पद्मा
पद्मा
अत्यंत बिकट परिस्थितीतही जिद्द व मेहनतीच्या भरोशावर मुलीने यशाचे उच्च शिखर गाठले आहे. ऐन तारुण्यात वैधव्य आल्यानंतरही आईने मुलीच्या पंखांना दिलेले बळ त्यासाठी कारणीभूत ठरले असून समाजासाठी हे निश्चितच प्रेरणादायक आहे.
चिंचपूर गावातील रहिवासी असलेल्या साठ वर्षीय पद्मा भिकुसा शेंदुरजने (पूर्वाश्रमीच्या पद्मा डगवार)वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी भिकुसा शेंदुरजणे यांच्याशी विवाह झाला होता. भूमीहीन असलेल्या पद्माचा विवाह आपल्यापेक्षा बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या भिकुसाशी विवाह झाल्याने तशा आनंदी व प्रसन्न होत्या. संयुक्त कुटुंबात सुखी संसारात रममाण असताना सासू-सासरे अल्पावधीतच इहलोकी गेल्याने संयुक्त कुटुंबाची जबाबदारी ही भिकुसावर आली त्यातचं त्याला वाईट व्यसनाने पछाडले आणि कुटुंबाची जबाबदारीही अखेर पद्मावर आली आणि तिने ती लीलया पेललीसुद्धा.दोन चिमुकल्या मुलीसह सर्वात धाकटी मुलगी अवघी अडीच वर्षाची असताना भिकुसानेही मृत्यूला कवटाळले होते. बऱ्यापैकी जम बसलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी ही कमी वयातच पदमावर आली. घरची परिस्थिती तशी जेमतेमच त्यातही वारसाहक्काची असलेली जमीन वाट्याला आली नाही. परिणामतः मोलमजुरी करण्याशिवाय पद्मासमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यातच लहानपणी पितृछत्र हरवलेल्या तीनही मुली बालवयातच पोरक्या झाल्या. कुटुंबाच्या वास्तव्यासाठी पुरेसे घर नाही त्यांतच अठराविश्व दारिद्र्य पद्माच्या पाठीशी आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलीचे शिक्षणासाठी पद्माची चांगलीच घालमेल होत असे. अशा बिकट परिस्थितीही पद्मा हिंमत हरली नाही.परिस्थितीशी चार हात करण्यास तिने कसलीही कसर सोडली नाही.
मोलमजुरी करीत संसाराचा गाडा पुढे रेटत असताना दोन मुलीचे जेमतेम शिक्षण झाल्यानंतर त्यांचे परिस्थितीनुसार विवाह उरकू
न टाकले. सोबतच धाकटी मुलगी ज्योतीला शिकविण्याचा "पण" सुद्धा तिने घेतला होता. उज्वल भविष्याचे स्वप्न तिने ज्योतीमध्ये बघितले होते. ज्योतीसुद्धा प्रत्येक वर्षी चांगल्यापैकी यश मिळवू लागल्याने पद्माच्या दृढनिश्चयाला बळ मिळत गेले. त्यातच मोल मजुरीचे काम करीत असताना अचानक संत्राच्या झाडाला अडकून पडल्याने पदमाच्या माझ्या डोक्याला जबर इजा झाली. कालांतराने डोक्याला कळा येऊ लागल्याने येनकेन प्रकारे तिला अचानक झटके येऊ लागले. निदाना अंती मेंदूत रक्तस्राव कमी असल्याने मेंदूत गाठ तयार झाली होती. वडिलांचे छत्र नाही. करती आई आजारी पडल्याने ज्योतीवर अचानक संकट उभे राहिले. होईल तशी तजवीज करून स्वतःचे शिक्षण आणि आईचे यशस्वी डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
पद्माच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाल्याने तिचे शेतीचे काम कायमचे हातून सुटले. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि ज्योतीच्या शिक्षणाचा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला होता.त्यातच पर्याय म्हणून वयाच्या पन्नासाव्या वर्षी पद्माने शिवणकला अवगत केली आणि तेच उदरनिर्वाहाचे साधन बनविले.
वाट्याला वैधव्य आणि त्यातच हाताला काम नाही एकट्या मुलीला घेऊन राहणेही तितकेच जिकिरीचे. कुणाच्या मदतीचा हात नाही .समाजाचा विकृत दृष्टिकोनामुळे जीवन जगणे अवघड असतानाच ज्योतीने हि शिवण कला अवगत केली. आईला हातभार म्हणून ज्योतीने शिवणकाम करण्याबरोबरच शिक्षणातही बऱ्यापैकी यश प्राप्त केले केले. शिक्षणातीलउच्च पदव्या तिने संपादित करीत गावातील सर्वात उच्चशिक्षित मुलगी म्हणून मानसन्मान मिळविला. स्पर्धेच्या काळातील शिवाजी शिक्षणसारख्या प्रतिष्ठित संस्थेत ज्योतीला शिक्षिका म्हणून नोकरीची संधी मिळाली. दोघींच्याही कष्टाच्या बळावर कुटुंबाचे अखेर भाग्य उजाळले! पदमाचे अपार कष्ट आणि प्रचंड अंगमेहनत दृष्टीपटलावर ठेवत ज्योतीनेही तितक्याच दिमतीने यशाचे शिखर गाठले आणि या मायलेकीने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.