Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

माझे इब्लिस लग्न (विवाह)

माझे इब्लिस लग्न (विवाह)

13 mins
177



ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटलं पण तसं एखाद्या पोराला "काय इब्लिस कार्ट आहे"

किंवा एखाद्या बाईला काय इब्लिस  बाई आहे. तसं माझं इब्लिस लग्न आहे. इब्लिस याचा अर्थ डांमरट, टारगट, चमत्कारिक इत्यादी इत्यादी. 

अर्थात या लग्नाला माझीच मस्ती कारणीभूत ठरली. त्याचं असं झालं जाऊद्या मंडळी आता तुम्हाला सुरुवातीपासून ची स्टोरी इस्कटून सांगतो

माझं नाव आनंदा म्हणजे आपलं आंद्या ओ, मी मुसळ्याचा आंध्या. शाळांमध्ये यथातथाच तवा बी जास्तीच लक्ष शाळेत नसायचं कवा एकदा मधली सुट्टी होती आणि वढ्यात जाऊन डुबक्या मारतोय असं व्हयाचं. वढ्याच्या काठाला लई चिचची झाड. झाडावरच्या चिचा पाडायला मी नंबर एक दुसऱ्याच्या आमराईत शिरून आंब चोरायला आम्ही तीन-चार दोस्तमंडळी मिळून जायाचो. आणि हा! मोठा वानवळा शर्टात गुंडाळून साळेमध्ये घेऊन येयाचो. दुपारच्या सुट्टीनंतर पहिला तास असायचा इतिहासाच्या मास्तरचा, तेला लईच प्रश्न विचारायची खोड मग म्या काय करायचो हळूच चिचचा, एक, एक आकडा संमद्या बेंचवर पास करायचो. सगळ्यांच्या तोंडात चिच सगळ्यांच्या तोंडाला सुटलेलं पाणी, मास्तर आपलं फळ्याकडे बघून प्रश्न इचारतय, इचारतय कोणी सुरेख सुदिक का बोलना, का जबाब देना म्हणून माग बघायचं तर समद्या च्या तोंडात चिचा, समद जण आपलं "इस- इस" करत चिचच पाणी गिळत्यात हे बघून मास्तर लई रागाला यायचा आणि समध्या वर्गाला फोडून काढायचा. समदी पोरं आरडायची मला लई मज्जा यायची. तसा मला बी मार पडायचा म्हणा, पण मी बसायचं शेवटच्या बाकड्यावर. माझ्या पावतर मास्तर येईपर्यंत सगळ्या वर्गाला हाणून हाणून ते दमलेल असायचं. त्यामुळे मला थोडाच मार पडायचा. असलं चिकार उद्योग मी आणि माझी दोस्तमंडळी करत बसायचो. कधी मास्तरच्या खुर्चीला खाज खुजली लाव, कधी दोन पोरींच्या शेपट्या एकमेकाला बांधून ठेव. कधी खिशातून बेडूक आणून गणिताच्या मास्तरच्या तासाला वर्गात सोडून द्यायचा, तोपण पोरींच्या बाकड्याखाली सोडायचा. पोरी घाबरून घाबरून पार बाकावर उभ्या राहायच्या आणि बेडकापेक्षा जास्त उड्या त्याच मारत असायच्या. 

पेटीच्या तासाला मात्र माझा रुबाब असायचा .मी पैलवान गडी, कमावलेले शरीर त्यामुळे मास्तरला मी लईच आवडायचो. एकांदा पोरगं पीटी करताना चुकलं की द्यायचो एक गुच्ची पोटात . माझी चित्रकला पण लय भारी त्यात मला पैकीच्या पैकी मार्क असायचं आणि कुठल्या पण मास्तरचं वेडावाकडा चित्र फळ्यावर काढून ठेवण्यात मी माहीर. त्यामुळे मारदेखील पडायचा . असो असं ढकलगाडी करीत- करीत आमची गाडी बोर्डापर्यंत गेली, पण बोर्डाच्या परीक्षेला काही पार झाली नाही. मी आणि माझ दोन -चार जिवलग दोस्त मागेच राहिलो. बाकीची शिकलेली पोरं पुढे शहरात गेली. चांगली नोकरी लागली लग्न पण झालं

बोर्डाची परीक्षा फेल झाल्यावर बापाने शेतीच्या कामाला जुंपलं. ते पण काय वाईट नव्हता . अशी पण आमची दहा एकर बागायत शेती त्यामध्ये बाप आणि चुलता. तस बरं चाललं होतं .

आमच शाळेतल जे काही जिवलग दोस्त होतं, आमची मैत्री मात्र पक्की होती. आम्ही रोज संध्याकाळी गावातल्या मारुतीच्या पारावर जमायचो गप्पा करायचो. अजून काय कोणाची इकेट पडली नव्हती. म्हणजे अजून कोणाचं लगीन झालं नव्हतं. पण सगळ्यांच्या घरांमध्ये लग्नाची बोलणी चालू होती. आज-काल सातवी आठवी शिकलेल्या पोरींना पण शेरातला नवरा पाहिजे होता. गावातला शेतकरी नको. आमच मैतर बी अठरापगड जातीच. त्यात न्हाव्याचा पांडू, सुताराचा गणपत, लोहाराचा मुरली. धुमाळाचा यशा, चांभाराचा दिनकर अशी मंडळी होती. आम्हा सगळ्यांना डोंगर-दऱ्या भटकायचा आणि शिकारीचा लई नाद.

आई रोज सकाळी नावाने शिव्या घालत असायची आरं मुडद्या पाच पाच भाकरी खातोयास तुझं रेट थापून थापून मी आता कटाळले आता तुझी बायको आन बरं!अगं आये पण मी कुठून बायको आणू? बायको मिळायला माझं काय शिक्षण नाय मला काय नोकरी चाकरी नाय. मी आपला साधा शेतकरी मला कोण पोरगी देणार? आर !आग लाव त्या शिक्षणाला, त्याच्या बिगर कुणाचं काय अडतय होय? शेतकऱ्याच्या पोरांनी काय लग्न करायच नाय? अरे शेतात नांगर कसा धरायचा, बी कसं पेरायचं हे कोणत्या शाळेत शिकवतात? आपण शेतात राबतो म्हणून सारे जग खातंय!

ते येताना तुला चांगलं? मग बस झालं तर.


असं बी माझ्यासाठी बाप आणि चुलता स्थळ बघत फिरत होते .पण अजून काय लगीन जमत नव्हतं. कुठे पोरगी चांगली नव्हती, कुठे पोरीला शिकलेला नवरा पाहिजे होता, तर कुठे हुंड्यापायी  अडत होतं आणि आमचं घोड त्याच्यामुळे अडून बसलेलं होतं. मला काय त्याच्या वाचून फार फरक पडत नव्हता. सकाळी उठल्यावर आधी न्याहारी करावी ,शेतावर काम करावं नदीवर डुंबावं. दोस्ता संग पारावर चकाट्या पिटाव्या. पंधरा दिवसांनी एकदा दोस्ता संगती शिकारीला जावं.


असंच त्या दिवशी आम्ही चार-पाच जण गावाशेजारच्या डोंगरावर शिकारीला म्हणून गेलो शिकार तरी कसली हो! एखादा मोर ,एखादा ससा, नाहीतर पाणकोंबड्या! कवा कवा तर काहीच मिळायचं नाही आणि हात हलवत परत यायचं.

त्यादिवशी आम्ही वाट चालत चालत गेलो खरं आणि दिवसभर दबा धरून बसलो पण पण काय मिळालं नाही. आम्ही बरोबर आणलेल्या भाकऱ्या, शिदोरी एका माकडाने पळवून नेल्या. पोटात लईच कावळे कोकलत होतं पण सांगणार कोणाला? फक्त नदीवरती जाऊन पोटभर पाणी प्यायलो.

सूर्य डोक्यावर मी म्हणत होता! दिवस उन्हाळ्याचे होते. दोस्त तर म्हणायला लागलं , आंद्या लेका लईच भुकलंलय. सुगीच्या दिवसात काय ना काय शेतात खायला घावायचं . पण आता कुठेच काय नव्हत,

आंद्या लेका आता कुणी आपल्याला, पुरणपोळीचे जेवण दिलं तर लई मज्जा येईल! दिन्या बोलला.

सुताराचा गणपा त्याच्यावर लईच खवळला " अर! चटणी-भाकर मिळाली तरी बस, अन तुला पुरणाचे जेवण सुचतंय.

अरे! आपला आंद्या डोक्याने लय भारी आहे!

तो काय तरी ग ईगत काढल!

दोस्त मंडळी माझ्या तोंडाकडे आशेन बघू लागली, आणि माझ्या डोक्यात एक आयडिया आली.

खरोखरी चला दोस्तांनो तुम्हाला जेवण्याशी मतलब. अरे करणार काय? ते सांग तरी.

गेल्या रविवारी माझा चुलता "अनपटवाडी" ला माझ्यासाठी पोरगी बघायला आला होता. पण पोरगी काळी बी हाय, जाडी बी हाय, आण चकणी बी हाय त्याच्यामुळे तिला कोणी पसंत करत नाही .

हाय ती तालेवार बापाची! आणि ती मंडळी हुंडा देखील मोप द्यायला तयार हायेत. पण माझा चुलता नकोच म्हणला. पण घरी येऊन म्हणला आम्ही अजून  त्यांस्नी काय बी उत्तर दिलेलं नाही. ते लोक अजून आशेवर आहेत.

चला तर मग आपण पोरगी बघायला म्हणून जाऊ चांगलं गोडधोड जेऊ आणि जाऊ घरला. उत्तर न्हाय दिलं तर पुन्हा कशाला कोणी विचारायला येतंय ? ते समजून जातील.

आम्ही तिथून सरळ अनपटवाडी ला गेलो. रामराव शिर्के यांचे घर सर्वांनाच माहिती होतं. काही लोक तर पत्ता सांगताना एकदम मिश्किलपणे "पावन कशाला आलाय ?पोरगी बघायला आलाय का? वा वा पोरगी एकदम भारी हाय बरका ! लगेच पसंत करशीला असं सांगत होते .

आम्हीपण गालातल्या गालात हसत हो म्हणालो आणि एकदम शिर्कें च्या दरवाजासमोर हुब राहिलो. बाहेरूनच आवाज दिला तर पहिली दोन तगडी कुत्री भो भो करत अंगावर आली. आमचं अर्ध अवसान तिथच गळालं .

बर आता उलट्या पावली पळावं तर कुत्रे मागे येतील या भीतीने उभा राहिलो. तेवढ्यात "वाघ्या, राजा "माघारी फिरा! तुमच्यामुळे कोणी दारात पाहुणे येईना झालंय असं ओरडत एक साठीचा मनुष्य हातामध्ये काठी घेऊन बाहेर आला. तो पण रंगाने पक्का होता. आम्ही तिथेच वळखलं हे पोरीचा बाप म्हणून आणि सरळ मामा म्हणून साद घातली. त्याबरोबर मामा गहिवरूनच गेलं.

मी पिंपोडे बु|| या गावचा आनंदा मुसळे, गेल्या हप्त्यात माझे चुलते तुमच्याकडे पोरगी बघायला आले होते .

एवढ वाक्य ऐकल्याबरोबर त्या माणसाचा चेहरा एकदम खुलला. पाहुणे या, या ,या, बसा -बसा त्यांनी वसरीला घोंगडी हातारली. अरे गणपा आरे शिरपा पाहुणे आलेत पाणी घेऊन या ,गूळ पाणी आणा!, आत बघून त्यांनी आवाज दिला.

लोकांची लगबग ऐकू येत होती. दिसत पण होती. त्याने मोठ्या सन्मानाने मला आणि माझ्या दोस्तांना वसरीला बशीवलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या शेतातल्या पीक पाण्यावर बोलणी झाली. मग तुमचे चुलते काय म्हणतात? तुमच्या घरची मंडळी काय म्हणते? तुम्ही दुसऱ्या डावाला पोरगी बघायला आलात याचा अर्थ तुमच्या घरच्यांना आमची सोयरीक पसंत आहे. मी आपला नुसती मान डोलवत होतो आणि ह्या ला हा करत होतो.

तुमच्या सोबत ची मंडळी कोण आहे तुमचे भाऊ आहेत का? त्यावर मी खुलासा केला नाय माझी दोस्त मंडळी आहेत आणि सर्वांची ओळख करून दिली. पावन हेच आहे बाकी तुम्ही झ्याक केलं. म्हणजे आमचे ऐश्वर्या दिसायला थोडी डावी हाय खरी ! पण घर कामाला माग नाही, स्वयंपाक पाण्याला मागं नाही ,कोणत्याच गोष्टीला मागं नाही. स्वभावाने नुसती गाय हो तुम्ही कशी वागवा हु म्हणून वर मान करणार नाही.

आता ही गाय गरीब गाय होती का मारकी गाय होती ते काही मामांनी सांगितलं नाही. आणि मला तरी कुठे लगीन करायचं होतं म्हणा! आजच्या दुपारचं जेवण मिळाल्याशी मतलब. मी आपलं समद हो ला हो म्हणत होतो.

पाहुण्यांनी आम्हाला पडचीट्टी ची रूम दिली. घमेल भरून शेंगा, गुळ, खजूर लसणाची चटणी हे सारं पुढे आलं .

"पावण "स्वयंपाक होईस्तोवर एवढं जरा चालवून घ्या. कशी पोरगी माझी सुगरण आहे कामाचा उरक आहे आत्ता बघा तासाभरात चांगला पुरणावरणाचा स्वयंपाक करून तुमचं तोंड गोड करतो.

आम्ही भुकेली मंडळी भुईमुगाच्या शेंगाच्या घमेल्यावर तुटून पडलो. पाच जणांमध्ये बघता बघता त्याचा फन्ना उडवला पाणी पिऊन गप्पागोष्टी करत तिथेच आडवे झालो.

आनंदा तुझी सासुरवाडी पक्की झ्याक आहे. पाहुणे मंडळी लईच उठबस करतात बघ रे बाबा! अजून काय वहिनीला बघितलं नाही नाहीतर फट म्हणता ब्रम्ह हत्त्या व्हायची.

अरे बाबू आपण काय लगीन करायला थोडच आलोय? आजच्या दिवस जेवायचा खायचं आणि सांजेला घर गाठायचं.

आपल्याला काय करायचे पोरगी कशी का असेना. "खबरदार" वहिनी बहिणी बोललास तर! आनंदराव खवळला. अस्ताव्यस्त लोळून आराम केल्यावर मंडळीला जेवणासाठी निमंत्रण आलं. खेडेगावांमध्ये कोणत्याही सणाला, कोणत्याही गोष्टीला पाहुणेरावळे आले की की त्यांना एक तर गोड म्हणजे पुरणपोळीचे जेवण किंवा खारे जेवण म्हणजे मटन केव्हा चिकन असा बेत ठरलेला असतो. त्याप्रमाणे रिवाजाप्रमाणे मुलगी पाहायला आल्यावर शक्यतो पुरणाचे जेवण करतात आणि मुलाकडेच्यांनी देखील मुलीला पेढ्याचा पुडा, ब्लाउज पीस आणि ओटी द्यायची असते.

आनंदा आणि मंडळी जेवायला उठली.जेवल्या नंतर मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. आनंदा आणि दोस्तांनी पूरणाच्या जेवणावर आडवा हात मारला .पुरणाची पोळी ,कटाची आमटी, मोठ्या मोठ्या तळलेल्या कुरवड्या ,भजी असा झकास बेत होता. जेवल्यावर परत सगळे सुस्तावले आणि आपल्या खोलीमध्ये येऊन आडवे झाले . तासाभराने पोरीचा भाऊ बोलवायला आला, पाहुणे चला! आता मुलगी बघायचा कार्यक्रम उरकून घेऊ. खरे तर यांना मुलगी बघायचा कंटाळाच आला होता.

जेवल्या जेवल्या गावाचा रस्ता धरला असता तर बरे झाले असते असे वाटू लागले. पण आता रिवाजाप्रमाणे पोरगी बघायला जाणे भाग होते .ओसरी मध्ये एक पाट मांडलेला होता ही मंडळी येऊन काही जण झोपाळ्यावर काहीजण बाकड्यावर काहीजण खुर्चीवर बसले आणि मुलीला बाहेर बोलवणे आले. "ऐश्वर्या" बाहेर ये बघू ! नाव तर मोठं झकास होतं "ऐश्वर्या" पण पोरींने उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकल आणि आमची सर्वांची तोंडे उतरली. पोरगी रंगाने काळी अंगाने थोराड आणि एवढेच कमी म्हणून की काय एका डोळ्याने चकणी पण होती. 

तुमच्यात वडीलधारे कोण आहे? पोरीला कुकू लावा, ओटी द्या ,मिठाईचा पुडा द्या पोरीचा बाप बोलला. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. सगळेजण कावरेबावरे होऊन एकमेकाचा तोंड बघू लागले . यांनी तर काही आणलं नव्हतं.

काय पाहूण? काय झालं?. "अहो! आमची सामानाची पिशवी एस्टीतच राहिली. एक दोस्त बोलला. पण आंद्याच्या तोंडून मात्र पटकन खरं बाहेर पडलं .

अहो मामा! आमच्या घरच्यांना माहित नाही.  आम्ही मैतर- मैतर परस्परच मुलगी बघायला आलोय. घरच्यांना काय माहिती नाही? असू द्या! असू द्या! काय बी असेल ते असू द्या'

असं पण तुमचं चुलत पोरगी बघून गेल्यात. तुम्हाला पण बघायची असेल तर हरकत नाही .काय प्रश्न विचारायचे ते विचारा.

आनंदाने जुजबी प्रश्न विचारले नाव काय? शिक्षण किती? स्वयंपाक करता येतो का? त्या काळात एवढ्या कॉलिफिकेशन बस होत्या. पोरगी नॉनमॅट्रिक होती ,स्वयंपाक उत्तम करत होती.

आता आम्हाला काही विचारायचं नाही आम्ही उठतो असं म्हणून सगळे उठले आणि परत खोलीवर जाऊन पसरले. गोडाधोडाचे जेवण अंगावरच आल होतं.

दोस्तांच्या गप्पा सुरू झाल्या ,आनंदा" वहिनी एकदम झ्याक आहे . करून टाक लगीन. चांगली मालदार पार्टी आहे. तुझ्याकडे बघून "आय लव यू "म्हणले तर तुला वाटलं की दुसऱ्याकडे बघून म्हणते आणि शेतात काम तरी केलं तरी रंग काही काळा होणार नाही. रंग उतरणार नाही .

लेको गप्प बसा. मला काय करायचे तिच्याशी, आज तुम्हाला पोटभर पुरणपोळी जेवायला मिळाली ना? पुढच्या वेळी दुसरीकडे बघू, आता जरा डोळ्यावर आली पडून घेऊ आणि संध्याकाळी आपल्या गावाला जाऊ .असं बोलून सारेजण झोपी गेले संध्याकाळ झाली तरी कोणाला जाग आली नाही आणि त्यांना उठवायला देखील कोणी आले नाही. जेव्हा यांना जाग आली तेव्हा अंधार पडला होता.

बाहेर नजर टाकली तर चांदण्या चमकत होत्या.

अहो पाहुणे कितीवेळ झोपायचं उठा! खोलीच्या बाहेरूनच कोणीतरी साद घातली .आनंदा आणि त्याचं मैतर डोळे चोळत बाहेर आले बाहेर बघता तो अंधार पडलेला आता त्यांनी बिगी बिगी ने आपलं सामान आवरायला सुरुवात केली. 

पावण एवढ्या रातच्याला कुठे जाताय? आज हीतच मुक्काम करा, सकाळी गोडाचे जेवण केलं आता खार जेवण खायला घालतो, आपल्या घरचच कोंबड आहे. पावणे मंडळीच्या आग्रहाला , आनंदा आणि त्याचे मैतर बळी पडले रात्रीचा मुक्काम तिथेच झाला. आनंदा तुझी सासुरवाडी लई तालेवार दिसते! काय हरकत नाही ,लगीन करून टाक.

ए !गप बसा रे भाड्यानो, तुम्हाला फुकट खायला मिळालं ना मग बसा गप!

 तुमच्या खाण्यासाठी अशी जाडी, चकणी ,काळी म्हैस माझ्या गळ्यात मारू नका. सकाळी लवकर उठायचं आणि आपल्या रस्त्याला लागायचं .

रात्रीच जेवण जरा जास्तच झालं, त्यात पाहुण्यांनी बाटली ची पण सोय केली. आम्ही घेत नाही असे आढेवेढे घेत सगळ्यांनी थोडी थोडी घेतली, आणि मग लागले आपसात बरळायला; असो बडबड करत कधीतरी झोपी गेले. झोपेत आनंदा स्वप्न बघत होता त्याच्यामागे एक मारकी म्हैस लागली आणि आनंदा पुढे- पुढे पळत होता, मधेच त्या म्हशीची ऐश्वर्या झाली आणि ती काळी, जाडी, चकणी ऐश्वर्या त्याच्यामागे,

लक्ष्याच्या एका सिनेमाप्रमाणे "सिनेमावाले तुम्ही काय बी करा, पण मला तुमच्या दिलाची सखया राणी करा" असे म्हणत आपल्या मागे पळत आहे, असे स्वप्न त्याला पडले. स्वप्नामध्ये भेदरून तो खडबडून उठला, जागा झाला तर, कानावरती सनईचे मंजुळ सूर पडले. बाहेर डोकावले तर, दारात मांडव दिसला.

यात नक्कीच काहीतरी धोका आहे. आनंदाने हडबडून आपल्या दोस्तांना उठवले .पाच जण काय समजायचं ते समजले आणि चोरपावलाने बाहेर पडायला रस्ता शोधू लागले, बाहेर येतात न येतात तोच राजा आणि वाघ्या भो भो करत यांच्या अंगावर आले . उंबऱ्या बाहेर टाकलेला पाय परत आत घेतला तर त्या आवाजाने, मेहुणे हातामध्ये बंदूक घेऊन दरवाजात उभे'

कुठे चाललात पावन? कुठे चाललात?अव आज तुमचं लगीन आहे ना! नवरी घेतल्याशिवाय कुठे पळता? 

अहो पण माझ्या घरच्यांना सांगायला पाहिजे ना, मी इकडे एकटाच परस्पर आलो होतो. त्याची काय बी चिंता करू नका !आपण नवरी घेऊन वरात घेऊनच तुमच्या घरी जाऊ. आम्ही येतो ना संगट कशाला घाबरता?

पावन तुम्ही  काय आम्हाला दुधखुळ समजलात? घरच्या माणसांना न सांगता, तुम्ही परभारेच इथे आलेला आहात ,तुम्ही जंगलात शिकारीला आलात ,तुम्हाला शिकार सापडली नाही. तुम्हाला भुका लागल्या आणि पोरगी बघण्याच्या बहाण्याने तुम्ही तुमच्या दोस्तांना घेऊन येथे जेवणासाठी आलात. आमची पोरगी काय बाजारात मांडलेली गोष्ट होती का? नाही लग्न करायचं होत तर पुन्हा कशाला आलात? आणि आलात तर आलात, खोटं बोलून आलात. जर तुम्ही खरं सांगितलं असतं जेवण्यासाठी आलोय तर तुम्हाला खुशीने जेवायला घातलं असतं .आमच्या वाड्यातून आजपर्यंत कोणी उपाशी गेलेला नाही. पण तुम्हाला वाटलं तुम्हीच हुशार, तुम्हाला रात्री बाटली दिली ना, ती त्यासाठीच दिली. तुम्ही, तुमचं मैतर सगळ्या गोष्टी ओकुन मोकळा झालात, इथं काय खानावळी मांडल्यात का? जेवणावळी घातल्यात?

सकाळी गोड जेवण झालं, संध्याकाळी खार जेवण.

आम्ही तुम्हाला जावई म्हणून सकाळी पुरणपोळ्या चा स्वयंपाक केला रात्रीच्याला हळदीचा खार जेवण झालं, आता लगीन केल्या  बिगार तुम्हाला येथून हलता येणार नाही. आणि ही तुमची दोस्तमंडळी, गप गुमान बसायचं! नाहीतर सगळ्या जातीच्या पोरी लग्नाच्या हायेत, सुताराची, न्हाव्याची,लोहाराची, चांभाराची सगळ्यांच्या पोरी घेऊन येतो आणि तुमची पण लग्न लावून देतो हुंडा नाही आणि पांडा नाही गप गुमान लग्नाला तयार व्हावं लागल.

नाहीतर मग असं करा! तुमच्या दोस्ताला लग्नाला राजी करा. तुम्हाला अख्खा पोशाख ,मानाचा फेटा आणि चांदीचा एक-एक रुपया देतो.

हे ऐकल्याबरोबर स्वतः लग्न करून घेण्या परीस ,मानाचा पोशाख आणि चांदीचा रुपया हे बरं असं म्हणून माझे दोस्त माझ्यावर उलटले .काल मी त्यांच्यासाठीच मोठेपणा करायला गेलो त्यांना पुरणाच जेवण खाऊ घातलं, रात्री मटन खाऊ घातलं आणि तेच दोस्त माझ्यावर उलटले. आणि माझ्या सासुरवाडी ची साथ देऊ लागले. जगात कोणी कोणाचं नाही हेच खरं.

शेवटी मग मी झक मारून लग्नाला तयार झालो. जाणार कुठे? दोन मेव्हणे हातामध्ये दुनाळी बंदूक घेऊन बसलेले. मग काय वाजत गाजत आम्हाला मांडवात नेलं ,हळद लावली, आंघोळी घातल्या, घोड्यावरुन मिरवणूक काढली, श्री वंदना ला घेऊन गेलो आणि शेवटी एकदाची जाडी, काळी चकणी ऐश्वर्या माझी बायकू झाली. मी रागाने तिचं नाव म्हाळसा बाई ठेवलं तर मेव्हणे कसे म्हणतात भाऊजी तुम्ही नाव जरी  "म्हाळसाबाई" ठेवलं असेल, तरी आता तुम्हाला "बानूला" आणण्याची परवानगी नाही त्यामुळे ,आहे त्या म्हाळसे बरोबरच संसार केला पाहिजे.

माझा कान पिरगाळून मेव्हण्याने मला हे बजावले आणि भाऊजी कानपिळ्याचा पोशाख तुमच्याकडे बाकी आहे तो आम्ही तुमच्या गावाला येऊन वसूल करू.

पोरगी सोडता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. आमच्या म्हाळसाबाई च्या अंगावर चांगलं पंधरा तोळे सोनं घातलं. काळ्याभोर रंगावर पिवळ सोन अजून चमकत होतं.

मलादेखील चेन अंगठी दिली, सुटाचा भारीतला कपडा दिला बाकी माझ्या मापाचे कपडे नव्हते. मी तसा पैलवान गडी माझ्या आहे त्या कपड्यावर लगीन लावलं. गावातून आमची वरात काढली गावकरी मंडळी आणि आमच्या म्हाळसाबाई च्या मैत्रिणी अशा म्हणत होत्या की

"आपल्या ऐश्वर्याने नशीब काढलं! कसला राजबिंडा पैलवान गडी मिळालाय.

जोडी एकदम अमोशा -पौर्णिमा! जाऊद्या, जाऊद्या, असं नका म्हणू! लक्ष्मीनारायणा सारखा जोडा दिसतो असं म्हणू या. असं म्हणून काही लोक मला फिदीफिदी हसत होते. पण ऐश्वर्याच्या भावाकडे बघितलं की तोंड बंद करत होते. त्यानंतर चार-पाच बैलगाड्या जुंपल्या .त्यात आमचं सामान, रुखवताचे सामान, एका गाडीत नवरा नवरी, एका गाडीत नवरीच्या करवल्या आणि नवरीचे दोन्ही भाऊ, दुसऱ्या गाडीत माझं पाच मैतर आणि बाकीच्या तीन गाड्यांमध्ये गावातली पोलीस पाटील, सरपंच, पुढारी, प्रतिष्ठित मंडळी सगळा लवाजमा आमच्या गावाला आला .

माझा चुलता आणि बाप अचंबित झाला त्यांनी भांडण काढलं, पण जेव्हा पोरीच्या भावाच्या हातात बंदुका बघितल्या तेव्हा गप्प बसले, शिवाय सर्व कहाणी सांगितल्यानंतर माझीच कशी चूक होती आणि त्याची शिक्षा मला भेटली पाहिजे ,असे म्हणून आहे ते गोड मानून घेऊ या असा विचार त्यांनी केला. आलेल्या मंडळींना चहापाणी केलं ,जाताना मंडळी मला , आणि माझ्या बापाला आणि चुलत्याला बजावून गेले, जर आमच्या पोरीला काही त्रास दिला तर गाठ आमच्याशी आहे हे ध्यानात ठेवा. तसे आमच्या पुढे ती मंडळी तालेवार होती. त्यांच्याशी पंगा घेणे आम्हाला जमलेच नसते.


आता माझ्या लग्नाला दहा वर्षे झालीत दोन पोरं बी झालीत. एकंदरीत ठीकठाक चाललंय.

असा म्हाळसाबाई शी लग्न केल्याचा पश्चाताप मला झाला नाही. तिने कधी करू दिला नाही. खरोखर ती सुगरण आहे, माझी काळजी खूप घेते जिवापाड प्रेम करते. तालेवार घराण्यातून आली पण इथे कधी रुबाब केला नाही. आमच्या परिस्थितीशी जुळवून घेतले. तिथे तिला बाहेरचा वारा माहित नव्हता इथे शेतीभाती ची कामेदेखील करते.

नॉन मॅट्रिक असली तरी मी तरी कुठे मोठा बॅरिस्टर होतो. पोरं मात्र दोन्ही हुशार आहेत म्हाळसा बाई वर गेलेली आहेत. तिच्या माहेरच्यांनी तिच्या चकण्या डोळ्याचं ऑपरेशन करून दिलं. सर्व खर्च त्यांनीच केला. आजपर्यंत तिच्यासाठी मला काही खर्च करावा लागलेला नाही .पहिले पहिले मी तिचा राग -राग करायचो. दुश्वास करायचो पण आता हळूहळू मी देखील तिच्यावर प्रेम करू लागलो .आता माझी म्हाळसाबाई मला प्रिय आहे. पण मंडळी एक गोष्ट सांगतो कोणी माझ्यासारखा उप्पद्याप करायला जाऊ नका कारण मला एक म्हाळसाबाई चांगली मिळाली म्हणून सर्वांना मिळेल असे नाही .



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy