प्रतीक्षा
प्रतीक्षा


त प्रतिक्षा हा शब्दच असा आहे की जो जीवाला वेदना देतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कित्येक वेळा कित्येक गोष्टींची प्रतीक्षा करावी लागलेली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला प्रतीक्षा करावी लागते.
बस/ ट्रेन/ लोकल/ येणारे पाहुणे/ नातेवाईक या सगळ्यांची आपण प्रतीक्षा करतो.
ती पण थोड्या वेळाची असते.
मग कधी दारावर येणारा फेरीवाला, भाजीवाला,
पूर्वी लहान मुले दारावर येणारा फुगेवाला, आईस्क्रीम वाला, बुढ्ढी का बाल ,एकाच गाडीवर लागलेली खेळणी, या गोष्टींची प्रतीक्षा असायची.
त्यात आता भर पडली आहे ती ऑनलाईन डिलिव्हरी बॉयची.
मग काय ते गरमागरम अन्न असो, वस्तू असो, कपडा असो, दागिना असो, फर्निचर असो, काय वाटेल ते आता ऑनलाईन मिळते. आणि त्या सगळ्यांची आपण घरात प्रतीक्षा करत असतो.
आता आपण खरी प्रतीक्षा पाहूया.
दोन प्रेमी जीव एकमेकांची प्रतीक्षा करतात, त्यासाठी विरहाच्या वेदना त्यांना सहन कराव्या लागतात.
तू दूर दूर तेथे
हुरहुर मात्र येथे
विरहात रात्र मोठी
प्रेमी जीवास वाटे
किंवा
"नयना बरसे रिमझिम रिमझिम
पिया तेरे आवन की आस"
उद्याच्या प्रतीक्षेसाठी आज टाटा.
"सायोनारा इतलाती और बलखाती कल फिर आऊंगी सायोनारा"
" कल की हसी मुलाकात के लिए आऽऽऽ आज की रात के लिए
अच्छा चलो सो जाते है
हम तुम जुदा हो जाते है
त्या प्रतीक्षेत पण गोड वेदना असतात. मग एक उशिरा आला की दुसऱ्याने रुसायचं फुगायचं, मग त्या पार्टनर ची समजूत काढायची. त्याला गिफ्ट द्यायचं, नवे नवे वादे करायचे, मग एखाद्या गाण्यात तर ऋषी कपूर सारखा म्हणतो
" मै देर करता नही
देर हो जाती है
कधी कधी एखादी विरहिणी समोर प्रियकर दिसताच आनंदाने हसते, हसता हसता रडते ,त्याला लटक्या रागाने बुक्कया मारते.
"सैया बिना घर सुना" असे म्हणता म्हणता जेव्हा त्याची चाहूल लागते, तेव्हा मग ती हसता हसता रडू लागते. अजून किती प्रकारच्या तरी प्रतीक्षा आहेत .
फौजेमध्ये बॉर्डरवर लढणाऱ्या मुलाची आईबापांना असणारी प्रतीक्षा वेगळी
त्याच्या मुलांना आणि बायकोला असणारी प्रतीक्षा वेगळी
परीक्षा दिल्यावर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
कैद्याला सुटकेच्या दिवसाची प्रतीक्षा
रुग्णाला डॉक्टरची प्रतीक्षा
आरोपीला न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा
उमेदवाराला कॉल ची प्रतीक्षा
मरणासन्न रुग्णाला मरणाची प्रतीक्षा
भीष्मांना उत्तरायणाची प्रतीक्षा
द्रौपदीला सुडाची प्रतीक्षा
भीमाला आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची प्रतीक्षा
कृष्णाला शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होण्याची प्रतीक्षा
विवाहइच्छु ला लग्न होण्याची प्रतीक्षा
पाळणाघरातील बाळाला आईच्या येण्याची प्रतीक्षा
अनाथ आश्रमातील मुलाला कोणीतरी दत्तक आईबाप मिळण्याची प्रतीक्षा
या सगळ्या प्रतीक्षांमध्ये सगळ्यात मोठी प्रतीक्षा उर्मिले ने केली .
असं म्हणतात की लक्ष्मण वनवासाला गेल्यानंतर, 14 वर्षे ती म्हणे दारातच उभी होती, आणि कुठल्यातरी एका जुन्या हिंदी सिनेमातले गाणे, जे लक्ष्मण उर्मिलेला उद्देशून म्हणतो.
ते माझे वडील म्हणायचे.
सुंदरी तू क्यू खडी है
साथ होने के लिए
देर क्या लगेगी
14 बरस जाने के लिए
म्हणजे बघता बघता 14 वर्षे निघून जातील. तू माझ्याबरोबर येण्याचा हट्ट का करतेस? तू तर माझ्या आई-वडिलांची म्हणजेच तुझ्या सासू-सासर्यांची सेवा कर, आणि माझी वाट पहा.
खरोखर तिने भोगलेले ते विरहाचे क्षण म्हणजे एक दिव्यच होते, नुसते दिव्य न्हवे तर अग्नी दिव्य होते.
आता किती लिहायचे प्रतीक्षेवर! बास झालं बाई तुम्हाला पण दुसऱ्या लेखाची प्रतीक्षा असेलच ना!