ABHAY BAPAT

Crime Thriller

3  

ABHAY BAPAT

Crime Thriller

साक्षीदार - प्रकरण १३

साक्षीदार - प्रकरण १३

6 mins
179


चक्रवर्ती हॉटेल च्या रूम नंबर ९४६ च्या बाहेर पाणिनी पटवर्धन क्षणभर उभा राहिला आणि बेल वाजवली. आतून एका तरुणीचा आवाज आला, “ कोण आहे?”

“ कुरियर” पाणिनी म्हणाला

तिने दार उघडताच पाणिनी आत घुसला आणि दार लावून घेतलं. तिच्या डोळ्यावरची झोप उडाली नव्हती अजून.

“ काय आगाऊ पण आहे हा?, एकदम आत काय घुसलात?”

“ मला बोलायचं आहे तुझ्याशी.”

“ कोण आहात कोण तुम्ही? कुरियर वाला नक्कीच नाही. पोलीस? गुप्त हेर?”

“ पटवर्धन.वकील आहे मी.”

“ बर मग?”

“ मी ईशा अरोरा चा वकील आहे. काही संदर्भ लागतोय?” पाणिनी म्हणाला .

“ मुळीच नाही.”

“ फिरोज लोकवाला हा मिर्च मसाला चा मालक नाहीये हे तुला माहित्ये ना?” पाणिनी ने सहज विचारावं तसं विचारलं.

“ फिरोज लोकवाला कोण? आणि मिर्च मसाला म्हणजे काय?”

पाणिनी हसला.

“ तुला दर पंधरा दिवसांनी खर्चासाठी जो पैसे देतो तो लोकवाला आणि ते चेक ज्या कंपनीच्या खात्यातून वटतात ती कंपनी म्हणजे मिर्च मसाला. ” पाणिनी म्हणाला

“ फार चतुर आहात तुम्ही.” ती म्हणाली.

“मी माहिती मिळवत असतो इकडून तिकडून. ” पाणिनी म्हणाला

“ या सगळ्यात मी कुठे येते?”

“ फिरोज लोकवाला हा नामधारी आहे.मिर्च मसाला चा खरा मालक आहे दधिची अरोरा.” पाणिनी म्हणाला

“ मला झोप आल्ये.तुम्ही जा आता.” ती म्हणाली

“ दारा बाहेर आजचं वर्तमान पत्र पडलंय. वाचलंस ? ते वाचल्यावर झोप उडेल तुझी.”

“ काय आहे त्यात?”

“ अरोरा च्या खुनाची बातमी.” पाणिनी म्हणाला

“ नाही. आणा ते दारातून. दाखवा बरं मला. ”

“ मी नाही ,तू आण दारात जाऊन. मी आणायला गेलो तर मला तू ढकलून देशील आणि दार लावशील.” पाणिनी म्हणाला

तिने आळसातच उठून दार उघडलं आणि वर्तमान पत्र उचललं. अरोरा च्या खुनाची बातमी पहिल्याच पानावर छापून आली होती.

“ काय संबंध आहे यात माझा? कोणीतरी मेला, कोणीतरी त्याला मारलंय.” ती म्हणाली.

“ तुझ्या बथ्थड डोक्यात शिरतंय का? अरोरा च्या मृत्यू नंतर त्यांची बायको ईशा अरोरा ही मिर्च मसाला ची मालक झाल्ये.” पाणिनी म्हणाला

“ बर मग?”

“ मिर्च मसाला चे सगळे आर्थिक व्यवहार आता ईशा अरोरा च्या हातात असणार आहेत आणि ती माझी अशील आहे. तू तुझा मित्र फिरोज लोकवाला ला ब्लॅक मेल करून पैसे उकळत होतीस आणि तो मिर्च मसाला च्या एका बँकेतल्या खास खात्यातून पैसे काढून तुझ्यावर उधळत होता. हे खास खाते त्याने बातम्या मिळवण्यासाठी करायच्या खर्चासाठी वापरणे अपेक्षित होते, तुझ्यावर खर्च करायला नाही.” पाणिनी म्हणाला

“ मला यातलं काही माहिती पण नाही आणि मला याच्याशी देणं घेणं ही नाही.” वर्तमानपत्र फेकून देत ती म्हणाली.

“ आणि ब्लॅकमेलिंग चं काय?” पाणिनी म्हणाला

“ काय? कशाबद्दल बोलताय?” तिने उलट सवाल केला

“ तुला माहित्ये जिज्ञासा, तू त्याला त्याच्या चेन्नई च्या प्रकरणा वरून ब्लॅकमेल करत्येस.” पाणिनी म्हणाला

पाणिनी चा हा घाव मात्र वर्मी बसला. पहिल्यांदाच तिच्या चेहेऱ्याचा रंग बदलला.

“ तुम्हाला काय हवंय?”

“ आता तू बरोबर बोलायला लागलीस.” पाणिनी म्हणाला

“ बोलायला नाही , ऐकायला लागले आता.”

“ काल रात्री तू फिरोज लोकवाला बरोबर होतीस.बरोबर?” पाणिनी म्हणाला .

“ कोण म्हणतो तसं?”- जिज्ञासा

“ मी म्हणतोय.तू आधी त्याच्या बरोबर बाहेर गेलीस, मग तुम्ही परत आलात आणि तो रात्रभर तुझ्या बरोबर राहिला.” पाणिनी म्हणाला

“ मी एकवीस वर्षाची सज्ञान तरुणी आहे. हे हॉटेल म्हणजे माझं घरच आहे.कायद्याने मला अधिकार आहे माझ्या मित्र मैत्रिणींना सोबत करण्याचा.”- जिज्ञासा

“ अधिकार आहे ना, नक्कीच आहे.पण तुला पुरेशी अक्कल नाही असं मला वाटतंय.”

“ म्हणजे?”

“ काल रात्री हॉटेलात परत आल्यावर काय केलास तू?”

 “ हवा पाण्याच्या गप्पा मारल्या.”

“ तू रूम मधे मद्य मागवल होतंस, तू ते घेतलंस, थोडा वेळ बोलत बसलीस नंतर तुला खूप झोप यायला लागली.म्हणून झोपायला गेलीस.” पाणिनी म्हणाला

“ कोणी सांगितलं तुम्हाला?”

“ तू मला हे उत्तर देणार आहेस. तुझा हाच दावा असणार आहे की मी झोपल्यावर फिरोजकधी निघून गेला काहीच माहीत नाही मला एकदम सकाळीच जाग आली.” पाणिनी म्हणाला

“ मला झोप लागली हे सांगण्यात माझा काय फायदा?” जिज्ञासा ने विचारलं

“ तू जर झोपलीस असं सांगितलंस तर मिसेस ईशा अरोरा अफरातफर झालेल्या बँकेच्या खात्याकडे दुर्लक्ष करतील.” पाणिनी म्हणाला

“ मी झोपले नाही ना पण !” ती ठाम पणे म्हणाली.

“ नीट विचार कर पुन्हा.”

तिने डोळे मोठे करून पाणिनी पटवर्धन कडे पाहिले फक्त.कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाणिनी ने सुध्दा काही न बोलता तिथूनच कनक ओजस ला फोन लावला.

“ काही प्रगती तपासात?” पाणिनी म्हणाला

“ त्याचं ,म्हणजे फिरोजचं मूळ नाव पुष्ण चरण .आता त्याच्या हाताचे ठसे जुळताहेत का हे मी तपासून घेतो लौकरच.तर चेन्नई मधे ही तुझी जिज्ञासा आणि फिरोज उर्फ चरण प्रथम भेटले.म्हणजे तिची एक रूम मेट होती, रचना साहू नावाची. तिच्या बरोबर रहात होती. तिचं आणि फिरोजचं काहीतरी झालं आणि त्याने तिला ठार मारलं. हे सगळ जिज्ञासा समोरच घडलं.पण तिने मात्र अचानक आपली साक्ष फिरवली आणि फिरोजला क्लीन चिट मिळेल अशा पद्धतीने कोर्टात बोलली. ”-कनक म्हणाला.

“ मला वाटलं तसंच कारण निघालं.” पाणिनी म्हणाला आणि फोन बंद केला

“ तर मग काय ठरलं तुझं जिज्ञासा?”

“ माझा निर्णय तोच आहे.मी मगाशीच बोलल्ये. मी झोपले नाही हेच माझे उत्तर आहे.”

“ गंमत अशी आहे की तुझा उदयोग फक्त ब्लॅकमेलिंग पुरता मर्यादित राहिलेला नाही, तुझी चेन्नई मधील लफडी यात आहेत. फिरोजने खून केलेला आहे हे माहिती असूनही कोर्टात खोटी साक्ष देऊन त्याला वाचवलंस पण खोटी साक्ष देऊन कोर्टाची दिशाभूल आणि अवमान केल्याचा खटला तुझ्यावर चालू होईल आता.”

भीतीने तिचे डोळे बाहेर यायचेच बाकी होते.

“ अरे देवा !” ती उसासा देत म्हणाली.

“ तर मग तू झोपली होतीस रात्री गाढ.” पाणिनी जो देत म्हणाला.

“ तसं असेल तर वाचेन यातून मी?”

“ मला माहीत नाही , माझ्या बाजूने मी विषय संपवीन पण दुसऱ्या कोणी पुन्हा ते खणून काढलं तर मी काय करणार? ” पाणिनी म्हणाला

“ ठीक आहे मान्य आहे मला ,मी झोपले होते.” ती म्हणाली.

“ तुला हे कायमचं लक्षात ठेवावं लागेल.जर लोकवाला ला तू सांगितलंस मी इथे येऊन तुला काय प्रस्ताव दिलाय ते, तर तू आहेस,मी आहे आणि तुझे चेन्नई तले उद्योग आहेत !” पाणिनी ने दम भरला.

“मला समजलय, माझ्या गळया पर्यंत आलंय हे.” ती म्हणाली.

आणि पाणिनी बाहेर पडला.

आपल्या गाडीत बसून तो थेट बंदुका आणि रिव्होल्वर ची अधिकृत विक्री करणाऱ्या निम-सरकारी दुकानात , सुदाम नावाच्या माणसाच्या दुकानात गेला.पाणिनी चा तो खास मित्र होता

 “ आज कशी काय आठवण आली गरिबाची?” सुदाम ने विचारलं.

“ गरिबाला जरा श्रीमंत करावं असं डोक्यात आलं.” पाणिनी म्हणाला आणि खिशातून पाचशे च्या दोन नोटा काढून त्याच्या खिशात कोंबल्या. सुदाम ने किती पैसे आहेत हे पाहिलं सुध्दा नाही.कामाच्या स्वरूप नुसार पाणिनी आपल्याला योग्यच नाही तर जरा जास्तच रक्कम नेहेमी देतो हे त्याला माहीत झालं होतं. मैत्री आणि व्यवहार यात पाणिनी पटवर्धन कधी गफलत करत नाही याचा त्याला अनुभव होता.

“ मला जरा तुझं रजिस्टर दाखव, बंदुका विक्रीचं ” पाणिनी म्हणाला

सुदाम ने त्याच्या कडे ते दिल्यावर पाणिनी ने चाळायला सुरुवात केली.खरेदी करणाऱ्याचे नाव, पत्ता, दिनांक, बंदुकीचा प्रकार,खरेदी करणाऱ्याची सही अशा नेटक्या नोंदी होत्या. ३२-कोल्ट ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर या प्रकारच्या नोंदीवर पाणिनीने लक्ष केंद्रीत केलं.त्याला हवं होतं त्या नोंदीवर बोट ठेऊन पाणिनी ने सुदाम ला दाखवलं.

 “ हाच.” पाणिनी म्हणाला

“ त्याचं काय?” –सुदाम

आज किंवा उद्या एका माणसाला घेऊन मी इथे येईन. तो तुझ्या समोर आला की त्याला बघता क्षणीच तू होकारार्थी मान हलवून म्हणायचं, ‘हाच तो माणूस. नक्की हाच.’ मग मी तुला दोन तीन दा विचारीन की तुझी खात्री आहे? प्रत्येक वेळी तू अधिक ठाम पणे म्हणायचं की ‘ हो, हो हाच तो.’ तो माणूस नाकारेल, पण जेवढे नाकारेल तेवढया वेळा तू जोरात हो म्हणायचं.लक्षात आलं?”

  पाणिनी म्हणाला

“ पाणिनी, जरा गंभीरच दिसतंय हे प्रकरण !” सुदाम उद्गारला.

“ नाही, जो पर्यंत तुला हे कोर्टात सांगायला लागत नाही तो पर्यंत गंभीर नाही.तू हे त्याच्या शिवाय कोणालाही सांगणारच नाहीयेस.आणि गंमत म्हणजे तू फक्त हाच तो माणूस म्हणून ओळखणार आहेस.म्हणजेच कशा बद्दल ओळख पटवतो आहेस हे त्याला कळणार नाहीये त्याला. ”

सुदाम ला पटलं आणि तो नि:शंक झाला.

“ तुझं ओळख पटवण्याचं काम झालं की तू आत निघून जायचं फक्त तुझं ते रजिस्टर बाहेर माझ्याजवळच ठेवायचं.” पाणिनी म्हणाला

“ सगळ व्यवस्थित कळलं मला पटवर्धन.” सुदाम म्हणाला. “फक्त एक शंका आहे, तुझ्या बरोबर जो कोणी माणूस येईल त्याचीच ओळख पटवायची आणि हाचं तो असं म्हणायचं ना? म्हणजे भलताच माणूस वेगळ्याच कामासाठी तुझ्या बरोबर येणार नाही ना?”

“ डोन्ट वरी” पाणिनी म्हणाला  “ मला नेमका माणूस सापडे पर्यंत तुझ्या कडे येणारच नाही मी.”

पाणिनी खुष होवून शिट्टी वाजवत बाहेर पडला.

( प्रकरण -१३ समाप्त.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime