Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Crime Inspirational

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Tragedy Crime Inspirational

नातं

नातं

4 mins
337


हॉस्पिटलचा राऊंड संपवून डॉ. दिनेश खुर्चीत विसावलेच होते की नर्स धावतच त्यांच्या केबिनमध्ये शिरली,


" सर, लवकर चला. वार्ड नंबर पाच मधल्या पेशंटची तब्येत अचानक बिघडली आहे. खूप ब्लिडिंग होत आहे."


" कोण ती थोड्यावेळापूर्वी डिलिव्हरी झालेली पेशंट का?" डॉक्टरांनी स्टेथेस्कोप हातात घेत विचारलं आणि तडक वार्ड नंबर पाच कडे जायला निघाले.


" हो, डॉक्टर." 


ते दोघे धावतच वार्डमध्ये पोहचले पण तिथे पोहचेपर्यंत सारं संपल होतं. एक तर सोळा वर्षाचं कोवळं वय त्यात अशक्त शरीर मातृत्वाच्या बाळंतवेणा सहन करू शकलं नाही आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.


" सुमे, आता या लेकराचं मी काय करू गं. म्या पिकलं पान कवा गळून पडंल ठावं नाय. सारं भोग माझ्याच नशिबाला कसं?" बाजूलाच उभ्या तिच्या आजीनं टाहो फोडला होता.


" आजी आधी शांत व्हा. असा धीर सोडून कसं चालेल बरं. तुम्हीच असं खचून गेलात तर ह्या लेकराला कसं सांभाळणार?" डॉक्टरांनी आजीचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.


" मी नाय सांभाळणार याला. माझ्या सोन्यासारख्या लेकराला गिळून टाकलं. काळ हाय ह्यो काळ..." म्हातारीने त्या बाळाकडे पाहत बोटं मोडली.


" अहो आजी असं का म्हणत आहात तुम्ही. या सगळ्यात याचा काय दोष? ह्याला आता तुमच्याशिवाय कोण आहे सांगा बघू. तुम्ही एक काम करा. माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये चला. आपण तिथे जाऊन बोलू." डॉक्टर दिनेश त्यांना घेऊन आपल्या केबिन मध्ये गेले.


" डाक्टर सायेब, मी काय ह्या पोराला सांभाळायची नाय. तुमच्या बघण्यात एखादं आश्रम असेल तर बघा आन ह्याला तिथं नेऊन द्या. माझा काय भरोसा नाय मी आज हाय तर उद्या नाय. माझ्या सुमीसाठी माझा जीव तळमळत हुता पण आता तीच नाय तर..." म्हातारीनं तोंडाला पदर लावत परत हंबरडा फोडला. 


" अनाथआश्रम...!" हा शब्द ऐकताच डॉक्टर विचारात पडले. 


" हे पहा, मुक्ताआजी आपण काहीतरी करू. तुमची परिस्थिती मी समजू शकतो. सध्या तरी तुम्ही ह्या बाळाला घेऊन घरी जा आणि हो जाताना तुमचा पत्ता नर्सला द्यायला विसरू नका. सुमीवर अंतिम संस्कार व्हायचे बाकी आहेत अजून. ह्या सगळ्यातून तुम्ही आधी मोकळ्या व्हा. पुढे काय करायचं ते आपण नंतर बघू."


मुक्ताबाई स्वतःच्या बोजड शरीराचं गाठोडं सावरत उठल्या आणि मान हालवत केबिनबाहेर पडल्या.


" अनाथआश्रम,,," हा शब्द बराच वेळ डॉक्टर दिनेश यांच्या डोक्यात घोळत राहिला ते अस्वस्थ झाले आणि त्यांचा भूतकाळ एखाद्या चित्रफितीप्रमाणे त्यांच्या नजरे समोर सरकू लागला.


" अनाथआश्रम! मी सुद्धा अनाथाश्रमात जाणार होतो. जर बयो आत्ती वेळीच आली नसती तर..."


 साधारण सहा सात वर्षाचं वय. जेंव्हा आई बाबा एका अपघातात मला एकट्याला टाकून हे जग सोडून गेले. माझा सांभाळ करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. घेणार तरी कोण? एकटा मामाचं तर होता. त्याच्याही घरी अठराविश्व दारिद्र्य. बाबाही भरपूर संपत्ती मागे सोडून गेले होते असं नाही. अचल संपत्तीच्या नावावर एक मोडकं तोडकं घर होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मुलाला कोण ठेवून घेणार ज्याला पोलिओने ग्रासलं होतं.


अशातच शेजारची बयो आत्ती पुढे आली. ती बाल विधवा होती. आपलं सारं आयुष्य तिने माहेरच्यांची बडदास्त ठेवण्यात वेचलं होतं. तिच्या वडिलांनी एक छोटी खोली आणि छोटासा जमिनीचा तुकडा तिच्या नावे केला होता. अशा निस्वार्थ आणि मायेला मुकलेल्या बयो आत्तीने मला सहारा दिला. एक वठलेलं खोड आणि परिस्थितीच्या तडाख्यात सापडलेलं एक लहानगं रोपटं एकमेकांच्या आधारानं तग धरू पाहत होतं. कुशाग्र बुद्धीच्या जोरावर मिळणारी स्कॉलरशिप आणि बयो आत्तीच्या आशीर्वादने मला डॉक्टर बनवलं. माझ्या पोलिओग्रस्त पायाची जागा नकली पायाने घेतली. ज्या झाडाला बयो आज्जीने जोपासलं आपल्या प्रेमाच्या मातीत रुजवलं त्या झाडाची फळं चाखण तिच्या नशिबी नव्हतं बहुधा. मला तिची सेवा करण्याची संधी न देता एक दिवस तिने गुपचूप या जगाचा निरोप घेतला.

__________________________


दिनेशने मुक्ताबाईंचं सांत्वन करून त्यांना घरी पाठवून दिलं खरं पण सुमी आणि तिचं बाळ काही केल्या त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं. बऱ्याच विचारांती ते एका निर्णयावर ठाम झाले आणि त्यांनी मुक्ताबाईंच्या घरचा रस्ता धरला.


ते मुक्ताबाई आणि बाळाला घेऊन आपल्या घरी आले.


" अहो, हे कोणाचं मुलं तुम्ही उचलून आणलं.?"


" अगं, आधी आत तरी येऊ देत. किती प्रश्न विचारशील."


सावीने दिनेशच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव अचूक टिपले आणि ती पाणी आणण्यास आत गेली.


" आता तरी नीट सांगाल का, हे बाळ कोणाचं आहे आणि ह्या आजी कोण आहेत." 


" हो सांगतो, ह्या मुक्ताबाई. परवा यांची नात बाळंतपणात गेली. पंधरा-सोळा वर्षाचं कोवळं वय. घरात कोणी नाही पाहून काही नराधमांनी तिच्यावर बळजबरी केली आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे बाळ. ह्या दोघींच या जगात कोणी नाही. सुमीचे आईबाबा तिच्या लहानपणीच देवाघरी गेले." दिनेशने सगळी हकीकत सांगितली.


" म्हणून तुम्ही या दोघांना इकडे घेऊन आलात."


" हो, बाहेर आपलं आऊटहाऊस आहे त्यात हे दोघे राहतील. तसंही थोड्याच दिवसात आपल्या परीलाही बाळ होईल. दोघे एकत्र वाढतील. ह्या मुक्ताबाई आहेतच की मदतीला."


" अहो, परी आपली मुलगी आहे पण याचा आणि तुमचा काय संबंध, कोणतं नातं? ह्याला एखाद्या अनाथआश्रमात द्या पाठवून." सावीने जरा चढ्या आवाजातच सांगितलं.


" नातं आहे ना, वेदनेचं नातं...! आणि ह्याला मी अनाथआश्रमात तर अजिबात पाठवणार नाही."


" वेदनेचं नातं...!" सावी स्वतःशीच पुटपुटली.


सावीने दिनेशकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव आणि त्यातून दृश्य होणारी वेदना ती स्पष्ट वाचू शकत होती. पुढे काहीही न बोलता तिने बाळाला आपल्या कवेत घेतलं आणि मुक्ताबाईंचा हात पकडून ती आऊटहाऊस कडे निघाली.


दिनेशने पाठमोऱ्या सावीकडे पाहिलं आणि विचार करू लागला,


बयो आत्तीचा आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहे म्हणूनच ती माझ्या आयुष्यात परत आली, सावीच्या रूपात!


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy