साधीभोळी माणसं
साधीभोळी माणसं
गावातील अतिशय प्रामाणिक माणुस ,दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल.
विष्णू गोमा तळपे यांचे आणि माझे सबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते व अजुनही आहेत.त्यांच्या घरी काही विशेष पक्वान्न असले की तो सकाळीच मला सांगुन ठेवत असे. संध्याकाळी जेवायला ये बरं का!संध्याकाळी मी घरी यायची तो वाट बघत असे,
विष्णू तळपे हा पुर्वी गाजलेला पहिलवान होता.त्यामुळे त्याला आखाड्यातील कुस्त्या पाहण्याची आवड होती.गावातील पहिलवान मंडळींना तो सतत प्रोत्साहन देत असे . मी त्याला विष्णू नाना म्हणतो,
भागातील यात्रेचा आखाडा बघून आल्यावर रात्री जेवण झाल्यावर त्यांच्या दारात गावातील पहिलवान मंडळी व माझ्या सारखे कुस्ती न खेळणारी पोरं जमत असत.दुपारी झालेल्या आखाड्यातील कुस्यांचे अगदी बारीक सारीक बारकाव्यासह विष्णू नाना चितपट झालेल्या कुस्तीचे वर्णन करीत असे.हे ऐकतांना प्रत्यक्ष कुस्ती चालू आहे असा भास होई.विजयी झालेल्या नामांकित पहिलवानाचे विष्णू नाना तोंडभरून कौतुक करत असे.कुस्त्यांच्या गप्पा ऐकायला मोठी मजा वाटे.क्षणभर आपणही पहिलवानकी करावी की काय?असे वाटे...एखाद्या पहिलवानाने आखाड्यात जर मुजोरी केली असेल तर विष्णू नाना त्याच्या खास शैलीत टीका करीत असे.
माझे आणि त्याचे विशेष घरोब्याचे सबंध असल्यामुळे विष्णू नाना मला कुस्ती खेळण्याचा सल्ला देई.परंतू मला हा छंद नसल्यामुळे मी कुस्तीकडे कायमच दुर्लक्ष करायचो.या मुळे त्याचे मला कायम बोलने ऐकुन घ्यावे लागत असे.
मी महाविद्यालयीन शिक्षणा साठी राजगुरूनगर येथे होतो.तेव्हा तालुक्यातील भाम नेहर,भिमनेहरातील ब-याच मुलांबरोबर माझ्या ओळखी झाल्या होत्या.अनेकांच्या गावी माझे यात्रेच्या निमित्ताने जाणे येणे होते.त्यामुळे तेथेही अनेकांच्या ओळखी झाल्या होत्या.
यात्रेच्या हंगामात आंबोली भलवडी वि-हाम,कुडे,घोटवडी अशा अनेक गावचे पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी आमच्या भागात येत असत.यातील बरेचसी नामांकित पहिलवान मंडळी माझ्याकडे मुक्कामी येत असे.दुसऱ्या दिवशी ही मंडळी बोर्डाच्या विहिरीवर अंघोळ करण्यासाठी जात असे.तत्पुर्वी तेथील दुला तळपे यांच्या खाचरात त्यांची कुस्त्यांची कसरत चाले.गावातील पहिलवान मंडळी त्यांच्यात सामील होत असे.विष्णू नानाच्या जेव्हा हे निदर्शनास येई तेव्हा तो सर्व कामधाम सोडून कुस्त्यांची कसरत पहायला बांधावर बसून बारीक निरिक्षण करत असे.
ही मंडळी आपल्या गावात कोणाकडे आली आहेत याचा तो खुलासा करी. ही पहिलवान मंडळी माझ्याकडे आली आहेत हे समजल्यावर तो आश्चर्यचकीत होत असे.तो अनेकांना विचारायचा अगदी मलाही...तु कधीच कुस्ती खेळत नाही..मग हे लांबलांबचे पहिलवान तुझ्याकडे कसे काय येतात? परंतू याचे उत्तर त्याला अद्यापही कुणीच दिले नाही.
माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्ही लहान भावंडे अगदीच अनाथ झालो होतो.त्यावेळी विष्णू नाना नेहमीच दुंःखातुन सावरण्यासाठी प्रेरणादायक अनुभव सांगत असे.त्यामुळे दुःखातुन सावरण्यासाठी त्याची मोलाची मदत झाली.व पुढील आयुष्य जगायला नवी उमेद मिळाली.
सन १९९८ साल असेल.विष्णू नाना ने घर बांधायला काढले होते.त्यासाठी मी त्याला अर्थिक मदत केली होती.दररोज मी त्याच्या दारावरूनच जात - येत असे.त्यामुळे घराचे काम कसे चालले आहे हे जवळून पहाता येई.दोन पाखी,पुढे खुप मोठ्ठी गच्ची पुढे अंगण असलेले कौलारू, पाच खण ...असे ते घर होते.
घराचे काम चालू होते.आम्ही जाता येता पहात होतो..सर्व काम पुर्ण झाले होते.वासे ठोकून झाले होते.परंतु बँटम व कौलांचे काम बाकी होते.त्या अभावी काम बंद होते.मी दररोज विचारायचै विष्णू नाना अरे हे काम करून घे पाऊसाला आता सुरूवात होईल.यावर तो म्हणायचा.करायचय.चालू..होईल. शेवटी एक दिवस
मी त्याचा मुलगा धोंडुला विचारले.
अरे काय प्राँब्लेम आहे..घराचे काम बंद का ठेवलयं?
यावर त्याने सांगीतले अरे पैसेच नाहीत..काय करणार?
अरे मग मला विचारायचे ? आपण काहीतरी मार्ग काढला असता.?
यावर तो म्हणाला.तुझ्या कडून आधीच पैसे घेतले आहेत.परत कसे मागणार?
अरे करूया आपण काहीतरी..
माझ्याकडे एक नवीन आँईल इंजीन होते.हे आँईल इंजीन माझे मित्र श्री.संजय नाईकरे यांचेकडे होते.हे इंजीन आम्ही विकले.व आलेल्या पैशातुन मी आणि धोंडूने खेडवरून बँटम विकत घेतली.व तातडीने काम पुर्ण झाले.
परंतु थोड्याच दिवसात विष्णू नानाने माझे सर्व पैसे दिले..परंतू अजुनही कधी भेटल्यावर बाबा तु होता म्हणुन घर झालं..नाहीतर पाण्या पावसात आमची परवड झाली असती..वाद्यावै-यांचा हसू झाला असता.
आमच्या रानात बरीच हिरड्यांची झाडे आहेत.हे सर्व हिरड्यांचे राखण करणे,हिरडे झाडावरून पाडणे,ते घरी घेऊन येणे,रोजच्या रोज वाळत घालणे हे काम विष्णू नानाचा थोरला मुलगा दगडूदादा करायचा.
दगडुदादा सुद्धा गावातील साधा.सरळ व स्वभावाने गरीब असा माणुस होता.त्याला बैलांची व शेतीची खुप आवड होती.काही काम नसलेतरी रानात किंवा शेतात चक्कर मारायचाच.
बैलांना कासरा,दावे वळने,म्होरक्या विणने,उन्हाळ्यात घराच्या मागे बैल बांधण्यासाठी वाडा तयार करणे.. मोठे होत असलेल्या गो-ह्यांना औताला तयार करणे असे त्याला छंद होते.
दगडूदादा आजारी असताना आम्ही त्याला डाँक्टरांकडे घेऊन गेलो.डाँक्टरांनी तपासल्यावर अँडमीट करायचा सल्ला दिला..यावर दगडूदादा रडायलाच लागला..
नका डाक्टर.. मला अँडमीट करू नका.माझ्या बैलांना चारापाणी कोण घालनार?माझे शेत कोण करणार?
नंतर दगडूदादा खुप आजारी पडला..आजाराने उग्र रुप धारण केले.त्याला यशवंतराव चव्हाण हाँस्पिटल पिंपरी येथे अँडमीट केले.नंतर तेथे दोन्ही किडण्या फेल झाल्याचे निदान झाले..आणि त्याला घरी घेऊन जाण्यास सांगीतले.
घरी आल्यावार सर्व पर्याय बंद झाले.अशाही परिस्थितीत जेव्हा बरे वाटू लागेल तेव्हा हळूहळू रानात जाऊन येत असे.शेतात जाऊन कामाची पहाणी करत असे.
एकदा सकाळीच विष्णू नाना माझ्याकडे आला...
तु दगडुला घेऊन वरच्या भोमाळ्याला सावंत भगताकडे गेला तर बरं होईल..तो चांगला भगतय...अस दगडू म्हणतोय?
त्याच्या किडण्या निकामी झाल्या आहेत हे ना विष्णू नानाला माहीत ना दगडूदादाला,.
तरीही त्या दोघांच्याही समाधानासाठी मी आँफिसला जायच्या ऐवजी दगडूदादालामोटार सायकलवर घेऊन वरच्या भोमाळ्याला भगताकडे घेऊन गेलो.
तिकडुन परत येताना रस्त्याच्या बाजुला एक आंबा होता..त्यावर खुपच पिवळेधम्मक पाड दिसत होते..हे पाहिल्यावर दगडुदादाने मला गाडी थांबवायला सांगीतली..
आम्ही दोघेही खाली उतरलो.मी गाडी स्टँडवर लावेपर्यांत दागडुदादाने झाडावर चढायला सुरूवात केली..
अरे हे काय करतो?तु आजारी आहेस..झाडावार कशाला चढतो?
परंतू त्याने माझे कसलेही न ऐकता झाडावरच्या सर्व फांद्या हेलकावून सर्व आंब्याचे पाड खाली पाडले. व खाली उतरला.
मी खालचे सर्व पाड गोळा केले.त्याने त्यातला एकही आंबा खाल्ला नाही..
मी त्याला म्हणालो अरे कशाला मग झाडावर चढला?तु आजारी आहेस..
यावर तो म्हणाला...तु लांब शहरात राहतो.तुला गावचे रानातले आंबे कसे खायला मिळणार? आंब्याचा सिझन चालू आहे..तेव्हा म्हणलं..तुला मिळतील दहा - पाच आंबे खायला..त्याचे माझ्यावरचे प्रेम बघून मला गहिवरून आले..
पुढे दोनच दिवसांनी दगडूदादा गेल्याचा निरोप आला आणि मी सुन्नच झालो..क्षणभर काहीच सुचेना एकदम भोवळ यावी तसे झाले..मनपटलावरून दगडूदादाचे एक एक चित्र तरळून गेले..
आता मी कधीतरी गावाला जातो..विष्णू नाना मला भेटतो..आता तो ठार बहिरा झालाय..त्याला काहीच ऐकायला येत नाही..मी त्याच्याशी खुणेनेच संवाद साधतो.खुप गप्पा मारायची इच्छा असते..परंतू त्याला ऐकायला येत नसल्यामुळे काहीच उपयोग होत नाही.
काहीही म्हणा जुनं ते सोनच..आताची पीढी त्यातल्या त्यात बरी आहे..परंतु पुढची पीढी ही स्वतःपुरतीच मर्यादित असणारी असेल व माणुसकी हरवुन बसलेली असणार हे नक्की..