Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

पैठणीचे वाण!

पैठणीचे वाण!

11 mins
151


      सोफ्यावर बसल्या बसल्या मी एक मोठ्ठा आळस देत घड्याळाकडे पाहिले, तीन वाजत होते. म्हणजे अजून एक तास बाकी होता. सुट्टी असली, मी घरी असलो म्हणजे दिवाणखान्यात घड्याळाचा चारचा ठोका आणि स्वयंपाक घरात गॅस लायटरचा 'टक' असा आवाज एकदाच कानावर पडत असे. आज हा योग साधून येण्यासाठी साठ मिनिटांचा अवधी होता. माझ्यासमोर असलेल्या पत्नीकडे मी पाहिले, ती वर्तमानपत्र वाचण्यात गुंग होती. तितक्यात माझ्या भ्रमणध्वनीने संदेश आल्याची बांग दिली. मी भ्रमणध्वनी उचलून तो सुरू केला. 'संदेश पेटी' उघडताच मात्रेबाईंचा संदेश असल्याचे समजले. मी दचकून बायकोकडे पाहिले. ती त्याच 'मग्न' अवस्थेत होती. मात्रेबाईंनी लिहिले होते, 

'आज सायंकाळी सहा वाजता संक्रांतीचे नियोजन आणि 'लुटावयाचे वाण' या संदर्भात महत्त्वाची तातडीची बैठक आहे. आपण आवर्जून आणि नक्की यावे...'

"अग, ऐकलेस का? मात्रेबाईंचा संदेश आलाय..." 

"काय मात्रेबाईचा संदेश आणि तुमच्या मोबाईलवर." 

"आज बैठकीला या म्हणताहेत..." मी बोलत असताना बायको मध्येच कडाडली, 

"बैठकीला बोलावून काय बैठकीची लावणी म्हणणार आहेत? नाही म्हटल तुम्हाला आमंत्रण दिलेय. कुठे आहे लावणीची बैठक?"

"कुठे म्हणजे काय ? त्यांच्या घरीच..." 

"त्या बाईची एवढी हिंमत? माझ्या नवऱ्याला लिखित स्वरूपात संदेश पाठवून घरी बोलावते म्हणजे काय? आता तिचे दिवस भरले..." 

"दिवस भरले ? मात्रेबाईंचे? चांगलेच आहे की ग आता त्यांच्या घरी अजून एक बाळ येणार म्हणायचे." 

"काहीही बरळू नका. आता बघा, अशी फजिती करते तिची ना..."

"अ..अग, ऐक तर मिटींग आहे पण त्यासाठी तुला बोलावलय."

"पण मग संदेश तुमच्या मोबाईवर कसा?" 

"अग,तू एवढी स्मार्ट नाहीस. ब-बापरे! म्हणजे तुझा माबाईल स्मार्ट नाही. साधा आहे. व्हाटसअपवर संदेश पाठवला म्हणजे वेगळे पैसे लागत नाहीत. मिटींग संक्रांतीच्या संदर्भात आहे..."

"अग बाई, संक्रांत आली वाटते. अहो, आठवते ना. तुम्ही गेले वर्षी केलेला वादा?" 

"वादा? मी केला? कोणता?"

"मला वाटलेच होते. दिलेले वचन पाळायला तुम्ही काही दशरथ राजा नाहीत."

"म्हणजे मी तुला 'बारा वर्षे वनवासात जाईन' असे वचन दिले होते का? बरे, असे वचन मी तुला का द्यावे? मला तू एकटीच लाडाची बायको..."

"अहो महाराज, गेले वर्षी संक्रांतीच्या दिवशी पुढच्या वर्षी संक्रांतीला तुला पैठणी घेऊ असे वचन दिले होते. विसरलात का?" 

"पुढच्या वर्षी ना? मग घेऊ की पुढच्या वर्षी..."

"हे बघा माझ्यासमोर हे असे वेड पांघरून पेडगावला जाता येणार नाही. मागच्या वर्षी म्हणजे २०१५ ला आपण मला २०१६ च्या संक्रांतीला पैठणी घेऊ असा शब्द दिला होता."

"आले लक्षात. तुला काय. वाटले, मी विसरलो होतो? शब्द दिला म्हणजे दिला. आत्ता चहा घ्यावा आणि पैठणीला आणायला जावज असे तुला सरप्राइज द्यावे असा विचार होता माझा पण नेमकी आजच तुझी मिटींग आली."

"खरे म्हणता? पण काय करावे? बैठकही खूप महत्त्वाची आहे." 

"बरे झाले एक आठवले. काल पित्रेबाईंचा फोन आला होता."

"चाललय काय? मात्रेंचा संदेश काय? पित्रेंचा फोन काय?" 

"अग, काल माझी बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून मी नाही का तुझा फोन नेला होता. आता तिला काय माहिती की तुझा फोन माझ्याजवळ होता म्हणून..."

"खरेच की. काय म्हणत होती? तुमचा आवाज ऐकून फोन बंद केला असेल ना?" 

"नाही ग. चांगली १५-२० मिनिटे बोलत होती."

"काय? म्हणजे मग तिने तुम्हालाच फोन केला होता. तुमची लॉटरीच लागली म्हणायची." 

"अग, तसे नाही ग. झाले काय, फोनवर तिचे नाव पाहून तिची गंमतच करावी असा विचार मी.केला."

"बाई! बाई! तिची गंमत करण्यापर्यंत मजल गेली म्हणायची. संबंध एवढे जिव्हाळ्याचे झाले आहेत का?" 

"ऐकून तर घे. तुला माहिती आहे, की मी तुझा अवाज काढतो. पित्रेबाई, तुझ्याशी काय बोलतील ते जाणून घेण्यासाठी मी तुझ्या आवाजात त्यांच्याशी बोललो..." असे म्हणत मी तो प्रसंग जसाच्या तसा पुन्हा माझ्या मनःपटलावर जिवंत केला... 

     मी कार्यालयीन कामात रमलेलो असताना म्हणजे थोडे लक्ष माझ्या कामावर तर बरेचसे लक्ष समोरच्या टेबलवर बसलेल्या सौंदर्यवान सहकाऱ्याकडे असताना, कबड्डीतील टच अँड गो प्रमाणे म्हणजे तिच्याकडे पाहाताना तिचे लक्ष माझ्याकडे जाताच पटकन आपल्या कामात व्यग्र असल्याचे दाखवून ती पुन्हा स्वतःच्या कामात गुंतताच पुन्हा नयन सुख घेणे असे चालू असताना माझा फोन वाजला. त्यावर पित्रेबाईंचे नाव पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी पुटपुटलो,   'पित्रेवहिनींचा मला फोन?...' असा प्रश्नात्मक विचार मनात येताच दुसऱ्या मनाने खुलासा केला, 'अरे, तू बायकोचा फोन आणलास मग त्यावर तिच्या मैत्रिणींचे फोन येणार नाहीत तर मग काय तुझ्या मित्रांचे फोन आलेले चालतील तुला?' अशा विचारात असताना पित्रेबाईंशी बायकोच्या आवाजात बोलावे हा अजून एक विचार डोक्यात शिरला, सर्वांसमोर बाईच्या आवाजात कसे बोलावे म्हणून वॉशिंगरूमकडे निघालो...

"हॅलो..." मी बायकोच्या आवाजात म्हणालो. 

"आवाजाला काय झालं? वेगळा वाटतोय..."अत्रेबाईंनी विचारले.

"अहो, काय सांगू? नवऱ्याच्या आग्रहाखातर परवा सायंकाळी चमचाभर... अगदी चमचाभरच आइस्क्रीम खाल्ले बघा नि काल सकाळपासून गळाच धरला मेल्याने"

"कुणी? नवऱ्याने? दाबला नाही ना गळा?"

"अहो. काहीही काय म्हणता? आइस्क्रीम खाताच गळा लालभडक झालाय आणि सुजून आलाय" "कम्माल आहे बाई तुमची. जानेवारी महिन्यातली अशी कडक थंडी आणि तुम्ही आइस्क्रीम खाल्लेत? तुम्हाला नाही पचले पण त्या धोत्रेबाईला मात्र दिवसातून चार-चार आइस्क्रीम खाल्ले ना तरी काहीच होत नाही हो. नवऱ्याच्या मागे लागून लागून आइस्क्रीम आणायला लावते. फ्रीजमध्ये ठेवते आणि मग ते थंडगार आईस्क्रीम दिवसभर चोखत बसते पण तिला कधी सर्दी होत नाही हो."

"असते एकेकाची प्रकृती. बरे, फोन कशासाठी केला होता?"

"विसरलेच की. हे अस्से होते गप्पांच्या नादात. उद्या म्हणे संक्रांत संदर्भात मात्रेबाई मिटींग घेणार आहेत. मला सांगा, गेल्यावर्षीचा हिशोब अजून दिला नाही. गेले वर्षी मात्रे आणि कात्रेबाईंच्या हातात सारा व्यवहार होता. काय गोंधळ घातला ते त्या दोघीच जाणोत. हिशोबाला कातरी लावलीय की काय कळत नाही."

"अहो,हिशोबाचे काय? देतील उद्या."

"एक वर्षाने?कसे अत्रेबाई, कोणतेही काम त्यातल्या त्यात हिशोबाचे काम जेव्हाच्या तेव्हाच व्हायला पाहिजेत. संक्रांत झाल्यानंतर वर्षभरात आठ-दहा मिटिंग झाल्या असतील तेंव्हा हिशोब द्यायला नको? आता उद्या शिळ्या कढीला ऊत आणून काय फायदा? शिवाय वाणाची वस्तू तरी धड आणावी ना? आपण मारे थोडेथोडके नव्हे प्रत्येकीने पाच -पाचशे रूपये जमा केले आणि यांनी आणले काय तर फवारणीचे औषध..."

"तुम्हाला कसे समजले ?" 

"अहो, त्याचे काय आहे, आमच्या ह्यांची आणि मात्रेंची कार्यालयात जाण्याची वेळ एकच. ह्यांना निरोप द्यायला मी दारात जाऊन ऊभी राहते. यांची मोटारसायकल आमच्या दारापासून पंधरा-वीस फुट जात नाही, योग्य पिकअप घेत नाही तो हा मात्रे स्कुटीवर स्वार होऊन हळूवार चालीने माझ्याकडे पाहात- पाहात, एक छानसा स्मित देत जातो. त्यावेळी त्याच्या अंगाचा घमघमाट..."

"काय? मात्रे तुम्हाला एवढा चिकटून.. सॉरी.. तुमच्या जवळून जातो?"

"अहो, जातो रस्त्यावरून पण आमच्या दरवाजाला भिडूनच जातो. त्यामुळे येतो त्या फवारणीचा वास. शिवाय बायकोने फुकटात आणून ठेवलेल्या बाटल्या त्यामुळे फवारून घेत असेल भरपूर! मला सांगा, त्याला वर्षभर पुरतो आहे म्हणजे नक्कीच ड्युओच्या दहा-अकरा बाटल्या उरल्या असणार, ते काही नाही यावर्षी तुम्ही आणि मीच संक्रांतीचे वाण खरेदी करू या..." हे सारे सांगताना मी बायकोस म्हणाला, 

"अग तुझ्या आवाजाची नक्कल करता -करता ठसका लागला आणि मग तिला मी बोलतोय हे लक्षात आले. तुला सांगू, एखादी स्त्री असती तर चिडली असती, रागारागाने फोन बंद केला असता कदाचित तुझ्याकडे किंवा स्वतःच्या नवऱ्याकडे तक्रार केली असती, पण तिने ना माझी स्तुती करून फोनवरच..."

"स्तुतीसुमने उधळणार नाही तर काय? तो काय ड्युओ आहे का विकत घेऊन फवारायला? बरे काय गुण गात होती तुमचे?" बायकोने जळफळाट झाल्याप्रमाणे विचारले.

"अगबाई भावोजी, मला माहितीच नाही, की तुम्ही आवाज बदलून बोलू शकता ते. यावर्षी की नाही, मीआपल्या दुर्गा मंडळाची अध्यक्ष होणार आहे. तेव्हा तुमचा हा वेगवेगळे आवाज काढण्याचा कार्यक्रम ठेवते हो. कॉलनीतल्या लोकांना कळू तर दे किती हरहुन्नरी माणूस आपल्या शेजारी आहे ते. तुला करते म्हणाली होती फोन. केला का?"

"नाही. मला फोन केला तिने तेव्हा तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्यावर मला पुन्हा कशाला करेल? गटवला असेल दुसराच.. म्हणजे दुसऱ्या बाईशी बोलली असेल आणि केले असतील त्या मात्रेबाईंचे गाऱ्हाणे. तुम्हाला सांगते एक नंबरची गाऱ्हाणखोर बाई आहे. कुठून-कुठून प्रत्येकाची माहिती मिळवते आणि दुसऱ्याच क्षणी प्रसाद वाटल्याप्रमाणे सर्वत्र वाटत फिरते. यावर्षी मी ना दुर्गा मंडळाची अध्यक्ष झाले ना, तर पहिले हिला 'गाऱ्हाण सम्राज्ञी' हा पुरस्कार देऊन सन्मानित करेन. बघा.. अगबाई, चार वाजले चला चहा करून आवरते सारे आणि जाते बैठकीला. अहो पण पैठणीचे कसे हो?"

"तू मिटींग आटोपून लवकर आलीस तर जाऊ नाही तर पुढच्या शनिवारी..." 

"नाही हो, तोपर्यंत खूप उशीरही होतो आणि दुकानात खूप गर्दीही होते हो. धड पसंत करता येत नाही ना" 

"असे करूया, रात्री ऑनलाइन बुक करू या.." 

"शीः! काही नको. दुकानात जाऊन साडी खरेदी करण्यातली मजा काही न्यारीच असते. संक्रांतीची

साडी तर अशी ऑनलाईन नकोच नको. दुकानात एक म्हणता शंभर साड्या पाहता येतात. इथे काय तर समोरच्या चित्रातील आठ-दहा साड्यांमधून पसंत करावी लागेल. घरी आलेले पार्सल फोडल्यावर आत वेगळाच रंग असला कुठे बारीकसे डॅमेज असेल तर बदलताही येणार नाही आणि तितकासा वेळही नसणार. शिवाय ते म्हणतात, की या खरेदीवर तुम्ही अमूक रूपये वाचवले पण मला नाही खरे वाटते. अगोदरच हजार रूपयांची वस्तू असेल तर त्यावर पंधराशे रूपयाचा आकडा टाकून बाराशेला गळ्यात बांधायची आणि तीनशे रूपये वाचविल्याची जाहिरात करायची पण प्रत्यक्षात दोनशे रूपयांनी महागातच पडते."

"जाऊ दे, उद्या दुपारी अर्ध्या दिवसाची रजा घेऊनच येतो. मग जाऊया." 

"खरेच! आई ग, किती चांगले आहात तुम्ही! आज रात्री ना..."

"काय रात्री..."

"श्रीखंड-पुरी सोबत कांद्याची भजी खास तुमच्यासाठी" 

"आता कपभर चहा मिळेल का?"

"आणते हो आणते..."असे म्हणत बायकोने अत्यानंद झालेल्या अवस्थेत स्वयंपाक घराकडे कूच केले.

    बरोबर सहाच्या सुमारास गल्लीतल्या बायकांची 'संक्रांतस्पेशल' बैठक सुरू झाली. मात्रेबाईंनी बैठकीचा उद्देश सांगितला. 

"ते राहू देत. आधी गेल्या वर्षीचा हिशोब द्या..."

"गत वर्षीचा ? अहो, 'रात गयी. बात गयी!' आता काय त्याचे?" 

"कशी जाईल रात! 

कशी संपेल बात!! 

जर असतील दोघे नवविवाहित!!!...." 

"वा! वा! तुम्ही तर मस्त कविताच केली हो. रात की बात चांगलीच रंगविता म्हणायची... विडा रंगल्याप्रमाणे! तुमचा हा शीघ्र कवितांचा गुण माहिती नव्हता हो. पण बरोबर आहे. गेले वर्षीचा हिशोब द्यायलाच हवा. रक्कम थोडी नव्हती हो. प्रत्येकीने पाच-पाचशे रूपये दिले होते." 

"अहो, गंमत केली. हिशोब तयारच आहे. मोठेपणा करायला गेले आणि हजार रूपये तोट्यात गेले. बघा.." म्हणत म्हात्रेंनी हिशोबाचा एक कागद पित्रेबाईंच्या हातात दिला. तो फिरत फिरत अत्रे यांच्या हातात आला. त्यावर एक नजर टाकून अत्रे म्हणाल्या.

"लॉसमध्ये की फायद्यामध्ये? वाण म्हणून आणले होते त्या फवाऱ्याची किंमत तुम्ही तीनशे रूपये लावलीत मात्र प्रत्यक्षात त्याची किंमत एकशे चाळीस रूपयेच आहे. शिवाय नग जास्त घेतल्यावर अजून कमी होते."

"त-त- तुम्हाला काय माहिती? तुमचा नवरा तर ड्युओ वापरतच नाही.."

"वापरला तरी विकत आणून वापरतो. तुमच्या नवऱ्या प्रमाणे संक्रांतीच्या वाणासाठी आणलेला नि वाण देऊन उरलेल्या बाटल्या वर्षभर फुकटात वापरत नाही.." अत्रेबाई तावातावने बोलत असताना मागे बसलेली एक बाई शेजारी बसलेल्या बाईच्या कानात हळूच म्हणाली, 

"किती गंमत आहे ना, अत्रे ड्युओ वापरत नाहीत हे मात्रेबाईंना माहिती आहे आणि मात्रे रोज फवारा मारून जातो ते अत्रेबाईंना ठाऊक आहे. कमालच म्हणावी."

"अत्रेबाई, भलताच आरोप करू नका. माझा नवरा डयुओ वापरतो हे तुम्हाला कसे माहिती? "वासावरून..."

"पोलिसांची कुत्रीही वासावरूनच माग काढतात." 

"मात्रेबाई, तोंड आवरा..."

"का? तुम्हाला बिनबुडाचे आरोप करता येतात..."

"बिनबुडाचे? पुरावा आहे पाहायचा? हा बघा..." असे म्हणत अत्रेबाईंनी पर्समधून एक ड्युओची बाटली काढली व पुढे म्हणाल्या, 

"यावरची किंमत आणि बाटलीवरची किंमत कसे असते आजकाल वस्तुवरचा दर जास्त आणि किंमत कमी असते परंतु इथे विकलेली किंमत जास्त आणि बाटलीवरचा छापलेला दर कमी. या कागदावर तुम्ही पंचवीस बाटल्या खरेदी केल्याचे दाखवले आहे पण प्रत्यक्षात इथे आपण पंधराच कुटुंबेच राहतो."

"ठीक आहे. नजरचुकीने झाले असेल. लगेच दुरूस्त करते. या वर्षीचे ठरवूया."

"थांबा, वाणाचे काय आणायचे नंतर ठरवू. यावर्षी पैसे कुणाजवळ जमा करायचे नि कुणी खरेदीला जायचे ते ठरवूया." 

"त्यात काय मी आहे ना... मी का नको?" मात्रेबाईंनी लगोलग विचारले. 

"कसे आहे वापरायला मिळावा म्हणून गेले वर्षी वाण म्हणून ड्युओच्या बाटल्या लुटल्या. यावर्षी पतीराजाला फुकटात वर्षभर प्यायला मिळाव्यात म्हणून दारुच्या बाटल्या लुटाल... वाण म्हणून..."

"अत्रे..."

"ओरडू नका. जी नजरचूक गतवर्षी झाली ती यावर्षीही होऊ शकते. आणि इतरांनाही संधी मिळू द्या." 

"हो...हो..." इतर काही बायकांनी दुजोरा दिला.

"अत्रेबाईंनाच सारे अधिकार द्या."

"ठीक आहे. बघू तर काय दिवे लावतात ते." मात्रेबाई फणकाऱ्याने म्हणाल्या.

"दिवे लावायला दिवाळी नाही तर आवा लुटायची संक्रांतआहे. कुणाच्या डोक्यात काही कल्पना असेल तर सांगा." 

"सामाजिक वसा जपण्यासाठी, प्रदुषण वाटू नये म्हणून तुळशीची रोपटी द्यावीत का?" 

"नको गं बाई, खूप ठिकाणी हेच वाण लुटताहेत. शिवाय गेल्या वर्षीही हा प्रयोग झालाय."

"एखादे फुलझाड किंवा वृक्षाचे रोपटे.." 

"पित्रेबाई आजकाल फ्लॅटसंस्कृतीमध्ये आपण रोपटी लावणार कुठे नि वाढणार कशी?" 

"माझ्या मावस बहिणीने यावर्षी काश्मीर, आग्रा येथून आवा लुटण्यासाठी वाणाचे अनेक प्रकार आणले आहेत. अगदी स्वस्तात. बोलावू का तिला? आग्र्याच्या बेडशीट आणि काश्मीरचा गालिचा फार सुंदर.. एकापेक्षा एक सुरेख आहेत म्हणे."

"नको हो. अगदीच कॉमन झालेय ते." 

"अजून एक सुचवते बघा. माझी भावजयी आहे येवल्याची. हो. पैठणीवाला येवलाच! तिथे तिच्या भावाचे पैठणीचे फार मोठे शो-रूम आहे. त्यामुळे आपणास भरघोस सुट मिळेल."

"कितीही सुट दिली तरी का पैठणीचे वाण लुटायला परवडेल आपणास?"

"वाण म्हणून नाही हो. कुणाला संक्रांतीसाठी पैठणी घ्यायची असेल म्हणून सांगितले."

"खरे तर मला घ्यायचीय पैठणी पण बघू."

"मग घ्या ना. उधार द्यायला सांगू का?" 

"प्रश्न पैशाचा नाही हो. साहेबांच्या होकाराचा आहे." 

"त्यांच्याकडे की नाही अजून एक स्कीम आहे, जशी ज्वेलर्सकडे असते ना तशी. काय करायचे आपण एक ठराविक रक्कम दरमहा त्यांच्या दुकानात भरायची. अकरा महिने झाल्यावर आपल्या एका महिन्याच्या रक्कमेएवढी रक्कम ते भरणार आणि एकूण सर्व रक्कमेच्या किमतीची साडी.... पैठणी शालू आपण घेऊ शकतो."

"ही स्कीम चांगली आहे पण सध्या तो तूर्तास बाजूला ठेवू या. मुख्य प्रश्न आहे, आपल्या संक्रांतीच्या वाणाचा. का हो पित्रेबाई, तुमच्यामध्ये काही तरी बदल दिसतोय." 

"बदल असा विशेष नाही. थोडे वजन कमी करावे म्हणते. त्यासाठी मेकअप करणे सोडून दिलेय. अगदी हलका शृंगार करते." 

"आणि रात्रीचा शृंगार? काल की नाही मी बाहेर निघाले होते. जाताना तुमच्या घरामध्ये सहज डोकावले तर सोफ्यावर कुणी तरी स्त्री बसली होती. मी ओळखले नाही तिला." 

"अहो, मीच होते. मी बघितलं तुम्हाला..."

"मला तर धक्काच बसला बाई. ते नाही का आजकाल फेसबुकवर सध्याच्या टॉप नायिकांचे बिना मेकअपचे फोटो येतात. कशा दिसतात हो त्या जणू एखाद्या तुरूंगातील कैदिणी. तशा तुम्ही दिसत होता बघा..." चर्चा भलतीकडेच जाऊन रंगात आलेली असताना अचानक तिथे पाच-सहा बायकांचे आगमन झाले. त्यांना पाहताच मात्रेबाई पुढे होऊन त्यांचे स्वागत करून म्हणाल्या,

"या. या. चौधरीताई, या! कशी काय वाट चुकलात? 

"वाट नाही चुकले तर वाट शोधत आले. नगरपालिकेची निवडणूक आहे. मी उभी आहे. तुमच्या येथे बैठक चालू आहे असे समजले म्हणून मुद्दाम आले. म्हटलं सर्व भगिनी एकदाच भेटताहेत तर जावे. कसे आत्तापर्यंत आपल्या वॉर्डातून आजपर्यंत पुरुष उमेदवार निवडून आलेले आहेत. याही वेळेस माझ्यासोबत इतर सारे पुरुष उभे आहेत. म्हणून म्हटलं आपल्या बायकांशी बोलावे. त्यांच्या मदतीने इतिहास घडवावा."

"पण चौधरीताई, नेमकी मतदानाच्या दिवशी संक्रांत आहे हो. जरा मतदानाचा दिवस बदलून मिळाला ना तर बघा ना." 

"बरोबर आहे तुमचे पण कसे आहे हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. त्यात आपणास हस्तक्षेप करता येत नाही."

"ठीक आहे ना. संक्रांत तर संक्रांत! सर्व पुरुष उमेदवारांवर संक्रांत आणूया. स्त्री एकजुटीचा परिणाम त्यांना दाखवून देऊ." पित्रेबाई म्हणाल्या.

"वा! ये हुई बात! नाही तरी संक्रांत म्हणजे बदल, स्थित्यंतर! बरे. माझी निवडणूक निशाणी आहे प्रेशर कुकर! संक्रांतीच्या दिवशी सणानिमित्त घराघरात कुकर लावणारच. त्याच्या शिट्ट्यांनी परिसर दुमदुमला पाहिजे, त्याच्या प्रेशरने इतर उमेदवारांची हवा गुल झाली पाहिजेत." 

"पण माझ्याकडे कुकरच नाही हो तर मग शिट्टी वाजणार कशी?"

"ती व्यवस्था मी केलीय. कसे आहे, कुणाकडे कुकर नाही. कुणाचा जुना झालेला असेल. कुणाचे गास्केट तर कुणाची शिट्टी खराब झाली असण्याची शक्यता आहे. संसारात एक ना अनेक अडचणी म्हणून मी या वर्षी प्रेशर कुकर हेच वाण लुटले आहे. आणा ग..." चौधरीताई बोलत असताना त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येक महिलेला हळद-कुंकू लावून प्रेशर कुकरचे वाण देताना तीळगुळाच्या वड्या घातलेले पॉकेटही दिले आणि सर्वांना हात जोडून विनंती करत निघून गेल्या. "वा! काय मस्त योग आला हो संक्रांत आणि निवडणूक! बरे चला. आपल्या वाणाचे ठरवा, कुकर लावायची वेळ झाली." 

"आता कशाचे आलेय वाण. संक्रांतीच्या दिवशी सकाळीच एकत्र येऊया. एकमेकींना कुंकू लावून वाण म्हणून हेच प्रेशर कुकर देऊन वाजत गाजत मतदानाला जाऊया." 

       संक्रांतीच्या आदल्या दिवशी सायंकाळी ती बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली, की आचारसंहितेच्या काळात स्वतःची निवडणूक निशाणी असलेले प्रेशर कुकर मतदारांना फुकटात वाटल्यामुळे चौधरीबाईंना अटक झाली असून वॉर्डाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. शिवाय पोलीस घरोघर जाऊन वाटप केलेले प्रेशर कुकर जप्त करणार आहेत.. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मतदान केंद्राजवळ म्हणजे शाळेच्या मैदानात शेकडो प्रेशर कुकर बेवारस अवस्थेत आढळले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy