Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

माझी पहिली शाळा

माझी पहिली शाळा

3 mins
160


शाळा, कॉलेज आणि त्यातील किस्से हा माझा आवडीचा विषय. बाबांचा ट्रान्स्फरेबल जॉब असल्याने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात राहिलो. त्यामुळे प्रत्येक वेळेला शाळा बदलली की नवनवीन अनुभव हाताशी आले. माझी पहिली शाळा बहुदा बजाज विद्यामंदिर असं काहीसं नाव होतं. वय वर्षे 3, बालकमंदिर मधे होते इथे. तिथलं मैदान, कार्यक्रमाचा स्टेज, रिक्षाने जाणं येणं, माझा पहिला स्टेज प्रोग्राम 'दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल...' वरचा डान्स... एकदा शाळा सुटल्यावर मैदानात कुणीतरी खेळताना मला डोक्याला लागलेला दगड आणि रिक्षात तसाच रक्ताने माखलेला युनिफॉर्म घालून घरी परतलेली मी... अश्या धुसरश्या आठवणी आहेत. त्यानंतर पहिली दुसरीत वेगळी शाळा. जाताना बाबा सायकल ने सोडून द्यायचे. आणि येताना घराजवळच्या एका मुली बरोबर परत यायचे. मधल्या सुट्टीत खाऊच्या पंचवीस पैशात शाळेच्या गेट जवळ टोपलीत सजवून बसलेल्या काकांकडून शिंगाडे किंवा ओल्या नारळाचे काप घेवून खायचे. पहिलीत पहिला नंबर आल्यावर झालेला सत्कार... ह्या पण आठवणी तश्या धूसरच! नंतर दुसरी तिसरीत परत वेगळी शाळा. ती जिल्हा परिषदेची. त्याचे निराळेच अनुभव. त्यातली एक आठवण म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका मला त्यांच्या खुर्ची-टेबल शेजारी बसवायच्या व बाकी मुलं मुली समोर फारीवर. मग तिसरी चौथी परत नवीन शहर नवीन शाळा, ध्रुव प्राथमिक शाळा. इथलं सगळं बऱ्यापैकी आठवतंय. शाळेच्या मागच्या मोठ्या ग्राऊंड वरचे महिन्यातल्या एका शनिवारचे शिवाजी संस्थेच्या सगळ्या शाळांचे एकत्रीकरण, खूप साऱ्या प्रार्थना व श्लोक म्हणणे आणि कवायत करणे,.. महिन्यातून एकदा टेकडी वरचे वृक्षारोपण व श्रमदान,.. कच्च्या शॉर्ट कट रस्त्याने जातानाचा तो दूरवर पसरलेला ओसाड परिसर आणि मधेच एक मटणाचा तंबू, सह बाजूला खुंटीला बांधलेली बकरा,.. पाऊस येण्याचे लक्षणं दिसले की सुट्टी, कारण खरंच शाळा बुडायची आणि मग पक्क्या लाँग रूट ने उशिरा घरी परतणे,.. इत्यादी. सगळ्यात जास्त कुठली भावना मनात घर करून आहे तर ती म्हणजे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दीन, महाराष्ट्र दीन अश्या दिवशीचा तो देशभक्तीने खच्चून भरलेल्या माहोल चा फील! अजूनही आठवलं की अंगावर रोमांच उभा करतो नि अंगात रक्त सळसळायला लागतं... अजून इथला खास शेअर करण्यासारखा मुद्दा म्हणजे चापून-चुपून अगदी व्यवस्थित नेसलेल्या पांढऱ्या साडीतल्या आमच्या वर्गशिक्षिका **** बाई. मध्यम कदकाठी, गोऱ्या, एका पायाने थोड्या अधू म्हणून हलक्या लंगडत चालायच्या आणि अतिशय कडक शिस्तीच्या. मला खूप भीती वाटायची त्यांची. एकतर तिसरीत वर्षाच्या मध्येच ऐड्मिशन, जिल्हा बदलल्याने भूगोल विषय पूर्ण बदललेला (भूगोल विषयात आपल्या जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास असायचा), गणित विषयाचे टॉपिक्स वेगळे त्यामुळे सुरू असलेला धडा समजण्यासाठी त्याच्या बेसिक धड्यांचा अभ्यास आधी पूर्ण करायचा, आणि त्यात ह्या अश्या स्ट्रिक्ट बाई. माझी गोंधळलेली अवस्था पाहून त्यांनी आई ला भेटायला बोलावले. म्हणाल्या की त्या आमच्याच एरियात राहतात तर मला गाइडन्स करिता त्यांच्या घरी पाठवत जा. हे ऐकून तर माझी पंढरी अजूनच घाबरली. पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जायचे घाबरत-घाबरत आणि दाखवायचे माझा अभ्यास. हळूहळू सगळं कव्हर-अप व्हायला लागलं. गणित विषय तर इतका पक्का झाला की कॉलेज पर्यंत गणितात टॉप करायचे. त्यांनी घेतलेल्या एक्स्ट्रा एफर्ट्स साठी मी सदैव त्यांची ऋणी आहे. त्यांच्या कडक व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू माझ्यावर इम्पॅक्ट करून गेला. एकाच एरियात राहत असल्याने त्यांच्या घरातल्या गोष्टी ऐकिवात यायच्या. त्यांना बघायला स्थळ यायची पण लग्न काही जुळत नव्हते. कारण त्यांची अट होती म्हणे की लग्न झाल्यावर त्या त्यांचं नाव बदलणार नाहीत. शिवाय कुंकू, मंगळसूत्र, वगैरे घालण्याचा आग्रह स्वीकारणार नाहीत. शिक्षिका म्हणून काम करणे मुळीच सोडणार नाही. त्यांच्या ठाम व्यक्तिमत्वाचा ठसा कायमचा मनात उमटला आणि त्या नेहमीकरिता स्मरणात राहिल्या... नंतरच्या शालेय शिक्षणात बरेच शिक्षक अभ्यासा व्यतिरिक्त बरच काही शिकवून गेले. त्यातून रुजलेल्या सद्गुणांची पुढच्या आयुष्यात स्वतःला घडवायला खूप मदत झाली. आज लिहिताना परत त्या सगळ्यांची आठवण झाली. त्या सर्वांचीच मी खूप आभारी आहे......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics