ते लाहो......

                     ( समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama