Pratibha Tarabadkar

Comedy Drama

3  

Pratibha Tarabadkar

Comedy Drama

सहल भाग १

सहल भाग १

4 mins
206


 'गप्प बसा गं सगळ्याजणी,'टेबलावर डस्टर आपटण्याचा अभिनय करत उषाताई ओरडल्या.निवृत्त झाल्या तरी हाडीमासी मुरलेला शिक्षकी पेशा कधी कधी असा उफाळून येत असे.

   'सख्ख्या मैत्रिणी मंडळ'च्या त्या प्रमुख होत्या.मंडळाची वार्षिक सहल जाणार होती त्याबद्दल ही सभा बोलावली होती.'आपली सहल सागाव येथील 'रेनबो रिसॉर्ट आणि वॉटर पार्कला 'जाणार आहे.

  'मी गेले आहे या रिसॉर्ट ला',वसुधाबाई अंग घुसळीत म्हणाल्या.

  'नेहमी टेंभा मिरवत असते, मी इकडे गेलेय आणि मी तिकडे गेलेय',वासंतीताई धुसफुसल्या.

  'आपली बस सकाळी बरोबर सहा वाजता शिवाजी चौकातून सुटेल.दोन तासांनी काजूघाट सुरू होईल, त्याआधी एक हॉटेल लागेल तिथे चहा नाश्ता आणि वॉशरुमसाठी थांबायचे आहे.पुढे घाटात गाडी न थांबता डायरेक्ट सागाव ला जाईल.तिथे रिसॉर्ट मध्ये रेनडान्स, वॉटर पार्क मध्ये खेळायचे आहे त्यामुळे सर्वांनी एक जोड कपडे, टॉवेल घेऊन या.आणि हो, आपापली औषधे आणण्यास विसरु नका.'

   'आणि जेवण काय असेल?'मीनाताईंनी उत्सुकतेने विचारले.

  'हिला सतत खाण्याची पडलेली असते.सहलीला येते की खायला कोणास ठाऊक ',सरलाताई मंगलाताईंच्या कानात कुजबुजल्या.तशी मंगलाताईंनी सरलाताईंना टाळी दिली.

  'जेवणात वांग्याचं भरीत, भाकरी,गोळ्यांची आमटी,भजी, मसालेभात,पापड, जिलबी आणि मठ्ठा असेल.'उषाताईंनी मीनाताईंचे शंकानिरसन केले.

  'जिलबी नको बाई,'मीनाताई नाक मुरडून म्हणाल्या.'त्यापेक्षा बासुंदी ठेवा.आणि मसालेभाताबरोबर टोमॅटो सूप वगैरे....'

   'बासुंदी अजिबात नको.'मंगलाताईंनी मीनाताईंचे बोलणं खोडून काढले.'प्रवासात कोणाला बाधली तर?'

टोमॅटो सूप आणि जिलबी सर्व संमत झाली.

   'जेवणानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम होतील.हाऊजी,पासिंग द पार्सल, अंताक्षरी वगैरे ', उषाताईंच्या या प्लॅन वर सगळ्याजणी खूष होत्या.'नंतर पाच वाजता चहा बिस्कीटं घेऊन परतीसाठी गाडीत बसायचं '.

  'फक्त चहा बिस्कीटं?'मीनाताईंच्या स्वरातून निराशा डोकावत होती.'त्यापेक्षा वडापाव ठेवा ना आणि बरोबर शिरा वगैरे...'

 'काहीतरीच काय?'आता सरलाताई पुढे सरसावल्या.'आधी नाश्ता,मग पोटभर जेवण,नुसते बैठे खेळ.... अन्न पचायला नको का? शिवाय परतीचा प्रवास आहे.'त्यांच्या ठाम विरोधाने मीनाताई गप्प बसल्या.जरा नाराजीनेच.

   'या सहलीचा खर्च येईल माणशी दीड हजार रुपये,'उषाताईंनी जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली.

  'नुसतं रिसॉर्ट वर तर जायचं आहे, सकाळी जाऊन संध्याकाळी परत!मग इतका खर्च कसा?'विद्याताई तावातावाने म्हणाल्या.'एक हजार ठिक आहेत.'

  'साठ हजार पेन्शन आहे हिला पण एक नंबरची कंजूस!'सरलाताई मंगलाताईंच्या कानात कुजबुजल्या.'नुसते कुजवतेय पैसे!'

 'मुलाची मज्जा आहे मग!आईने पै पै करून साठवलेला पैसा त्यालाच मिळणार!'

  'दीड हजार रुपये आणि साधं जिलबीचं जेवण!'अर्थात मीनाताई.

'अहो हजार रुपयात कशी होईल सहल?'शिक्षकी पेशामुळे उषाताईंमध्ये बराच पेशन्स होता.'त्या रिसॉर्टची फी च मुळी माणशी हजार रुपये आहे.तेसुद्धा ऑड डे आहे म्हणून स्वस्त ! शिवाय बसचा खर्च,टोल... सगळं धरुन जास्तच खर्च येईल पण वरचे पैसे मंडळ घालणार आहे म्हणून स्वस्तच पडेल', उषाताईंनी सांगितले तशी सगळ्याजणी गप्प बसल्या.'ज्या कोणी इच्छुक असतील त्यांनी येत्या गुरुवारपर्यंत मंडळात पैसे आणून द्यावेत ', उषाताईंनी समारोप केला.

 मंडळाच्या व्हॉट्स अप ग्रुपवर प्रवासाची रुपरेषा झळकली आणि बघताबघता तीस सदस्यांनी नावनोंदणी केली.

 सकाळी साडेपाच वाजल्यापासून बायका शिवाजी चौकात जमू लागल्या.

 आजूबाजूचा अंधार,पहाटेचे शांत वातावरण यांची तमा न बाळगता सर्वजणींचा कालवा चालला होता.

'मी पहाटे चार वाजता उठून अंघोळ,पूजा, यांच्यासाठी भाजी पोळी, सर्व आटोपून आले.'वासंतीताईंच्या स्वरात अभिमान कळून येत होता.

 'मोठी भाजी पोळी करून आलीये म्हणे, आमच्या जवळच्या भाजी पोळी केंद्रात हिचे मिस्टर कायम दिसतात,'सुनिताबाई आशाताईंच्या कानात कुजबुजल्या आणि दोघी खुदूखुदू हसल्या.

  'उषाताई,मला खिडकीची सीट हवी हं,मोकळा वारा मिळाला नाही तर मला मळमळतं,'मनिषाताईंनी जाहीर केलं.

'अहो मग उलटीवरचं औषध घेऊन नाही का निघायचं? तुमचं हे नेहमीचं कारण आहे खिडकी पटकावण्याचं!'सुलभाताई कुरकुरल्या.

 तेवढ्यात अंधारात लांबून बसचे दिवे चमकू लागले आणि साऱ्याजणी न सांगता पटापट रांगेत उभ्या राहिल्या.

 'श्शी,कसली जुनाट बस आहे!चांगली पॉश बस मागवायची ना, जरा जास्त पैसे लागले असते तर दिले असते की!'दीड हजार रुपये जास्त होतात म्हणून तावातावाने भांडणाऱ्या विद्याताई आढ्यतेने म्हणाल्या.

  'काय रे सखाराम,बायकांची पान्यात खेळायची टरीप म्हून आपण जायला तयार झालो आनि या तर समद्या म्हताऱ्या दिसत्यात ', धोंडीराम किलिंडरच्या (क्लिनरच्या)स्वरात निराशा होती.

'व्हय रे, मला पण वाटलं तरन्या बायांना पान्यात भिजतांना बगून डोळ्यांना सूख भेटंल,राम तेरी गंगा मैली बगायला भेटंल पन बगतोय ही म्हतारी खोडं!'बस येऊन उभी राहिली.धोंडीराम निवांत हातावर तंबाखू चोळू लागला.

बसचं दार बंद होतं पण हवी ती जागा मिळवण्यासाठी आता रांगेची शिस्त मोडून सगळ्याजणी बसच्या दाराशी गोळा झाल्या.उषाताईंनी शिट्टी वाजवायला सुरुवात केली पण कोणी जुमानेना.शेवटी नाईलाजाने धोंडीराम किलिंडरने बसचा दरवाजा उघडला तशी तरुणाईला लाजवेल अशा चपळाईने साऱ्या 'ज्येष्ठ नागरिक ' बसमध्ये शिरू लागल्या, काही बसच्या पायरीवर लोंबकाळू लागल्या.

सखाराम आणि धोंडीराम ते दृष्य डोळे विस्फारून बघत होते.

ज्या चपळ होत्या त्यांनी पटापट खिडक्या पकडल्या आणि ज्या बसमध्ये भराभर चढण्यात अयशस्वी ठरल्या त्यांना बाजूची सीट किंवा मागील सीटवर बसावे लागले.खिडकीची सीट पकडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर 'जितं मया 'चे भाव होते तर इतरजणींच्या चेहऱ्यावर निराशा!

उषाताईंनी बससाठी पिशवीतून हार आणि नारळ बाहेर काढला.नारळाचा आकार बघून विद्याताईंचे डोळे कपाळात गेले.'एवढा मोठा नारळ?बससमोरच तर फोडायचा आहे,छोटा,स्वस्तातला आणायचा ना!'

 'झाली यांची कंजूसी सुरू,'सरलाताई मंगलाताईंच्या कानात कुजबुजल्या.

बस ला हार बांधून,नारळ फोडून 'गणपतीबाप्पा मोरया, उंदीर मामा की जय 'चा गजर होऊन बस मार्गाला लागेपर्यंत बऱ्यापैकी फटफटू लागले होते.ड्रायव्हर सखाराम आणि किलिंडर धोंडीरामने बसमध्ये बसलेल्या पाशिंजरांवरून नजर फिरवली.डोईला स्कार्फ, अंगात स्वेटर घातलेल्या साऱ्याजणी बघून सखारामने गाणे सुरू केले,'कशी नशिबाने थट्टा आज मांडली....'धोंडीरामने गाण्यावर ठेका धरला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy