Pratibha Tarabadkar

Fantasy Thriller

4.5  

Pratibha Tarabadkar

Fantasy Thriller

फॅंटम आणि जंगलातील रहस्य - भाग दोन

फॅंटम आणि जंगलातील रहस्य - भाग दोन

5 mins
226


 भाग दोन 

उलुंगा जमातीचा निरोप घेऊन फॅंटम पुढच्या प्रवासास निघाला.हिरो आणि डेव्हिलला पुरेशी विश्रांती मिळाल्याने दोघेही ताजेतवाने झाले होते.फार्का दाखवेल त्या दिशेने फॅंटम हिरोवर स्वार होऊन मार्गक्रमणा करु लागला.अंधार पडायच्या आत त्याला पुढील मुक्कामाला पोहोचायचे होते.त्याने इशारा करताच हिरो वाऱ्याच्या वेगाने दौडू लागला.आकाशात फार्का आणि सोबतीला डेव्हिल यांच्या संगतीने पुढील मुक्काम गाठताना मात्र फॅंटमच्या मनातून ते ओल्या मातीत उमटलेले बुटांचे ठसे काही जाईनात.तेव्हढ्यात ढोलांचा आवाज ऐकू येऊ लागला.

 फॅंटम मनाशी हसला.आपण येणार असल्याची बातमी उलुंगांनी सांबोरा पिग्मींना कळवली वाटतं.घनदाट वृक्षराजी असलेल्या भागातील कमी उंचीचे पिग्मी जमातीची माणसं सांबोरा या वृक्षाला देव मानत.त्या वृक्षाच्या प्रत्येक भागाचा त्यांना उपयोग होत असे.त्या वृक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पिग्मी स्वतः ची ओळख 'सांबोरा पिग्मी'म्हणून सांगत.फॅंटमचा बगालिया देश शहरीकरणापासून, आधुनिकीकरणापासून दूर होता.त्याचे प्रजाजन निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करीत.चंद्र, सूर्य,वृक्ष,वेली, नद्या हेच त्यांचे देव होत.

 सांबोरा पिग्मींची वस्ती जवळ येऊ लागली.वृक्षांच्या आजूबाजूची जागा साफ करून तेथे गोल आकाराच्या मातीच्या झोपड्या तयार केल्या होत्या.झोपड्यांचं छप्पर गवताचं असून आईस्क्रीमच्या कोनाच्या आकाराचं होतं.

 पिग्मी प्रमुख 'एबो' फॅंटमच्या स्वागतासाठी सामोरा आला.फॅंटम हिरो वरून पाय उतार झाला तशी एबोने आणि फॅंटमने एकमेकांच्या नाकाला हात लावून अभिवादन केले.आजूबाजूच्या घरांमधून पटापट माणसे गोळा झाली.सर्वांनी कमरेभोवती सांबोरा वृक्षाची पाने अडकवली होती तर एबोने वस्तीचा प्रमुख म्हणून त्याच पानांची शंकूच्या आकाराची टोपी घातली होती.आपापल्या आयांच्या मागे लपून फॅंटमला न्याहाळणाऱ्या मुलांना पुढे बोलावून फॅंटमने त्यांच्याशी हस्तांदोलन केले तेव्हा ती मुले आनंदाने उड्या मारु‌ लागली.

 सारेजण फॅंटमभोवती जमले.फॅंटमने विचारले,'एबो, सर्व काही ठीक आहे ना?कुठली अडचण तर नाही ना?'सांबोरा पिग्मी प्रमुख'एबो' विचारमग्न झाला.बोलू की नको अशी त्याची झालेली द्विधा मनस्थिती फॅंटमने ओळखली.'एबो, तुला जे काही सांगायचे आहे ते खुशाल सांग.तुमच्या अडचणी सोडविण्यासाठीच तर मी येथे आलो आहे.'फॅंटमच्या या बोलण्याने एबो ला धीर आला.तो सांगू लागला,'ब्वाना, दोन दिवसांपूर्वी आम्ही आकाशात खूप मोठा पक्षी पाहिला.तो मोठ्याने आवाज करीत उडत होता.आम्हाला वाटलं की तो आमच्यावर हल्ला करणार म्हणून आम्ही त्याच्यावर खूप बाण मारले पण काही उपयोग झाला नाही.पेंबे,तो पक्षी कसा आवाज करीत होता ते ब्वानाला दाखव बरं!'त्यासरशी तो पेंबे नावाचा चुणचुणीत मुलगा पुढे आला आणि त्याने त्या पक्ष्याचा आवाज काढून दाखविला.फॅंटम चमकला.हा तर विमानाचा आवाज! आपल्या बगालिया देशात विमानांना बंदी आहे मग हे विमान आले कोठून? फॅंटम अस्वस्थ झाला.त्याला रात्रभर झोप लागली नाही.माझे निरागस प्रजाजन, ज्यांची आदिम संस्कृतीचे जतन करण्यासाठी मी जिवाचे रान करतोय आणि हे आधुनिक वारं माझ्या देशावर कोठून घोंगावू लागलंय? माझ्या प्रजाजनांना काही धोका निर्माण झाला तर नाहीए ना? फॅंटम रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिला.

 सकाळी सांबोरा पिग्मींचा निरोप घेऊन फॅंटम 'झोमां'च्या वस्तीला भेट देण्यासाठी निघाला.पण तत्पूर्वी त्याने एबो ला बजावले, काहीही विपरीत वाटले तर ढोलांच्या मदतीने मला निरोप दे.मी ताबडतोब हजर होईन.आणि तो 'मोठा पक्षी'जर आकाशात परत दिसला तर तात्काळ कळव.'फॅंटमच्या बोलण्यावर एबोने मान हलविली.'हो ब्वाना, मी नक्की तुम्हाला कळवेन.'

फॅंटम हिरो वर आरुढ होऊन मार्गस्थ झाला पण मनातून अस्वस्थ होऊनच.आता झोमांच्या वस्तीवर बारकाईने चौकशी केली पाहिजे.

फार्का दिशा दाखवेल तसे हिरो आणि डेव्हिल वाटचाल करीत होते. तेव्हढ्यात हिरो अचानक थांबला व कान टवकारून काहीतरी ऐकू लागला.डेव्हिलही गुरगुरु लागला.फॅंटमलाही एखादे वहान जात आहे असा अस्पष्टसा आवाज ऐकू आला तशी त्याने हिरोला इशारा केला.हिरो वेगाने दौडू लागला पण लांबवर दौडूनही काहीच मागमूस लागला नाही मात्र मातीमध्ये टायरचे ठसे उमटले होते ते पाहून फॅंटम चक्रावला कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की!

 झोमांची वस्ती गवताळ प्रदेशात होती.अतिशय विस्तीर्ण असा तो प्रदेश फारच मनोहारी होता.फॅंटमने त्या प्रदेशात प्रवेश केला आणि तिथल्या आल्हाददायक दृश्याने त्याचे सारे श्रम,साऱ्या चिंतांचे जणू त्याला विस्मरण झाले. वेगवेगळ्या प्राण्यांचे जणू संमेलनच भरले होते.गोजिरवाणी हरणे, महाकाय गवे, धष्टपुष्ट झेब्रे कुरणात निवांत चरत होते तर बाभळीचा पाला ओरबाडून खाण्यात जिराफ मग्न होता.एक चित्ता झाडाच्या फांदीवर बसून आसमंत न्याहाळत होता तर एका झाडाखाली सिंह आणि सिंहीण शांतपणे पहुडले होते आणि त्यांचे छावे त्यांच्या आजूबाजूला बागडत होते.दूर हत्तींचा एक कळप दिसत होता.फॅंटमचे मन त्याच्या या प्रजेवरील अतीव प्रेमाने भरुन गेले.आपले प्रजाजन सुखी असलेले बघणे याहून राजाला आणखी काय हवे?

 रमत गमत,ती मनोहारी दृश्य मनात साठवत फॅंटम झोमांच्या वस्तीवर पोहोचला.झोमांचा प्रमुख 'इमेझा' फॅंटमचे स्वागत करण्यात पुढे झाला.गवताचा स्कर्ट घालणारे ,उंच धिप्पाड देहाचे झोमा स्वसंरक्षणासाठी हातात कायम भाला बाळगत. इमेझाने हातातील भाला उंचावून 'ब्वाना,तुमचे स्वागत आहे', अशी आरोळी ठोकली तशी इतर झोमांनीही भाले उंचावत एका तालात उंच उंच उड्या मारल्या.

हिरो आणि डेव्हिलला विश्रांतीसाठी सोडून फॅंटम झोमाप्रमुख इमेझा ला त्याच्या प्रदेशाचे हालहवाल विचारु लागला. इतर झोमा मंडळी फॅंटमभोवती गोळा झाली. इमेझाने हाक मारली,'म्वान्गा,क्लान्बा, तुम्ही काय पाहिलंत ते ब्वाना ला सांगा.'प्रमुखाच्या आदेशानुसार विशीचे दोन तरुण पुढे झाले आणि उत्तेजित स्वरात सांगू लागले,'ब्वाना, आम्ही एक खूप मोठा गेंडा पाहिला.तो गेंडा इतका मोठा होता की त्याच्या पोटात चार माणसं बसली होती.'फॅंटमने आश्चर्याने बघितले.'आणि ब्वाना, त्याला पाय नव्हते,त्या जागी चार गोल होते.'हातवाऱ्यांच्या सहाय्याने ती मुले समजावून सांगू लागली.'आणि ब्वाना,तो गेंडा असा आवाज करीत होता', असे म्हणत त्यांनी तोंडाने आवाज काढून दाखवला.त्या आवाजावरून फॅंटमने ताडले की ती एखादी जीप असावी.ते उलुंगारा नदीवरील बुटांचे ठसे,मग विमान, नंतर जीप... नक्कीच कोणीतरी आगंतुक घुसले आहेत आपल्या देशात!पण आपल्या निबिड आणि दुर्गम जंगल असलेल्या देशात शहरी माणसांचं काय काम? फॅंटम आश्चर्याने विमूढ झाला.

 'ब्वाना,सारे झोमा म्हणताहेत की आज रात्री तुमच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ नृत्याचा कार्यक्रम करावा.'इमेझा च्या विनंतीला फॅंटमने तात्काळ संमती दिली आणि सर्व झोमांनी एकच जल्लोष केला.

 शेकोटी भोवती पुरुष,बायका,मुले यांनी रिंगण करून बॉंगो ढोलाच्या तालावर गाणी गात ठेक्यात नृत्य करायला सुरुवात केली.'अरे इमेझा,आज जोशात नृत्य करणारा ग्वांटा दिसत नाही?'इमेझाने ग्वांटाची पत्नी टेटे ला हाक मारली.'टेटे,आज ग्वांटा आला नाही नृत्य करायला?'टेटे चिंतातूर दिसत होती.'ब्वाना,मी पण ग्वांटाची केव्हापासून वाट पहातेय.आज सकाळी मध आणायला जातो म्हणून सांगून गेलाय तो अजून आला नाहीय.'

 रात्रभर सर्वजण गीत गात नृत्य करीत होते.फॅंटमही आपल्या प्रजाजनांच्या आनंदात सहभागी होऊन नृत्याचा आनंद घेत होता.सकाळी फटफटू लागले.सूर्याचा लालिमा पूर्व दिशेला दिसू लागला.आता नृत्य करणाऱ्यांचा जोश मंदावू लागला.इतका वेळ वेगाने थिरकणारी पावले सावकाश पडू लागली.गीत गाणाऱ्यांचे सूर ही बेसूर होऊ लागले.

 तेव्हढ्यात लांबून धावत,मध्येच थबकत येणारी आकृती दिसू लागली आणि नृत्य तटकन् थांबले.सर्वांचे डोळे त्या आकृतीकडे लागले होते.तो ग्वांटा होता.वेगाने पळत आल्यामुळे त्याला धाप लागली होती.आल्या आल्या तो मटकन खालीच बसला.साऱ्या जणांनी त्याच्याभोवती कोंडाळे केले आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला.सर्वजण गोंगाट करू लागले.कोणाचे बोलणे कोणाला कळेना तशी फॅंटम मध्ये पडला आणि त्याने ग्वांटा ला विचारले.ग्वांटा उत्तेजित स्वरात विस्फारलेल्या डोळ्यांनी सांगू लागला.

ग्वांटा फॅंटमला काय सांगू लागला?

वाचा पुढील भागात. .. क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy