Pratibha Tarabadkar

Thriller Others

4  

Pratibha Tarabadkar

Thriller Others

फॅंटम आणि जंगलातील रहस्य भाग ३

फॅंटम आणि जंगलातील रहस्य भाग ३

6 mins
215


 सकाळी उजाडायला लागले आणि शेकोटी भोवती नृत्य करणाऱ्या झोमांचा जोश कमी होऊ लागला.नृत्याचा वेग आणि बॉंगोचा ठेका यांचा ताळमेळ बसेनासा झाला तेव्हढ्यात एक मनुष्याकृती दूरवर दिसू लागली.जोराने धावत,मध्येच थबकत ती आकृती जवळ येऊ लागली तशी सर्वांनी त्यास ओळखले.ग्वांटा होता तो.काल सकाळी मध आणायला जातो म्हणून सांगून गेला होता तो आता उगवत होता.त्याला पहाताच सगळ्यांनी त्याच्याभोवती कोंडाळे केले आणि एकदमच सर्वजण त्याला प्रश्न विचारु लागले.एकच गोंगाट सुरू झाला.शेवटी फॅंटम मध्ये पडला आणि त्याने ग्वांटाला प्रश्न केला,'अरे ग्वांटा, कालपासून कुठे होतास तू?सगळेजण काळजीत होते.टेटे,तुझी बायको तर बिचारी केव्हापासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.आणि अंगाला एव्हढी माती कशी काय लागली आहे?मातीत लोळून आलास की काय?'फॅंटमच्या प्रश्नावर सारेजण हसले.

ग्वांटा आता जरा सावरला होता.तो सांगू लागला,'ब्वाना, मी मधाचे पोळे असलेले झाड पाहून ठेवले होते.त्या झाडाकडे जाताना वाटेत मला कोणीतरी वेगळ्याच भाषेत बोलत माझ्याकडे येताना दिसलं तशी मी घाबरुन पटकन् एका झाडावर चढलो आणि लपून त्यांच्याकडे बघू लागलो.ब्वाना ते तुझ्या रंगाचे होते.'फॅंटमच्या गौरवर्णाकडे बोट दाखवत ग्वांटा म्हणाला,'आणि त्यांचे डोळे असे होते',असे म्हणत ग्वांटाने मिचमिचे डोळे करून दाखवले.'म्हणजे चिनी माणसं?आणि बगालियात?'फॅंटमने मनाशी नोंद केली.'

 'ब्वाना,ते मी बसलेल्या झाडाखाली काहीतरी बोलत उभे राहिले होते.मला ते काय बोलत होते ते काही कळलं नाही.मी इतका घाबरलो होतो ना.मग थोड्या वेळाने बोलत बोलत ते दूर गेले तेव्हा मी हळूच झाडावरून उतरलो आणि घरी येण्यासाठी धावू लागलो.थोडे अंतर धावल्यावर अचानक एका खड्ड्यात पडलो.ब्वाना,तुमची आणि निसर्गदेवाची शपथ,मला तो खड्डा अजिबात दिसला नव्हता.त्याच्यावर पालापाचोळा होता.'ग्वांटाच्या या बोलण्यावर फॅंटम चमकला.'ब्वाना,तो खड्डा इतका मोठा होता की त्यात एखादा गेंडा, झेब्रा असा प्राणी पडला तर त्याला बाहेर पडता येणार नाही.'ग्वांटाच्या या बोलण्यावर फॅंटमच्या लक्षात आले .'म्हणजे माझ्या देशातील प्राणी पकडून परदेशी पाठवण्याचा यांचा डाव आहे की काय?'फॅंटमच्या डोळ्यासमोर आपल्या देशातील 

 स्वच्छंदपणे बागडणारे प्राणी आले.या प्राण्यांना पिंजऱ्यात डांबून कुठल्यातरी दूरदेशात पाठवून त्यांचे स्वातंत्र्य हिसकावून घेणार हे चिनी? नाही नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही'फॅंटमने रागाने मान हलविली.'माझ्या देशातील प्राणी हे माझे प्रजाजन आहेत आणि त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.माझ्यावर विश्वास टाकून ते निर्भयपणे बागडत असतात.त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिन्यांना शिक्षा झालीच पाहिजे.फॅंटमने मनाशी निश्चय केला.

 फॅंटमने ग्वांटाला विचारले,'जिथे खड्डा होता तिथे मला घेऊन जाशील?'ग्वांटाला अत्यानंद झाला.आपल्या ब्वानाबरोबर जाण्याचा बहुमान त्याला मिळणार होता.त्याने आनंदाने आपला भाला उंचावून उडी मारली.ग्वांटा आणि फॅंटम रात्रीच्या काळोखात निघाले.चंद्राच्या प्रकाशात दोघेही आवाज न करता दबकत चालत होते.आसमंतात नीरव शांतता पसरली होती.दोघांच्या पायाखाली चुरडणाऱ्या पाचोळ्याचा आवाज सोडला तर पूर्ण जंगल निस्तब्ध होते.दोन अडीच तास चालल्यावर ते दोघे त्या खड्ड्यापाशी पोहोचले.खरंच , खूप मोठा खड्डा होता तो.एखादा प्राणी त्यात पडला तर बाहेर पडणं मुश्किल झालं असतं.त्या मिचमिच्या डोळ्यांच्या चिन्यांची फॅंटमला अतिशय चीड आली.त्याने त्या धोकेबाज चिन्यांना शिक्षा करण्याचा निर्धार केला. फॅंटमने आजूबाजूला नजर टाकली तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या शेजारचा देश आक्रानिका ची हद्द या जागेपासून थोड्याच अंतरावर आहे.याचा अर्थ हे चिनी आक्रानिका देशात राहून आपल्या बगालिया देशात कारवाया करीत आहेत.बगालिया आणि आक्रानिका देशांची सरहद्द केवळ ओळीने लावलेल्या उंच झाडांनी निश्चित केली होती.त्यामुळे या देशातून त्या देशात जाणे सहजसोपे होते.सरहद्दीवर सैनिक ठेवायची कधी गरजच भासली नव्हती.

 फॅंटमने ग्वांटाला खूण केली आणि दोघांनी उंच झाडे ओलांडून आक्रानिका देशात प्रवेश केला.आजूबाजूला फक्त दाट झाडी होती.पण दूर अंतरावर उजेड दिसत होता.त्या उजेडाच्या अनुरोधाने फॅंटम आणि ग्वांटा चालू लागले.

 तो एक बंगला होता.बंगल्याच्या भिंतीला चिकटून दोघे उभे राहिले आणि कोणाला कळणार नाही या बेताने आत डोकावून बघू लागले.दिव्याच्या उजेडात सर्व कसे लख्ख दिसत होते.त्या खोलीमध्ये काही माणसं बसली होती.त्यातील चार मिचमिच्या डोळ्यांचे चिनी तर दोन आफ्रिकी वंशाचे होते.फॅंटमने त्यातील एका आफ्रिकनाला ओळखले.तो आक्रानिका देशातील धनाढ्य व्यापारी टोंगो होता.चिनी माणसं काहीतरी बोलली आणि ते त्या दुसऱ्या आफ्रिकन माणसाने भाषांतर करून टोंगोला सांगितले. 'ही माणसं म्हणताहेत की त्यांनी बगालियामध्ये खड्डे खोदण्यासाठी आणखी जागा पाहून ठेवल्या आहेत.त्या खड्ड्यात पडणाऱ्या प्राण्यांना कोंडण्यासाठी पिंजरे मागवले आहेत.ते दोन तीन दिवसात दाखल होतील.आपल्याला लवकरात लवकर खड्डे खोदावे लागतील त्यासाठी माणसांची व्यवस्था केली पाहिजे.'टोंगोने मान हलविली.उद्याच मी काही मजूर घेऊन येतो असे म्हणत तो उठला.

ग्वांटा संतापाने बेभान झाला होता.त्याने फॅंटम ला खुणेने टोंगोवर भाल्याने हल्ला करू का विचारले पण फॅंटमने त्याला शांत रहाण्यास सांगितले.उद्या पूर्ण तयारीनिशी परत येऊन सर्वांना रंगेहाथ पकडण्याचे त्याने ठरविले.कारण आता हल्ला केला तर शत्रू सावध होऊन निसटण्याची शक्यता होती.

टोंगो आणि तो दुभाषी कारमध्ये बसून दिसेनासे झाले.फॅंटम आणि ग्वांटा आवाज न करता बगालियाला परत जाण्यासाठी वळले ते उद्या परत येण्याचे ठरवूनच.फॅंटम आणि ग्वांटा झोमांच्या वस्तीवर पोहोचले तेव्हा पहाट होऊ लागली होती.पक्ष्यांचे मंजूळ कूजन ऐकू येऊ लागले होते.

 झोमाप्रमुख इमेझा आणि इतर झोमा फॅंटम आणि ग्वांटा भोवती जमले.रात्रीकाय घडले याबद्दलची त्यांची उत्सुकता शीगेला पोहोचली होती.फॅंटमने आक्रानिका देशात प्रवेश केल्यापासून काय काय घडले ते इत्यंभूत सांगितले.ऐकताना सर्वांच्या मुठी क्रोधाने आवळल्या गेल्या.त्यांनी आपले भाले उंचावत युद्धाच्या गर्जना केल्या.त्यांच्या देशातील प्राणी हे त्यांचे बांधव होते मग कोणीही येऊन त्यांच्या या बांधवांना कसे काय पकडू शकते?

 आताच्या आता जाऊन त्या शत्रूंवर हल्ला करावा असे ते झोमा फॅंटमला सूचित करू लागले.फॅंटमने त्यांना समजाविले की आज रात्री ते बेसावध असताना आपण पकडू आणि आक्रानिका सरकारच्या हवाली करू.साऱ्या झोमांना ते पटले.फॅंटम त्यांचा आत्यंतिक प्रिय राजा होता आणि त्याचे म्हणणे त्यांना शीरसावंद्य होते.

 'ब्वाना,'इमेझाने विचारले,आपण सर्वांनी एकदम हल्ला करून त्यांना मारुन टाकायचे का?'फॅंटम म्हणाला,'इमेझा,आपण त्यांना जिवंत पकडायचे आहे.त्यांना थोडा जरी संशय आला तरी ते अंधाराचा फायदा घेऊन पळून जायचा प्रयत्न करतील तेव्हा आपल्याला काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील.आपण नीट रणनीती ठरवून आक्रानिकाला जाऊया'.सर्वांनी मान हलविली.

 संध्याकाळ झाली.सर्व झोमा आपापले भाले घेऊन फॅंटम पाशी जमले.आपल्या लाडक्या ब्वानाबरोबर कामगिरीवर जायला मिळणार म्हणून सर्वजण उत्तेजित झाले होते.त्यांच्या चेहऱ्यारुन आनंद ओसंडून वाहत होता.फॅंटम आणि ग्वांटाने तो खड्डा साऱ्यांना दाखविला आणि काळजीपूर्वक चालण्यास सांगितले.सारे झोमा दबकत चालले होते.आतापर्यंतचे सारे आयुष्य जंगलात गेल्याने त्यांना आवाज न करता अंधारात वावरायची सवय होतीच.आक्रानिकाच्या सरहद्दीवर ‌पोहोचल्यावर फॅंटमने काही झोमांना तिथेच थांबण्याची सूचना केली.'आम्ही त्या उजेडाच्या दिशेने जाणार आहोत.'फॅंटम बंगल्यातील उजेडाकडे लक्ष वेधून कुजबुजत्या स्वरात म्हणाला.'जर काही जरुर पडली तर मी शीळ घालीन तेव्हा तुम्ही धावत या'असे म्हणून फॅंटमने काही झोमा सरहद्दीवर तैनात केले आणि इतर झोमांबरोबर तो दिव्याच्या अनुरोधाने चालू लागला.

 बंगल्याच्या बाहेर आवाज न करता सारे झोमा अंधारात मिसळून गेले होते.फॅंटम खिडकीजवळ उभा राहून आतील चिनी आणि टोंगोचे संभाषण ऐकू लागला.दुभाषा चिन्यांना सांगत होता,'काल आपले बोलणे झाल्याप्रमाणे टोंगोसाहेबांनी खड्डे खणण्यासाठी आठ मजूर आणले आहेत.'दुभाषाने खूण करताच आठ आफ्रिकी मजूर पुढे झाले.बिचारे भीतीने थरथरत होते.'हे लोक सांगतील तसे वागा',टोंगो मजुरांना जरबेच्या स्वरात म्हणाला तशी घाबरलेल्या मजुरांनी माना डोलावल्या.चिन्यांनी टोंगोला नोटांची थप्पी दिली.टोंगो आणि तो दुभाषा बोलत बोलत बंगल्याच्या गेट पाशी येऊ लागले.फॅंटम चपळाई करुन त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला.अंधारातून अचानक फॅंटम समोर आल्याने टोंगो गडबडला पण क्षणार्धात सावरला.त्याचा हात खिशातील पिस्तुलाकडे जाऊ लागताच फॅंटमने त्याच्यावर झडप घातली आणि आपल्या बोटातील कवटीचे चिन्ह असलेल्या अंगठीने टोंगोच्या हनुवटीवर जोरदार प्रहार करताच टोंगो बेशुद्ध होऊन खाली कोसळला.बरोबर आलेला दुभाषी काय झाले ते न कळल्याने आ वासून बघतच राहिला.इतके दिवस फॅंटमबद्दल तो ऐकून होता.पण आता त्याला प्रत्यक्षात पाहिले.फॅंटमचा पोशाख, त्याची चपळाई,त्याची जरब बघून तो दुभाषी भयकंपित झाला.इमेझाने पुढे होऊन टोंगो आणि त्या दुभाषाला मजबूत वेली बांधून जखडून ठेवले.बंगल्यामधील हास्यविनोद करणाऱ्या चिन्यांना बाहेर काय चाललंय याची गंधवार्ताही नव्हती.फॅंटमने इशारा करताच सारे झोमा आपापले भाले उंचावत, गर्जना करीत बंगल्यात शिरले.ते काळेकभिन्न, उंच धिप्पाड झोमा हल्ला करण्याच्या पवित्र्यात पाहून चिन्यांची बोबडीच वळली.ग्वांटा आणि इतर झोमांनी बरोबर आणलेल्या वेलींनी त्या चिन्यांचे हातपाय बांधून त्यांना जेरबंद केले.कोपऱ्यात बसून भीतीने थरथरणाऱ्या मजुरांकडे झोमांनी आपला मोर्चा वळवला तेव्हढ्यात फॅंटमने बंगल्यात प्रवेश केला.चिन्यांना जखडून ठेवल्याचे पाहून त्याने समाधानाने निःश्वास सोडला.'ब्वाना, आम्हाला सोडा, आम्ही काही केलं नाही.आम्हाला जबरदस्तीने इथे आणलं ,' ते मजूर फॅंटमच्या पायावर डोके ठेवून गयावया करू लागले.फॅंटमला त्यांची दया आली आणि त्याने त्या मजुरांना सोडावयाचे ठरविले.चिन्यांच्या टेबलावरील कागद घेऊन फॅंटमने त्यावर मजकूर लिहिला.'टोंगो आणि दुभाषी तसेच चार चिनी आक्रानिका आणि बगालियाच्या सरहद्दीवरील बंगल्यात आहेत.'आणि खाली सहीच्या जागी त्याने आपल्या कवटीचे चिन्ह असलेल्या अंगठीने मोहर उमटवली.ते पत्र त्या मजुरांकडे देऊन टोंगोच्या घरी पोहोचवा असे बजावले आणि त्यांना सोडून दिले.त्यासरशी ते मजूर अंधारात दिसेनासे झाले.

 रात्र संपून पहाट होऊ लागली होती.फॅंटम साऱ्या झोमांसह बगालिया देशात परत निघाला होता.जंगलातील रहस्याची उकल करुन.

समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller