Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

माझी किंमत

माझी किंमत

9 mins
210


          सकाळची वेळ होती. सुनयना लवकरच उठली. कामे आटोपत असताना सुभाषचे तिथे आगमन झाले. डोळे चोळत त्याने विचारले,

"सुने, इतक्या लवकर का उठलीस?"

"ते नंतर. आधी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

"काय? वाढदिवस? माझा? अरे, बाप रे! मी तर विसरुनही गेलो. बरे, जाग येत असताना तू शेजारी नाहीस हे पाहताच भ्रमणध्वनी पाहिला नाही उठून बाहेर आलो. भ्रमणध्वनी सुरू केला असता तर समजले असते. आणि हे काय तू सजून सवरुन बसलीस? कुठे काही कार्यक्रम आहे का?"

"नवऱ्याच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कोणता महत्त्वाचा कार्यक्रम असू शकणार आहे?"

"म्हणजे?"

"तुम्हीसुद्धा पटकन तयार व्हा. चहासुद्धा बाहेर घ्यायचा आहे. काही बोलायचे नाही. आज सारा खर्च मी करणार आहे. म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल."

"आता हे काय नवीन खुळ काढले आहे?"

"मी काढले का? तुमच्या लेखी मला शून्य किंमत आहे का नाही? बरे, आज तरी वाद नको. चला..." असे म्हणत सुनयनाने सुभाषला बाहेर ढकलले.

    काही वेळात सुभाष स्नान करुन बाहेर आला. तेव्हा सुनयनाने एक नवीन ड्रेस त्याच्या हातात देत म्हणाली, "ही माझ्याकडून वाढदिवसाची भेट... किमती आहे बरे. नाही तर जशी माझी किंमत नाही तशी या पोशाखाची तुमच्या दृष्टीने किंमत नसेल. चला. पटकन घाला..."

     काही क्षणातच दोघेही तयार होऊन बाहेर पडले. तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते. सुभाष मोटारसायकलकडे जात असताना सुनयना म्हणाली, "नाही हं. आज मनसोक्त हिंडत तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे..." असे बोलत असताना सुनयनाचे लक्ष रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका चहाच्या टपरीकडे गेले. तशी तिकडे वळत सुनयना म्हणाली,

"चला. खूप दिवसांपासून अशा टपरीवर चहा घ्यायची इच्छा होती. कॉलेजमध्ये असताना आम्ही मैत्रिणी टपरीवर नेहमीच चहा घेत असू. पण लग्न झाले नि पुन्हा तो योग आला नाही. आज घेऊ या..." बोलत बोलत दोघे टपरीवर पोहोचले. दुसरे कुणी गिऱ्हाईक नव्हते. सुभाष काही बोलण्यापूर्वीच सुनयनाने विचारले,

"दादा, चहा कितीला आहे रे?"

"बहनजी, हा छोटा कप पाच रुपये आणि हा मोठा कप बारा रुपये..."

"एक मोठा कप द्या..."

"अग पण.."

"थांबा ना थोडे. दादा, एक रिकामा कप दे. मोठ्या कपातला चहा छोट्या कपात टाकून तो साहेबांना दे आणि मोठा कप मला दे. पण मला एक सांग, दोन कप घेतले म्हणून किंमत एकाच कपाची... म्हणजे मोठ्या कपाची लावशील ना?"

"बहनजी, तुम्ही घेतला त्या मोठ्या कपाची किंमत लावेल. साहेबांना म्हणजे त्यांच्या कपाला किंमत नाही..." असे म्हणत तो चहावाला हसला. चहा घेऊन सुनयनाने पैसे दिले आणि सुभाषकडे कटाक्ष टाकत निघाली....

     तिने एका ऑटोला हात दाखवला नि म्हणाली, "भाऊ, पळस बागेतील गणपती मंदिरात सोडायला काय घेशील?"

"ताई, शंभर रुपये पडतील..."

"आधीच सांगते, माझा नवरा सोबत आहे. त्यांचे वेगळे पडणार नाहीत ना? नाही तर उतरल्यावर त्यांची वेगळी किंमत... म्हणजे भाडे मागशील."

"तसे नाही हो ताई. दोघांनाही सोडतो. तुमच्याकडून भाडे घेत असताना त्यांची वेगळी किंमत कशी करणार? नाही का?" ऑटोवाला म्हणाला नि सुनयना सुभाषकडे बघत आत बसली, पाठोपाठ सुभाष!

    काही क्षणात ऑटो गणपती मंदिर परिसरात थांबला. तसे सुनयनाने त्याला पैसे दिले. मंदिराच्या आवारात असलेले व्यापारी त्यांना फुलं, हार, प्रसाद घेण्यासाठी आग्रह करीत असताना सुनयनाने एका दुकानात हार, पेढे घेतले. प्रसाद घेत असताना तिने विचारले, "भाऊ, दर्शनासाठी आम्ही दोघे पती-पत्नी आलो आहोत. प्रसाद मी एकटीने घेतला तर चालेल का की दोघांना वेगवेगळा घ्यावा लागतो..."

"ताई, का हो मजाक करताय. नवरा बायको का वेगळे असतात? जे तुमचं ते त्यांचं आणि देवाजवळ दोघांचीही एकच किंमत असते. तिथे भेदभाव नसतो."

   प्रसाद घेऊन दोघे मंदिराकडे निघाले. सुभाष शांतपणे तिच्या मागोमाग चालत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या पुजाऱ्याकडे पूजेचे ताट देत म्हणाले,

"महाराज, हे माझे पती देव! आज यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी हा प्रसाद आणला आहे. चालेल का? त्यांनीच घेऊन तुमच्या जवळ द्यावा असे काही नाही ना?"

"देवाजवळ असा भेदाभेद नाही. पती काय नि पत्नी काय? सारखेच असतात. तुम्ही ज्या शुद्ध भावाने, पवित्र हेतूने करताय हे खूप छान आहे..." पुजारी बोलत असताना सुनयनाने सुभाषकडे यादृष्टीने कटाक्ष टाकला की बघा माझी किंमत...

    पूजा, दर्शन आटोपून आल्यावर दोघे मंदिराच्या परिसरातील बाकड्यावर बसले. तसे सुनयनाने विचारले,"चलो. विमानतळावर जाऊया..."

"विमानतळावर? कुठं जायचं आहे?"

"जायचं नाही कुठे? आपला फराळ करून..."

"सुने, काय चालले आहे? नाष्टा करायला विमानतळ?"

"नाही हो. दहा वाजत आहेत. आता इथेच नाष्टा करून विमानतळावर पोहचायला तीन तास लागतील तिथे जाऊन जेवण करूया..."

"अगं, तिथलं जेवण कोणत्या किमतीत..."

"असू द्या हो. तुम्हाला कुठे द्यायचे आहे? मी देणार आहे. बरोबर आहे तुमचे. तुमच्यापुढे त्यातही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी किमतीचा विचार करणार नाही..."

      फराळ, चहा झाला. थोडं पुढे आल्यावर सुनयनाने एक टॅक्सी थांबवली आणि विचारले,

"दादा, विमानतळ जाण्यासाठी किती रुपये पडतील?"

"ताई, आठशे रुपये पडतील.'

"आठशे? ठीक आहे. पण आम्ही दोघे आहोत... दोघांचेही आठशे ना? नाही तर तिथे गेल्यावर वेगवेगळी किंमत म्हणजे भाडे सांगशील..." सुनयनाने सुभाषकडे बघत विचारले.

"हरकत नाही. आठशेच पडतील. ही काही प्रवासी वाहतूक करणारी नाही. एकाच किंमतीत दोघांनाही सोडतो..."

        भरधाव वेगाने धावणारी टॅक्सी जवळपास दीड तासाने विमानतळावर पोहोचली. तेव्हा सुभाषकडे बघत सुनयनाने पैसे दिले. सुनयना म्हणाली,

"अहो, चला. एक चक्कर मारून पाहूया विमानतळ कसे दिसते ते. विमानात बसणे तर आपल्या नशिबात नाही. दुरून किंवा आत सोडले तर किमान हात लावून स्पर्श तरी अनुभवता येईल..."असे म्हणत सुनयना निघाली. पाठोपाठ अर्थात सुभाष होता. एका दाराकडे ती निघाली. त्यांना येताना पाहून तिथे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना सॅल्यूट ठोकला तसे सुनयनाने सुभाषकडे पाहिले नि हळूच पुटपुटली,'देखो हमारी किमत...' तिने त्या रक्षकाला विचारले,  

भैय्या, यहाँसे अंदर जा सकते है?"

"बहनजी, कौनसे देश का हवाई जहाज पकडना है?"

"अरे, जी नही। ऐसेही... हवाई जहाज देखना है? भैय्या, हवाई जहाज के अंदर कुछ पल बैठ सकते है क्या? उसके लिए कुछ टिकट निकालना पडेगा तो निकालते है या किसी को चायपानी के लिए पाँच पच्चीस रुपया..."

"नही। बहनजी, ऐसा कुछ नही हो सकता। किसी देश जाना है तो आप हवाई जहाज में बैठ सकते है। हाँ, आप यहाँ से अंदर जाकर अंदर का माहौल देख सकते है।"

"जाने दो। बाद में कभी परदेस जाएंगे तो हवाई जहाज से ही जाएंगे।..." असे म्हणत सुनयना निघाली... सुभाषही!

     थोडावेळ फिरल्यानंतर सुनयनाला विमानतळ परिसरात एक हॉटेल दिसले. तशी ती म्हणाली,

"भूक लागली का हो? पॉश हॉटेल दिसते आहे. चला. नाही तर म्हणाल, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नुसतेच गरगर फिरवले... पोळ्याला बैल फिरवल्याप्रमाणे! खाऊ मात्र काही घातले नाही..."

"तुला त्या हॉटेलचे दर..."

"जेवणाची किंमत ना? कितीही असू द्या... चला..." असे म्हणत सुनयना आत शिरली. तसा सुभाष पुटपुटला,

'आता हे गरगर फिरवणे नाही तर काय... म्हणे पोळ्याचा बैल! वाढदिवसाला बायकोने किती प्रेमाने भेट दिलीय ना... पोळ्याचा बैल!...' सुभाषही पत्नीच्या पाठोपाठ आत शिरला. कोपऱ्यातील एक टेबल पाहून सुनयना बसली. सुभाषही आज्ञाधारक पतीप्रमाणे बसला. काही क्षणातच एक पोऱ्या आला आणि त्याने मेन्यूकार्ड समोर ठेवले नि अदबीने उभा राहिला. त्या कार्डवर एक सरसर नजर फिरवत सुनयनाने विचारले,

"अरे बाबा, केवढे मोठे, वजनदार कार्ड... कार्ड कसले पुस्तकच आहे हे... भूक फार लागली आहे. पाच मिनिटात भरपेट काय देशील ते सांग..."

"मैडम, सध्या दोन मिनिटात थाळी देऊ शकतो. बाकी कोणत्याही पदार्थाला वीस मिनिटे लागतील."

"आण, बाबा आण. त्यात स्वीट असेल ना रे? आज साहेबांचा वाढदिवस आहे. आणि थाळीची किंमत किती आहे?"

"स्वीट मिळेल. एक थाळी सतराशे साठ रुपयाला..."

"काय सतराशे साठ..." सुनयना विचारत असताना सुभाष हसत म्हणाला,

"नकट्याच्या वाढदिवसाला सतराशे साठ रुपयाची थाळी... मागव... मागव..."

"फिरून फिरून थकलोय, पाय दुखतात. असे कर एक थाळी आण. कसे आहे, नवऱ्याचा वाढदिवस कसा डिफरंट, अविस्मरणीय साजरा करायचा आहे तेव्हा ती समोरची जोडी जशी एकाच कोल्ड्रिंक मध्ये दोन नळ्या टाकून मजेने पित आहेत ना तसे आम्ही आजच्या दिवशी एकमेकांना घास भरवत एकाच थाळीत खातो. पण किंमत माझ्या एकाच ताटाची लागेल ना? का ह्यांची..."

"नाही. नाही. त्यांची किंमत... म्हणजे साहेबांसाठी थाळी मागवली नाहीच तर किंमत लागणारच नाही ना. आणतो... एक थाळी..." असे म्हणत वेटर हसतच निघून गेला.

"मग सुभाषराव, कसा वाटतो वाढदिवस?..."

"पोळ्याचा बैल नुसता गरगर फिरत असतो, त्याला कुठे काय चांगले... वाईट कळते? हो ना?"

"अहो, उत्साहाच्या भरात बोलले हो. तुम्ही तर मनाला लावून घेतलेले दिसतेय..."

"अग, जिथे मलाच काही किंमत नाही तिथे माझ्या मनाला नि माझ्या मताला काय किंमत असणार?" सुनयना काही बोलणार तितक्यात मुलाने थाळी आणून ठेवत विचारले,

"अजून एक ताट आणू का.... रिकामे..."

"बरे,आण. आमचे साहेब की नाही मोठमोठे घास घेतात. मला शिल्लकच राहणार नाही." सुनयना म्हणाली आणि तो मुलगा ताट आणायला गेला. तितक्यात सुनयनाचे लक्ष हॉटेलमध्ये येणाऱ्या एका महिलेकडे गेले. तिने विचारले,

"अहो, ती येत असलेली बाई कोण आहे हो? मला ओळखीची वाटते. अरे, ही तर सोनिया... माझी मैत्रीण. सिंगापूरला असते असे ऐकले होते. तितक्यात स्त्री रिकामा टेबल शोधत जवळ येताच सुनयनाने थोड्या मोठ्या आवाजात विचारले,

"तू सोनी ना?..."

"तर मग तुला काय चांदी वाटले? सुने, तू शरीराने किती सुटलीस गं? पण मी बघ तशीच आहे कॉलेजमध्ये होती तशी..."

"चवळीची शेंग! अहो, हिची शरीरयष्टी पाहून सारे... विशेषतः मुलं हिला चवळीची शेंग म्हणून चिडवत असत. मजा यायची..."

"अग, तुझ्या चवळीच्या शेंगेला... सॉरी! म्हणजे मैत्रिणीला बसू तर दे..."

"व्वा! जिज्जू, व्वा! आवडला हं तुमचा स्वभाव..." म्हणत सोनियाने पुढे केलेल्या हातावर सुभाष टाळी देत असताना सोनियाने विचारले,

"सुने, जिज्जू म्हणाले खरे पण हा तुझा नवरोजीच आहे ना? बॉयफ्रेंड तर नाही ना?"

"तुझं आपलं काही तरीच मी अजूनही भारतातच आहे..." असे म्हणत सुनयनाने तिच्या पाठीवर चापटी दिली.

"भारतात बॉयफ्रेंड नसावेत असा सरकारने नवा नियम तर केला नाही ना? का हो जिज्जू?" असे विचारत सोनियाने पुन्हा टाळी देण्यासाठी हात पुढे केला पण सुनयनाने लगबगीनं स्वतःच टाळी दिल्याचे पाहून सारे हसत असताना सुभाषने विचारले,

"तू... म्हणजे तुम्ही जेवणार आहात का?"

"तर मग सोडेन का, आज पहिल्यांदा तुमची भेट होतेय, तुमच्या लग्नालाही नव्हते तर... हे काय थाळी? एकच? दुसरे काही मागवले का? तुम्ही कुठे परदेशात जाणार आहात का? नाही म्हटलं कुणी केवळ जेवणासाठी विमानतळाची सफर करणार नाही..."

"अगं, आज की नाही ह्यांचा वाढदिवस आहे म्हणून म्हटलं परदेशात नाही पण विमानतळावर साजरा करावा..."

"वॉव! ग्रेट!! जिज्जू, हर्टी काँग्रेच्युलेशन्स... शेकहँड केला असता पण या सुनयनेने माझा हातच उखडला असता..." सोनिया म्हणाली नि पुन्हा सारे हसायला लागले.

"काय झालं एकतर भूक जास्त नव्हती आणि म्हटलं एका ताटात दोघांनी जेवावे..."

"एकमेकांना घास भरवावे. किती छान कल्पना आहे ना पण मी कबाब में हड्डी बनकर सारा मजा किरकिरा कर दिया। क्यों जिजाजी?"

"नाही, असे काही नाही. उलट मजा येतेय..." तितक्यात वेटर एक ताट घेऊन आला. तशी सोनिया म्हणाली,

"हे ठीक आहे. तुम्ही दोघे एका ताटात जेवा. मी आपली या दुसऱ्या ताटात घेईन थोडे. अगं, लागतेच किती मला..."

"चवळीच्या शेंगेला..." सुभाष हसत म्हणाला तशा त्या दोघी हसण्यात सामील झाल्या तरी सुभाषला जाणवले त्याच्या विनोदावर सुनयना मनापासून हसत नव्हती तर हसायचे म्हणून हसत होती. सोनियाने लगोलग ताट घेतले आणि वाढून घ्यायला सुरुवात केली. तिने अर्ध्यापेक्षा जास्त पदार्थ वाढून घेतल्याचे पाहून सुनयनाने सुभाषकडे पाहिले...

      हसतखेळत जेवणं झाली. सुभाष हात धुऊन येत असताना त्याच्या कानावर दोन्ही मैत्रिणींचे बोलणे आले. दोघींचीही पाठ त्याच्याकडे होती. सोनिया म्हणाली,

"सुने, खरेच तू खूप भाग्यवान आहेस ग..."

"ती कशी?"

"असा जिंदादिल नवरा मिळालाय तुला. किती विनोदी स्वभाव आहे ग त्याचा. नाही तर माझा नवरा हसणं सोड बोलणं विकत घ्यावे लागते त्याचे. इतका कंजूष आहे हसण्या- बोलण्यात..."

"अगं, तुम्ही परदेशात राहता. कामाचा ताण असेल..."

"तो तर सर्वांनाच असतो पण कामाचा तो ताण कमी करण्यासाठी हसणं बोलणं महत्त्वाचे असतेच ना. दोघेच दोघे राहतो. स्वभावाला औषध नाही. आणि एक गोष्ट सांगू का, राग येणार नाही ना..."

"अगं,बोल ना. तुझा आणि राग कसे शक्य आहे?"

"बघ ना, तुझा नवरा किती फिट आहे. पोट मध्ये आहे, छाती आत आहे. बलदंड शरीर आहे. राहतोय ही कसा टापटीप! एकदम हिरो! नाही तर आमचं ध्यान तू बघशील ना तर... गोलमोटल आहे. पाहणारांना वाटते, याच्या शरीरात काय नुसते मांसच भरलेय की काय? हाडाचा पत्ताच नाही. पोट दोन विती बाहेर आलय नि छाती हातभर आत गेलीय. डोक्यावर केसांचा पत्ता नाही, चष्मा लागलाय... जाऊ दे. तुझ्या हिरोचा आज वाढदिवस आहे, कशाला मजा किरकिरा करु..." सोनिया म्हणत असताना वेटरने बील आणून दिले. ते सोनियाने पटकन उचलले. तसा सुभाष म्हणाला,

"आण इकडे मी देतो. नाही तर सुनयना देईन. आज तीच सारा खर्च करते आहे..."

"हो क्का, हमे भी दीजिए एक मोक्का... बील देने का..." असे म्हणत सोनियाने बील दिले नि सारे बाहेर आले. सोनियाने आधीच टॅक्सी बुक केली होती. ती निघून जाताच सुनयना म्हणाली,

"अहो,टॅक्सी बुक करा ना..."

"का गं... आज तू सारा खर्च करणार आहेस ना... मला माझी..."

"कळली हो कळली तुमची किंमत कळली. माझे जाऊ देत पण सोनियाने तुमची खरीखुरी किंमत केली बघा..."

"फिट.... बलदंड... टापटीप... हिरो... हीच माझी किंमत ना..."

"त्याहीपेक्षा जास्त... अनमोल... अमूल्य... बहुमूल्य, बहुमोल असा माझ पती... परमेश्वर!..." तितक्यात टॅक्सी आली. दोघेही आत बसले. टॅक्सी सुरु झाली आणि सुनयनाने सुभाषच्या खांद्यावर डोके टेकवले... सुभाषनेही त्याचे डोके हलकेच तिच्या डोक्यावर ठेवले....

                             ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy