Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Pratibha Tarabadkar

Others


4.3  

Pratibha Tarabadkar

Others


मरुभूमीतील चमत्कार

मरुभूमीतील चमत्कार

9 mins 279 9 mins 279

मध्यंतरी लेकीकडे दुबईला जाण्याचा योग आला तेव्हा मनाशी पक्की खूणगाठ बांधली की कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, मनाची पाटी कोरी ठेवून समोर जे जे दिसेल, जाणवेल, अनुभवास येईल ते ते स्पंजासारखे टिपून घ्यायचे. दुबई आपल्यापासून अंदाजे २,००० कि.मी.अंतरावर आहे.विमानप्रवास अवघ्या तीन तासांचा आणि घड्याळाने आपल्यापेक्षा दीड तास मागे. दुबई हा देश नसून संयुक्त अरब अमिरात अर्थात यु.ए.इ.या देशातील सात राज्यांपैकी एक आहे. अबुधाबी, शारजा ही आपणास माहीत असणारी राज्येच आहेत.मात्र या राज्यांना मुख्यमंत्री नसून चक्क राजे‌आहेत जे एकमेकांच्या राज्यात अजिबात ढवळाढवळ करीत नाहीत. दुबईच्या राजाचे नाव मोहम्मद बिन रशीद अल् मख्तूम आहे.


दुबईचा एअरपोर्ट अतिशय भव्य असून चक्क मेट्रोने एकीकडून दुसरीकडे जावे लागते. इमिग्रेशनच्या लाईनीत विविध देशांच्या व वंशाच्या लोकांची मांदियाळी भरली होती. त्यात गोरे होते, आफ्रिकन्स होते, चिनी वंशाचे तसेच अरब आणि आपल्यासारखे भारतीय सुद्धा होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून ही माणसे दुबईमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी दाखल झाली होती. आम्ही दुबईला गेलो तो फेब्रुवारी महिना‌ होता. स्वच्छ सूर्य प्रकाश आणि बऱ्यापैकी थंडी होती. दुबईला जाण्यासाठी आदर्श मोसम हा नोव्हेंबर ते मार्च आहे. त्यानंतर तीव्र उन्हाळा सुरू होतो.


दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्या मॉलमध्ये जाण्यास निघालो. रस्त्यावरील फेरारी, ऑडी, बेंटले कार्स बघून ‌थक्क झालो. साऱ्या कशा एका लयीत चालल्या होत्या. रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर पाय ठेवताच वेगाने जाणाऱ्या गाड्या एकदम थांबल्या आणि आम्ही आरामात रस्ता क्रॉस केला. याबाबत मुलीकडे कौतुक करताच,'अगं आई, इथले कायदेच इतके कडक आहेत की त्यांना नियम पाळावेच लागतात,' असे स्पष्टीकरण तिने दिले. आणि लवकरच त्याचे प्रत्यंतर आले. आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला तब्बल पाच हजार दिरम म्हणजे तेव्हाचे ८५ हजार भारतीय रुपये दंड झाला होता. त्याने जो वाहतुकीचा नियम मोडला होता तो आम्हाला तर नगण्य वाटला. पण नियम म्हणजे नियम. जर दंड भरला नाही तर आपला गाशा गुंडाळा आणि आपल्या देशाची वाट सुधारा. मॉलमध्ये ओळखीच्या भाज्या दिसल्या आणि जीव भांड्यात पडला. चला, खाण्याचे वांधे तरी होणार नाहीत. मॉलमध्ये आलेल्या बहुतेकांनी क्रेटस् भरभरून पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या. वाळवंटी प्रदेश असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य असले तरी येथे समुद्राच्या पाण्यातील क्षार काढून ते पाणी सर्वत्र फिरविले आहे त्यामुळे नळाला चोवीस तास पाणी आहे मात्र बहुतांशी लोक बाटल्यांमधील पाणी पिण्यासाठी वापरतात. येथे प्लॅस्टिकचा वापर सर्रास केला जातो जो माझ्या भारतीय डोळ्यांना खुपत असे. 


दुबईचे एक वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला मातकट रंगाच्या, एकसुरी बसक्या बिल्डींग्ज तर दुसरीकडे विविध आकारांचे, विविध रंगांचे टॉवर्स!काचेचे, ग्रॅनाईटचे, चंदेरी... वाटोळे,लांबुडके.. टॉवर्ससुद्धा इतके उंच की मन आश्चर्यचकित होई. भुसभुशीत वाळूत हे महाकाय टॉवर्स कसे काय बांधले असतील? असाच जगातील सर्वात उंच टॉवर,बुर्ज खलिफा बघायला आम्ही गेलो. अबब केव्हढा उंच टॉवर!त्याचे सुई सारखे टोक जणू आभाळात घुसले होते. पायथ्याशी प्रचंड असा दुबई मॉल असलेला बुर्ज खलिफा ताठ मानेने जणू सांगत होता, मीच जगातल्या सर्व इमारतींचा खलिफा.. सम्राट! शिस्तबद्ध रांगेतून १२४ व्या मजल्यावर जाण्यासाठी प्रचंड अशा लिफ्टमध्ये चढलो आणि काय आश्चर्य, अवघ्या ७७ सेकंदात पोहोचलोसुद्धा. वरुन दुबई बघताना खूप मजा वाटत होती. रेखीव रस्ते, त्यावरून धावणाऱ्या इवल्याइवल्या गाड्या यांचं यथेच्छ अवलोकन करून झाल्यावर खाली उतरलो आणि पायथ्याशी असलेल्या दुबई मॉलमध्ये शिरलो. अर्थात तेथे फक्त विंडो शॉपिंग केले कारण एकूणच माहौल श्रीमंती दिसत होता. मात्र या मॉलमध्ये एक अद्भुत प्रकार पहायला मिळाला. या मॉलमध्ये प्रचंड असे मत्स्यालय आहे. काचेच्या बोगद्यातून जाताना आजूबाजूला पोहणारे छोटे शार्क, कासवे, स्टींग रे, रंगीबेरंगी छोटे मोठे मासे बघताना रोमांचकारी वाटत होते. शिवाय याच मॉलमध्ये चक्क प्राणीसंग्रहालय सुद्धा होते. ज्यात महाकाय मगर होती तसेच गोजिरवाणे पेंग्विनही होते. आम्ही गेलो तेव्हा पेंग्विन्सची खाण्याची वेळ होती. सगळे कसे लायनीत उभे होते. एकएक पेंग्विन पुढे असलेल्या पाटावर उभा राही. तिथे बसलेला माणूस जवळच्या बकेटमधून चिमट्याने मासा काढून पेंग्विनच्या तोंडात देऊन वहीत काहीतरी नोंद करी आणि मग तो पेंग्विन लुटूलुटू चालत जाऊन जवळच असलेल्या छोट्या तळ्यात डुबकी मारी. इतकं मनोहारी दृश्य होतं ना ते! असं वाटलं, त्या कमरेएवढ्या पेंग्विन्सच्या गळ्यात वॉटर बॅग अन् पाठीवर स्कूल बॅग लावली तर नर्सरीमधली मुलंच वाटतील.


यु.ए.इ.हे जरी मुस्लिम राष्ट्र असले तरी दुबईचा राजा तसा उदारमतवादी आहे. आपापल्या धर्माचे पालन करण्यास मज्जाव नाही पण मर्यादेत राहून. शाळा, ऑफिसेस यांना शुक्रवार-शनिवार सुटी. थोड्या थोड्या अंतरावर मशिदी होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या, कधी दोन. कधी तीन तर कधी चार मिनारांच्या, पण रस्ता अडवून नमाजपठण नाही. दुबईला गेलो आणि मिरॅकल गार्डन पाहिले नाही असं शक्यच नाही. मिरॅकल गार्डनमध्ये प्रवेश केला आणि डोळे विस्फारून बघतच राहिले. कोणीतरी संमोहन केल्यागत पाय जमिनीला खिळून राहिले. काय नयनरम्य दृश्य होते ते! स्वर्गातून पृथ्वीतलावर अवतरलेले नंदनवनच जणू! नजर जाईल तिथे फुलेच फुले. लाल, पांढरी, पिवळी, निळी, जांभळी... बरं नुसती फुलझाडे नाहीत तर वेलींच्या कमानी, घड्याळ, छोटीछोटी घरं, विमान... साऱ्यांवर फुलांच्या वेली पसरलेल्या. किती बघू अन् किती नको असं झालं. बरं त्या वेली, फुलझाडं अगदी टवटवीत, हिरवीगार! एकही वाळके पान अथवा फूल जमिनीवर पडलेले नव्हते. एका वाळवंटात अशी बहरलेली बाग! खरंच मिरॅकल नाही तर ‌काय!


 या गार्डनमध्ये एक गंमतीशीर दृश्य बघायला मिळाले. तिथेसुद्धा मुलांसमोर फुगे नाचवणारे होते, साबणाचे बुडबुडे उडवणारे होते आणि ते घेण्यासाठी हट्ट करणारी मुले होती आणि त्यांना रागे भरणारे पालकही होते. ते पाहून मनात आले, देश, धर्म कुठलाही असो, पण हट्ट करणारी मुले आणि रागे भरणारे पालकही जगाच्या पाठीवर एकसमानच!


दुबईमधील तेलाचे साठे कमी होऊ लागले तसे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुबई हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे तेथील धोरणी व दूरदर्शी राजाने ठरविले. मात्र पर्यटनस्थळांची आखणी करताना अत्यंत नियोजनबद्ध व दर्जेदार करण्याचे पथ्य पाळल्याने जगभरातून पर्यटकांचा ओघ दुबईकडे वळला त्यात नवल ते काय! मोठे मोठे मॉल्स, त्यांच्या जवळून धावणारी मेट्रो, दुबई शॉपिंग फेस्टिवल, सोन्याच्या अलंकारांनी गच्च भरलेली दुकाने जणू सांगत असतात, ग्राहकांनो या आणि भरपूर खरेदी करा! ग्लोबल विलेज हासुद्धा त्यातलाच एक प्रकार. विस्तीर्ण अशा मैदानात प्रत्येक देशाचे वैशिष्ट्य असलेल्या इमारतीची प्रतिकृती तयार केली होती. उदा. भारताचा ताजमहाल, इजिप्तचे पिरॅमिड बांधलेले आणि आत चक्क कॉस्मेटिक्स, कपडे, आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्याचे स्टॉल्स. सगळीकडे विद्युत रोषणाई केलेली. बाहेर मैदानात स्टेजवर कसरतींचे विविध प्रकार, आकाशपाळणे, खाण्याचे सर्व देशांतील स्टॉल्स, बंदुकीने फुगे फोडणे इ. पाहून गावची जत्रापण अधिक आकर्षक असेच वाटले. अर्थात खरेदी काहीच केली नाही कारण भारतात आता सगळे मिळतेच. शिवाय तेथील स्थानिक वस्तू एकही नव्हती. फक्त ग्लोबल विलेजमध्ये अरबांचा सर्रास वावर दिसला. नाहीतर दुबईचे मूळ रहिवासी इतरांमध्ये अजिबात मिसळत नाहीत. त्यांची वसाहत शहरापासून लांब. त्यांची संस्कृती, त्यांचे रीतीरिवाज, पोशाख, भाषा जपण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. वर्णसंकर निषिद्ध आहे. आपण आजन्म दुबईत राहिलो, दुबईची सेवा केली तरी तेथील नागरिकत्व मिळत नाही. तिथे व्यवसाय करायचा असल्यास दुबईच्या अरबाला पार्टनर म्हणून घेऊनच करावा लागतो.


संयुक्त अरब अमिरातीचे दुसरे राज्य अबुधाबी येथील शेख झायेद मॉस्क अर्थात ग्रॅंड मॉस्क बघायला आम्ही निघालो होतो. 'इयर ऑफ शेख झायेद' अशी एका अरबाचा फोटो असलेली पोस्टर्स सर्वत्र दिसत होती, प्रशस्त 'शेख झायेद रोड' आणि आता ही त्याच नावाची मशीद. हा शेख झायेद आहे तरी कोण? माझी उत्सुकता चाळवली. अनुपने, माझ्या जावयाने या व्यक्तीबद्दल जे सांगितले ते ऐकून मी थक्कच झाले. पूर्वी छोट्याछोट्या टोळ्या करून, ऊंटांचा काफिला घेऊन पाण्याच्या शोधात वणवण फिरणाऱ्या अरबांना या अबुधाबीच्या राजघराण्यातील पुरुषाने एकत्र आणले. या प्रदेशात तेलाचे साठे सापडल्यावर त्याचे महत्त्व जाणून त्याने अरबांना समृद्धीचे स्वप्न दाखविले. टोळीयुद्धे समाप्त करुन एकीच्या बळाचे महत्व पटविले आणि एक राष्ट्र स्थापन केले तेच आजचे यु.ए.इ.! परकीयांनी तेलाच्या साठ्यांवर कब्जा करू नये म्हणून सावधपणे त्या संपत्तीचा ओघ, हक्क अरबांकडे राहतील याची तजवीज शेख झायेदने केली. त्याचे आपल्या अरब बांधवांवरील निस्सीम प्रेम पाहून संयुक्त अरब अमिरातीमधील सर्व अरबांनी त्याला राष्ट्रपिता म्हणून एकमुखाने घोषित केले त्यात नवल ते काय! अशा या थोर राष्ट्रपुरुषाचे ते जन्म शताब्दी वर्ष होते. त्याला आदरांजली म्हणून ती पोस्टर्स आणि त्याला जेथे दफन करण्यात आले ती ही शेख झायेद मॉस्क अर्थात ग्रॅन्ड मॉस्क.


ग्रॅण्ड मॉस्कच्या जवळ जसजशी गाडी जाऊ लागली तसतशी तिची भव्य वास्तू, संगमरवरी शुभ्रपणा स्वच्छ सूर्यप्रकाशात तळपू लागली. मशिदीच्या प्रवेशद्वारावर मला अडविण्यात आले. पूर्ण बाह्यांचा पंजाबी ड्रेस सुरक्षारक्षक स्त्रीस आक्षेपार्ह वाटला आणि तिने मला फक्त चेहरा उघडा राहणारा बुरखा परिधान करण्यास दिला. मला गंमत वाटली. म्हटलं आयुष्यात परत कधी असे कपडे वापरणार आहोत? म्हणून मी बुरखा अंगावर चढविला. चित्रविचित्र केस कापलेल्या गोऱ्या स्त्रियासुद्धा निमूटपणे बुरखा चढवीत होत्या. हुज्जत घालणे येथे नामंजूर आहे मुळी! पांढरीशुभ्र संगमरवरी भव्य वास्तू, त्यातील जगातील सर्वांत मोठा गालिचा, दोन मजली उंचीची सुंदर झुंबरे, भिंतीवरील वेलबुट्टी सारे काही अद्वितीय! या अनुपम वास्तूचे सौंदर्य डोळ्यात साठवीत आम्ही त्याच परिसरातील शेख झायेदच्या कबरीकडे गेलो. अत्यंत साध्या अशा त्या स्मारकासमोर नतमस्तक झालो. 'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती!'


जगभरातील लोक दुबईत एकवटल्याने भरपूर टी.व्ही.चॅनेल्स आहेत. आपल्या भडक हिंदी सिरीयल्स तेथे बऱ्यापैकी लोकप्रिय असाव्यात. कारण अंगभर दागिने ल्यालेल्या, कपाळभर बिंदी रेखलेल्या आणि भरजरी साड्या नेसलेल्या अभिनेत्री अरबी भाषेत डब केलेले संवाद म्हणत तेव्हा बऱ्यापैकी करमणूक होई. एका चॅनेलवर सतत घोड्यांच्या शर्यती दाखवत तर एकावर फक्त उंटांच्या शर्यती. दुबईचा गोल्ड सूक प्रसिद्ध म्हणून बघायला गेलो. सोन्याच्या अलंकारांनी दुकानं ठसाठस भरलेली. त्यात सोन्याची पर्स, सोन्याचे शिरस्त्राण, कंबरपट्टा इ. प्रकारही होते. आपल्या देशातील कल्याण ज्वेलर्स, पोपले ज्वेलर्स इ. ची मोठमोठी दुकाने होती. मात्र दुकानाबाहेर सुरक्षारक्षक काही दिसले नाहीत. शिक्षा जबरदस्त आणि पोलिसांचा जबर धाक मग काय बिशाद कोणी गुन्हा करेल! एक गोष्ट येथे जाणवली की दुबईत सुरक्षा खूप आहे. पाकिटमार, खिसेकापू, रस्त्यावर चालताना स्त्रियांना धक्के मारणे असे प्रकार अनुभवास आले नाहीत.


पाम जुमैरा हे दुबईतील अतिश्रीमंतांचे निवासस्थान. जसे मुंबईतील मलबार हिल. समुद्रात भराव टाकून केलेला विभाग. प्रतिष्ठित लोकांचे बंगले, हॉटेल्स यासाठी हा विभाग प्रसिद्ध आहे. पर्यटकांना आकर्षित करुन घेण्यासाठी येथे मोनोरेल ही आहे. रस्त्याने जाताना थोडे अंतर आपण समुद्राखालून जातो. एव्हढे थरारक वाटते ना! वर समुद्र आणि आपण खाली! अबुधाबीला आम्ही एका छोट्या म्युझियमला भेट दिली. अरबांची पूर्वीची मातीची घरे, प्रवेशद्वारावर टांगलेला कंदील, त्यांची शस्त्रे, चांदीचे अलंकार, मासे पकडण्याची जाळी इ. सर्व पद्धतशीरपणे मांडलेले होते. त्यातच ६०-६२ वर्षांपूर्वीचे फोटो होते. ते पाहून आम्ही थक्कच झालो. वाळवंट, उंटाजवळ उभे असलेले अरब, त्यांच्या चेहऱ्यावरील दीनवाणे भाव, कळकट कपडे, त्यांची उघडीनागडी पोरं, जवळून वाहणारा गलिच्छ नाला सारेच अविश्वसनीय! अतिदैन्यावस्थेतून अतिसमृद्धीकडे जाणारा अरबांचा हा प्रवास केवळ अद्भुतच म्हणावा लागेल. आपण आता ज्या गुळगुळीत रस्त्यावरुन फिरतोय, टॉवर्स बघतोय, चकचकीत गाड्या, मॉल्स पाहतोय तेथे काही दशकांपूर्वी विराण वाळवंट, मातीच्या झोपड्या आणि वाहतुकीसाठी ऊंट वापरत होते ही गोष्ट पचनी पडायला वेळ लागतो. अर्थात हा बदल काही एका रात्रीत घडला नाहीये हे नक्की. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' ही उक्ती अरबांच्या बाबतीत खरी ठरते.


दुबई जरी इस्लामी राज्य असले तरी परदेशी स्त्रियांच्या वेशभूषेबाबत आग्रही नाही. अर्थात सभ्य कपडे असावेत असा संकेत असावा कारण परदेशी स्त्रिया व्यवस्थित कपड्यात दिसत होत्या. तेथे एक वैशिष्ट्य दिसले ते म्हणजे अनेक ठिकाणी लेडीज नेल सलून्स होती. आपल्याकडे ज्या हुक्का पार्लरविरुद्ध ओरड होते तो हुक्का ज्याला तिथे शिशा म्हणतात ते गुडगुड आवाज करीत ओढत पुस्तक वाचत निवांत बसलेले गोरे स्त्री-पुरुष हॉटेलमध्ये सर्रास दिसत. रोज आम्ही वाळूच्या वादळाची स्थिती बघत असू कारण आम्हाला डेझर्ट सफारीला जायचे होते. पण हवामान अनुकूल होईना. शेवटी त्या रोमांचकारी सफारीचा नाद आम्ही सोडून दिला. माणसाने कितीही प्रयत्न केला तरी निसर्गावर ताबा मिळवणे शक्य नाही हेच खरे!


दुबई हे मिनी इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील बहुतेकांना हिंदी समजते. अगदी पातळ पोह्यांपासून ते साजूक तुपापर्यंत सारे काही तेथे सहजपणे उपलब्ध आहे. त्यामुळे आपण कुठं येऊन पडलोय अशी भावना मनात निर्माण होत नाही. तसेच स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय... कामवाली तिथे मिळते अर्थात भरपूर पैसा ओतून. दुबईत काही खरेदी करायची म्हटली की माझा सतराचा पाढा मनात सुरू होई कारण आम्ही गेलो तेव्हा सतरा भारतीय रुपये म्हणजे दुबईचा एक दिराम होता. मग सगळ्याच वस्तू महाग वाटत. भारतात परत जायची वेळ जवळ येऊ लागली. आप्त कुटुंबीयांना भेट देण्यासाठी काय न्यावे याचा विचार करीत असताना येथे इराणी केशर चांगले मिळते असे कळले व आम्ही मसाला मार्केटमध्ये गेलो. तेथे अक्षरशः पोती भरभरून सुकामेवा ठेवलेल्या दुकानांच्या रांगा होत्या. तेथील चित्रविचित्र मसाले, वाळलेली गुलाबाची फुले, वाळलेली लिंबं होती. ज्या दुकानातून इराणी केशर घेतले तो पाकिस्तानी होता. त्याने माझ्या टिकलीवरुन मी भारतीय आहे हे ओळखले आणि जरा स्वस्तात केशर दिले. शत्रुत्व हे माणसामाणसात नसते तर पाताळयंत्री राजकारण्यांमध्ये असते. सामान्य माणूस बिचारा त्यात भरडला जातो.


आता परतीचा दिवस जवळ येऊ लागला. लेकीसाठी आणि जावयासाठी त्यांच्या आवडीचे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी माझी लगबग सुरू झाली. मिस्टर आता भयंकर कंटाळले होते. परत घरी कधी जाऊ असे त्यांना झाले होते. सामानाची बांधाबांध करुन आम्ही निघालो. येताना विमानतळाच्या इमारतीवरील कनेक्टींग द पीपल असे वाक्य नजरेस पडले. खरंच किती सार्थ वाक्य आहे हे! दुबईचे एका वाक्यात वर्णन करणारे! आमचे विमान आकाशात उंच उडाले... भारताच्या दिशेने आणि आमच्या आयुष्यात एका अविस्मरणीय अनुभवाची भर पडली.


Rate this content
Log in