Sunita madhukar patil ( मधुनिता )

Classics Inspirational Others

4.0  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Classics Inspirational Others

मनोदीप

मनोदीप

3 mins
151


मनोदीप उजळणाऱ्या अति लघुकथा.

१. बायकांचं न्हाण

धनत्रयोदशीचा दिवस, गिरजाक्काने पाट मांडला. उटणं, तेल एकत्र करून सुनांना बोलावलं आणि फर्मान सोडलं.

"चला आता समद्याजणी एकेक करून या पाटावर बसा. छान तेल लावून तुमास्नी न्हाऊम्हाकू घालती."

"अहो आत्याबाई, हे काय नवीन खूळ. आम्हाला कशाला तेल, उटणं अन न्हाऊम्हाकू...!!! तिघी सुनांपैकी एकजण बोलली.

"अगं पोरींनो, तुम्ही माझ्या घरच्या लक्षुम्या...!!! दिनरात ह्या घरासाठी राबता. तुमी सगळ्याजणी निरोगी, आनंदी तर माझं घर निरोगी राहील ना गं बायांनो. आजचा दिस तुमचा...!!! घरच्या लक्षुमीला खुश ठेवलं तर देवी लक्षुमी खुश होईल ना, तवा लई पाघुळ लावू नगा. गप्पगुमान या पाटावर येऊन बसा". सुनांना सासुचं कौतुक वाटलं.

इतक्यात गिरजाक्काची दहा वर्षांची नात म्हणाली, "आज्जे, मग तुला तेल मी लावणार."

गिरजाक्काने जुन्या परंपरांच्या प्रकाशाने नव्या पिढीचा मनोदीप उजळवून संस्कृतीचं महत्व पटवून दिलं.


२. तुझं कसब ऑपरेशन थिएटरमध्ये दाखव.

सुनिधी पहाटे लवकर उठली. लक्ष्मीपूजनाचा दिवस...! मुलांना मस्त उटणे लावून आंघोळ घातली. दारात छान रांगोळी काढत बसली होती इतक्यात फोन वाजला. तिने फोन उचलला.

"हॅलो, मॅडम एक एमर्जेंसी आहे. डिलिव्हरीची केस आहे. बाळ पोटात आडवं झालयं,बहुतेक ऑपरेशन करावं लागेल." मनात विचार आला, रांगोळी पूर्ण करून जावं का? पण नको. नवरोबाला जाऊन सांगितलं. ते लगेच म्हणाले, ‘‘तुझी कलाकुसर ऑपरेशन थिएटरमध्ये दाखव, ती खरी रांगोळी."


सुनिधी हॉस्पिटलमध्ये गेली. सिझेरियन करावं लागलं, मुलगी झाली. तोवर जेवणाची वेळ टळून गेली. दिवाळीच्या दिवशीसुद्धा मी मुलांसोबत, नवऱ्यासोबत एकत्र नाही याची हुरहूर तिच्या मनाला लागली. पण बाळाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि तिचं अंतर्मन प्रकाशाने लख्ख उजळून निघालं.

ती घरी परतली तर मुलं आणि नवऱ्याने मिळून सारं घर सजवुन दिवाळीची सगळी तयारी केली होती.


३. ड्युटी फर्स्ट

मुग्धा ट्राफिक पोलीस अधिकारी होती. हायवे वर ट्रक उलटला होता त्यामुळे ट्राफिक जाम...! वाहनांना योग्य दिशा देत मोठ्या मुश्किलने सगळ्या वाहनांना ती ट्राफिकमधून बाहेर काढत होती.वेळेवर जेवण नाही. बाथरूमला जाणं नाही. उन्हाळ्याचे दिवस...! घामाने अंग ओलचिंब झालेलं.


दहा-बारा तासांनंतर ट्रॅफिक नीट मार्गी लागलं. तेवढय़ात एक अनोळखी इसम तिच्याजवळ आला. त्याने हात मिळवून ‘‘हॅप्पी दिवाळी!’’ म्हटलं आणि एकदम तिच्या लक्षात आलं, ‘अरे!आज तर पाडवा! नवरोबा घरी वाट पाहत असेल. तो आणि मुले जेवली असतील का? आपण तर दिवसभरात काहीही खाल्लेलं नाही.

पण तरीही तिच्या मनाला एक मोठं समाधान होतं. आज ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या शेकडो नवऱ्यानां, भावांना त्यांच्या परिवारापर्यंत पोहचवून त्यांना आनंद दिला... त्यांना एकत्र आणण्यात मदत केली. तिचा मनोदीप उजळला आणि त्याच्या प्रकाशात ती लख्ख उजळून निघाली.


४. खमक्या... माझ्या घरच्या लक्षुम्या.

"काय गं आज्जे, आज लक्ष्मीपूजन. या वर्षी दिवाळीला आमाला कापडं बी न्हाय घेतली." सुजी आणि सुमी तक्रारीच्या सुरात बोलल्या.

"यंदाच्या सालाला तुमाला येगळी दिवाळीची भेट देणार हाय", म्हणत लक्ष्मीबाईनीं पिशवीतून काही कागद बाहेर काढून दोघींसमोर धरले.


"अय्यो, तायडे बघ...! कराटे क्लासमध्ये आपलं ऍडमिशन केलंय आज्जीने.

"व्हय गं पोरींनो...! माझ्या घरच्या लक्षुम्या खमक्या पाहीजेत्या". म्हणत आजीने दोघींवरून कडाकडा बोटं मोडली.


काही दिवसांपूर्वी नवरात्रीत दांडिया दरम्यान अंधार आणि गर्दीचा फायदा घेत कोणीतरी शेजारच्या नंदावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हापासून लक्ष्मीबाई खूप बेचैन होत्या. त्यांनी सुजी आणि सुमीवर लोकलाजेमुळे बरीच बंधने घातली होती. या प्रसंगानंतर त्यांना कळून चुकलं होतं की मुलींनी सक्षम असायला हवं. लक्ष्मीबाईंनी नातींना एकत्र घेऊन आनंदाने स्त्रीसक्षमीकरणाची ज्योत पेटवत प्रकाशपर्व साजरं केलं.


५. बळीराजाची दिवाळी

सर्जाच्या रिकाम्या दावणीकडे बघून कुशाबाचा जीव तीळ तीळ तूटत होता. आज वसुवारस, गोधनाची पूजा करण्याचा दिवस...! गोठ्यातील तीर्था नावाच्या गाईसोबत बाकी जनावरांचीही पूजा आटोपली होती पण सर्जाची रिकामी दावण आणि एकट्या उभ्या राजाकडे पाहून त्याने धोतराच्या सोग्याने डोळे पुसले.

सर्जा-राजाची जोड म्हणजे कुशाबाचा जीव होती पण मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची जुळणी करण्यासाठी त्याला ही जोडी फोडावी लागली. इतक्यात पाठीमागून बैल हंबरण्याचा ओळखीचा आवाज आला. त्याने वळून पाहिले तर मनोज त्याचा मुलगा सर्जाची वेसण धरून हसत उभा होता.


त्याचा पहिलाच पगार झाला होता आणि त्याने बापाला भेट म्हणून त्याचा सर्जा परत आणला होता. कुशाबाने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. कुशाबाचा आनंद डोळ्यातून वाहत होता. चार वर्षानंतर सर्जा-राजा, कुशाबा प्रकाशपर्वाला एकत्र होते.

तर माझ्या प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो या मनोदीप उजळणाऱ्या अति लघुकथा आपल्याला कशा वाटल्या सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.


फोटो - साभार गुगल

तर माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. असेच आणखी ब्लॉग वाचायचे असल्यास माझ्या मधुनिता या फेसबुक पेजला नक्की follow करा. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि लेखकाच्या नावासहित शेअर करा.

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics