Pratibha Tarabadkar

Abstract

3  

Pratibha Tarabadkar

Abstract

नातं

नातं

2 mins
164


नातं हे फक्त माणसांचं माणसांशी असतं का हो?ते तर आयुष्यात येणाऱ्या कितीतरी गोष्टींशी असतं.आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन?

उदाहरणार्थ घर.आपल्या घरात आपण जितके comfortable असतो तितकं कुठेही नसतो.बदल म्हणून थोडे दिवस बाहेर बरं वाटतं पण काही दिवसांनी घराची ओढ लागते.

आणि या घरातील स्वयंपाकघर म्हणजे स्त्रियांचा हळवा कोपरा.... मी नवीन पिढी बद्दल बोलत नाहीये बर्का!

तर असंच माझ्याही मनातला हळवा कोपरा असलेलं स्वयंपाकघर!

एकदा माझी मैत्रीण माझ्याकडे बरेच दिवसांनी आली.पोटभर गप्पा मारुनही पोट भरलं नाही आणि मी काहीतरी खमंग, चुरचुरीत पदार्थ करावा म्हणून तिला घेऊन स्वयंपाकघरात आले.

  'अगं प्रतिभा,काय हे तुझे डबे,एकही धड नाही', माझ्या या मैत्रिणीने 'हवाबंद, रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या डब्यांची एजन्सी नुकतीच घेतल्याने तिचे लक्ष मांडणी वरील डब्यांकडे जाणे साहजिकच होते.

मी चमकून मांडणीकडे पाहिले.खरंच की,किती विजोड डबे होते माझे!एक बसका तर दुसरा पेढेघाटी,एक फुगीर तर एक चौकोनी,अशा चित्रविचित्र आकाराच्या डब्यांनी माझी मांडणी भरुन गेली होती.

  'हो यार,कसले डबे आहेत माझे, एक डबा दुसऱ्यासारखा नाही ', मी पण तोंड वाकडे केले.मासा गळाला लागतोय याचा अंदाज मैत्रिणीला आला.ती म्हणाली,'असं कर, तुला किती आणि कुठल्या मापाचे डबे हवेत तेवढं सांग, मी आणून देते.मी दोन दिवसांनी येते तुझी ऑर्डर घ्यायला.'मी मान हलवली.मला माझाच राग आला होता.इतक्या दिवसात आपल्या विजोड डब्यांचं लक्षात कसं काय आलं नाही?मी मांडणीवरील डब्यांवर रागाने कटाक्ष टाकला.

  आपली मांडणी आता त्या 'हवाबंद, रंगीबेरंगी डब्यांनी कशी सजून दिसेल या धुंदीत दोन दिवस उलटले.आज माझी मैत्रीण येणार,माझी मांडणी सुंदर डब्यांनी कशी सजणार या आनंदात मी एक एक डबा खाली काढायला सुरुवात केली.

'हा पेढेघाटी मोठा डबा माधुरीच्या लग्नातला,बाई गं, दिवस किती भरभर जातात नै, तिला आता दोन नातवंडं सुद्धा झालीत.हा डबा बोहारणीकडला.... चांगल्या तीन साड्या आणि शर्ट पँट देऊनसुद्धा एवढासा वीतभर डबा दिला.फसवलंन मेलीनं!हा चौकोनी डबा मनूच्या मुंजीतला,हा डबा...हा डबा....

जसजसा एक एक डबा मांडणीवरुन उतरत होता तसतशी एक एक आठवण मनात फेर धरू लागली.

 आणि... आणि एका क्षणी असं वाटलं की हे डबे नुसती निर्जीव वस्तू नसून या प्रत्येक डब्याशी माझं नातं आहे.भले ते वेडे बागडे दिसोत पण यांच्या नात्यातील गोडवा त्या सुंदर, रंगीबेरंगी डब्यांमध्ये कुठून येणार?मी मनाशी निश्चय केला, मैत्रिणीला फोन करुन माझा बेत रद्द केल्याचे कळवले आणि ती काही बोलण्याच्या आतच फोन ठेवला आणि सगळे डबे परत मांडणीवर रचू लागले.


आणि काय आश्चर्य, इतका वेळ मलूल दिसणारे माझे डबे आनंदाने हसरे की हो झाले!



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract