Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

पर्यावरण आणि आपण

पर्यावरण आणि आपण

3 mins
203


मी पर्यावरण जपण्यास

 कसा हातभार लावते


पर्यावरण पर्यावरण 

म्हणजे तरी काय हो 

दर्या डोंगर झाडे वेली

 सगळी धरणी माय हो


पर्यावरण राखण्यासाठी

 वाघ पाहिजे नाग पाहिजे

 सुगंधी वारे वाहण्यासाठी

 फुललेली बाग पाहिजे


असं आपलं पर्यावरण, ज्यामध्ये सगळं काही येतं. दोन पायाचे, चार पायाचे, सहा पायाचे, आठ पायाचे आणि बिन पायाचे असे सगळे जीव जंतू ,सजीव निर्जीव दगड धोंडे, सारं काही येतं निसर्गानं तुम्हाला देताना भरपूर दिले पण ते तुम्हाला जपता आलं पाहिजे आणि नुसता कोरडा उपदेश करण्यापेक्षा आधी केले मग सांगितले या अनुषंगाने प्रत्येकाने पर्यावरणासाठी स्वतःचे योगदान दिले पाहिजे.

 मी माझ्याकडून त्याचा कसोशीने प्रयत्न करते. 


मुळात माझी "मीन" रास पाण्यात खेळणारी मासोळी मला पाण्यात खेळायला पण आवडते . पण मला पाणी वाया घालवलेले किंवा गेलेले जरा देखील आवडत नाही. 

काय आहे माहित नाही, पण कुठेतरी अगदी छोटासा पाणी वाहण्याचा आवाज जरी आला ,अगदी थेंब थेंब पाणी वाहत असेल तरी मला त्याचा ताबडतोब आवाज येत असतो. 

अगदी झोपेत सुद्धा मी इरिटेट होते, आणि कुठे पाणी वाया जात आहे त्याचा शोध घेत राहते. 

कधी कधी कॉमन नळ सिक्युरिटीने, किंवा बाहेर गाड्या पुसणाऱ्या लोकांनी चालू ठेवलेला असतो. 

मग सकाळच्या घाई गडबडीत पण मी वरून आवाज देऊन आरडा ओरडा करून तो नळ बंद करायला लावते. 

मी जेव्हा सोसायटीचे सेक्रेटरी पद सांभाळत होते तेव्हा मी तीन महिन्यातून एकदा प्लंबर  बोलावून सर्वांचे नळ चेक करून घेत होते. आणि जगातील समस्त कामवाल्यांना असे वाटत असते की, धो धो नळ चालू ठेवला की भांडी निघतात. मग तिच्या वर पण लक्ष ठेवावे लागते. तिला ओरडावे लागते. 

कामावर तर लाईट पंखे बंद करण्यासाठी माझी बोंबाबोंब चालू असते .

मी राऊंड घेताना सातत्याने लाईट, पंखे, पाण्याचे नळ विनाकारण चालू आहेत का? ते पाहत असते, आणि त्याबाबत सर्वांना दक्ष राहण्यास सुचवते.


दुसरा मुद्दा आहे कचरा व्यवस्थापन


 हा मुद्दा घरीदारी महत्त्वाचा आहे .

एक तर मी हॉस्पिटलला काम करत असल्यामुळे, तेथे तर कचरा व्यवस्थापनाचे अनेक वेगवेगळे नियम आहेत. त्याला बीएमडब्ल्यू म्हणतात. बायो मेडिकल वेस्ट, त्यामध्ये पिवळा निळा काळा लाल या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाच्या बादलीत वेगवेगळा कचरा टाकला जातो. 

परंतु आपल्या घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन आपण कसे करतो ?

रोज एका प्लास्टिकच्या पिशवीत कचरा गोळा करायचा आणि ती पिशवी घराबाहेर ठेवून द्यायची. किंवा कचरा कुंडीवर  टाकायची, असे वर्षाचे 365 दिवस रोज एक प्लास्टिक पिशवी कचऱ्यामध्ये देतो. पण त्यात आपण थोडीशी सुधारणा करू शकतो, म्हणजे आपल्या घरातील कचऱ्याच्या बादलीत किंवा साध्या एखाद्या प्लास्टिक बादलीत साधी प्लास्टिक थैली टाकावी. 

घरात बहुतेक जण फुल पुडी घेतातच ,ती ज्या पानांमध्ये बांधून आलेली असते ,ती पाने तळाला टाकायची आणि वर तुमचा दिवसभराचा कचरा टाकून, कचरे वाल्याला ओतून घे , रोजच्या रोज पिशवी काढून घेऊ नकोस अशी सूचना द्यायची . साधारण तीन चार दिवसानंतर पिशवी खराब झाल्यावर बदलायची. 

मी हे करते, म्हणजे रोज एक प्लास्टिक पिशवी देण्यापेक्षा चार दिवसांनी एक प्लास्टिक पिशवी देऊ शकता..

ओला सुका कचरा वेगवेगळा करायचा, मी एक मोठी पंधरा एक किलो ची प्लास्टिकची पिशवी त्यासाठी केलेली असते. त्यात सगळा सुका कचरा, मार्केट मधून वेगवेगळ्या सामानाच्या निमित्ताने घरात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक, फुटलेले कप ,वायरी, दोऱ्या बाटल्या, झाकणी सगळे गोळा करते, आणि महिन्यातून एकदाच ती पिशवी कचरे वाल्याला देते. 


शिवाय भाज्यांची देठ फळांच्या साली, या शक्यतो आपल्या खराब ओल्या कचऱ्यात मिसळणार नाहीत याची दक्षता घेते. कारण डम्पिंग ग्राउंड वर बरीच जनावरे चरत असतात, त्यांच्या मुखात आपला ओला घाणेरडा कचरा जाऊ नये. 


माझी आई सुद्धा पालेभाज्या निवडताना त्यांची देठे रस्त्यावर टाकायची ,कचऱ्यात द्यायची नाही, का? म्हणून विचारले तर म्हणायची रस्त्याने गुरेढोरे जातात, तेव्हा जाता जाता हा ओला चारा खातात, इतका विचार आजूबाजूच्या प्राणीमात्रांचा ती करत असे. 

"इतकेच काय! मी पण त्या भाजीला असणारी सुतळीची दोरी देखील मी सुक्या कचऱ्यात काढून टाकते, ती त्या भाज्यांबरोबर टाकत नाही, उगाच जनावरांच्या पोटामध्ये सुतळी जायला नको .

त्यांना काही आपल्यासारखे हात नसतात किती बाजूला करतील.

फिरायला गेल्यावर जंगलात, स्वच्छ नद्यांमध्ये, पाण्याच्या ठिकाणी, किंवा कोठेही अगदी मुंबईतल्या नाल्यांमध्ये मी कधीही बाटल्या कचरा टाकत नाही. अगदी रोजची काढलेली बीएसटीची तिकिटे सुद्धा पर्समध्ये साठवून एकदा कचऱ्यामध्ये टाकते. बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही खाल्लेल्या गोष्टींचे रॅपर फेकत नाही ,ते घरी आणून सुक्या कचऱ्यात टाकते .


अजून एक गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या वाशिंग मशीन बाबत ,वॉशिंग मशीनला प्रचंड पाणी लागते आणि ते एक प्रकारे नदी नाल्याला मिळते म्हणजे वाया जाते. प्रत्येकाने घरात दररोज वॉशिंग मशीन लावली पाहिजे असं नाही, छोटे छोटे कपडे, रुमाल, अंतर वस्त्र पाय मोजे गाऊन हे हातानेच धुवावेत आणि जास्तीत जास्त आठवड्यातून तीन वेळा मशीन लावावी त्यातूनही बरेच पाणी वाचवता येईल . 


असे आपल्या स्वतःकडून पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि शुद्ध राखण्यासाठी अनेक प्रयत्न करता येतील


Rate this content
Log in