Pratibha Tarabadkar

Drama Others

4.7  

Pratibha Tarabadkar

Drama Others

सॅन्डविच डे

सॅन्डविच डे

5 mins
511


मंदार बेसीनसमोर दाढी करत होता.'तुझा फोन',आई त्याचा मोबाईल घेऊन आली.चष्मा न घातल्याने डोळे किलकिले करून ती नाव वाचायचा प्रयत्न करीत होती.मंदारने तिच्या हातून फोन घेईपर्यंत 'शेफाली'हे नाव वाचण्यात ती यशस्वी झाली होती.मंदारचे फोनवरील बोलणे होईपर्यंत ती तिथेच घुटमळत राहिली.मंदारचे बोलणे झाले आणि त्याने आईच्या हातात फोन ठेवला.

'शेफाली म्हणजे ती पाडळकरांची का रे?'आवाजात सहजता आणण्याची धडपड करीत आईने खडा टाकला.आईचा कावा लक्षात येऊन मंदार गालातल्या गालात हसला.

'ही शेफाली चैनानी. तिला तिच्या बॉयफ्रेंड बरोबर लोणावळ्याला चैन करायला जायचंय म्हणून तिचं काम माझ्या गळ्यात मारायला बघत होती.'

मंदारच्या खुलाशाने आईचा चेहरा पडला.हिरमुसल्या चेहऱ्याने ती आत गेली.

आईने मंदारचा डबा ऑफिसच्या सॅकमध्ये भरला आणि बूट घालणाऱ्या मंदारकडे ती पहातच राहिली.नेव्ही ब्ल्यू टी शर्ट आणि जीन्स मध्ये मंदार किती राजबिंडा दिसत होता! शुक्रवारी त्यांच्या ऑफिसमध्ये असे कपडे चालत असत.

मंदार जाण्यासाठी उठला आणि तेव्हढ्यात त्याला काहीतरी आठवले.

'आई,आज संध्याकाळी आम्ही ऑफिसमधून परस्पर शंतनूकडे जाणार आहोत.तो एक वर्षासाठी कंपनीतर्फे अमेरिकेला जाणार आहे.म्हणून आज नाईट मारणार आहोत.'

आईचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्याने घाईघाईने खुलासा केला,' म्हणजे रात्रभर त्याच्याकडे रहाणार आहोत.'आईच्या कपाळावर आठी पडली.'रात्री कोणाकडे कशाला जायचं घर नसल्यागत?'

'अगं आई,त्याचे आई-बाबा त्याच्या ताईकडे गेलेत.मग तोच म्हणाला,आपण रात्री पार्टी करू. सौरभ,प्रथमेश,ऋषी,मनीष सगळेच येणार आहेत.'

'पार्टी म्हणजे 'हे'असेल?'आईने अंगठा ओठाकडे नेत विचारले.

'कमॉन आई, मी काय लहान आहे का आता?'

'हो,'आई चिडून म्हणाली,'सोयीनुसार लहान,मोठा होतोस रे! पार्टी म्हटलं की मोठा आणि लग्नाचं नाव काढलं की लहान',आई आता सुरू होणार हे मंदारच्या लक्षात आलं आणि 'बाय आई',म्हणत तो सटकला.

पार्टी रंगात आली.बिअरच्या बाटल्या रिकाम्या होत होत्या तेव्हढ्यात मंदारचा फोन वाजला.आईचा फोन.मंदारच्या कपाळावर आठी पडली.अरे यार, मित्रांच्या पार्टीत सुद्धा पाठ सोडत नाही आई!'हॅलो,मंदार त्रासिक सुरात म्हणाला.'अरे मंदार, अगदी पहाटे निघू नकोस बरं का घरी यायला.पहाटे रहदारी कमी असते म्हणून वेगाने चालवतात वहानं तेव्हा उजाडल्यावरच निघ.'आईने बजावले.मंदारने 'ओके'म्हणत फोन बंद केला तेव्हा त्याला जाणवलं की सर्वजण बोलणं थांबवून आपल्याकडे बघतायत.

'काय मजनू, एव्हढ्या रात्री कोणाचा फोन अं?' ऋषीने डोळे मिचकावत विचारले.मंदार गप्प बसला.

'चोच उघड आणि बोल रे माझ्या राघू,' सौरभने मंदारच्या हनुवटीला धरुन चुचकारले तशी मंदारने त्रोटक उत्तर दिले'आईचा'.

'आईचा' प्रथमेश फक्कन हसला.त्याच्या तोंडातील बियरचा फवारा सगळीकडे उडला.'आईच्या अंगाई शिवाय चालत नाही का मंदारबाळाला?' सगळे मोठा विनोद झाल्यासारखे हसले. मंदारने वरकरणी दाखविले नसले तरी तो आईवर जाम भडकला होता.

सकाळी मंदारने बेल वाजवताक्षणी आईने दरवाजा उघडला.बाबा पेपर वाचत होते.त्यांनी पेपरातून डोळे वर करुन त्याच्याकडे पाहिले आणि परत पेपरात डोके खुपसले.

'रात्रभर जागरण झाले असेल ना,दमला असशील.'आई मंदारच्या हातातील सॅक घेत म्हणाली.'पटकन दात घासून चहा घे म्हणजे फ्रेश वाटेल.'ती लगबगीने आत गेली.

'आई अगं टूथपेस्ट कुठेय?' विचारत मंदार किचनमध्ये आला आणि डोळे विस्फारून पहातच राहिला.आई ओट्यावर टूथपेस्ट ठेवून त्यावर लाटणे फिरवत होती.

'हे काय चाललंय तुझं आई? 'मंदारने आश्चर्याने विचारले.

'काटकसर ,बाबा , काटकसर',मंदार कडे बघत बाबांनी डोळे मिचकावले. 'फेकून दे ती टूथपेस्ट',मंदारने चिडून ती टूथपेस्ट डस्टबिनमध्ये फेकली.

'अरे कशाला टाकलीस ती कचऱ्यात? अजून एखादा दिवस चालली असती.'आई हळहळली.'आई पुरे झाली आता तुझी ही चिंधीगिरी' मंदार आईवर ओरडला.काल रात्री सर्वांसमोर आईच्या फोन ने इज्जतीचा जो फालुदा झाला त्याचा राग त्याच्या डोक्यात धुमसत होताच.

मंदारला एव्हढ्याशा गोष्टीने चिडायला काय झाले?आई आश्चर्याने थक्क झाली.  


मंदारच्या ऑफिस मध्ये गंभीर विषयावर डिस्कशन चालू होते.तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला, excuse me' म्हणत तो कोपऱ्यात गेला.'मंदार,माझे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकलेय आणि पैसे न येता दहा हजार रुपये withdraw झाल्याचा मेसेज आला आहे रे मी आता काय करू?' आई रडवेल्या आवाजात सांगत होती.

'आई अगं आमची खूप महत्वाची मिटींग चालू आहे.तुझ्याबरोबर बाबा नाहीयेत का? त्यांना सांग ना!'

'ते कधी असतात माझ्या बरोबर? गेलेत त्यांच्या टोळभैरव मित्रांबरोबर गप्पा झोडायला.आणि मोबाईल कधी नेतात का बरोबर?'त्या परिस्थितीत सुद्धा बाबांची तक्रार करण्याची तिने संधी सोडली नाही.'बरं बरं, मी बघतो काय करायचं ते' म्हणत मंदारने फोन बंद केला आणि तो मिटींगला जॉईन झाला.

'आई,तू शिकून घे बघू सगळं.आता या सर्व गोष्टी तुला यायलाच हव्यात. 'मंदारने घरी येताच आईला बजावले.'अरे मी करते की बहुतेक सगळी कामं! एटीएम वरुन पैसे काढणं, ऑनलाईन ऑर्डर देणं.,बिलं भरणं...'आई आठवून आठवून सांगू लागली.

'आणि अश्लील व्हिडिओला क्लिक करणं' बाबांनी हळूच काडी लावली.नाहीतरी नारदमुनीचं काम बरोबर करायचे ते.अपेक्षेप्रमाणेच आई भडकली.'मला काय माहित असलं काहीतरी चुकीचं असेल म्हणून? त्या टचस्क्रीनला बोटाचा नुसता स्पर्श झाला आणि ते रामायण झालं. मी तर देवाचे श्लोक शोधत होते यू ट्यूब वर.'आईने सफाई दिली.बाबा गालातल्या गालात हसत होते.त्या दोघांची तू तू मैं मैं मंदार हताशपणे पहात राहिला.

'त्या रसिकाचं लग्न ठरलंय.तीन महिन्यात होणार आहे म्हणून सबनिसांची हॉल शोधण्यासाठी धावपळ चालू आहे.'आई मंदारला चहाचा कप देत म्हणाली.मंदारचं तिच्याकडे लक्षच नव्हते.तो लॅपटॉप वर काहीतरी काम करीत होता.आईने हळूच बाबा आजूबाजूला नाहीत ना ते पाहिले आणि मंदारला विचारले, 'मंदार,तू लग्नाला नकार का देतोस सारखा? तुझं तूच ठरवलंयस का?'

'आई', मंदारचा ‌संयम आता सुटला होता.'काय सारखं लग्न लग्न? तुला दुसरा विषय नाही का?सारखी माझ्या मागे मागे करत असतेस?जा ना दुसरं काही तरी कर ना!'

मंदारच्या अशा बोलण्याने आईच्या डोळ्यात पाणी आले.ते लपवत ती तिथून निघून गेली.मंदारला मग वाटलं, उगाच इतक्या कठोरपणे बोललो आपण आईला!त्याने‌ लॅपटॉप बंद केला आणि विमनस्क होऊन बसलेल्या आईजवळ जाऊन बसला.'आई सॉरी, मी तुला कठोरपणे बोललो.'

'तुझं तरी काय चुकलं मंदार,माझीच अवस्था एखाद्या सॅन्डविच सारखी झालीय बघ.ना मी आधीच्या पिढीसारखी संथ आयुष्य घालवू शकत ना तुमच्या पिढीसारखं वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकत.ना पूर्वीच्या काळातील पालकांसारखं मुलांना धाकात ठेवू शकत ना हल्लीच्या विचारांशी जुळवून घेऊ शकत.मधल्या मध्ये कुचंबणा.'आई भडाभडा बोलत होती.मंदार गप्प बसून ऐकत होता.इतके दिवस आई आपल्याला irritating आणि annoying वाटत होती पण तिची होणारी घुसमट,तिचा एकटेपणा आपल्याला आतापर्यंत कधी जाणवलाच नाही.

मंदारने मनाशी काही निश्चय केला आणि आईला सांगितले,'आई उद्या तयार रहा.आपण दोघांनी बाहेर जायचे आहे.'

'कुठे?'आईने आश्चर्याने विचारले.'आणि दोघेच? बाबा नाही?'

'नाही.'मंदार ठामपणे म्हणाला.

सकाळी आई बाबांसाठी स्वयंपाक करू लागली पण मंदारने तिला थांबवले.'आज तुला रोजच्या कामातून सुट्टी.बाबा त्यांची जेवणाची व्यवस्था बाहेर करतील.'आईला सगळं नवीनच होतं.पण मंदार पुढाकार घेऊन आपल्याला बाहेर नेतोय याचा तिला आनंदही होत होता.ती तिचा आवडता पंजाबी ड्रेस घालून निघाली.ओठांवरुन हलकेच लिपस्टिक सुद्धा फिरवली होती तिने.

मंदार तिला घेऊन एका मॉलमध्ये गेला.'आई तुला कसली शॉपिंग करायची आहे?'

'मला? आई गोंधळून म्हणाली,'छे रे बाबा, सगळं भरपूर आहे घरात.उगाच कशाला खर्च?'

'आई,तू मला पूर्वी एकदा म्हणाली होतीस, तुला जीन्स आणि टॉप घालायला आवडतो.मागे मैत्रिणींबरोबर गेली होतीस तेव्हा त्या सर्वजणींनी जीन्स आणि टॉप घातला होता आणि तूच एकटी वेगळी दिसत होतीस म्हणून?'

मंदारच्या बोलण्याचे तिला आश्चर्य वाटले.कधीतरी बोलून गेली होती ती पण मंदार ते लक्षात ठेवेल असं तिला वाटलं नव्हतं. मंदारने तिला जीन्स आणि टॉप घ्यायला लावला.मग दोघेही मॉलमध्ये भरपूर फिरले.दमल्यावर एका रेस्टॉरंट मध्ये शिरले.नेहमीच्या सवयीने आई मेन्यू कार्ड वरील किंमतीचा कॉलम बघू लागताच मंदार ने त्यावर हात ठेवला.'आई, तुला काय हवं ते मागव.आज आपला' सॅन्डविच डे'आहे.'सॅंडविच डे?'आईने आश्चर्याने विचारले.

'हो आई,इतके दिवस मी तुला गृहीत धरत होतो, तुझ्याकडून केवळ अपेक्षा करत होतो पण काल तू स्वतः ला सॅन्डविच ची उपमा दिलीस तेव्हा त्यातील गांभीर्य माझ्या लक्षात आलं.'दोघेही गंभीर झाले होते.वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी मंदारने विचारलं,'मग काय आई, अधूनमधून असा सॅन्डविच डे साजरा करायला तुला आवडेल ना?'

आईने पण तरुण मुलांसारखं 'याsss'असं म्हणत अंगठा उंचावला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama