पोस्टमार्टम
पोस्टमार्टम


नानासाहेब दिवाणखान्यात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. राहून राहून त्यांचे लक्ष शयनगृहाकडे जात होते. आतमध्ये त्यांची पत्नी सुमन पलंगावर झोपली होती. गत् दोन दिवसांपासून ती आजारी होती. तसा पटकन दिसेल, जाणवेल असा कोणताही आजार तिला नव्हता. ना ताप होती, ना सर्दी होती. डोकेदुखी, अंगदुखी, झालेच तर पोटदुखीमुळे ती हैराण होती, परेशान होती, अस्वस्थ होती, तळमळत होती. त्यादिवशी सकाळीच डॉक्टरांनी सुमनला सांगितलेल्या सर्व तपासण्या करुन घेतल्या होत्या. त्या तपासण्यांचे अहवालही त्यांनी नुकतेच जाऊन आणले होते. नानांना तपासणी अहवालातील ज्या गोष्टी समजत होत्या त्यानुसार सारे अहवाल व्यवस्थित होते. सुमनला काहीही आजार नसल्याचे दर्शवत होते. परंतु त्याक्षणीही सुमन आत तळमळत होती. न राहवून नानासाहेब आत गेले. त्यांची चाहूल लागताच सुमन थोडी जास्तच विव्हळू लागली.
"काय झाले? त्रास वाढला का?" नानांनी विचारले.
"तर मग? मी काय उगाच तडफडते आहे? सहन होत नाही म्हणूनच कण्हते आहे ना? उगाचच झोपून राहायला का मी वेडी आहे? कधी तरी विनाकारण झोपून राहते का?"
"अग, तसं नाही गं. कालच आपण डॉक्टरांकडे जाऊन आलो. आज तपासण्याही झाल्या. अहवालही चांगले आहेत..."
"त्या अहवालाचे काय घेऊन बसलात? मला काही आजार नाही असेच अहवालात आले आहे तर मग मला जीवघेणा त्रास का होतो? डोक्यात जणू कुणी घाव घालतंय, अंग सारं ठणाणा करतंय आणि म्हणे अहवाल चांगले आहेत."
"चल. पुन्हा जाऊया का डॉक्टरांकडे?"
"काही नको. त्या डॉक्टरला आजार समजला असता तर त्याने तपासण्या कशाला करायला लावल्या असत्या? आपल्या लहानपणीचे डॉक्टरच हुशार होते. नाडीला काही क्षण हात लावायचे आणि दुसऱ्या क्षणी आजाराचे निदान करायचे. आताचे डॉक्टर तर हे तपासा, ते तपासा, याचा फोटो काढा, त्याचा फोटो काढा. एम आय आर करा, स्कॅन करा. पैसे उकळायचे धंदे सारे..."
"अग, डॉ. राजे हे तुझे वर्गमित्र आहेत. ते कशाला गरज नसताना ..."
"एकेकाळी वर्गमित्र होता. आज नाही. आता तो डॉक्टर आणि मी रोगी आहे. बघितलंत ना कसा आलिशान दवाखाना बांधला आहे तो..." सुमन बोलत असताना नानांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. त्यावरील नाव बघताच नाना सुमनकडे बघत म्हणाले,
"बघ, डॉ. राजेंचाच फोन आहे..."
"खडसावून विचारा त्याला. तुझ्याकडून इलाज होत नसेल तर स्पष्ट सांग म्हणावे. इथे डॉक्टरांची काही कमी नाही. मीच सांगते नाही तर..."
"नको. नको. मी बोलतो..." असे म्हणत नाना पुन्हा दिवाणखान्यात आले. फोन उचलत म्हणाले,
"हॅलो डॉक्टर, काय म्हणता?"
"काय म्हणते आमची मैत्रीण? काही फरक पडला की नाही?"
"नाही हो. काहीच फरक नाही..."
"अच्छा! तर मग नानासाहेब, मी काल सांगितले तेच करायला हवे..."
"डॉक्टर, काल सायंकाळी तुमच्या दवाखान्यातून बाहेर पडल्यापासूनच मी तेच केलंय. म्हणजे असे बघा, तुमच्या दवाखान्याच्या बाहेर एक फुलांची हातगाडी आहे..."
"हो. खरे आहे. अनेक स्त्री पेशंटच्या नवऱ्यांना मी एक सल्ला देतो की, आजार कुठलाही असो, पेशंटची परिस्थिती कशीही असो, घरी जाताना बायकोला एक गजरा घेऊन जा. पुढच्या चौकात ती गजऱ्याची गाडी असायची पण मी प्रत्येक स्त्री पेशंटला गजरा..."
"डॉक्टर, तुम्ही गोळ्यांसोबत प्रिस्क्रिप्शनवर गजरा असे तर लिहून देत नाहीत ना?"
"व्वा! मजेशीर आहे. आजपासून प्रिस्क्रिप्शनवर गोळ्यांसोबत दररोज एक स्वच्छ, ताज्या ताज्या फुलांचा गजरा बायकोच्या केसात न चुकता माळणे असे लिहून देतो... तर त्या चौकातला तो गजरेवाला काही दिवसात माझ्या दवाखान्याच्यासमोर गाडा लावू लागला आणि चक्क पेशंट बाहेर पडला की, ओरडू लागला, 'बायकोच्या आजारावर एक उपाय, घ्या ताजा गजरा!'..."
"हो. आम्ही काल सायंकाळी बाहेर पडलो त्यावेळी तो असेच म्हणत होता. मी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक टवटवीत फुलांचा आकर्षक गजरा घेतला. मी पैसे देत असताना तोच म्हणाला की, साहेब, 'गजरा इथेच बाईसाहेबांच्या केसात माळा. ताईंना खूप आनंद होईल...' तो सांगत असताना मी सुमनकडे पाहिले तेव्हा..."
"ती चक्क लाजली असेल. एक मनमोहक लालसर छटा तिच्या चेहऱ्यावर पसरली असेल..."
"अगदी बरोबर. पण डॉक्टर, तुम्हाला हे कसे समजले? नाही म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असताना एकमेकांचे मित्र होता हे मला माहिती आहे पण..." नानांनी काहीशा शंकेने विचारले.
"अहो, तसे काही नाही. ज्या पुरुषांना मी हा 'गजरा' उपाय सांगतो. त्यापैकी बहुतेक पुरुष असेच सांगतात. एक शीघ्रकवी आले होते. त्यांनी हा उपाय केल्यानंतर म्हणजे गजरा घेऊन तो बायकोच्या केसात माळल्यानंतर बायकोच्या चेहऱ्यावर पसरलेल्या विविध भावनांवर एक कविताच करून मला ऐकवली होती. त्या कवितेचे मी एक पोस्टरच तयार करून दवाखान्यात लावले आहे..."
"अरे, हो. मीही काल पाहिले. सांगायचा मुद्दा असा की, लाजणाऱ्या, शहारणाऱ्या, अंग आकसून घेणाऱ्या..."
"थांबा. थांबा. नानासाहेब, तुम्हीसुद्धा कवी आहात की काय?"
"नाही हो डॉक्टर, मी कवी नाही. पण तुमचा गजरा प्रयोग जवढा जबरा आहे ना की, गजरा माळल्यानंतर आलेले भाव पाहून कुणीही कवी होईल. गजरा माळला. नंतर आम्ही घरी निघालो. तुम्ही सांगितलेली बाग दिसली आणि मी आनंदाने माझी स्कुटी तिकडे वळवली. स्कुटी बागेसमोर थांबताच खाली उतरणाऱ्या सुमनच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे, आनंदी आणि लज्जेचे भाव पाहून मी खुश झालो. नंतर तासभर आम्ही त्या बागेत मनसोक्त हिंडत होतो. त्यावेळी चाळीशीतली सुमन एकदम अल्लड झाली होती. तिच्याकडे पाहून ती आजारी आहे, आम्ही आत्ताच दवाखान्यातून आलोय हे कुणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते..."
"दॅट्स इट! मला हेच हवे असते. प्रत्येक स्त्री पेशंटच्या नवऱ्यांना मी हेच सांगतो..."
"बायकोला बागेत न्या. आता प्रिस्क्रिप्शनवर..."
"लिहिणार... आठवड्यातून एकदा बायकोला बागेत फिरायला न्या असे लिहावे, सांगावे लागेल..."
"सायंकाळचे सहा वाजत होते. अंधार पडत होता..."
"बस. बस. नाना, पुढले काही सांगू नका..."
"डॉक्टर, ऐकून तर घ्या. वाटलं चला. बायकोचा मूड चांगला आहे तर सिनेमाला जाऊया..."
"व्वा! नाना, हे माझ्या आजवर लक्षातच आले नाही हो. चला प्रिस्क्रिप्शनसाठी एक उपाय वाढला... सिनेमा!"
"सिनेमा बघितला. पुन्हा तरुण झाल्याप्रमाणे ताजेतवाने झालो. बाहेर आलो. तुमचा इलाज लक्षात होता, आजारी बायकोला हॉटेलमध्ये जेवायला न्यावे. एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो. सुमनच्या आवडीचे जेवण बोलावले. डॉक्टर, तुम्हाला सांगतो, तुमच्या दवाखान्यातून बाहेर पडून घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे दहा वाजले. तब्बल सहा तासात एका क्षणीही सुमन आजारी आहे असे मला जाणवले नाही किंवा कुणी परिचित भेटला असता आणि त्याला सुमन आजारी आहे असे सांगितले असते तर त्याला खरे वाटले नसते..."
"ग्रेट! खूप छान! औषधीपेक्षाही गुणकारी काही उपाय असतात. आपण नेमके तेच विसरतो आणि औषधांचा भडिमार करतो. आपण पुरुष मंडळी आपल्याच व्यापात एखाद्या चक्रव्युहात अडकल्याप्रमाणे असतो. एका विशिष्ट वयापर्यंत बायकांना काही गोष्टी आणि पतीची जवळीक हवी असते. बरे, पुढे काय घडले? म्हणजे घरी पोहोचताच..."
"नॉर्मल! एकदम छान! मी तर विचार केला की, सकाळी तुम्हाला फोन करून तपासण्या रद्द कराव्या किंवा पुढे ढकलाव्या की काय असा विचार केला पण सकाळी उठलो आणि लागलीच बाईसाहेबांचे डोके उठले."
"अरे, बाप रे! मग?"
"मग काय? तपासण्या! तुम्ही सांगितलेल्या तपासण्या करण्यासाठी निघालो. काही तपासण्या चहा न घेता करायच्या होत्या म्हणून मीही चहा न घेताच बाहेर पडलो. साऱ्या तपासण्या करून बाहेर यायला बराच वेळ लागला. म्हणून मग त्या पॅथॉलॉजीला लागूनच असलेल्या एका हॉटेलमध्ये..."
"बरोबर आहे. ते हॉटेल त्याच पॅथॉलॉजीवाल्याचे आहे. कसे आहे अनेक पेशंट साखरेच्या आजाराने त्रस्त असतात. खूप वेळ लागला आणि जवळ हॉटेल नसेल तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून..."
"म्हणजे डबल कमाई! मस्त नाष्टा केला. दहा वाजत होते. म्हटलं संक्रांत तोंडावर आहे, मॅडमला साडी घ्यावी..."
"व्वा! हा आपला फॉर्म्युला क्रमांक दोन!..."
"हो ना. तुम्ही सांगितले होते म्हणून साडी खरेदी करण्यासाठी गेलो. चक्क तीन तासानंतर तिला एक साडी पसंत पडली. पोटात कावळ्यांची कावकाव सुरु झाली म्हणून मग मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण केले. तितक्यात एका माणसाकडे बऱ्याच वर्षांपासून अडकलेली रक्कम जमा केली असल्याचा त्याचा आणि बँकेचा संदेश प्राप्त झाला. समोरच ज्वेलर्सचे दुकान दिसले. बऱ्याच दिवसांपासून बायको एकदाणी घ्या म्हणून मागे लागली होती म्हणून..."
"व्हेरी गुड! हाच आजार असावा. नक्कीच. कसे आहे, अनेक बायका आकांडतांडव करून, तमाशा करून स्वतःला हवे ते नवऱ्याकडून मिळवितात पण सुमनचे तसे नाही. ती फार समंजस आहे. तिला काय हवे ते ती हट्टाने सांगणार नाही... "
"बरोबर आहे. पण हा आजाराचा प्रकारही हट्टीपणाच आहे ना. मलाही दागिने खरेदी करून बाहेर पडताना असेच वाटले होते की सुमनचा आजार पळाला असेल. घरी आल्यावरही हिचा मुड अत्यंत चांगला होता. मीही थोडा आराम केला. पाच वाजता तपासणी अहवाल तयार असल्याचा फोन आला. मी तातडीने पॅथॉलॉजीत गेलो. अहवाल घेतले. तिथेच चाळले. त्या माणसाशी चर्चा केली. सारे अहवाल नॉर्मल आहेत..."
"असणारच! अहो, सुमनचा आजार हा साडी आणि दागिने हाच होता..."
"तसे असते तर चांगले झाले असते पण मी घरी पोहोचलो. दार काढणाऱ्या सुमनचा अवतार वेगळाच होता. डोके घट्ट आवळले होते. जोरजोरात कण्हत होती, विव्हळत होती..."
"बाप रे! आपले सारे उपाय फोल ठरले तर! पण काय आजार असावा? सुमनचे वय म्हणजे तसे चाळीस असणार! तशी चाळिशी म्हणजे मोनोपॉजचा काळ नसतो. कारण ह्या कालावधीत स्त्रीयांची अशी अवस्था होते. काय उपचार करावा ते समजत नाही बुवा..."
"डॉक्टर, सुमन आत्ता म्हणाली की, तुम्ही इलाज करू शकत नसाल तर स्पष्ट सांगा म्हणावे. शहरात छप्पन डॉक्टर आहेत..."
"भारी विनोदी आहे. कॉलेजमध्येही असेच विनोद करून सर्वांना हसवत असे पण तिचे विनोद पीजे नसतात हं..."
"हा आजारही ती करत असलेला विनोद तर नसेल ना डॉक्टर?"
"नाही म्हणजे नसावा. म्हणजे तसे काही छातीठोकपणे सांगता येत नाही."
"मला काय वाटते डॉक्टर, तुम्ही सुमनपुढे शस्त्रं टाकलेली दिसताहेत. मला वाटते डॉक्टर, आता एक शेवटचा उपाय राहिला आहे. तो करूया म्हणजे सुमनचे दुखणे कायम पोबारा करेल.तीही या आजारातून सुटेल आणि मीही..."
"अरे, व्वा! नाना, असा उपाय आहे? सांगा... सांगा बरे, पटकन..."
"आपण तिचे पोस्टमार्टेम केले तर..."
"बाप्पो रे, नाना, हा काय इलाज झाला? तुम्हीसुद्धा विनोद करता की काय? मला माहिती नव्हते. पण असा त्रागा करू नका. तुमच्या जागी कुणीही असते तरी असेच कंटाळले असते..."
"मग काय करु? तुम्ही काहीही म्हणा पण मी हा शेवटचा उपाय करणार म्हणजे करणारच. सुमन तुमची मैत्रीण आहे म्हणून तुम्ही पोस्टमार्टेम करणार नसाल तर मी दुसरा डॉक्टर शोधेल. छप्पन्न इंची छाती असलेले अनेक डॉक्टर या शहरात आहेत म्हटलं..." नानासाहेब त्राग्याने बोलत असताना दिवाणखान्यात आलेली सुमन म्हणाली,
"अहो, कुणाशी बोलताय? काय झोप लागली म्हणता मला. आता एकदम फ्रेश वाटतंय. अहो, संध्याकाळ होतीय, स्वयंपाक करायचा आहे. कालपासून हॉटेलमध्ये खाऊन खाऊन पोट बिघडलंय हो. आज की नाही, तुमच्या आवडीचे पदार्थ करते हं. बासुंदी-पुरी, भजे करतीय मस्तपैकी. आलेच हं... फ्रेश होऊन..." म्हणत सुमन आत गेली आणि नानासाहेब फोनवर म्हणाले,
"मग काय डॉक्टर, केवळ पोस्टमार्टेम म्हणता क्षणी पळाला की नाही, तुमच्या मैत्रिणीचा आजार? या आमच्याकडे जेवायला. बासुंदी-पुरी, भजे..."
"नको. नको. नाना, तुमच्या दोघांमध्ये माझाच भजा झालाय. 'जब ना चले दुआ या दवा, तब काम आएगा पती का इलाज!' हेच शिकलो मी आज. नाना, पत्नीची नस... नाडी केवळ पतीच ओळखू शकतो. हेच खरे. धन्य आहात तुम्ही! असाही एक इलाजाचा प्रकार असू शकतो हे तुम्ही दाखवून दिले..." म्हणत डॉक्टरांनी फोन बंद केला आणि नानासाहेब आत निघाले... आवडत्या भोजनावर ताव मारायला...
००००