Pratibha Tarabadkar

Abstract Drama

4.3  

Pratibha Tarabadkar

Abstract Drama

निरंतर - भाग २

निरंतर - भाग २

4 mins
249


 सकाळचा स्वयंपाक आटोपून अपर्णा घाम पुसत हॉलमध्ये आली.समोरच नीलच्या मुंजीच्या वेळी काढलेल्या ,एनलार्ज केलेल्या ग्रुप फोटो कडे तिचे लक्ष गेले.अण्णा माई खुर्चीवर बसलेले, त्यांच्या मध्ये बटूच्या वेशातील नील,मागे रोहन आणि रिया, सर्व प्रसन्नपणे हसत आहेत आणि दोन्ही बाजूला मोहनराव आणि अपर्णा दमल्या भागल्या चेहऱ्यावर ओढूनताणून आणलेले स्मित वागवत.


अपर्णा पंख्याखाली जरा टेकली तोच तिचा फोन वाजला.अपर्णाने थोडा वेळ बरं बरं करत फोन बंद केला.'कोणाचा फोन होता?'मोहनरावांनी विचारले तशी सुस्कारा सोडत अपर्णा म्हणाली,'सारजाबाईंचा.त्या कामावर येणार नाहीत आजपासून.तुमच्याकडचे म्हातारा म्हातारी लईच कटकटे आहेत म्हणतेय ती.'अपर्णा पडेल आवाजात म्हणाली.मोहनराव गप्पच बसले.अण्णा माईंसाठी लावलेली ही पाचवी बाई होती.आता पुनश्च हरिओम.पण दुसरी बाई मिळेपर्यंत आपल्यालाच अण्णा माईंना अंघोळ घालावी लागणार.अपर्णा आणि मोहनरावांनी अंगात चंद्रबळ आणले .दोघांना खुर्चीवर बसवून अंघोळ घालून परत व्हिलचेअरवर बसवून त्यांच्या खोलीत परत आणेपर्यंत अपर्णा आणि मोहनरावांची पुरती दमछाक झाली.त्यातून माई अण्णांची भूणभूण चालूच होती,साबण नीट गेला नाही,अंग धड पुसले नाही वगैरे.पण हल्ली अपर्णा आणि मोहनराव मूकबधीरांच्या भूमिकेत असत.वादविवाद करण्यासाठी त्यांच्यात त्राणच उरत नसे.माई अण्णांना डायपर घालून कपडे चढविले तशी माईंनी छोटा आरसा मागितला.चेहऱ्याला पावडर लावून टिकली लावली आणि आरशात स्वतःच्या छबीकडे पाहून खुशीत हसल्या.अपर्णा खिन्नपणे हसली. आपण कधी शेवटचं असं असोशीने आरशात पाहून पावडर कुंकू लावलंय?'तिला आठवेना.


 'अरे मोहन,'अण्णांची थरथरत्या आवाजातील हाक ऐकून मोहनराव त्यांच्या खोलीत आले.'माझं पासबुक भरुन आण.'उशाशी ठेवलेले पासबुक मोहनरावांपुढे करीत अण्णा म्हणाले.'मागल्या आठवड्यात तर भरुन आणलंय.'मोहनराव म्हणाले.'मग यातले पैसे कसे कमी झाले?'खराब प्रिंटरमुळे फिकट उमटलेले आकडे डोळे किलकिले करून वाचण्याचा प्रयत्न करीत अण्णांनी विचारले.'तेव्हढीच रक्कम होती अण्णा, तुमच्या लक्षात रहात नाही आताशा',औषधांचा डबा उघडत मोहनराव म्हणाले.अण्णांच्या गोळ्या त्यांच्या हातात ठेवून ते माईंकडे वळले.'हे काय, इतक्या कमी गोळ्या कशा काय उरल्या?'त्यांनी आश्चर्याने विचारले.'अरे तिच्या लक्षात नाही रहात आणि सरळ डब्यातून पाच-सहा वेळा खाते गोळ्या.'अण्णांनी माईंची चुगली केली.


मोहनराव सुन्न झाले.याचे परिणाम काय होतील?ते अण्णांना गोळ्या घेण्यासाठी पाणी द्यायला गेले तर अण्णांनी आधीच गोळ्या घेतल्या होत्या, पाण्याशिवाय!'अण्णा कुठे घेतात गोळ्या?त्यांची उशी उचलून बघ म्हणजे कळेल', माईंनी अण्णांच्या चुगलीची परतफेड केली तशी चपापून मोहनरावांनी अण्णांची उशी उचलून बघितली तर गोळ्यांचा हा थोरला ढीग उशीखाली लपवून ठेवला होता.मोहनराव डोकं धरून बसले.

 

अपर्णा स्टुलावर बसून पोळ्या लाटत होती.गुडघेदुखीमुळे फार वेळ तिला उभं रहावत नसे.डॉक्टरांनी गुडघ्यांच्या ऑपरेशनचा सल्ला दिला होता पण तीच जर अंथरुणावर पडली तर एकटे मोहनराव माई अण्णांना कसं सांभाळू शकतील म्हणून ती ऑपरेशन लांबणीवर टाकत होती. तसा होता भातुकलीसारखा स्वयंपाक, पण तो चारी ठाव लागत असे माई अण्णांना! त्यामध्ये अजिबात तडजोड चालत नसे. भाजी पोळी, आमटी भात, कोशिंबीर, डाव्या बाजूला चटणी, लोणचं काहीतरी हवंच. अधूनमधून शिरा,खीर,साखरांबा...कवळ्या नीट बसत नव्हत्या म्हणून सगळं मिक्सरमधून बारीक करून द्यावे लागे.असलं गरगट जातं तरी कसं अपर्णाला वाटे.


जेवण झाल्यावर व्हिलचेअरवरुन माई अण्णांची परत त्यांच्या ‌खोलीत रवानगी करुन अपर्णा बाहेर आली आणि तिचा फोन वाजला.'माहेरचा फोन आला असेल.सदा न कदा माहेरच्यांशी काय गप्पा मारायच्या असतात कोण जाणे',माई फिस्कारल्या आणि अपर्णा थबकली.'गेली पंचेचाळीस वर्षे मी या घरासाठी राबतेय,आपली दुखणी अंगावर काढून वयाच्या पासष्टाव्या वर्षी सुद्धा सासू सासऱ्यांची सेवा करतेय पण त्यांना त्याची जराही कदर नसावी?'अपर्णाचे मन वैफल्याने भरुन गेले.


 'अण्णा तुमचं पासबुक द्या तर,'मोहनराव बाहेर जाण्याच्या तयारीत होते.'कशाला हवंय माझं पासबुक?'अण्णांनी संशयाने विचारले.'पैसे काढायचे आहेत', मोहनराव अण्णांच्या उशीखालून पासबुक काढत म्हणाले.'कशाला पैसे काढायचे आहेत?'अण्णांची उलटतपासणी सुरू झाली.'मी आणि अपर्णा युरोप टूरवर जाणार आहोत.'मोहनराव हसत हसत म्हणाले.'काय अण्णा,अहो एव्हढीशी पेन्शन तुमची आणि खर्च ढीगभर!'सहा वर्ष थांब, अण्णा डोळे मिचकावत म्हणाले.'कशाला?'मोहनरावांनी आश्चर्याने विचारले.'अरे, सहा वर्षांनी मी शंभर वर्षांचा होईन.मग माझी पेन्शन दुप्पट होईल,'तोंडाचे बोळके रुंदावत अण्णा खुदुखुदू हसले.'आणि तोपर्यंत आमचे हार घातलेले फोटो भिंतीवर लटकत असतील, कैलासवासी मोहन आणि कैलासवासी अपर्णा म्हणून', मोहनराव हार घालण्याची अॅक्शन करीत म्हणाले.'अहो, कसलं अभद्र बोलताय भरल्या घरात,'अपर्णाने मोहनरावांना दाबले.नशीब माई तिथे नव्हत्या नाहीतर मुलाला सून भडकावते असं त्यांना नक्कीच वाटलं असतं.आपला मुलगा फटकळ आहे हे त्या कधीच कबूल करीत नसत.


 ओ ताई, लवकर या,'अण्णा माईंच्या खोलीतून शांताबाईंच्या हाका ऐकून अपर्णा लगबगीने आली.'ही बघा मुंग्यांची रांग टेबलापासून ते पार माई अण्णांच्या पलंगापर्यंत गेलीया.'अगं बाई,खरंच की,लाल टपोऱ्या मुंग्या पार दोघांच्या गादीपर्यंत गेल्या होत्या.दोघींनी अंथरुणं,पांघरुणं झटकली.गाद्या झटकल्या, कुठे मुंग्या दिसत नाहीत ना ते बारकाईने तपासले.व्हिलचेअरवर बसून टी.व्ही.बघणाऱ्या अण्णा माईंना यांचा पत्ताच नव्हता.पण या लाल मुंग्या आल्या कुठून?टेबलावर शेव, चकलीच्या कागदात बांधलेल्या पुड्या सापडल्या.अपर्णाने डोक्याला हात लावला.


 'सूनबाई, गणपती कधी येतायत?'माई हातात कालनिर्णय घेऊन डोळे किलकिले करून बघत होत्या.'पुढच्या आठवड्यात येतायत.'अपर्णा भाजी चिरत म्हणाली.' नीट, शास्त्रानुसार झाली पाहिजे बरं का गणपतीची पूजा.'माई आज्ञावजा सुरात म्हणाल्या.'माझं करणं कसं व्यवस्थित, शास्त्र शुद्ध असायचं.कुठे कसली चूक म्हणून नाही.'माई ठसक्यात म्हणाल्या.'लग्न झाल्यापासून तर सगळे सणवार माझ्या गळ्यात टाकून मोकळ्या झाल्या.कधी केले 'शास्त्रशुद्ध ' सणवार कोणास ठाऊक!'अपर्णा मनातल्या मनात म्हणाली.


 गणेश चतुर्थी जवळ आली तशी अपर्णा ची धांदल उडाली.खिरापत करणे, गणपतीच्या पूजेची उपकरणी घासणे,माळा,वस्त्र तयार करणे...ती तयारीत दंग असतांनाच फोन ‌वाजला.माई अण्णांना सांभाळणाऱ्या नवीन बाईचा फोन होता.'गणपतीसाठी गावाला जातेय,आठ दिवस येणार नाही.'अपर्णाला अचानक गळून गेल्यासारखे वाटू लागले.

 

एका बाजूला माई अण्णांना सांभाळायचं, दुसरीकडे गणपतीच्या आगमनाची तयारी करायची ,आपले दुखरे गुडघे, वाढलेलं बी.पी.,मोहनरावांची वाढलेली शुगर...कसं निभणार आपल्याला?अपर्णाच्या मनावरचा ताण वाढला आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा आसवं वाहू लागली.  भांडी घासता घासता शांताबाई अपर्णाला निरखित होती.ती अपर्णा जवळ येऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली,'ताई, लोकं म्हनत्यात विध्राशरम (वृद्धाश्रम) नगो, आपल्या आईवडलांना कोनी आसं टाकून देत्यात का,पन हे कवा म्हनायचं,जवा अंगात रग आसती,वय जवानीत आसतं तवा!पन आई बापास्नी सांभाळणारेच जवा पिकलं पान हुतात तवा काय करायचं?'


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract