Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

रस्त्याचे वांधे

रस्त्याचे वांधे

26 mins
163


         साटेलोटे नगरीचे महापौर वांधे नुकतेच झोपेतून उठले होते.चहाचा घोट घेत असताना त्यांचा भ्रमणध्वनी खणाणला.शहरातील जनतेची गा-हाणी,तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी स्वत:चा विशेष भ्रमणध्वनी क्रमांक सार्वजनिक केला होता. त्या भ्रमणध्वनीवर शहरातील कोणताही नागरिक थेट महापौर यांशी संपर्क साधू शकत होता. गेले पंधरा दिवस वांधे एका वेगळ्याच आजाराने त्रस्त होते. दिवस-रात्र ते त्या आजारामुळे बेचैन होते. 'जीव नकोसा झालाय' अशी त्यांची मन:स्थिती झाली होती. महानगरपालिकेच्या (मनपा) कार्यालयात जायचे ते टाळत होते.तशाच अवस्थेत घरी बसून ते महत्त्वाच्या पंजिका हातावेगळ्या करीत असत. त्या आजाराने केवळ स्वत: महापौरच त्रस्त नव्हते तर नव्वद वर्षांची त्यांची आईसुध्दा त्याच आजारामुळे काही महिन्यांपासून पडून होती.बसल्या जागेवरून हात लांबवून महापौरांनी भ्रमणध्वनी उचलला.त्यावर अनोळखी क्रमाकं पाहून 'काय तक्रार आहे ? असे म्हणत महापौरांनी भ्रमणध्वनी सुरू केला.

"हॅलो,महापौर वांधे का?"

"बोलताये.बोला..." बोलणे अवघड जात असतानाही महापौर म्हणाले.

"काय बोला? सारे वांधेच होऊन बसलेत.वांधे नावाचे गृहस्थ शहराचे पाहिले नागरिक असताना वांधेच होणार ना? बरे,उद्या होळी आहे. तेंव्हा शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने शहरात रस्तोरस्ती पडलेले,एकूण एक लहान-मोठे खड्डे भरभरून आपणास होळीच्या शुभेच्छा!"

"अहो, हे-हे काय बोलता?"

"वांधेजी,मी खोटे बोलतोय का? तुम्ही स्वतः शहराच्या कोणत्याही भागातल्या रस्त्यावर सुईचे टोक बसेल असा रस्त्याचा अणू मला दाखवा.माझी सारी जायदाद तुमच्या नावे करून एका क्षणात रस्त्यावरच्या खड्ड्यात स्वतःला बुडवून घेईन.ळठेवतो..." म्हणत तिकडून भ्रमणध्वनी बंद झाला.आजार आणि तशा दूरध्वनी मुळे वैतागलेल्या महापौरांनी भ्रमणध्वनी बाजूला फेकला. तितक्यात त्यांच्या सौभाग्यवती चहाचा ट्रे घेऊन तिथे आल्या. त्यांनी विचारले,

"का हो,कसे वाटतेय ? फरक वाटतोय का?"

"मुळीच नाही.आई कशी आहे?"

"काहीही फरक नाही. उलट दिवसेंदिवस आजार बळावतोय. काय करावे काही समजत नाही.काय-काय उपाय झाले पण काडीचाही फरक नाही. हकिम झाले, वैद्य झाले. वीस-पंचवीस डॉक्टर झाले शंभर वेळा रक्त,लघवी, संडास यांच्या तपासण्या झाल्या. यज्ञ- महायज्ञ,रूद्र-महारूद्र,नवस सायास झाले. यात्रा झाल्या. कोंबडज,बकरे,शेळ्या, मेंढ्या यांच्या आहुत्या झाल्या. पण तोळाभर फरक पडेल तर शपथ ! मला सांगा, महापौराची खुर्ची मिळावी म्हणून तुम्ही काही नवस बोलला होता काय? महापौर झाल्याच्या आनंदात विसरून तर गेला नाहीत ना?"

"नाही ग. जे काही नवस बोललो होतो ते सारे नवस महापौर झाल्याबरोबर फेडून टाकले. म्हटलं, महापौर हे पद काय आज आहे,उद्या नाही. शिवाय सध्याचा उपमहापौर स्पर्धेत होता.आताही तो टपून बसलाय.तो केव्हा दगा करेल आणि माझी खुर्ची बळकावेल ते सांगता येत नाही.नगरसेवक, वरिष्ठ , मंत्री-संत्री नागरिक सांभाळता-सांभाळता महापौराची मुदत संपून जाईल आणि नवस फेडायचे राहिले तर मग स्वतःच्या पैशातून फेडावे लागतील म्हणून मग मनापाची तिजोरी रिकामी केली आणि सारे नवस दणक्यात फेडून टाकले. सगळे मिळून अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये खर्च झाले."

"अग बाई, हिशोब किती पक्का आहे तुमचा आणि बघा ना आकडाही कसा शुभ जुळूनआलाय."

"ते झाले ग.पण हा आजार का मागे लागला?"

"अहो,असे तर झाले नसेल ना,की तुम्ही सारे नवस सरकारी पैश्यातून फेडले म्हणून तर देव तुम्हाला अशी शिक्षा देत नसावा?"

"अग चूऽप ! काहीही बोलू नकोस. देवाला फक्त नवस फेडण्याशी मतलब. पैसे कुणाचेही का असेनात? आणि ऐक ते असते ना ग,की एखाद्या देवस्थानी स्वत:च्या खर्चाने जायचे नसते. कुणी तरी त्या कुटुंबाला त्या देवस्थानचे दर्शन घडवून आणायचे असते. किंवा कुणाकडे एखादी वस्तू घ्यायची नाही अशी परंपरा असते. ती वस्तू कुणी तरी घेऊन दयायची असते.अगदी तसाच हा माझा नवस फेडण्याचा प्रयत्न समज..." महापौर बोलत असताना त्यांच्या व्हाट्सअप वर एक संदेश आल्याची सूचना प्राप्त झाली. महापौरांनी भ्रमणध्वनी उचलला आणि 'संदेश पेटारा' उघडला. उप-महापौरांनी एक चित्रात्मक मजकुर पाठविला होता.अर्थात त्यांना कुणी तरी तो पाठविला होता. लिहिले होते, 'शहरात होळीचे रंग भलत्याच जोमाने भरल्या जात आहेत.एका सामाजिक संघटनेने एक फतवा काढलाय, की नैसर्गिक रंगाने होळी खेळण्यासाठी असा प्रयोग करू या.शहरात दोन-चार दिवसांपासून जोमदार अवकाळी पाऊस सुरू आहे.त्यामुळे शहरातील एकूण-एक खड्डे पाण्याने भरलेले आहेत.खड्डयांमध्ये असलेल्या मातीचे रंग पाण्यात मिसळून त्या पाण्याला एक विशिष्ट नैसर्गिक रंग प्राप्त होतो आहे. हेच पाणी होळीचा रंग म्हणून एकमेकांच्या अंगावर फेकूया. रंग खरेदीचा पैसाही वाचेल आणि नैसर्गिक रंग असल्यामुळे शरीरास काही इजा होणार नाही. चला तर मग....खेळू या रंग होळीचे...."

"काय सांगावे, बाप्पा? कशाचा संबंध कशालाही जोडतात."

"अहो, काय झाले? कुणी काही संदेश पाठवलाय का? सारे ठीक आहे ना? एखदा नागरिक गचकला नाही ना?" सौ. वांधे यांनी विचारले.

     महापौर काही बोलण्यापूर्वीच त्यांच्या भ्रमणभध्वनीवर संदेश आला. तो संदेश फेसबुकवरआला होता. वांधेनी तो संदेश पाहिला. त्यावर एका सुंदर नवजात बालकाचे छायाचित्र होते. त्या खाली लिहिले होते, 'अभिनंदन! विचार अभिनंदन! मनपातील सर्व संबंधित विभागाचे, घटकांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मनापासून आभार ! अहो, हे सुंदर बालक म्हणजे नुकतेच जन्मलेले माझे गोंडस बाळ आहे. वास्तविक हे पोरगं दोन महिने आधीच म्हणजे सातव्या महिन्यात जन्माला आलय. डॉक्टरांनी दोन महिन्यानंतर बायकोचे पोट फाडून चिरंजीवाला भुतलावर आणण्याची तारीख दिली होती. पण झाले काय, काल शहरामध्ये एका कार्यक्रमामध्ये आम्ही दोघे नवरा -बायको गेलो होतो. स्वतःच्या दुचाकीवर! तशा अवस्थेत तिला दुचाकीवर नेणे म्हणजे एक दिव्यच होते. परंतु मी शुद्ध अंतःकरणाने तिला घेऊन गेलो आणि बाईकवरूनच परत घेऊन आलो. काय सांगू तुम्हाला रात्री दहाच्या सुमारास घरी पोहचलो आणि बायकोच्या पोटात दुखायला लागले. काही क्षणात वेदना तीव्र झाल्या. तसा घाबरलो. माझी आई म्हणाली की घाबरू नको.वाहन बघ. दवाखान्यात न्यावे लागेल. ताबडतोब अॅटो घेऊन आलो. दारात पाय टेकला न टेकला तो चक्क बाळाच्या रडण्याया आवाज आला. मला पाहिल्याबरोबर आई म्हणाली की, आम्ही बाईकवर बाहेर जाऊन आलो त्यावेळी खड्ड्यांमुळे जे धक्के बसले त्यामुळे ही आपोआप बाळंत झाली. तुम्हाला काय सांगू केवढा झाला. अहो,एक तर मुलगा झाला. दुसरे म्हणजे ते नो सिझेरिंग! सर्वात महत्वाचे म्हणजे दवाखान्याचे साठ हजार वाचले की हो. म्हणून महापौरजी,तुम्हाला धन्यवाद ! लगे रहो. खड्डे बुजवूच नका. बाळंतपणाचा खर्च वाचला ना तर माझ्यासारख्यांना 'अच्छे दिन' येतील.'

    'झोडा रे झोडा ! काय पण वेळ आलीय. ही बिमारी पण कमी होत नाही.. 'असे पुटपुटत महापौर वांधे दाणकन. सोफ्यावर बसले न बसले तोच पुन्हा त्यांच्या व्हाट्सएपवर एक संदेश प्राप्त झाला. कपाळावरील आठ्यांचे जाळे अधिकाधिक घट्ट करून वैतागलेल्या चेहऱ्याने वांधेनी संदेशाची पेटी उघडली,

    'मी नुकताच एक व्हाटस्-अप् समूह स्थापना केला आहे. त्यात खासदार, आमदार, मंत्री, महापौर, उप-महापौर यांच्यासह शहरातील सर्व संस्था पदाधिकारी, अधिकारी यांना समाविष्ट केले आहे. अशा रथी -महारथी उपस्थिती असलेल्या ग्रुपमध्ये येण्यासाठी नागरिकांची झुंबड उठेल. शहरात, गल्लोगल्लीत ज्यावेगाने खड्डयांची संख्या वाढू लागलेय त्यापेक्षा अधिक वेगाने आपल्या ग्रुपमध्ये येणारांची संख्या वाढते आहे. आपल्या आजूबाजूच्या परिचित, नातेवाईक, मित्र इत्यादी सर्वांना आपल्या खड्डयांमध्ये....माफ करा...आपल्या खड्डेग्रुपमध्ये येण्याचे आमंत्रण द्यावे....'

हा संदेश वाचून होतो न होतो तोच त्या ग्रुपमध्ये संदेश यायला सुरूवात झाली.एका संदेशात लिहिले होते, गत दोन दिवसांपासून उन्हाळा असूनही शहरात पावसाचे आगमन झाल्यामुळे पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या पक्षांना संजीवनी मिळाली आहे. बघा. गर्मीमुळे त्रस्त झालेले पक्षी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यांमध्ये किती मस्तपैकी, स्वच्छंदपणे विहार करताहेत आणि त्याच्या बाजूचे चित्र बघा. पावसामुळे शाळांना सुट्टी असलेली मुले कागदाच्या नावा करून खड्डयांमधील पाण्यामध्ये सोडून स्वत:काठावर बसून का होईना पण नौकाविहाराचा आनंद घेत आहे, तो ही फ्रीमध्ये !थँक्यू ! महापौर, उप-महापौर आणि मनपा !आमच्या चिमुकल्यांना तशी संधी उपलब्ध करून दिल्याबाबत !' खड्डाग्रुपमध्ये एका मागोमाग एक संदेशांचा पाऊस पडू लागला.एका संदेशामध्ये लिहिले होते,

'बुजवूच नका खड्डे.आपल्या पुर्वजांना कुठे माहिती होते, गुळगुळीत,चकचकीत रस्ते! खड्यांमधून चालण्यातच त्यांचा जन्म गेला ना! चांगले रस्ते नसल्यामुळे काही अडले का त्यांचे ?खड्डे ही नैसर्गिक गोष्ट आहे तर पक्के रस्ते हे अपवाद आहेत. अपवाद कधी तरी समोर येतात.' पाठोपाठ एक कविता ग्रुपमध्ये आली,

'खड़ेच खड्डे चोहीकडे,

गेला रस्ता कुणीकडे ?

इथे दिसेना तिथे दिसेना,

शोधू कुठे, शोधू कुठे?

दिसला ग बाई दिसला,

खड्ड्यांमध्ये लपलेला

छोटा रस्त्याचा तुकडा दिसला....'

   'उथळ खड्डा,खोल खड्डा,

   त्रिकोणी खड्डा,चौकोनी खड्डा !

   मोठा खड्डा, लहान खड्डा...

  खड्डाआणि खड्डा !'

विषय मिळला उशीर,शीघ्र कवींनी कवितांचा खच पाडला. जणू 'एक खड्डा एक कविता.. एक खड्डा एक झाड याप्रमाणे!'

    महापौर रागारागाने त्या ग्रुपमधून बाहेर पडले परंतु पुन्हा दोनच क्षणामध्ये त्यांना त्याच खड्डाग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतल्याचा संदेश आला आणि वांधेनी स्वत:चे कप्पाळ बडवून घेतले. ते विचारमग्न होऊन बसलेले असताना त्यांना मनपाच्या मागच्या मासिक बैठकीत घडलेला प्रसंग आठवला....

    मनपाची मासिक बैठक तणावाच्या वातावरणात सुरू असताना आयुक्त म्हणाले, 'माननीय महापौर यांच्या परवागनगीने मी सभागृहाचे लक्ष एका महत्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो. माझ्याकडे काही वैद्यकिय पर्ततेसंचधीची देयके आली आहेत. सुमारे दहा कोटी रुपयांची देयके आली आहेत."

"कुणी सादर केले? मागच्याच बैठकीमध्ये आपण सर्वानुमते निर्णय घेतला होता, की मनपाची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन,नवीन आर्थिक तरदूत होईपर्यंत कुण्याही कर्मचाऱ्यास वैद्यकिय मदत देऊ नये. कुणी पाठविलीत ही देयके ?कर्मचारी एवढे कसे निर्ढावलेत?आयुक्त, आपल्या कर्मचाऱ्यांवर आपला जरब नाही का?'' विरोधी पक्ष नेत्याने संतप्त होत विचारले.

"तसे नाही.ही देयके कर्मचाऱ्यांची नाहीत."

"का..य? कर्मचाऱ्यांची नाहीत तर मग काय नगरसेवकांची आहेत ?जिथे नोकरशहांचा हक्क आपण प्रलंबीत ठेवतोय तिथे नगरसेवकांची घरे कशी काय भरली जाणार?"

"ही देयके कर्मचारी किंवा नगरसेवक यांची नाहीत तर शहरातील नागरिकांनी दाखल केलेली आहेत." आयुक्त म्हणाले.

"हे तर नवीनच ऐकतोय. असे झाले तर जो-तो उठेल आणि मनपाचे कर्मचारी जसे खोटे नाटे वैद्यकीय देयके सादर करून मनपाला करोडो रुपयांचा चुना लावतात तसे होईल." स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणाले

"आयुक्त.. कुणी आणि का दाखल केलीत देयके?" महापौर वांधे यांनी विचारले.

"महोदय, सात-आठ नागरिकांनी एकत्रितपणे ही देयके दाखल केली आहेत. सोबत एक पत्र ही आहे.वाचतो...

'माननीय आयुक्त, विनंती,की आम्ही आमची वैयक्तिक देयके दाखल करीत आहोत. आपल्या शहराची 'खडेयुक्त शहर' म्हणून सर्वत्र नोंद होते आहे. उद्या कुणी सुज्ञ नागरिकाने आपल्या शहराचे नाव बदलून 'खड्डेनगर' असे नामकरण करावे अशी मागणी केली आणि त्यासाठी आमरण उपोषणाचा रस्ता धरला तर नवल वाटू नये.एवढे प्रचंड खड्डे आपल्या शहरात पडले आहेत.त्यामुळे अर्जदार क्रमांक १ यांना खड्डयातून ये-जा करावी लागल्यामुळे पाठीच्या मणक्याचा आजार जडला. मणक्यामध्ये पडलेला गॅप भरून काढण्यासाठी त्यांना लाखो रूपयांचा खर्च आलाय.

     अर्जदार क्र.२ हे आपल्या शहरातून सक्तीची दैनिक खड्डेमय सफर करीत असताना त्यांची गाडी खड्डयात पडली त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाचा गुडघा चकनाचूर झाला. गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, औषधोपचाराचा खर्च दहा लाखांच्यावर गेला आहे.

       अर्जदार क्र.३ यांच्याकडे एक अत्यंत महागडी कार होती. परंतु रस्त्यातील खड्ड्याच्या प्रतापामुळे त्यांचे वाहन पार निकामी झाले आहे.विमा कंपनीने त्यांचा आर्थिक दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी अशी मागणी केलीय,की आजच्या बाजारभावाप्रमाणे मनपाने त्यांच्या कारची नुकसान भरपाई द्यावी.

   अर्जदार क्र.४ यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे, की त्यांच्या पतीचा खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला असून त्यावेळी त्यांचे वय २४वर्षे होते आणि अर्जदाराचे वय २२वर्षांचे होते. अर्जदारास एक छोटी मुलगी आहे. महिलेचे शिक्षण फारसे झालेले नाही. केवळ आणि केवळ मनपाच्या 'खड्डा अभियाना'मुळे त्यांच्या पतीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे मनपाने अर्जदारास कायम स्वरूपाची नोकरी द्यावी किंवा त्या दोघींचा खर्च भागविण्यासाठी एक रकमी दहा कोटी रूपये द्यावेत.

      वरीप्रमाणे इतर काही नागरिकांनी मनपाकडे नुकसान भरपाईपोटी दाखल केलेली देयके आयुक्तांनी सभागृहापुढे मांडताच मुख्य लेखापाल उभे राहुन म्हणाले, "मी एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो,की मनपाकडे अशी कोणतीही आर्थिक तरदूत नाही... "

"नाही. नकोच.वेगळी तरतूद करण्याचा ठराव कुणी मांडू नये.कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावू नये.उद्या कुणीही उठेल आणि खड्ड्यांमुळे असे झाले,तसे झाले त्यापोटी एवढी रक्कम द्या.अशी अवास्तव मागणी करेल." एक सदस्य म्हणाले.

"बरोबर आहे. भीक नको,कुत्रा आवर..." दुसरे एक सदस्य तावातावाने बोलत असताना अजून एक सदस्य म्हणाले,

"तुम्ही या शहरातील सन्माननीय नागरिकांचा घोर अपमान करीत आहात.तुमच्या वाक्यातील भीक हा शब्द भिकारी या अर्थाने वापरून तुम्ही जनतेचा अपमान करीत आहात."

"न-न-नाही.तसे नाही. ही एक म्हण आहे. मी फक्त ती वापरली."

"भिकारी म्हणाला नसेल तर 'कुत्रा' हा शब्द नक्कीच वापरला आहे. माझ्यातर्फे,माझ्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो."

"अहो,पण..."

"शब्द मागे घ्या. माफी मागा..."

"माफी मागितलीच पाहिजे..."

"नाही.नाही.राजीनामा हवा."

"दिलाच पाहिजे,राजीनामा दिलाच पाहिजे."

   सदस्य जोरजोराने घोषणा देत असताना अनेक सदस्य हातघाईवर आले,एकमेकांच्या अंगावर धावून गेले.धक्का-बुक्की,ठोसाठोशी करताना अगदी एक-दुसऱ्याचे कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली.त्यात महिला सदस्य मागे राहिल्या नाहीत.महापौर वांधेंनी सभागृहातले बिघडलेले वातावरण पाहून सभा स्थगित केली आणि स्वत:च्या दालनात येऊन बसले.त्यांच्या पाठोपाठ उप-महापौर, सभागृह नेते,विविध समित्यांचे अध्यक्ष आणि अनेक नगरसेवकही दालनामध्ये आले.

"काय करणार वांधेसाहेब, रस्त्याचा प्रश्न फार गंभीर झालाय हो-कुणा-कुणाला उत्तरे द्यावीत?कोणा-कोणाची तोंडं बंद करावीत? रोज कुणी ना कुणी नागरिक खड्डयाची तक्रार घेऊन येतोच येतो."

"अहो, तुम्ही असे म्हणता पण मला एक चांगला अनुभव आला आहे. माझ्या प्रभागातील एका महिलेने मला पत्र लिहून माझ्या प्रभागातील आणि शहरातील खड्डे न बुजविल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. झाले काय, त्या महिलेला एक मुलगी आहे. रंग-रुपाने तशी विशेष नाही. वय पस्तीस वर्षाचे झाले तरीही तिचे लग्न जुळत नव्हते. महिन्यापूर्वी ती मुलगी स्कुटीवरून बाहेर जात असताना एका मोठ्या खड्ड्यात पडली. दुपारची वेळ असल्याने रस्ता तसा निर्मनुष्य होता. तिला वर निघता येत नव्हते. काही क्षण ती तळमळत असताना, मदतीसाठी ओरडत असताना एक तरुण तिथून जात होता. त्याने तिची अवस्था पाहिली. त्याने तिला बाहेर येण्यासाठी मदत केली. तरुणी बराच मार लागला होता. तो तरुण तिला दवाखान्यात घेऊन गेला. त्या घटनेमुळे त्या दोघांचे सूर जुळले आणि पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले." एक नगरसेवक म्हणाले.

    "माझा अनुभव अगदी उलट आहे. मागच्या रविवारी माझ्या प्रभागात भलताच प्रकार घडला माझ्या वॉर्डात एक सुखवस्तू आणि धनाढ्य गृहस्थ राहतात. चांगली उच्च शिक्षित माणसे आहेत. त्यांच्या एकुलत्या एक आणि मोठ्या पदावर असलेल्या मुलाचे लग्न ठरले. रविवारी साखरपुडा होता. आजकाल बहुतेक साखरपुड्याचे कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचे लग्नच! शहरातील

कार्यालय ठरविले होते.ठरल्याप्रमाणे मुलीकडील मंडळी त्यांच्या गावाहून चार-पाच वाहने करून निघाली.वेळोवेळी संपर्क सुरू होता.आपल्या शहरात पाहुण्यांचे आगमन झाले आणि त्यांचा फोन आला, की ते शिवाजीनगरात आलो आहोत परंतु ते कार्यस्थळी न येता गावी परतत आहेत."

"काय सांगता?" शेजारच्या नगरसेवकाने विचारले.

"होय! कारण विचारताच ते म्हणाले, की शहरात पोहचल्यापासून त्यांना खड्डयांनी हैराण केले आहे.आमच्या पोरीला तुमच्या घरी म्हणजे या शहरात जन्म काढायचा आहे. तिला आम्ही आमच्या हाताने खड्ड्यात नाही ढकलू शकत.तेंव्हा हे लग्न होणे नाही."

"बाप रे ! मग काय झाले?"

"आम्ही येईपर्यंत जाऊ नका अशी वारंवार विनवणी करून मुलाकडील प्रमुख मंडळी त्यांचेकडे गेली.अनेक विनंत्या, मिन्नतवाऱ्या केल्या परंतु ते मानायलाच तयार नव्हते. शेवटी त्यांच्याकडील एका माणसाने प्रस्ताव मांडला,की एका अटीवर आम्ही लग्नासाठी तयार आहोत."

"चला. म्हणजे त्या कुटूंबावरचे आणि आपल्या शहरावरील फार मोठे संकट टळले तर."

"ऐकून तर घ्या त्यांची अट ! ते म्हणाले,आमच्या शहरात येऊन पहा,?रस्ते कसे गुळगुळीत आहेत ते. तुमचा मुलगा लग्नानंतर आमच्या घरी येऊन राहणार असेल पर्यायाने घरजावई होणार असेल तरच आम्ही लग्नाला तयार आहोत."

"बाप रे बाप! काय हा खड्डेप्रताप! त्यांची अट मान्य झाली?"

"कशी होणार ?त्याचा एकुलता एक मुलगा आहे. ते कसा त्यांचा प्रस्ताव मान्य करणार ? लग्न मोडले हो त्यांनी ?"

"अरेरे ! काय बाट लावली या खड्ड्यांनी ?"

"असे प्रकार वाढू लागलेत हो. माझ्या प्रभागातील अनेक मुलांना केवळ शहरातील खड्डयांमुळे अनेक मुलींनी नाकारल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे."

" हे तर काहीच नाही.तुमचे कुणाचे लक्ष नसेल,परंतु शहरात जिथून कुठून प्रवेश करण्याचे रस्ते आहेत ना,त्या प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी कुणी तरी फलक लावलेत,की यह खड्डों का शहर है,देर रात इस शहर में आना, खुद की जान का खतरा मोल लेने जैसा है...."

"कसे आहे, अनेकानेक प्रकार घडत असूनही आपण शहरात खड्डे कमी करू शकत नाही. ही परिस्थिती वरचेवर बिकट होत चालली आहे.मागच्या पावसाळ्यात शहरातील अनेक नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपन केले होते आणि कडी म्हणजे त्या कामाच्या रीतसर पत्रिका छापल्या होत्या.त्रमहापौर या नात्याने मला अध्यक्ष केले होते. मला तो कार्यक्रम वेगळा असेल असे वाटले नाही. बरे, आयोजकांनी ताकास तूर लागू दिली नाही.सुंदर व्यासपीठ तयार केले होते.बऱ्यापैकी गर्दी जमली होती. सत्कार झाले. प्रास्ताविक झाले.ळदोन-चार जणांची भाषणे झाली. वृक्षारोपणाचे महत्व विषद करणारे माझेही छोटेखानी भाषण झाले. शेवटी वृक्षारोपण करण्यासाठी आम्ही खाली उतरलो.ळव्यासपीठाच्या बाजूला मुख्यरस्त्यावर पडलेल्या भल्या-थोरल्या खड्डयात लावण्यासाठी माझ्या हातात एक रोपटे देण्यात आले....बेशरमीचे होते हो...आता बोला." महापौर म्हणाले.

"बेशरमीचीही हद्द झाली.माझ्यापुढे वेगळेच संकट आहे. शहरात माझे सहा बार आहेत पण सारे बंद पडायची वेळ आलीय हो. वर्षभरापूर्वी बारपासून मिळणारे करोडो रूपयांचे उत्पन्न आज दहा-बारा लाखांवर आलेय."

"का? बारमधून झिंगणाऱ्या अवस्थेत बाहेर पडणाऱ्या लोकांना खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे हे काय समजणार?"

"तसे नाही हो. पिऊन घरी परतताना खड्डयात पडणारांची संख्या भरपूर वाढली आहे.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चिअर्स करणारांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आहे."

"ते झाले असेल पण त्यामुळे एक झाले असेल ना, बेहोश होऊन परतणाऱ्या न बेवड्याऐवजी होशमधला नवरा घरी परतलेला पाहून बायका चियरफुल राहत असतील..."

"वा !चला. हे मात्र छान झाले. कोणत्याही कारणावरून का होईना पण कुणी तरी आनंदी आहे ना,मग झाले तर."

"विनोदाचा भाग सोडला तर महापौर, परिस्थिती भयंकर...महाभयंकर आहे. एका संस्थेने शहरातील खड्डयांचे सर्वेक्षण केले तेंव्हा त्यांनी जाहीर केलेला आकडा झोप उडविणारा आहे. आपल्या शहराच्या लोकसंख्येपेक्षा किती तरी हजारपटीने खड्डे जास्त आहेत."

“लोकसंख्या वाढली म्हणून नसबंदीचा उपाय सुरू झाला. आता या खड्डयांची नसबंदी कशी करावी?"

"नसबंदीचे सोडा. माझ्याकडे बांधकाम विभागाचे अभियंते वेगळीच तक्रार घेऊन आले होते. त्यांचे असे म्हणणे आहे, की परवा आपल्या शहरात एक फार मोठा कार्यक्रम झाला. अतिभव्य व्यासपीठ उभारण्यासाठी, स्वागताचे, आभाराचे फलक लावण्यासाठी मोठमोठाले खड्डे खोदण्यासाठी मनपाची परवानगी घेतली नाही म्हणून अभियंते, अधिकारी यांचे पथक त्यांना नोटीस बजवायला गेले तर त्यावेळी संबंधित उप नागरिकांचे असे म्हणणे पडले, की खड्डे खोदायला रस्ते आहेतच कुठे ? आम्ही कोणताही रस्ता उखडला नाही. उलट जे आधीचे खडे होते त्यातच बांबू उभे करून खडकाची भर टाकून आम्ही रस्ते बुजविले. जे काम मनपाने केले नाही ते काम आम्ही केले. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी आणलेल्या खडकाचे आणि मजुरीचा खर्च मनपाने दयावा. आता बोला."

"अहो, आजचे वर्तमानपत्र कुणी वाचले नाही का?'' उप-महापौर हातातले वर्तमानपत्र उंचावून म्हणाले.

"काय वाचायचे त्यात असून असून असणार काय तर खड्डेच ! येऊन जाऊन जो उठतो तो खड्डयावर लिहतो.मी तर वर्तमानपत्र वाचायचे सोडा परंतु घ्यायचे देखील बंद केले आहे."

"अशी काय बातमी आहे त्यात उप-महापौर?" महापौरांनी विचारले.

"हे बघा महापौर,तुम्ही सारखं सारखं मला उप-महापौर, उप-महापौर असे हिणवू नका. मला महापौरपद मिळाले नाही ही जखम घेऊन मी चोवीस तास फिरतोय आणि त्यावर तुम्ही मीठ चोळू नका."

"त्यात हिणवायचा किंवा मीठ चोळायचा प्रश्न येतोच कुठे ?तुम्ही निर्वाचित उप-महापौर आहात."

"तेच तर ना. मीही त्यावेळी महापौरपदाच्या शर्यतीत होतो.अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही माझा पत्ता कट करून हे पद मिळवलेत.

“जाऊ द्या ना.झाले ते झाले. आजचा उप-महापौर उद्याचा महापौर असू शकतो."

"महापौरसाहेब, निदान कोपराला गुळ तरी लावू नका. आरक्षणाच्या चक्रव्युहामध्ये ती संधी केव्हा येईल?"

"बरे,वर्तमानपत्रात अशी कोणती बातमी आहे?"

"अंत्यसंस्कार होणार आहेत,अंत्यसंस्कार!"

"वर्तमानपत्रात अंत्यसंस्काराची बातमी म्हणजे तरी बडी आसामी गेली म्हणायची. कोण आहे?"

"ते जाऊ द्या हो. कोणी का असेना? आपल्याला काय त्याचे ?कोणत्या मसनात जायचे आणि किती वाजता जायचं तेवढे सांगा."

"खड्ड्यात आहेत अंत्यसंस्कार!"

"अच्छा ! म्हणजे अग्नीसंस्कार नाहीत."

"अहो अग्नीसंस्कारच आहेत...खड्डयात !"

"का ऽय? खडयात ?आता हे काय नवीन खुळ?"

"त्याचे असे आहे, मयताच्या घरासमोरच्या रस्त्यावर म्हणे १० फुट लांब,३फुट रूंद,आणि २फुट खोल या मापाचा खड्डा पडलाय...मनपा कृपेने ! काही दिवसांनपूर्वी रात्री उशिरा 'चियर्स' संपवून 'फुल्ल' झालेले हे गृहस्थ दुचाकीवरून घरी परतत असताना रात्रीच्या अंधारात त्यांना तो खड्डा दिसला नाही. दुचाकीसह तो माणूस सरळ त्या खड्डयात पडला.भरपूर मार लागल्याच्या अवस्थेत त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पुर्ण बेशुध्द होण्याच्या आधी त्याने म्हणे अंतिम इच्छा व्यक्त केली, की जर त्याला मृत्यू आला तर त्याला ज्या खड्डयामुळे अमरत्व प्राप्त झाले त्याच खड्ड्यात त्याची माती करावी. काल तो माणूस मरण पावला.आज सायंकाळी चार वाजता त्याच खड्ड्यामध्ये अंत्यसंस्कार आहेत. "

"महापौर, ही त्या इसमाची नाही तर आपली माती आहे. कारण तिथे उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या नावाचा जप करणार."

"ते काय नवीन आहे का? शंभर वर्षाची सौभाग्यवती तिच्या ऐंशी वर्षाच्या वैवाहिक जीवनात स्वत:च्या पतीचे नाव घेत नसेल त्यापेक्षा शतपटीने अधिकवेळा या शहरातले लोक आपली नावे रोज घेत असतील."

    तितक्यात मनपाच्या आयुक्तांनी महापौरांच्या दालनात प्रवेश केला. ते म्हणाले, "महापौरसाहेब, एक भयंकर बातमी आहे."

"आता अजून काय वाढणआणलेत?"

"आपल्या बांधकाम विभागातले सारे अभियंते संपावर जात आहेत.त्यांचे म्हणणे आहे,रस्त्यासाठी वारंवार येणारा पैसा फक्त अभियंत्यानीच खाल्लेला नाही.पैसा खाण्यामध्ये अभियंत्यांचा 'खारीचा वाटा असतानाही भ्रष्ट्राचारामध्ये अडकवून त्यांनाच शिक्षा होत आहे.ज्यांचा 'सिंहाचा' वाटा आहे, असे लोक मोकाट फिरताहेत."

"आयुक्त, शांत व्हा बसा. निघेल काहीतरी मार्ग."

"वा! महापौर, वा! किती लाइटली घेता हो तुम्ही.असे करा आयुक्त, मनपाचे एक अधिवेशन बोलावा. त्यात आपण महापौर वांधे यांची 'नोबेल' शांतता पुरस्कारासाठी शिफारस करू या." अर्थ विभागाचे सभापती म्हणाले.

"वा ! उत्तम कल्पना आहे. परंतु या पुरस्कारावर उपमहापौर या नात्याने माझाही हक्क असणारच आहे." उप-महापौर यांच्या विधानावर हास्याची कारंजी फुलली.

"त्यापेक्षा एक करू या आपल्या मनपाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड' या बहुमानासाठी व्हावी अशी शिफारस.'' शिक्षण सभापती म्हणाले.

"कोणता बहुमान मिळतोय कुणाला?खड्ड्यांना...." महापौरांच्या दालनात शिरलेल्या आरोग्य सभापतींनी विचारले.

"ते जाऊ द्या.आपली सभा-चालू असताना तुम्ही मध्येच कुठे गायब झाला होता?" महापौरांनी विचारले.

"काय झाले,आपली सभा सुरू असताना मला एक दूरध्वनी आला,की माझ्या प्रभागात नागरिकांनी एक 'खड्डा हनिमून' पकडले आहे." सभापती म्हणाले.

"हा कोणता नवीन प्रकार म्हणावा?"

"खड्ड्यातला हनिमून चालू असताना पकडले असेल." एक पक्षनेते म्हणाले.

"तेच ते. वॉर्डातील एक तरूण आणि एक तरूणी रस्त्यावरच्या एका खड्ड्यात नको त्या अवस्थेत सापडले. त्यांचे ते धाडस आणि आगावूपणा पाहून लोक खवळले. दोघांनाही बेदम मारले. मला भ्रमणध्वनी आला. मी लगोलग पोहोचलो. मी त्या मुलाची चौकशी करीत असताना तो निर्लज्जपणे म्हणाला की, मुंबईला चौपाटीवर आणि इतर ठिकाणी राजरोसपणे असले प्रकार चोवीस तास चालतात. मग आम्ही येथे केले तर बिघडले कुठे? नाही तरी हा मुख्य रस्ता असूनही खड्ड्यांमुळे सुनसानच असतो. कुणी इथे येत नाही की जात नाही. त्यामुळे इथे नेहमीच 'कार्य' चालू असते. दुर्देवाने आम्ही पकडल्या गेलो."

"वा रे,मेरे शेर! आयडिया! महापौर, आयडिया! असे करू या की, सारे खड्डे रात्रभर अशा प्रेमवीरांसाठी खुले करूया. खड्ड्यांना 'हनिमून पार्क' असे नाव देऊया. त्यामुळे रस्ते दुरूस्त करावयाची गरज नाही. दुरुस्तीचा खर्च तर वाचलेच शिवाय हे खड्डे सशुल्क दिल्यामुळे प्रचंड पैसा प्राप्त होऊन मनपा आर्थिक बाबतीत सक्षम होईल." मनपाचे अर्थ समिती अध्यक्ष म्हणाले.

   ती चर्चा चालू असताना तिथे आलेले विरोधीपक्षाचे नेते म्हणाले, "अरे,वा !सारा सरकारपक्ष इथे आहे तर !"

"तुम्ही आले आणि या दालनाची शोभा वाढली. कसे आहे विरोधी पक्षामुळे सरकारची शोभा आणि किंमत दोन्हीही वाढते. नाही तर आम्हाला विचारतो कोण?"

"ते जाऊ द्या. वांधेजी, आपल्यापुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना आहे का तुम्हाला?"

"काय हो,काय झाले ? मनपा बरखास्त झाली की काय ?"

"तो दिवसही दूर नाही.विरोधी पक्षनेते म्हणून काही गोष्टी लक्षात आणून द्याव्यात म्हटले तर तुम्ही ही अशी आमची खिल्ली उडवता."

"कसे आहे,सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये असते, विळ्या-भोपळ्याचे नाते ! विळा भोपळ्यावर पडला काय किंवा भोपळा विळ्यावर पडला काय."  

"झाले. महापौर,शेवटी तुम्ही आमचा भोपळा केला तर ! ठीक आहे. पण हे बघा, माझ्या हातामध्ये आत्ताच प्रकाशित झालेले सायं दैनिक आहे. त्यात अशी बातमी आहे, की शहरातील काही संघटनांनी असा निर्णय घेतला, की यापुढे आपल्या शहरातील मसणात.. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करायचे नाहीत.''

"मग कुठल्या मसणात जाणार?"उप महापौरांनी विचारले.

"दुसर्या शहरातील स्मशानभूमीत जाऊन...."

"का?आपल्या येथील मसणवटे तर अत्यंत आधुनिक आहेत. आपण अंत्यसंस्कारासाठी कोणतेही शुल्क घेत नाहीत.शिवाय अंत्यविधीसाठी लागणारे सारे साहित्य अगदी गुलाल-उदबत्तीसह मोफत देतो ना."

"मग काय झाले ते स्पष्ट सांगा

"दोन,दिवसांपूर्वी शहरातील एक इसम मृत पावला. त्यावेळी आपली एक शववाहिनी गॅरेजवर होती तर दुसरी शववाहिका एका अंत्ययात्रेला गेली होती.तिला यायला बराच वेळ लागणार होता. सायंकाळ होत आली होती म्हणून शेवटी खांदेकरी पुढे झाले. अंत्ययात्रा निघाली. मयत व्यक्ती चांगली जाडजूड म्हणजे वजनाचे शतक पूर्ण केलेली होती.त्यामुळे खांदेकऱ्यांच्या नाकीनऊ येत होते. एका भला मोठ्ठा खड्डा चुकविताना एका खादेकऱ्याचा तोल गेला आणि नो एका खड्ड्यात पडला. त्यामुळे इतर तिघांचाही तोल गेला. दोघांच्या अंगावर ते जाडजुड शव पडले तर दोघेजण खड्ड्यात पडले. त्यामुळे चौघांनाही मार लागला. त्यापैकी दोघे गंभीर आहेत म्हणे."

"मला सांगा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची सर्वत्र बोंब होत असताना त्या खादेकरांना खड्डे दिसू नयेत? स्वतः चुका करतात आणि त्याचे खापर मनपावर फोडताना आपल्या नावाने शिमगा करतात.मी तर म्हणतो हा या विरोधी पक्षाचा डाव असलाच पाहिजे."

"उप-महापौर तुम्हाला जळी-स्थळी पाषाणी आम्ही म्हणजे विरोधक दिसावेत हे ठिक आहे हो पण आता तुम्हाला 'स्मशानी'ही विरोधक दिसाताहेत.कमाल आहे.'' विरोधी पक्ष नेते म्हणाले...

         तितक्यात महापौर वांधे यांचा भ्रमणध्वनी खणाणला आणि ते भूतकाळातून वर्तमानात परतले. भ्रमणध्वनीवर 'आमदार' नाव पाहताच कपाळावरील आठ्यांचे जाळे अधिकाधिक घट्ट करून, नाक मुरडत त्यांनी भ्रमणध्वनी उचलला. कानाला लावताच खोकल्याची उबळ यावी तशी उचक्यांची उबळ आली. जणू एका मागोमाग एक फुटणाऱ्या फटाक्यांची लड!

"हे काय, महापौर वांधे, काय झाले?" आमदारांनी विचारले.

"अहो,गेल्या अनेक दिवसांपासून मी असा उचक्या देऊन-देऊन परेशान आहे. पाण्याचा घोट घेतला, की उचकी लागते आणि सारे पाणी बाहेर येते. अन्नाचा कणसुध्दा गिळता येत नाही. या उचक्यांमुळे ना पोटातल्या आतडी, छातीचा पिंजरा,घसा, डोके दुखतेय बघा.चेहराही कसा ओढल्यासारखा झालाय. प्रचंड अशक्तपणा आलाय. उभे राहवत नाही,बोलवत नाही,ते जाऊ दया. तुम्ही कशासाठी फोन केलाय?"

"अहो वांधे, शहरातील रस्त्यांची काय अवस्था झालीय ती ठाऊक आहे ना?"

"आजारी असलो तरी महापौर आहे.सगळीकडे लक्ष ठेवून आहे."

"काय खाक लक्ष आहे तुमचे? खड्डयांमुळे सारे शहर त्रस्त आहे. आज माझी गाडी खड्डयात गेली. तुम्ही माझ्यासोबत असते तर तुम्हाला समजले असते. थोडासा मार लागला. कसा तरी गाडीबाहेर पडलो तर हा भला मोठा जमाव धावून आला. मदत करायला नाही तर माझ्या सात पिढ्यांचा उद्धार करायला. कुणी तरी गाडीवर दगडही फेकला. कारच्या काचा चकनाचूर झाल्या आहेत.त्याचे बिल काय मनपाकडे पाठवू ?"

"पाठवा ना! शेवटी मनपाचा पैसा कुणासाठी आहे? आणि हो आपली कार तुम्ही मनपाच्या तिजोरीतून 'ऍडजेस्ट' करून घेतलीच आहे. शेवटी मी इथे बसलोय कशालाठी? आपल्या सर्वांची घरे भरण्यासाठीच ना? मला महापौर केलेत ते का सहजासहजी? पक्षाच्या तिजोरीत केवढी रक्कम मोजावी लागली ते आठवते ना? पक्षाध्यक्ष, मंत्री, आमदार, खासदार यांची पाद्यपूजा वेगळी. महापौर मला केलेत पण हे वेगवेगळे सभापती, उप-महापौर माझ्या उरावर बसविलेत ते कशासाठी? राहिला मनपाचा विरोधी पक्षनेता! तोही तुमच्या मर्जीतला, खिशातला! जो उठतो तो स्वतःची गैरवाजवी, गैरकानुनी कामे घेऊन येतो. कोणा-कोणाला आणि कसे, किती वेळा एडजेस्ट करू? शिवाय सारे हिशोब आणि जाब विचारायला तयार. एक साधा हिशोब तुम्हाला सांगतो,शहर विकासासाठी समजा शंभर रूपयाचा निधी मान्य झाला तर मंत्रालय,आमदार, खासदार, महापौर-उपमहापौर, समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता,आणि अशीच नोकरशहांची साखळी....असे वाटता-वाटता प्रत्यक्ष कामासाठी फक्त दहा ते पंधरा रूपये शिल्लक राहतात. त्या निधीतून कसे काम होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या शहरातील रस्ते...."

"महापौर,असा त्रागा करण्यापेक्षा, जबाबदारी पेलवत नसेल तर पद सोडून आराम करा ना?"

"कसा आराम करू,आमदार? माझे स्वत:चे घर भरण्याचे सोडा परंतु महापौर पद मिळविण्यासाठी मोजलेली किंमत तर वसूल करू द्या. मी माझे पद सोडण्याची तयारी दाखविली तर मी ज्याला-ज्याला खोकी पोहचविलीत ती का परत मिळतील? इतरांचे सोडा पण माझ्या पारड्यात तुमचं वजन पडावं म्हणून तुम्हाला अर्पण केलेली रक्कम तरी तुम्ही द्याल का?''

"ठेवा. जा खड्ड्यात...." असे म्हणत आमदारांनी रागरागाने फोन बंद केला.

"लागल्या का मिरच्या आमदारसाहेब? मी खड्डयात पडलोच ना तर एकटा नाही पडणार..." बोलता- बोलता महापौरांना पुन्हा उचक्यांची उबळ आली. जवळ असलेल्या पाण्याचा घोट त्यांनी महत्प्रयासाने गिळला.

        दुपारचे बारा वाजत होते. महापौर वांधे यांच्या बंगल्यावर त्यांच्या पक्षातील काही वजनदार नगरसेवकांचे आगमन झाले. वांधेच्या तब्येतीची चौकशी, अभिवादनाचे आदान-प्रदान होताच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड प्रयत्न करूनही अपयश आलेले नगरसेवक म्हणाले,

"वांधे साहेब, या खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतोय. तोंड दाखवायला जागा राहिली नाही हो.काल माझ्याकडे शहरातील दहा-बारा बचतगटांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी एक महाबचत गट स्थापन केलाय. जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन महाबचतगटाच्या माध्यमातून आपल्या शहरात दह्यापासून ताक तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा त्यांचा विचार आहे."

"अहो, आनंदाचीच गोष्ट आहे ही." वांधे आनंदानं म्हणाले.

"हो.ना.मनपाकडून लागणारी सारी मदत ताबडतोब करूया. अगदी प्रकल्पासाठी परवानगी देण्यापासून ते प्रत्यक्ष ताक विक्रीतून मिळणाऱ्या करातून मनपाला प्रचंड फायदा होईल..."

"मनपा जाऊ द्या हो खड्डयात ! कर मिळो अथवा न मिळो आपला कसा फायदा होईल ते बघा."

"बरोबर आहे.आपल्याला मलई जास्त प्रमाणात कशी मिळेल ते बघा."

"मिळणारी मलई आपल्याच पक्षातील नगरसेवकांना मिळाली पाहिजे. विरोधी पक्षाला काहीही मिळू नये. कसे?"

"खरे आहे.त्यामुळे चिडलेले ते नगरसेवक 'ताक-ताक,लोणी-लोणी' करत त्या प्रकल्पाच्या वाहनांमागे फिरतील.''

"अहो,ही मनपाची सभा नाही. काहीही नीट न ऐकता जीभ उचलून टाळूला लावू घेऊ नका.आपल्या शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आलेले ते शिष्टमंडळ विरोधात्मक बोलत होते."

"म्हणजे? ताक प्रकल्प,लोणी,मलई..."

"असे काहीही चाटायला मिळणार नाही. मोर्चा काढण्याची एक अफलातून कल्पना आहे ती...''

"म्हणजे ? काय ते स्पष्ट सांग राव."

"त्यांचे नियोजन असे आहे, की शहरातल्या सर्व बायकांनी एकत्र जमायचे. चार-पाच दिवसांपूर्वी विरजू घातलेल दही हंडा, तांब्यामध्ये भरून ऑटोमध्ये बसायचे. ते सारे ऑटो शहरभर प्रभातफेरी काढल्याप्रमाणे फिरवायचे. त्यामुळे काय होईल खड्ड्यांमधून जाताना अॅटोसारखे आदळत राहतील. त्यामुळे भांड्यातील दही आपोआप घुसळले जाऊन त्याचे ताक तयार होईल..."

"अहो, हे काय नवीनच सांगत आहात तुम्ही ?"

"वांधेसाहेब, खरे तर बोलतोय. त्या सर्व बायका चवताळलेल्या वाघीणीप्रमाणे बोलत होत्या. त्यापैकी एक जण म्हणाली ,की मोर्चामध्ये तयार झालेले ताक आणि लोणी सरळ मनपामध्ये घेऊन जाऊ या. सर्वांच्या डोक्यावर ते ओतू या. कदाचित त्यामुळे तरी संबंधित सारे जागे होतील.म्हणून म्हणतो वांधेसाहेब,काही तरी करा बाबा." ते नगरसेवक म्हणाले आणि ते शिष्टमंडळ निघून गेले. त्यांच्याशी चर्चा करीत असताना वांधेच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश आला होता. खड्डा व्हाटस्अप ग्रुपवर एक सदस्याने टीप टाकली होती, 'दोन दिवसांपूर्वी घरासमोर खेळणारे तीन वर्षाचे बालक एका खूप खोल आणि मोठ्या खड्ड्यात पडले ते एवढे घाबरले होते ,की जणू वाचा बंद झाल्याप्रमाणे खड्ड्यातच पडून राहिले. घरातले, शेजारचे लोक सर्वत्र त्याचा शोध घेत होते. चार पाच तास झाले. कुणी तरी म्हणाले की, गल्लीतल्या खड्ड्यात बघितले का? ते सारे धावले आणि शेवटी ते बालक एका खड्ड्यात सापडले.'

        सकाळची वेळ होती. महापौर वांधे आलिशान बंगल्यातील बैठकीमध्ये बसून उचक्या देत होते. सतराव्या दिवशीही उचकी कमी होण्याचे नाव नव्हते. त्यांच्या मातोश्रीनाही तशाच एक सारख्या उचक्या लागत होत्या. शेजारी पडलेले वर्तमानपत्र वांधेनी उचलले. त्यातल्या एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले...

     'दुधवाल्यांनी शहरात दुध आणणे बंद केले.' अशा ठळक बातमीखाली सविस्तर बातमी अशी होती, 'रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातील नागरिकांसाठी शहराला दुध पुरवठा करणारे दुधवाले त्रस्त झाले असून त्यांनी शहरामध्ये दूध न आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीत त्यांचा एक प्रतिनिधी म्हणाला,की शहरात घरोघरी दूध पोहचवताना खड्यामुळे दूध उसळ्या मारते.त्यामुळे अर्धेअधिक दूध सांडल्यामुळे जणू खड्ड्यांना अभिषेक होतो. त्यामुळे प्रचंड नुकसान होते. फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. शिवाय खड्ड्यातून जाताना वाहनाचा वेग कमी-जास्त करावा लागतो. वारंवार गियर बदलावा लागतो. हा सर्व खर्च आम्हाला परवडणारा नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. राहिला प्रश्न दुधाचे काय करणार? तर आम्ही आमचे दूध शेजारच्या गावामध्ये नेऊन विकू. नाही तर मग सरळ गायी- म्हशी विकून टाकू."

       'आता हे एक नवीनच झेंगट आले म्हणायचे...' असे म्हणत वांधे यांनी वर्तमानपत्राचे पान उलटले आणि त्यांचे लक्ष त्या बातमीवर गेले,

'खड्ड्यांमुळे गणपती बाप्पा येणार नाहीत. आमच्या विशेष प्रतिनिधीने कळविल्याप्रमाणे शहरातील खड्डे असेच कायम राहिले तर यावर्षी बाप्पांची स्थापना न करण्याचा निर्णय शंभर वर्षाची परंपरा असलेल्या काही मंडळांसोबत छोट्या-मोठ्या अनेक गणपती मंडळांनी घेतला आहे.'

'बाप्पा रे बाप्पा! अशी का रे परीक्षा पाहतोस? काय करावे ते समजत नाही. उचक्यांमुळे धड कोणता निर्णय घेता येत नाही, कुणाशी चर्चा करता येत नाही. तंदुरुस्त असतो तर काहीही करून रस्त्याचा प्रश्न निकाली काढला असता. एखादा निर्णय घेऊन पैसे मोकळे करावेत तर खाणारी तोंडं का कमी आहेत? असाच हातावर बसून राहिलो तर हां-हां म्हणता कार्यकाळ संपून जाताच निवडणुका लागतील आणि मग जनतेसमोर काय तोंड घेऊन जावे? येणाऱ्या निवडणुकीत अपक्षांनी 'खड्डा' चिन्ह घेऊन निवडणूक लढविली तर बहुमताने अपक्ष निवडून येतील. आज दुधवाल्यांनी दूध न आणण्याचा निर्णय घेतला. उद्या भाजी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी तसाच ठराव घेतला तर मग संपलेच सारे. चोहोबाजूंनी कोंडी होते आहे. महापौर पद जणू चक्रव्यूह बनले आहे. काय करावे?' ते तशा विचारात असताना त्यांचा एक नोकर तिथे येऊन म्हणाला,

"साहेब, बाहेर काही माणसे आली आहेत." महापौरांनी त्याला हातानेच 'पाठव' असे खुणावले.

    काही क्षणात सहा-सात माणसे आत आली.प्रत्येकाने परिचय देताच त्यातील एक जण म्हणाला, "आम्ही शहरामध्ये खड्डे 'बचाव-खड्डे बढाव' समिती स्थापन केली आहे.आपणास एक निवेदन देत आहोत. ते स्विकारावे...."

  ती व्यक्ती बोलत असताना ते सारे उभे राहिले. सर्वांनी मिळून वांधे यांच्याकडे निवेदन दिले.काही जणांनी तो क्षण भ्रमणध्वनीमध्ये टिपला.महापौरांनी ते निवेदन वाचायला सुरूवात केली,

     मा.महापौर,

        सेवेत विनंती,की शहरातील खड्डे बुजवण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. उलट अजून त्यामध्ये भर कशी पडेल याचे नियोजन करावे. कारण शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मानेचे,पाठीचे,मणक्याचे,कमरेचे आणि शरीर दुखण्याचे आजार वाढले आहेत. डॉक्टरांकडे रोग्यांची प्रचंड गर्दी होत आहे.त्यामुळे विविध प्रकारचे वेदनाशामक तेल, मलम,गोळ्या आणि इंजेक्शन यांच्या विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. हे आजार कमी व्हावे,सुसह्य, व्हावे म्हणून 'डॉक्टर आजार तसा पट्टा' वापरण्याचा सल्ला देत आहेत.खड्ड्यांमुळे सारी वाहनेही वरचेवर खराब होताहेत. प्रत्येकवेळी वाहनाचा कोणता न कोणता अवयव निकामी झाल्यामुळे बदलावा लागत आहे.त्यामुळे वाहनांच्या सुट्या अवयवांची तुफान विक्री होत असल्यामुळे मनपाला प्रचंड कर मिळतो आहे.

  महत्वाचे म्हणजे देशामध्ये केवळ आपल्याच शहरात खड्डे आहेत असे नाही तर एकाला झाकावे नि दुसऱ्याला काढावे याप्रमाणे शहरोशहरी खड्डे आहेत.उद्या 'खड्डेयुक्त शहर' असा पुरस्कार शासनाने द्यायचे ठरविले तर तो पुरस्कार आपण नक्कीच मिळवू. आणि हो खड्डे कुठे नाहीत? अगदी चंद्रावरसुध्दा खड्डे आहेतच ना मग आपणच कशाला खड्ड्यांची चिंता करायची? तेंव्हा विनंती,की शहरातील खड्डे मुळीच बुजवू नका.'

निवेदन वाचून महापौरांनी वर बघितलं. 'खड्डे बचाव खड्डे बढाव' समितीचे सारे सदस्य केंव्हाच निघून गेले होते...

      त्या दिवशी सकाळी महापौर वांधे सोफ्याच्या कडेवर डोके ठेवून विचारमग्न झालेले असताना, उचकीची मालिका सुरू असताना त्यांच्या पत्नीचे तिथे आगमन झाले.दोघे काही बोलण्यापुर्वीच मनपाच्या रामजी नावाच्या कर्मचाऱ्याने तिथे प्रवेश केला.त्याने विचारले,

"साहेब,राम राम ! काय म्हणते तब्येत?"

"तसुभरही फरक नाही." महापौर म्हणाले.

"अहो,मग डॉक्टर का नाही बदलत? ते म्हणतात ना, सेकंड ओपिनियन..."

"रामजी,पुण्या-मुंबईचे मिळून दहा-बारा डॉक्टर झाले."

"लहान तोंडी मोठा घास घेतो पण एक विचारतो, माणसाला उचकी केंव्हा लागते?"

"कुणी तरी आठवण काढते तेंव्हाच उचकी लागते म्हणतात." तिथे आलेल्या सौ. वांधे म्हणाल्या.

"ताईसाब, एकदम बरोबर आहे."

"माझी अशी एक सारखी आठवण कोण काढत असेल?"

"राग मानू नका साहेब, पण क्षणोक्षणी अगदी रात्रीसुध्दा कोणाच्या ना कोणाच्या ओठी तुमचेच नाव असते."

"पण का? का घेताहेत लोक माझे नाव?"

"सोप्प आहे,साहेब. म्हणजे खड्ड्यांमुळे हो. शहरातील खड्यांमुळे ज्याच्या त्याच्या तोंडी तुमचेच नाव येते. कसे आहे,जनता सारी त्रस्त आहे.गाड्यांवरून आणि गाड्यांमधून जाताना गचका बसला रे बसला ,की प्रत्येक जण तुमची आणि तुमच्या आईसाहेबांची आठवण काढतो..."

"अच्छा ! असे म्हणा,की प्रत्येक जण चोवीस तास सेकंदा-सेकंदाला आमचा आणि आईचा उध्दार करतो आहे.त्यामुळे आम्ही दोघेही या आजारांमुळे त्रस्त आहोत तर!"

"रामजीकाका, यावर उपाय काय करावा?" सौ. वांधेंनी विचारले.

"ताईसाहेब, काहीही करू नका. फक्त रस्त्यावर पडलेले खड्डे साहेबांनी बुजवावेत.उचकी आपोआप थांबेल बघा." असे म्हणत रामजी आतल्या खोलीत निघून गेला.

"अहो,ऐका ना.... "म्हणत सौ. वांधे नवऱ्याला हळू आवाजात काही तरी सांगू लागल्या.

"बरे.ठीक आहे.बघतो..."महापौर नाराजीच्या स्वरात म्हणाले आणि त्यांनी एक क्रमांक जुळविला.

    दुसऱ्याच दिवशी शहरातील प्रत्येक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर दिवस-रात्र सुरू झाले. तशी शहरात विशेषत: राजकीय लोकांमध्ये त्या कामाची चर्चा सुरू झाली. मनपाच्या कार्यालयात एक सारखी विचारणा होऊ लागली. परंतु ते तरी काय सांगणार? त्यांना काहीच माहिती नव्हते. स्वतः महापौर 'मला काहीही माहिती नाही.कुणी तरी दानशूर व्यक्ती असावी. करू द्या की. चांगलेच आहे.' असे उत्तर देत होते. जो कंत्राटदार ती रस्त्याची कामे करीत होता. त्याला अनेकांनी गाठले. प्रश्नांचा भडिमार होताच ते सुहास्य वदनाने शांत राहिला.

          दोन दिवसात शहरातील अर्धे - अधिक खड्डे बुजवून झाले. आश्चर्य म्हणजे महापौर आणि त्यांच्या आईला त्रस्त करीत असलेल्या उचक्यांमध्ये लक्षणीय फरक पडला. नंतरच्या काही दिवसात शहरातील एकूण एक खड्डे बुजवून झाले.अगदी तंत्रशुध्द पध्दतीने मजबुतीकरण, गुळगुळीत, डांबरीकरण झाले. नागरिकांना ते रस्ते पाहून आपण स्वप्नात तर नाहीत ना अशी शंका येऊ लागली. त्यामुळे एकमेकांना चिमटे घेऊन स्वप्न नसून सत्य आहे हे पडताळून पाहण्याची स्पर्धा तरूणाईमध्ये वाढली. दुसरीकडे रस्त्याचे काम जसजसे पुर्णत्वास जात होते तसतसा वांधे यांचा आजार कमी होत होता. काही दिवसातच महापौर आणि त्यांच्या आई दोघे पुर्णत: उचक्यांच्या आजारातून ठणठणीत चांगले झाले.

       शहरातील विकास नागरिकांनी एकत्र येऊन ज्या कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण केले होते. त्या कंत्राटदाराचा सत्कार करण्याचे नियोजन केले. कार्यक्रमास महापौर, खासदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले. कार्यक्रम सुरू होणार,तितक्यात त्या कंत्राटदाराने डायसचा ताबा घेतला आणि म्हणाले,

"बंधूनो, हे काम जरी मी पूर्ण केले असले तरी हे कार्य पूर्ण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे नाव त्यांची इच्छा नसताना मला जाहीर करावे लागणार आहे. मी केवळ निमित्तमात्र आहे. मी नेहमीप्रमाणे पैसे घेऊन हे काम केले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय लाटणे, सत्कार स्विकारणे मला जमणार नाही. महापौर वांधेसाहेब यांना या कामाचे सारे श्रेय दिले पाहिजे. वांधेजी, माफ करा. याक्षणी तुमचे नाव गुप्त ठेवणे मला जमणार नाही. कामासाठी खर्च झालेली पै न पै वांधेसाहेबांची आहे. त्यामुळे आजच्या सत्काराचे खरे मानकरी आपले महापौर वांधेसाहेब आहेत."

         त्यानंतर महापौर वांधे यांचा यथोचित सत्कार झाला. अनेकांनी त्यांच्या भाषणात महापौरांची तोंड भरून स्तुती केली. महापौर वांधे सत्कारला उत्तर देण्यासाठी उभे राहिले.त्यांच्या भाषणात त्यांनी स्वत:ला आणि आईला झालेला आजार, केलेले औषधोपचार आणि प्रयत्न यांची इत्थंभूत माहिती देऊन हेही सांगितले,आमच्या आजाराचे खरे कारण रामजीने लक्षात आणून देताच आमच्या सौभाग्यवती म्हणाल्या, की बजेट-विजेट गेले खडुयात! आपण जनतेसाठी आहोत ना, मग जनतेचा शाप लागून नको ते आजार का ओढवून घ्यायचे? वाट्टेल तेवढा पैसा खड्ड्यांमध्ये ओता आणि खड्ड्यांची बोळवण करा. आता स्त्री हट्टापुढे कोणाचे काही चालते का?आणि म्हणूनच आज सारे रस्ते मजबुत आणि चकचकीत झाले आहेत."

    कार्यक्रम संपला. लोक घरोघर परतू लागले. महापौर वांधे त्यांच्या घराकडे निघाले.कार्यक्रमाच्या स्थळापासून त्यांची कार काही अंतरावर जाते न जाते तोच पुन्हा त्यांना उचकी लागली.घरी जाऊन जेवण करून ते झोपेपर्यंत उचक्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या.सकाळी ते जरा उशिराच झोपूतून उठले. मुळात त्यांना जाग आली तीच उचकीने! दुपारपर्यंत त्यांचा आजार पुन्हा पूर्वपदावर आला. आजाराच्या परतीने त्यांच्यासह सारे कुटुंब हैराण,परेशान,त्रस्त असताना रामजीचे आगमन झाले.सौ.वांधे म्हणाल्या,

"रामजीकाका,बघा. सारे रस्ते टकाटक झाले असताना रात्रीपासून साहेबांना पुन्हा त्रास सुरू झालाय."

"ताईसाहेब, त्रास तर होणारच. कसे आहे ,रस्ते खराब असताना जनता साहेबांना शिव्या देत होती. त्यामुळे उचकी लागत होती."

"बरोबर! पण लाखो रूपये त्या खड्डयांमध्ये घातलेत ना." वांधे म्हणाले.

"साहेब, म्हणून तर लोक आपली आठवण काढत आहेत ना. कसे आहे,त्यावेळी संताप,चिड,व्यक्त होती.आता सर्वत्र आपले कौतुक होत आहे. प्रत्येक जण आपणास धन्यवाद देत आहे.त्यामुळे आपणास हा त्रास पुन्हा सुरू झालाय. दोन दिवस वाट पहा.लोक रोजच्या व्यवहारामध्ये व्यस्त झाले ना, की आपली आठवणही काढणार नाहीत. जनता फार विसराळू असते हो. आपोआप हा त्रास थांबेल...."म्हणत रामजी दुसऱ्या खोलीत निघून गेला.

सौ.वांधे हसत म्हणाल्या,

"मला लागली कुणाची उचकी?"

            ००००       


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy