Sunita madhukar patil ( मधुनिता )

Inspirational Others

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Inspirational Others

रंगबावरी

रंगबावरी

8 mins
168


" अच्छा! तर मॅडम आता चित्र काढणार." म्हणत आशिष इतक्या जोरात हसला की त्याला ठसका लागता लागता राहिला. त्याने हातातला ग्लास टेबलावर ठेवत आभाकडे पाहिलं आणि म्हणाला,


" आता ह्या वयात हे नवीन काय खूळ डोक्यात घुसलं. मेरी जान! तू माझ्या आयुष्यात जे रंग भरते आहेस ना, ते काय कमी आहेत. तू तेच करं आणि एवढंच पुरे आहे गं." 


आशिषचं हसणं तिला आत खोलवर कुठेतरी तोडत होतं.


" एवढंच पुरे आहे गं?...'एवढंच पुरे नाही,' आशिष!" 


एका एका शब्दावर भर देत आभाने त्याचेच शब्द परत उच्चारले. तिचा आवेश पाहून तो क्षणभर वरमाला आणि हातातला घास हातातच राहिला आणि तो तिच्याकडे पाहू लागला.


" आशिष मी या बाबतीत सिरियस आहे. मी काहीतरी करू इच्छिते. मला स्वतःची एक नवीन ओळख तयार करायची आहे. माझं स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे." तिने आपलं मत मांडलं.


" स्वतःची ओळख! कशी बनवणार? ही अशी चित्र काढून. विसर! कशाला इतके मोठे मोठे शब्द वापरतेस. दोन चार चित्र काय काढली स्वतःला मोठी चित्रकार समजायला लागलीस का? अगं या जगात लाखो चित्रकार आहेत. तू एकटीच नाहीस. अस्तित्व म्हणे, उगीच वेळ वाया घालवू नकोस." आशिष न थांबता बोलतचं होता. 


लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर आशिषच हे रूप तिच्यासाठी नवीन होतं. आशिषच्या इच्छेखातर स्वतःचा जीव सुद्धा द्यायला मागेपुढे न पाहणाऱ्या आभाला तो भावनिक आधारसुद्धा द्यायला तयार नव्हता. आभा न जेवताच ताटावरून उठली आणि बेडरूममध्ये गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली.


चाळीशी पार केलेली आभा इतकी वर्षे आई, बहीण, बायको, मुलगी, सून ही सगळी पात्रं निभावता निभावता स्वतःच अस्तित्व मात्र विसरली होती. गतकाळाचा हिशोब लावता लावता तिला जाणवलं की अरे, आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील स्वतःसाठीची पानं तर कोरीच आहेत. त्यात रंग भरायला हवेत. म्हणूनच ती तिच्या लग्नानंतर मागे राहिलेल्या छंदाला चित्रकारितेला व्यावसायिक रूप द्यायचा विचार करत होती.


ती रात्र तिने विचार करतच घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष लौकरच ऑफिसला निघून गेला. आपण काल आभाला दुखावलं याचा साधा मागमूसही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.


दोन्ही मुलं शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत असल्यामुळे दिवसभर काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर होताच. तिने पोटमाळ्यावरून जुनी बॅग काढली. त्यात वेगवेगळ्या आकाराचे कुंचले, रंगाच्या ट्यूब, असं बरंच सामान होतं. दुपारी फावल्या वेळात तिने बाजारातून पेंटिंगसाठी लागणार सारं सामान घेऊन आली आणि तिने चित्रं काढायला, पेंटिंग्ज बनवायला सुरवात केली. एक से एक चित्र ती रेखाटू लागली, त्यात स्वतःच्या कल्पकतेने रंग भरून त्यांना जिवंतपणा देऊ लागली.


रोज संध्याकाळी आशिष ऑफिसमधून आल्यानंतर ती किती उत्साहाने तिने बनवलेली पेंटिंग्ज त्याला दाखवायची पण त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसायचं. तिला फार दुःख व्हायचं. एक दिवस असा नक्की येईल ज्यादिवशी आशिषला आपल्या कलेची कदर वाटेल अशी स्वतःचीच समजूत काढून ती परत जोमाने कामाला लागे.  


तिने एक नवीन सुरवात तर केली होती पण तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की आपली कला आता लोकांपर्यंत कशी पोहचवायची. घाबरत घाबरत तिने स्वतःचा ब्लॉग सुरू केला, स्वतःची एक वेबसाईट आणि फेसबुक अकाउंट सुरू केलं, ' रंगबावरी ' या नावाने आणि तिथे ती तिची चित्रं अपलोड करू लागली. थोड्याच दिवसात तिला चांगला प्रतिसाद भेटू लागला. लोक लाईक, कमेंट करू लागले. तिला स्वतःवरच विश्वास होत नव्हता. कधी कधी तिला स्वतःच्या प्रतिभेवर आणि क्षमतेवर शंका निर्माण व्हायची आणि मग ती आशिषला म्हणायची,


" अहो, बघा ना माझी चित्रं, पेंटींग्ज लोकांना किती आवडत आहेत. तुम्ही पण एकदा बघा ना." 


तिला वाटायचं आशिषने तिचं कौतुक करावं. तिच्या कलागुणांना दाद द्यावी पण,


" या फालतुच्या कामांसाठी माझ्याकडे वेळ नाही. दिवसभर ऑफिसात राबा आणि घरी आल्यावर मॅडमच्या चित्रानां लाईक, कमेंट करा. तिचं कौतुक करा. इतकंच उरलयं आता." 


तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. तिला खूप वाईट वाटायचं. का करतोय आपण हे सगळं, बाहेर सारं जग आपलं कौतुक करतंय पण ज्याने करायला पाहिजे त्याला एक नजर त्या चित्रांवर टाकायला देखील वेळ नाही. मग तिचं मन खट्टू होई. 


त्यानंतर बरेच दिवस तिने हातात ब्रश पकडला नाही. एक साधी रेघ तिच्याकडून ओढली गेली नाही. दिवसभर विचार करण्यात निघून जाई. शेवटी कंटाळून बऱ्याच दिवसानंतर तिने फेसबुक उघडून पाहिलं तर तिला मेसेंजरला बरेच मेसेज होते. कोणी तिच्या चित्रांच कौतुक केलं होतं तर कोणी बरेच दिवस काही अपडेट्स नसल्यामुळे काळजीने चौकशी केली होती तर कोणी नवीन चित्रांबद्दल विचारणा केली होती.


परक्या लोकांनी दाखवलेल्या प्रेमाने आभा पुरती भारावून गेली. दुसऱ्यांकडून मिळालेल्या प्रेरणेने थांबलेल्या गाडीला आपण धक्का जरूर देऊ शकतो पण ती पुन्हा सुरू करायला लागणारी ऊर्जा स्वतःच स्वतःमध्ये जागवायला लागते हे ही तितकंच खरं आहे, हो ना?


आभाने उत्साहित होऊन स्पृहा आणि अन्वेषला म्हणजेच आपल्या मुलांना फोन केला. आपल्या ब्लॉगबद्दल, वेबसाईट आणि चित्रकारितेबद्दल त्यांच्याशी ती भरभरून बोलत होती. मुलांनीही तिचं तोंडभर कौतुक केलं. मुलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाने तिच्यात नवीन ऊर्जेचा संचार केला आणि ती परत झपाटून कामाला लागली. तिने मुलांना ब्लॉगबद्दल अजून काही सांगितलेलं नव्हतं कारण आशिषने केलेल्या मानसिक खच्चीकरणानंतर मुलं कशी रिऍक्ट करतील हे तिला माहीत नव्हतं. मुलांनाही आपलं म्हणणं नाही पटलं तर! ही भीती तिच्या मनात घर करून होती पण मुलांनी केलेल्या कौतुकाने तिला नवी उभारी मिळाली होती.


आभा पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आणि एक दिवस एका वेबसाईटने तिची वायरल झालेली चित्रं पाहून तिला कामासाठी विचारलं. त्या वेबसाईटवर टाकल्या जाणाऱ्या कथा, कवितांना वाचून त्यांना अनुरूप चित्र रेखाटायची होती. तिने लगेच आपला होकार त्यांना कळवून टाकला. आता तिचं आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं पाऊल पडलं होतं.


तिच्या कामाचा पहिलाच दिवस होता. कथा वाचून त्याला अनुरूप असं चित्र बनवता बनवता दिवस कसा निघून गेला तिला कळालंच नाही. संध्याकाळी आशिष ऑफिसमधून परतल्यानंतर किती उत्साहाने तिने त्याला आपलं चित्र दाखवलं,


" आशिष, हे पहा ना. मी आज एका कथेसाठी चित्र काढलं आहे. पाहून सांगा ना कसं आहे?"


" काय हा फालतुपणा, नवरा दिवसभर काम करून ऑफीसमधून दमून भागून आल्यानंतर त्याला चहा पाणी काही विचारायचं असतं की नाही, तुझ्या चित्रांसाठी माझ्याकडे वेळ नाही. मला आवरून लगेच समीरकडे जायचं आहे. आम्ही सगळे मित्र आज पार्टी करणार आहोत. तेंव्हा रात्री जेवणाला माझी वाट पाहू नकोस." आणि समीर तयार होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेला.


आभा डोळ्यात आलेल्या पाण्याला पदराने पुसत चहा बनवण्यासाठी किचनकडे वळाली.


आशिष कडून कौतुक आणि आधाराची अपेक्षा सोडून तिने पूर्णपणे स्वतःला कामामध्ये व्यस्त करून टाकलं. आताशा तिची चित्रं प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॅगझीनच्या कव्हर पेज वरती सुद्धा झळकू लागली होती. ती यशाची एक एक पायरी वर चढत होती. जितकी ती सफल होऊ लागली होती तितकीच ती आशिषपासून एक एक पाऊल लांब चालली होती.


आशिष छोट्या छोट्या गोष्टींवर आजकाल चिडत होता. घरातल्या कामांना घेऊन, तर कधी कपड्यांच्या इस्त्रीवरून, तर कधी जेवणावरून तो रोज काही ना काही दूषणे आभाला देतच होता.


" आजकाल बाहेर मॅडमचं खूप कौतुक होतंय ना, त्यामुळे घरातल्या कामात थोडंच लक्ष लागणार. काढा आणखी चित्र काढा." म्हणत हातवारे करत खोलीत निघून जाई.


कधी कधी तिला प्रश्न पडायचा आपण ओळखतो तो आशिष नक्की हाच का?


स्त्रियांबाबत नेहमी असं का होतं, जेंव्हा एखाद्या पुरुषाला जीवनाला सफलता प्राप्त होते तेंव्हा स्त्रियांना ती आपली प्रगती वाटते पण जेव्हा एखादी स्त्री प्रगतीपथावर असते तेंव्हा ती प्रगती फक्त तिची समजली जाते. जेंव्हा स्त्रियांचा विषय येतो तेंव्हा 'आम्ही' तू किंवा मी मध्ये का परिवर्तित होतो?


आभा खूप दुःखी व्हायची मग ती स्वतःचं दुःख विसरण्यासाठी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून द्यायची. दिवसेंदिवस तिचं काम वाढत गेलं. तिच्या चित्रांची प्रदर्शने भरू लागली. तिला चित्रकारितेसाठी वेगवगळे पुरस्कार भेटू लागले पण तिच्या एकाही उपलब्धी वर आशिष खुश झाला नाही किंवा तिच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तो गेला नाही. नेहमीच तिच्यासाठी त्याच्याकडे वेळ नसायचा.


पण आभा आता थांबणार नव्हती. कोणी साथ देऊ अथवा न देऊ ती तिचा प्रवास अखंड चालू ठेवणार होती. दिवसांमागून दिवस जात होते. ती मुलांशी बोलून आपलं मन हलकं करत असे. मुलांना आईचं कौतुक होतं. ती नेहमीच तिच्या पाठीशी होती.


एक दिवस आशिष ऑफिसमधून लौकर घरी आला आणि म्हणाला,


" आभा... आभा! आज मी खूप खुश आहे. मला 'बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर' चं अवार्ड मिळालं आहे. खूप मोठा सोहळा असणार आहे. मोठं मोठी लोकं येणार आहेत. उद्या तयार रहा बरं." 


" अरे वाह! अभिनंदन, मी तुमच्यासाठी खूप खुश आहे पण आशिष, मी उद्या तुमच्यासोबत नाही येऊ शकणार. माझी कामासंबंधी आधीच एक मिटिंग फिक्स आहे. अशी ऐनवेळी ती कॅन्सल नाही होऊ शकत. माझ्याकडे वेळ नाही." आभा हसत हसत म्हणाली.


आभाच्या या वाक्यावर आशिषला याआधी त्याने तिला सुनावलेली वाक्यं आठवली, ' माझ्याकडे वेळ नाही'. तो काहीचं न बोलता रूममध्ये निघून गेला.


दुसऱ्या दिवशी आशिष तिला काही न बोलताच त्याच्या अवार्ड सेरेमनीसाठी घरातून निघाला. त्याने आभाला सोबत चलण्याबद्दल पुन्हा एकदाही आग्रह केला नाही. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.


एका मोठ्या सभागृहात कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. नियोजित स्थळी आलेली पाहुणे मंडळी विराजमान झाली होती. कार्यक्रमाला सुरवात झाली. आलेल्या पाहुण्यांचे त्यांच्याविषयी चार शब्द बोलून स्वागत केले जात होते.


" तर मंडळी मी आता एका अशा विशेष पाहुण्याचं स्वागत करणार आहे ज्यांनी अल्पावधीतच खूप नाव कमावलं आहे. त्यांचं 'रंगबावरी' हे पेंटिंग्जचं कलेक्शन आजकाल सोशल मीडियावर खुप धुमाकूळ घालत आहे. त्यांची चित्रं आजकाल प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकत आहेत. त्यांची एक एक कलाकृती म्हणजे एक एक मास्टरपीस, त्याला कशाची तोड नाही आणि आज आपण सगळ्या अवार्ड विनर एम्प्लॉईजनां त्यांची एक पेंटिंग देखील भेट म्हणून देणार आहोत. तर मी आता स्टेजवर आमंत्रित करतो रंगबावरीच्या सर्वेसर्वा आभाजी यांना." आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.


स्टेजकडे जाणाऱ्या आभाकडे पाहून आशिष आश्चर्यचकित झाला. 

 

आकाशी रंगाच्या कॉटनच्या साडीत आभाचं तेज अजूनच उजळलं होतं. तिने हातात माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली.


" नमस्कार मंडळी, कोणताही प्रवास कधीच सुखकर नसतो तसाच माझाही नव्हता. वाटेत अनेक काचखळगे, काटे लागले पण मनात जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही. यात मला साथ दिली ती माझ्या पतीनीं, त्यांच्या शब्दांनी. त्यांचे शब्द मला जिद्दीने पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करायचे. त्यांच्या शब्दांशीवाय हे सगळं अशक्य होतं. आज ते ही इथे उपस्थित आहेत. माझा हा सन्मान त्यांच्या शिवाय अपूर्ण आहे. तेंव्हा मी मिस्टर आशिष अभ्यंकर यांना स्टेजवर येण्याची विनंती करते."


आशिष स्टेजवर गेला. त्याला पाहून त्याचा बॉस म्हणाला,


"अरे आशिष, यार! तुम तो बडे छुपे रुस्तम निकले. तुम्ही आभाजींचे पती आहात याबद्दल आम्हाला थांगपत्ताही लागू दिला नाही."


खरंतर त्यालाच कुठे ठाऊक होतं की रंगबावरी हे आभाचं रंगीत जग आहे हे.


कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. आशिषचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, आणि काही रोख रकमेसह आभाच्या रंगबावरी कलेक्शनमधील एक पेंटिंग देऊन सन्मान करण्यात आला.


दोघे सोबतच घरी परतले. वाटेत आशिषला आभाशी काय बोलावं काही कळतं नव्हतं. तो पूर्ण रस्ता गप्प होता.


" आभा, मला माफ कर. मी तुला नेहमी गृहीतच धरलं. तुझं सतत माझ्या मागे लागण्याची, माझ्या मागे भिरभिरण्याची सवयच लागून गेली होती मला. तू तुझं स्वतःच एक विश्व निर्माण केलं आहेस ही गोष्ट मला पचनी पडत नव्हती आणि त्यामुळेच माझी सारखी चिडचिड व्हायची. आता इथून पुढे असं कधी होणार नाही. इथून पुढे माझ्याकडे नेहमीच तुझ्यासाठी वेळ असेल." 


घरी पोहचताच आशिष आभाला जवळ घेत बोलला. त्याच्या डोळ्यात तिला खरंच पश्चाताप दिसत होता.


" पण आता 'माझ्याकडे वेळ नाही', म्हणत आभा जोरजोरात हसली आणि हळूच आशीषच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational