ADITYA MAGDUM

Children

3  

ADITYA MAGDUM

Children

नारीशक्ती

नारीशक्ती

3 mins
284


     ती कातरवेळ संध्याकाळची जीवघेणी. मावळत्या सूर्याकडे एकटक पाहत भूतकाळाची उजळणी, वर्तमानाची जुळणी, भविष्यकाळाची आखणी करत थोडीशी उदासवाणी तर पुसटश्या स्मितहास्याने खुललेली संध्या. आज आकाश कितीतरी विविध रंगछटांनी उजळले होते. संध्येच्या जीवनालाही अशाच सुख-दुःखाच्या अनेक रंगछटांची झालर लाभलेली आहे.


      मनात विचारांचे काहूर. हृदयात अनामिक हुरहूर. आवडत्या जोडीदाराशी जन्माची गाठ बांधली. लवकरच बाळाची चाहूलही लागली, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ पित्याच्या आकस्मिक मृत्यूचा वियोग सहन करावा लागला. पोटात वाढणाऱ्या अंकुरासाठी मग दुःखाचे घोट गिळत तिनं दिवस काढले. परिस्थिती बिकट होती. नवऱ्याला नोकरी नव्हती. अंगावरील काम हिनेच त्याला शोधून दिलं. मोबदल्यावर धड पोटही भरता येत नव्हतं. त्यात मनावरचे नी शरीरावरचे ओझे पेलणे म्हणजे दिव्यच.


      दिवस सरले. सुंदर गोंडस बाळ तिच्या पदरात जणू वडिलांच रूप घेऊन हसत होतं, आधार देऊ पाहत होतं, जगण्याची नवी उमेद घेऊन आश्वस्त करत होतं. त्याच्या बाल लीलात क्षण नि क्षण मग रंगून जाऊ लागले. जणू आभाळाची विशालता नि समुद्राची गहनताच या चिमुकल्यात सामावलेली होती. जीवनाचं हेही एक सुखद तत्त्वज्ञान होतं. निराशेच्या काळ्याकुट्ट अंधारात तेजाची,आशेची नवी किरणे घेऊन जीवन प्रकाशमय करण्यासाठीच जम्मू जन्मलेलं बाळ म्हणजे आदित्य.


       आदित्य वाढता वाढता पाच वर्षाचा झाला.कामानिमित्त बाप जास्त काळ बाहेरच असल्यामुळे त्याचा फारसा सहवास मिळाला नाही. त्यामुळे आईचाच लळा त्याला जास्त लागला. शाळेत नाव नोंदवलं शाळेतला पहिला दिवस. दिवसातले 24 तास आईच्या पदराला चिकटून राहणारा आदित्य आज कांही तास तरी दूर होणार होता. संध्याला कसंनुसं झालं. डोळे भरुन आले पण तिनं निग्रहानं ओक्साबोक्शी रडणाऱ्या पोटच्या गोळ्याचा चिमुकला हात आपल्या हातातून सोडवला. डोळ्याला पदर लावून ती पाठमोरी वळली.


     दिवस उलटले. छोट्या छोट्या कारणांवरून मग नवरा-बायकोत कुरबुरी वाढू लागल्या. सुखी संसारात गैरसमजाचं वारं सुटलं. ते वादळ आवरत नव्हतं आणि बघता बघता त्यानं घरच उद्ध्वस्त केलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आदित्य होता साडे सहा वर्षाचा. आई-वडील विभक्त झाले. पोराचा विचार डोक्यात आणण्याइतका समजूतदारपणा, ममतेचा ओलावा कुठे हरवला होता कुणास ठाऊक?


     संध्या आणि आदित्य. आई- मुलाचं हे गोड समीकरण जुळलं होत अगोदरच. ते आणखीन घट्ट झालं. घटस्फोटित महिला हा शिक्का माथी मारून आता तिला समाजात धिटाईनं वावरायचं होतं. छोट्या आदित्यची त जबाबदारी पूर्णतः स्वीकारून काही दिवस भावनेच्या आणि पश्चातापाच्या आगीत दग्ध झाले खरे. निर्णय चुकीचा होता की बरोबर माहीत नव्हतं.


      घटस्फोट ही आपल्या समाजाला अजूनही मान्य न होणारी, न रुचणारी गोष्ट. पुरुष प्रधान संस्कृतीत तर एकल महिला हा अस्तित्वहीन प्राणीच. सहानुभूती कमीच पण पुरुषा कडूनच नव्हे तर स्त्रियांकडूनही हेटाळणी होणं हे ओघानंच आलं. स्त्री स्वतः नवऱ्यापासून वेगळी झाली तरी नवऱ्यानेच तिला सोडलं. टाकलं अशी हिणकस भाषा वापरणारा समाज. कुणाकुणाला आणि काय काय उत्तर द्यावं हा प्रश्नच?


   तरीही या अशा विपरीत परिस्थितीतही जगण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा आणि पोराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडून स्वतःसोबत त्यालाही सक्षम बनविण्याचा चंग संध्यान बांधला ती उत्तम साहित्यिका होती पण तिचा हा पैलू तिने आतापर्यंत दुर्लक्षित केला होता. आता मात्र तिने हा छंद जोपासला. अनेक स्पर्धांत मुलालाही उतरवलं. ती स्वतःही उतरली.अनेक बक्षिसेही मिळवली. सत्कार होऊ लागले. छंदात मन रमू लागले. ओळखी वाढल्या. चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळू लागला. केवळ एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून स्वतंत्रपणे आपण जगू शकतो हे तिला नव्यानेच उमगलं.


    आई नि बापाची दोन्ही कर्तव्यं सक्षमतेने पार पाडणारी संध्या. समाजाचा दृष्टिकोन थोडाफार बदलला असला तरी कधीकधी वडिलांच्या आठवणीने गहिवरते. तिला स्वतःच्या बापाची उणीव जाणवते आणि मग मुलाच्या बापाचा विचार तिच्या डोक्यात येतो.मुलगा बापापासून दुरावला गेला याचीही खंत कधी कधी एकांतात तिला वाटते. संधी असूनही पुनर्विवाह करायचा विचार तिच्या मनात येत नाही ते केवळ मुलासाठी सावत्र बाप नको म्हणून. ती आज एकेरी पालकत्व निभावत आहे. 

   

   पण कधी कधी कुणीतरी विचारतं तुझा नवरा कुठे आहे? मुलालाही तुझा बाप कोठे आहे या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तेंव्हा त्याच्या डोळ्यातील न लपणारी अगतिकता स्पष्ट जाणवते. मन दुखावतं. सुन्न होतं. मग न संपणारा, असाच सुप्तपणे वारंवार छळणारा प्रश्न आ वासून समोर उभा राहतो. आपण घटस्फोट घेऊन एकल पालकत्व स्वीकारलं हे चुकीचं तर केल नाही ना?

     "का घडाव असं का सुचावं?

   का स्वतःचं अस्तित्व विरावं?

    समाजानं का म्हणून हिणवावं?

    स्वतंत्रपणे तिला जगू द्यावं

‌. माताही महान मान्य करावं

     नारीशक्तीची वीण विणावं

     का कुठे कमी तिनं पडावं?

    स्वतःच्याच बळावर उडावं

     का कशासाठी पण झुरावं?

     सर्वार्थाने सर्वांस पुरून उरावं

   हक्क आणि अधिकारासाठी लढावं

  मानाने मग जगी मिरवावं.." 


Rate this content
Log in

More marathi story from ADITYA MAGDUM

Similar marathi story from Children