Pratibha Tarabadkar

Drama

4.3  

Pratibha Tarabadkar

Drama

नाण्याची दुसरी बाजू

नाण्याची दुसरी बाजू

5 mins
284


 सकाळची सगळी कामं आटोपून अनघाने मोबाईल हातात घेतला.ती फेसबुक पाहू लागली आणि ती हादरलीच.तिच्या ग्रुप मधील साऱ्या मैत्रिणींनी श्रद्धांजलीची पोस्ट टाकली होती ती सुद्धा नैनाबद्दल! कसं शक्य आहे?काल तर हॉटेलमध्ये केळवण होते मीनूच्या ऐश्वर्याचे.त्याबद्दल आपल्याला 'टूक टूक'म्हणून चिडवूनही झाले होते.आणि आता अशा या अभद्र पोस्ट्स? अनघाच्या छातीत धडधडू लागले.श्वास वेगाने सुरू झाला.तिने वेळ पाहिली.आता इथे सकाळचे दहा वाजले आहेत म्हणजे भारतात रात्रीचे दहा वाजले असतील.हल्ली दहा वाजता कोणी झोपत नाही.तिने मनाचा हिय्या केला आणि सुखदाला फोन लावला.सुखदा म्हणजे ग्रुपमधला रेडिओ.सगळी बित्तंबातमी तिच्याकडे असायची.अनघाचे मिस्टर अनिलराव तिला गंमतीत 'ऑल इंडिया रेडिओ'म्हणायचे. 'मला वाटलंच होतं तू फोन करशील म्हणून',पहिल्याच रिंगला सुखदाने फोन उचलला.'अगं काय सांगू तुला, आम्ही सगळ्याजणी केळवणासाठी हॉटेलमध्ये जमलो होतो. नैना आणि माधुरी एकत्र येणार होत्या.त्यांची वाट पहात बसलो होतो तेव्हढ्यात माधुरीचा फोन आला की असं असं झालंय म्हणून!'

 'असं असं म्हणजे कसं?'अनघाने वैतागून विचारलं.

 'अगं नैनाने घरच्यांचा स्वयंपाक करून ठेवला आणि ती केळवणाला येण्यासाठी तयारी करु लागली आणि अचानक धाडकन खाली कोसळली.ऑन द स्पॉट खेळ खल्लास!' 'बाप रे , इतकी तडकाफडकी गेली? आजारी वगैरे होती का?'

 'नाही गं, चांगली टुणटुणीत होती.वजन कमी करायला जिम जॉइन करणार होती.'

 'मग इतकं सगळं व्यवस्थित असतांना अचानक कशी गेली?'

मॅसिव हार्ट अटॅक', सुखदा उत्तरली.'मग काय,आमचा मोर्चा सरळ नैनाच्या घरी! कसलं केळवण आणि कसलं काय!'अनघाने वैतागून फोन बंद केला.आपली एक मैत्रीण अचानक जाते आणि हिला त्या केळवणाची चिंता! अनघाला नैनाची अनेक रुपं डोळ्यासमोर दिसू लागली.हसरी,मुलीवर जीवापाड प्रेम करणारी, नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी असूनही सासूसासऱ्यांची काळजी घेणारी.अनघा फोन हातात घेऊन सुन्नपणे बसून राहिली.तिचा उतरलेला चेहरा पाहून अनिलने विचारले,'का ग,काय झालं?'

 'अहो ती नैना आहे ना ती काल अचानक गेली.हार्ट अॅटॅकनं,'

 'काय?'अनिल थोडा वेळ गप्पच बसले.'आयुष्य किती क्षणभंगुर असतं,'सुस्कारा सोडून ते म्हणाले.'तिच्या नवऱ्याचं नाव नितीन आहे का गं?'हो, तुम्ही ओळखता का त्याला?''एका कॉमन फ्रेंडकडे भेट झाली होती.बरा वाटला बोलायला.'

 

सकाळी सगळी कामं आटोपून नेहमीप्रमाणे अनघाने मोबाईल उघडला तर तिच्या 'सख्ख्या मैत्रिणी'ग्रुपवर देवांचे फोटो, सुविचार, विनोद यांची रेलचेल होती.कालच्या दुःखद घटनेचा त्यात मागमूसही नव्हता.

 'जन पळभर म्हणतील हाय हाय'

 

अधूनमधून ग्रुप मधील मैत्रिणींचे व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल होत असत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही मैत्रीण नैनाचा साधा उल्लेखही करीत नसे.जणू काही ती घटना घडलीच नव्हती.इतरच गप्पा होत.मुलांच्या चौकशा, सिनेमा, नाटक, नवीन खरेदी...बस्स!

 

एक दिवस अनघाला रहावलं नाही आणि तिने वसुधाला विचारले,नैनाच्या घरच्यांबद्दल,'अगं काही अडलं नाही त्यांचं! नितीन भेटला होता मागच्या आठवड्यात, स्पोर्टस् शूज घालून फिरायला चालला होता.नैनाचा उल्लेखही केला नाही ‌पठ्ठ्याने!'अनघाला आश्चर्यच वाटले.

 'सख्ख्या मैत्रिणी'ग्रुपमधील माधुरीशी बोलताना माधुरी अचानक उसळली.


नैनाला जाऊन एक महिना झाला म्हणून तिला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आम्ही तिच्या घरी गेलो होतो तर आम्हाला पाहून ते नाराज झाले. नितीन, नैनाचा नवरा सरळ पिशवी घेऊन बाहेर पडला.नभाने पाणी आणून दिलं आणि ती आपल्या खोलीत गडप झाली. नैनाच्या सासू-सासऱ्यांनी तर आमची दखलही घेतली नाही. सरळ  टी.व्ही.बघत बसले. कुठून गेलो असं झालं. तुला माहित आहे का, हल्ली नितीन एका बाईबरोबर दिसतो अधूनमधून!' माधुरीने बॉंबच टाकला होता.


 भारतात आल्यावर पहिलं काम होतं घर साफ करण्याचं.कितीही आवरुन,झाकपाक करुन गेलं तरी घर चार महिने बंद ठेवल्यावर साफसफाई करावी लागणारच ना!  माधुरीने सांगितल्यापासून नैनाच्या कुटुंबियांना भेटावयास जावं की नाही याबाबत अनघा द्विधा मनस्थितीत होती.अनघा बाजारात भाजी घेत होती. तेव्हढ्यात 'ती'चं लक्ष अनघा कडे गेलं आणि ती ओळखीचं हसली.अनघा गडबडली. 'ओळखलं का मला?मी नितीनची धाकटी बहीण नम्रता, नैना ने श्रीसूक्ताचं पारायण केलं होतं तेव्हा आला होता ना तुम्ही?'

 धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं अनघाला वाटलं.


 संध्याकाळी फिरणं झालं की भावे उद्यानात थोडा वेळ बसून घरी परतायचं असाअनघाचा परिपाठ.त्याप्रमाणे अनघा उद्यानातील एका बाकावर टेकली होती. बागेच्या गेटमधून नम्रता आपल्या आईवडिलांना हाताला धरुन आणत होती.नैनाचे सासू सासरे फारच वाकले होते.सासऱ्यांनी तर काठी धरली होती आधारासाठी. नम्रताने रिकामा बाक बघून दोघांना बसविले आणि ती बागेत फेऱ्या मारु लागली.थोड्या वेळाने दमून नम्रता येऊन बसली ती नेमकी अनघाच्या बाकावर!'अरे तुम्ही?'नम्रताचे तिच्याकडे लक्ष गेले.आईवडीलांकडे निर्देश करीत ती म्हणाली,'इथे आले की रोज आई-बाबांना बागेत आणते.तेव्हढाच त्यांना बदल!'नैनाचे सासू सासरे विझलेल्या डोळ्यांनी बागेतील वर्दळ न्याहाळत होते.

 

'दीर्घायुष्य कधी कधी शाप असतो नाही का?'नम्रता गंभीर होत म्हणाली.'आपल्याहून लहान व्यक्तीचा मृत्यू बघणं यासारखी दुःखदायक घटना नाही!'नम्रताने सुस्कारा सोडला.'हो ना,नैनाचा मृत्यू फारच धक्कादायक होता,'अनघा तिच्याशी सहमत झाली.'मी परदेशात होते त्यावेळी म्हणून येऊ शकले नाही.'

 

'तुमच्या मैत्रिणी आल्या होत्या की 'सख्ख्या मैत्रिणी'ग्रुपच्या',नम्रताच्या स्वरात पुरेपूर उपहास भरला होता.'एकजात पांढरे कपडे घालून, डोळ्याला रुमाल लावून दुःखाचं प्रदर्शन करायला!नैनाच्या मृत्यू नंतर ज्या अदृष्य झाल्या त्या एकदम एका महिन्याने उगवल्या नैनाला श्रद्धांजली वहायला म्हणे,'नम्रताच्या स्वरात क्रोध ठासून भरला होता.'आपली मैत्रीण अचानक आयुष्यातून निघून गेल्यावर तिच्या घरच्यांची परिस्थिती काय झाली असेल हे पहायला एकजणही फिरकली नाही आणि म्हणे सख्ख्या मैत्रिणी!'

 

अनघाला आपल्या मैत्रिणींचे वागणे खटकले होतेच! नम्रता हळूहळू शांत झाली.'अहो, त्या तर मैत्रिणी होत्या पण आमचे बहुतेक नातेवाईक सुद्धा त्याच कॅटॅगरीतले.नैनाचा अकस्मात मृत्यू ही त्यांच्यासाठी केवळ एक सेन्सेशनल ब्रेकिंग न्यूज होती.अगदी लांबून लांबून लोक भेटायला येत होते, तिच्या मृत्यू ची कहाणी अथपासून इतिपर्यंत ऐकून निघून जात होते.घरातील कर्ती स्त्री अचानक मृत्यू पावते त्यानंतर येणारे प्रश्न त्यांच्या गावीही नव्हते.का समजूनही दुर्लक्ष करत होते?

 

किती मोठा पहाडच कोसळला होता नितीन वर! बिचारा गांगरुन गेला होता.वयस्कर आई-वडील, तरुण मुलगी यांची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर! फारच थोड्या जणांना त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते.बाकी सगळे टाईमपास!मग घरच्यांनी ठरवलं की नैनाचा मृत्यू हा विषय कोणीही काढायचाच नाही.काय उपयोग असतो हो लोकांच्या कोरड्या सहानुभूतीचा!'

 

'गुजराती लोकांमध्ये एक सादडी नावाची पद्धत आहे.कुटुंबातील कोणी व्यक्ती मृत्यू पावली की पेपरमध्ये जाहिरात देतात आणि या दिवशी,अमूक हॉलमध्ये सर्वांनी जमावे असे आवाहन करतात.घरची मंडळी मृत्यूबाबत माहिती देतात, सर्वजण मिळून मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतात.बस्स.अशी पद्धत आपल्याकडे सुरू केली तर!'अनघाला नम्रता चे बोलणे पटले.तिने संमतीदर्शक मान हलविली. 'आता गाडी रुळावर आली का?'अनघाने बिचकतच विचारले


'नैनाची अनुपस्थिती नेहमीच जाणवणार,पण आयुष्य थांबून रहातं का?नितीनने स्वयंपाकाला, आई-बाबांची काळजी घेण्यासाठी बायका लावल्या आहेत.आता कसंतरी निभावतात.मीही अधूनमधून येत असते.मात्र एक गोष्ट घरचे सारेजण कटाक्षाने पाळतात ती म्हणजे कोणासमोर आपल्या दुःखाचे वर्णन करायचे नाही.काय उपयोग आहे हो त्याचा? कोरड्या सहानुभूती पलिकडे काय पदरात पडते?'

 

'चला,निघते मी आता,'नम्रता तिच्या आई-वडिलांकडे बोट दाखवत म्हणाली.'अंधार पडायच्या आत घरी न्यायला हवं दोघांना, खूपच थकले आहेत दोघं!' 'काही लागलं तर जरूर सांगा,'अनघा मनापासून म्हणाली. नम्रताने तिच्याकडे क्षणभर रोखून पाहिले आणि हसून अंगठा उंचावला.

 'नाण्याला दुसरी बाजू असते'नम्रताच्या दूर जाणाऱ्या आकृतीकडे पहाताना अनघाच्या मनात आले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama