Pratibha Tarabadkar

Drama

4.5  

Pratibha Tarabadkar

Drama

निरंतर

निरंतर

5 mins
258


घरात निःशब्द शांतता पसरली होती.एक प्रकारचं दबकं वातावरण पसरलं होतं.अपर्णाच्या बेडरूममधील वॉर्डरोबच्या दाराचा आवाज आला. मोहनराव बाहेर जाण्यासाठी कपडे शोधत होते. कपाटाचे दार बंद होऊन आता ड्रेसिंग टेबलचा ड्रॉवर उघडण्याचा आवाज आला. मोहनराव आपले विरळ चंदेरी केस विंचरत असतील. अपर्णा मटार सोलत कानोसा घेत होती. तेवढ्यात अण्णांच्या घसटत चालण्याचा आवाज आला. बर्म्युडा पॅन्ट आणि मलमलचा सदरा घातलेले अण्णा आपल्या बेडरूममधून हॉलमध्ये येऊन बसतील. रोजचे तेच तेच परिचित आवाज अन् तेच ते परिचित प्रसंग! अपर्णा मटार सोलणे अर्धवट सोडून उठली. उठतांना तिच्या गुडघ्यातून जोरदार कळ आली. त्याकडे तिने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आणि ती हॉलमध्ये आली.  

'दुपारच्या गोळ्या घेतल्या का?' बुटाचे बंद बांधता बांधता मोहनरावांनी अण्णांना विचारले.

अण्णांनी आज्ञाधारकपणे मान डोलावली.'आणि माईंनी?' अण्णांनी परत मान डोलावली.

'सहापर्यंत येतो' असे पुटपुटत मोहनराव बाहेर पडले.


अपर्णाने 'बरं'म्हणत दार लावले आणि जणू या क्षणाची वाट पहात असल्यागत अण्णांनी टी.व्ही.च्या रिमोटवर झडप घातली.'आजची ब्रेकिंग न्यूज'टी.व्ही.वरील वृत्तनिवेदक किंचाळू लागला आणि तिडीक येऊन अपर्णा गॅलरीत येऊन उभी राहिली. तिला खात्री होती, हातात फोनची डायरी घेऊन माईसुद्धा तयार असतील कोणालातरी फोन लावायला.

 

खालचे लॉन, बागडणारी मुलं, बाकावर बसून गप्पा मारणाऱ्या स्त्रिया यांनी भरुन गेले होते.त्या दृश्याने अपर्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. थोडा वेळ त्या लॉनवर जमणाऱ्या बायकांशी गप्पा मारणं हाच अपर्णाला विरंगुळा होता. मात्र अगदी थोडा वेळ.परत येऊन घाईघाईने स्वयंपाक करावा लागे. अण्णा आणि माई रात्री बरोबर आठ वाजता जेवावयास बसत. आपलं आयुष्य ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांसारखे झाले आहे. अण्णा, माई तारे आणि त्यांच्या कलेने फिरणारे मोहनराव आणि आपण ग्रह! अपर्णाला आपल्या या कल्पनेने हसू आले.

 

आपल्याच विचारात दंग असलेली अपर्णा भानावर आली. पावणेसहा वाजले होते. मोहनराव सहापर्यंत येतो सांगून गेले होते. ते आले की अपर्णा बाहेर पडणार होती. अण्णांना हार्ट अॅटॅक येऊन गेल्यापासून माई अण्णांना एकटं सोडून जाता येत नव्हते. त्यामुळे मोहनराव आले रे आले की त्यांना खो दिल्यागत अपर्णा बाहेर पडत असे. तयारी करण्यासाठी अपर्णा आपल्या बेडरूममध्ये येत असतांना माई फोनवर कोणाला तरी सांगत होत्या, 'आमच्या सूनबाईला देवाधर्माचं काही करायला नको'. अपर्णा खिन्नपणे हसली. 'आपला नातू पाच वर्षाचा झाला पण सुनेचं बिरुद काही आपली पाठ सोडत नाही.'

 

सकाळी नऊची वेळ होती. नाश्ता नुकताच झाला होता. मोहनरावांनी वाचून बाजूला टाकलेला पेपर अण्णा डोळे किलकिले करून वाचत होते. माईंची त्यांच्या बेडरूममध्ये काहीतरी खुडबुड चालू होती. अपर्णाने सहज डोकावून पाहिले. पांढऱ्या केसांचा बॉयकट केलेल्या, गाउन घातलेल्या माई आपली पैठणी पांघरुन आरशात वेगवेगळ्या अँगलने बघत आपले दंतविहीन बोळके पसरुन स्वतःच्या छबीवर खूष होऊन हसत होत्या. अपर्णाला वाटले, आपल्याला कधीच असे आसुसून नटावे, मुरडावे का वाटत नाही? का माईंची आसक्ती बघून आपल्याला विरक्ती..? अपर्णाने मान झटकली आणि स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी ती किचनकडे वळली. एकदम तिला गरगरल्यासारखे झाले. ब्लडप्रेशर चेक करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे पण अण्णा-माईंमध्येच इतकं गुरफटल्यावर स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे?

 

अपर्णा मिक्सरवर पोळ्या बारीक करीत होती. माई-अण्णांना अलीकडे कवळ्या नीट बसत नसत. आता पाच मिनिटांत जेवायला बसायचे तेवढ्यात बेल वाजली. 'आता जेवायच्या वेळी कोण आले असेल बरं?'

 'सरप्राईज' दारातून नंदाताई ओरडल्या.


मोहनराव या आपल्या चुलत बहिणीला 'नारदमुनी' म्हणत असत. 'आज मुद्दाम न कळवता आले. म्हटलं असं न कळवता गेलं की कशी मज्जा येते!'

 'मज्जा न यायला काय झालं, असं आयतं जेवायला मिळालं तर आम्हाला पण मज्जा येईल', अपर्णानं फणफणत शेवयांची खीर करायला घेतली.

'अण्णाकाका माईंची चौकशी करून यावी म्हटलं,' नंदाताई शक्य तितक्या गंभीर आवाजात म्हणाली.

'माई अण्णांच्या तब्येतीची चौकशी करतेस तशी त्यांना सांभाळणाऱ्या मोहनदादाच्या डायबिटीस आणि अपर्णा वहिनीच्या हाय बीपीची पण चौकशी करत जा जरा'मोहनराव नंदाताईला छद्मीपणाने म्हणाले.'आम्हीपण म्हातारे झालो आहोत आता'मोहनरावांनी टोला लगावला तशी नंदा कावरीबावरी झाली.

 

जेवायला टेबलावर येऊन बसताना अण्णा लंगडत आहेत हे बघून अपर्णा आणि मोहनरावांनी एकमेकांकडे चमकून पाहिले. अण्णांच्या पायाला काय झालं?नंदाचं लक्ष बरोब्बर अण्णांच्या पायाकडे गेलं आणि ती चित्कारली', 'अण्णाकाका,काय झालं पायाला?'

 'अगं, अंघोळ करून खुर्चीवरून उठतांना पाय लचकला.' अण्णा कण्हत म्हणाले.

'पण तुम्हाला अंघोळ घालणारी सारजा तर काही बोलली नाही', अपर्णा आश्चर्याने थक्क झाली.

'मग काय नंदाबाई, मोहनराव छद्मी स्वरात म्हणाले, आता सगळीकडे फोन करून सांगायला बातमी मिळाली तुम्हाला की मोहनदादा आणि अपर्णावहिनी कसे माई अण्णांकडे दुर्लक्ष करतात, त्यांचे कसे हाल चालू आहेत,' बोलता बोलता मोहनरावांनी अण्णांकडे रागाने कटाक्ष टाकला आणि नंदा गेल्यावर बापलेकांची चांगलीच जुंपणार या विचाराने अपर्णा अस्वस्थ झाली.

'ए काहीतरीच हं तुझं दादा, मी काही अगदीच 'ही' नाही हं,'नंदा गाल फुगवून लाडे लाडे म्हणाली.

'अगं माई, किती कमी खाते आहेस तू!'नंदा माईंच्या वाटीत जबरदस्तीने खीर वाढत म्हणाली

'किती अशक्त झाली आहेस,पोटभर खात नाहीस का?'नंदाच्या या आगाऊपणावर अपर्णा चिडली.

'आयजीच्या जीवावर बायजी कुठली',अपर्णा मनातल्या मनात फुणफुणली.

'नंदाताई, तुम्ही असं का नाही करत,थोडे दिवस दोघांना तुमच्या घरी घेऊन जा, त्यांना पोटभर खाऊपिऊ घाला,त्यांची काळजी घ्या आणि टुणटुणीत झाले की आणा परत!' 

अपर्णाच्या या वक्तव्यावर माईअण्णा हरखून गेले.त्यांचे डोळे आनंदाने लुकलुकू लागले.बेसावधपणे चोरी पकडली जावी तद्वत नंदाचा चेहरा झाला. क्षणभर काय बोलावे ते तिला सुचेना.'अगं नेलं असतं पण मला न पुण्याला जायचंय लग्नाला,'स्वतःवर ताबा मिळवत नंदा म्हणाली.'लग्नाहून आले की नक्की नेते.' लग्नाचे कारण ही पळवाट आहे आणि नंदाचे हे आश्वासन म्हणजे निव्व ळ थाप आहे हे अपर्णा जाणून होती पण हिरमुसलेल्या माई अण्णांकडे पाहून तिला वाईट वाटले.

 

'नारदमुनी'नंदाताई येऊन गेली आणि अपर्णाला भीती होती तेच घडले.'माहिती आहे तुम्ही माझे किती केले आहे ते, पुन्हा पुन्हा किती वर्ष तेच तेच ऐकवणार आहात?'मोहनरावांचा चढा आवाज ऐकू आला.'अण्णा,सत्तर वर्षांचा झालो आहे मी आता.किती वेळा तेच ऐकून घेऊ?'तुम्ही तुमचं कर्तव्यच केलं.काही उपकार नाही केलेत.'मोहनराव तावातावाने बोलत होते.'नशीब, नंदा समोर काही वादावादी झाली नाही ते'अपर्णाने सुटकेचा निःश्वास टाकला. 'आम्हीपण तुमची दुखणी, हॉस्पिटलमध्ये चकरा, औषधपाणी सगळं व्यवस्थित करतो आहोतच ना,'मोहनरावांचा चढा आवाज लागला तशी अपर्णा मध्ये पडली आणि दोघांना शांत केलं.


 आज रोहन, रिया आणि नील शी स्काईप वर बोलायचा दिवस.मोहनराव,अपर्णा,माई अण्णा सारेजण या दिवसाची आतुरतेने वाट पहात असत. एखाद्या शांत जलाशयावर वाऱ्याची झुळूक येऊन त्यावर तरंग उठावेत तसं वाटत असे सर्वांना.रोजच्या चाकोरीबद्ध आयुष्यातील तेव्हढाच विरंगुळा!

 रोहन आणि रिया कामातील व्यस्ततेमुळे भारतात येऊ शकत नव्हते आणि मोहनराव आणि अपर्णा माई अण्णां मुळे अमेरिकेत जाऊ शकत नव्हते. त्यामुळे हा विरंगुळा सर्वांनाच हवाहवासा वाटे.'हाय आई-बाबा, कसे आहात?रोहन म्हणाला.'माईअण्णांची तब्येत कशी आहे?'

 

'आई,नीलने तुमचं नामकरण केले आहे.तुम्ही नुसते आजी आजोबा आणि अन् माई अण्णा सिनिअर आजी-आजोबा',रिया म्हणाली.'अरे लबाडा, अण्णा म्हणाले,'बराच हुशार झाला आहेस की रे!'अण्णांच्या कौतुकाने नील लाजला.बराच वेळ गप्पा मारल्यावर आता परत कधी भेटायचे ते ठरवून मोहनरावांनी लॅपटॉप बंद केला.तरी गप्पा अजून मनात रेंगाळत होत्याच.

'नील आता पाच वर्षाचा झाला ना ग?'माईंनी विचारले.'हो आताच मार्च महिन्यात सहावं लागलं त्याला.'

 

म्हणजे अजून दोन वर्षांत मुंज करायची वेळ येईल की',माईंचे डोळे आनंदाने लुकलुकू लागले.'तुझी सोन्याची फुलं उधळायची हौस राहून गेली ना,नील अमेरिकेत जन्मला म्हणून?'अण्णांनी माईंना विचारले.'होच मुळी',माई ठसक्यात उद्गारल्या.'रोहनला मी सांगणार आहे,


नीलच्या मुंजीत पणजीचा मान म्हणून मला भारीपैकी साडी घे. माझे सगळे दागिने घालून मिरवणार आहे मी नीलची पणजी म्हणून आणि त्याच दिवशी सोन्याची फुलं पण उधळायची सर्वांसमोर. 'माईंचं प्लॅनिंग सुरू झालं. 'हो ना, अण्णा माईंशी सहमत झाले.


'दोन वर्षे काय हां हां म्हणता निघून जातील.' आणि माई अन् अण्णा त्या दोन वर्षांनी साजऱ्या करावयाच्या नीलच्या मुंजीच्या काल्पनिक सोहळ्यात हरवून गेले होते. आपली बोळकी रुंदावून खुषीत हसत होते. आनंदाने त्यांचे डोळे लुकलुकत होते आणि... अपर्णा आणि मोहनराव एकमेकांकडे हताश नजरेने पाहात होते.


जीवनाचा संथ प्रवाह वहातच होता... अखंड,निरंतर....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama