Nagesh S Shewalkar

Others

3.4  

Nagesh S Shewalkar

Others

माझा प्राणप्रिय ध्वज!

माझा प्राणप्रिय ध्वज!

7 mins
197


           भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांच्या दरम्यान कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता. दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित मानला जात होता. मी माझा मित्र दिनकर आणि त्याचा नातू भारत सामना पाहायला जाणार होतो. मी तयार होत होतो तितक्यात भारत आला.

"आजोबा, झाले का नाही हो तयार?"

"भारत, किती गडबड करशील? तासाभरात तुझी ही पाचवी चक्कर आहे. तुझ्या बाबांनी आपली तिकिटे काढून आणली आहेत ना? मग जाऊया की."

"तसे नाही हो, आजोबा. आज भारत जिंकणार म्हणजे जिंकणार. आपल्याला पोहोचायला उशीर होऊ नये हो. आज रविवार असल्यामुळे भारताचा विजय साजरा करण्यासाठी खूप गर्दी होणार. आपल्याला चांगली जागा मिळायला हवी ना?"

"बरे. चल..." असे म्हणत मी घरात सांगून निघालो. दिनकर म्हणजे भारतचे आजोबा आमचीच वाट बघत होते. भारतच्या बाबांनी त्यांची गाडी आणि चालक आमच्यासोबत दिला. आम्ही कारमध्ये बसलो आणि मैदानाच्या दिशेने निघालो. तसे मैदान आमच्या घरापासून जवळच होते परंतु भारत म्हणत होता त्याप्रमाणे रविवारची सुट्टी आणि भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती. भारत अकरा वर्षाचा, पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा होता. अत्यंत हुशार, चाणाक्ष अशी भारतची ख्याती होती. प्रत्येक गोष्टीवर त्याचे बारीक लक्ष असायचे आणि स्वतःचे समाधान होईपर्यंत तो चौकशी करीत राहायचा. त्यामुळे त्याला भरपूर माहिती होती.

    मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध अत्यंत उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहऱ्यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. चेहरा रंगवून घेण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी होती. सोबतच तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून, फडकावून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. 

"काय म्हणतोस भारत? घ्यायचा का चेहरा रंगवून?" दिनकरने विचारले.

"होय आजोबा..."असे म्हणत भारत एका वृद्ध माणसाजवळ गेला. त्याच्याकडे फारशी गर्दी नव्हती. पाच मिनिटात भारतच्या दोन्ही गालांवर आणि कपाळावर तिरंगा रंगवून झाला. भारत गोऱ्या रंगाचा असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर ते रंग खुलून दिसत होते. त्याच्याकडे बघत असताना मी विचारले,

"भारत, झेंडा घ्यायचा ना?"

"आजोबा, नाही हो."

"का रे?" मी आश्चर्याने विचारले.

"आजोबा, काल माझा मित्र सामना बघायला आला होता. त्याने ना मोठ्ठा ध्वज घेतला आणि उंच धरत तो मैदानात जाण्यासाठी फाटकाजवळ गेला. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ध्वजाची काठी काढून घेतली आणि फक्त कापडी ध्वजच आत नेऊ दिला."

"का असे?" दिनकरने विचारले.

"अरे, व्यवस्थेच्या कारणांमुळे असेल. कसे आहे, सारेच प्रेक्षक सारखेच नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. दुर्दैवाने आपला संघ हरत असताना बरेच प्रेक्षक पराभव स्वीकारू शकत नाहीत आणि मग हातात जे असेल ते आपल्याच खेळाडूंना फेकून मारतात. मागे काही सामन्यात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याच फेकून मारलेल्या मला आठवतात."

"खरे आहे, आजोबा. म्हणूनच ध्वजाची काठी, पाण्याची बाटली इतकेच काय पण मित्राच्या वडिलांच्या खिशाला पेन होती तीही आत नेऊ दिली नाही. आजोबा, काठी नसलेला ध्वज नेणे मला आवडत नाही. दोन्ही हातात धरून ध्वज जास्त उंचावर नेता येत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगतात की, राष्ट्रीय ध्वज हा देशाचा गौरव आहे, शान आहे. त्याचा योग्य सन्मान व्हायलाच हवा. आपला तिरंगा हा आपल्यापेक्षा उंच असायला पाहिजे शिवाय तो ज्या इमारतीवर फडकविला जातो त्या इमारतीपेक्षाही ध्वज उंच असलाच पाहिजे. आपण किती वेळ हात उंच धरणार ना? हाताला कळ लागली की, आपण हात खाली घेणार म्हणजे त्यावेळी हातातील ध्वजही खाली येणारच ना म्हणून मी ध्वज घेणार नाही..." भारत सांगत असताना आम्ही स्टेडियममध्ये प्रवेश केला. सामना सुरू झाला होता. दक्षिण आफ्रिका संघाचा एक बळी घेऊन भारतीयांनी विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली होती. आम्ही आमच्या आसनांवर जाऊन बसलो. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण होते. बहुतेक प्रेक्षकांनी तीन रंगांनी रंगवून घेतले होते. हातातील ध्वज उंचच उंच नेण्याची जणू स्पर्धा लागली होती. भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध घोषणा दिल्या जात होत्या त्यातही भारत मातेचा जयजयकार लक्ष वेधून घेत होता. कुणी भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी सीमेजवळ आला की, त्या सीमेजवळ बसलेले लोक टाळ्या वाजवून, त्याच्या नावाचा जयघोष करून त्याचे लक्ष वेधत होते. तो खेळाडूही हात उंचावून, हात हलवून प्रेक्षकांना अभिवादन करत होता. त्याच्या तशा कृतीने प्रेक्षकांमध्ये प्रचंड जोश भरला जात होता.

    अशा उत्साही वातावरणात सूर्य मात्र जणू आग ओकत होता. ऊन मी म्हणत होते. घामाच्या धारा पाझरत होत्या. सोबत पाणी न्यायला बंदी असल्यामुळे शरीराचे पाणी-पाणी होत होते. प्रेक्षक टोपी घालून, रुमाल पांघरून, गॉगल घालून तर मुली ओढणी डोक्यावर घेऊन, अनेक महिला साडीचा पदर पांघरून उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी धडपडत होत्या. टाळ्या, आरडाओरडा यांनी कळस गाठलेला असताना अचानक भारत म्हणाला,

"आजोबा, आजोबा, तो माणूस चक्क झेंडा डोक्यावर घेऊन बसला आहे..."

"भारत, अरे, ऊन किती लागतंय ते बघतोस ना?..." मी बोलत असताना भारत म्हणाला,

"मग काय ध्वज गुंडाळून डोक्यावर घ्यायचा? आजोबा, हे बरोबर नाही..." भारत त्वेषाने बोलत असताना मी तिकडे पाहिले तर खरेच एक माणूस रुमाल गुंडाळावा तसा चक्क तिरंगा डोक्याला घट्ट बांधून बसला होता. भारत त्या माणसाचे लक्ष स्वतःकडे वळविण्यासाठी 'ओ..ओ..शुक्... शुक मामा, अहो, मामा ...' असे ओरडत होता परंतु प्रेक्षकांचा आवाज एवढा मोठ्ठा होता की, भारतचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळे भारत अस्वस्थ, बेचैन होत होता. तो तळमळत होता. त्याची ती तगमग पाहून आमचेही लक्ष खेळाकडे लागत नव्हते. भारत एकसारखा बसत-उठत होता. इतर माणसांकडून त्या माणसाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होता परंतु सर्वांचे लक्ष मैदानावर होते.

"भारत, शांतपणे सामना बघ बरे... " दिनकर सांगत असताना भारत आमच्या डाव्या बाजूला असलेल्या स्टँडमधील एका माणसाकडे बोट दाखवत म्हणाला,

"बघा. बघा. तो मुर्ख माणूस बघा. अहो, तो तर झेंड्याने चक्क घाम पुसतोय हो. आजोबा, कुणीही त्याला अडवत नाही हो. तसे करु नकोस म्हणून सांगत नाहीत हो. आजोबा, तुम्ही सांगा ना त्याला, अहो, हा आपल्या देशाच्या ध्वजाचा अपमान होतोय आणि सारे..."

"भारत, आपण सामना पहायला आलो ना मग सामन्याचा आनंद लुटूया..."

"आजोबा, अहो, याच ध्वजाच्या सन्मानासाठी आपले जवान जीव द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. समोर मृत्यू दिसत असूनही हातातील झेंडा खाली झुकू देत नाहीत. जखमी झालेल्या अवस्थेत हातात असलेला ध्वज दुसऱ्या बहादूर, शूर शिपायच्या हाती देतील आणि मग त्या तिरंग्याला हसतमुखाने शेवटचा सॅल्यूट ठोकून आनंदाने प्राण सोडतील. आणि इथे आपण... काय वाटत असेल आपल्या हौतात्म्यांना, बलिदान दिलेल्या शिपायांना?" भारतचा चेहरा रडवेला झालेला पाहून मी म्हणालो,

"भारत, तुझे बरोबर आहे. तुझी तळमळ योग्य आहे. पण आपण काय करू शकतो? आपले कुणी ऐकणार आहे का? उलट आपल्यालाच रागावतील... भांडतील..." मला मध्येच थांबवून भारत आमच्या रांगेपासून चार पाच रांगा पुढे असलेल्या एका रांगेत बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून संतापाने म्हणाला,

"बघा. बघा. तो माणूस झेंडा कसा फडकावतोय ते बघा ..." आम्ही त्या दिशेने पाहिले. नुकताच आफ्रिकेचा तिसरा गडी बाद झाला होता. आनंदाने बेहोश झालेला एक माणूस उड्या मारत ध्वज उंचच उंच नेत होता परंतु बेभान झालेल्या अवस्थेत आपण ध्वज उलटा फडकावतोय हे त्याच्या गावीही नव्हते. इकडे भारतची तळमळ आता संतापात बदलली होती.

"आजोबा, पोलिसांना सांगूया का?" भारतने विचारले.

"अरे, पोलीस त्या तिकडे खूप दूरवर आहेत..." मी सांगत असताना भारतीय खेळाडूंनी अजून एका आफ्रिकन खेळाडूला तंबूत पाठवले होते. मैदानावर, स्टेडियममध्ये फार मोठा जल्लोष सुरू होता. आनंदाचे भरते आले होते. तो माणुसही जोराजोरात उड्या मारत ध्वज उंचच्या उंच नेत होता. सर्वत्र फिरवत होता तरीही त्याच्या लक्षात त्याची चूक येत नव्हती. आसपासचे, आजूबाजूचे शेकडो लोक कौतुकाने त्याचा आनंद पाहताना त्याच्या आनंदात सहभागी होत होते परंतु कुणाच्याही लक्षात ती घोडचूक येत नव्हती. प्रत्येकाला वेगळीच मस्ती चढली होती. इकडे तळमळत असलेला, संतापलेला भारत आमच्या मागे उभे असलेल्या सुरक्षा रक्षकाकडे गेला. बोट दाखवून त्याने तो प्रकार त्याच्या लक्षात आणून दिला परंतु तो म्हणाला,

"बाळा, तुझे बरोबर आहे. पण त्याला यशाची धुंदी चढली आहे आणि तो काही मुद्दाम करीत नाही तर आनंदाच्या भरात नकळत ते घडते आहे. काही क्षणात त्याला त्याची चूक लक्षात आली की, तो ध्वज पुन्हा सरळ करेल. बघ. जा बघ. आफ्रिकेची अजून एक विकेट गेलीय. मजा कर. आनंद लुट. उगीच कशाला टेंशन घेतोयस?"

ते ऐकून भारत तणतणत मागे फिरला. आमच्याजवळ येत त्याने ते सारे आम्हाला ऐकवले. भारतची अस्वस्थता पाहून आम्हालाही करमत नव्हते. सामन्याकडे आमचे लक्ष लागत नव्हते. राहून राहून ध्वज हातात घेतलेल्या माणसांकडे आमचे लक्ष जात होते. अनेकजण अंगावर ध्वज पांघरून बसले होते तर काही प्रेक्षकांनी ध्वज डोक्याला गुंडाळला होता. भारतची तगमग, तळमळ, अस्वस्थता मला पटत होती. राष्ट्रीय ध्वजासोबत तशी वागणूक ही मनाला पटणारी नव्हती. प्रसंग आनंदाचा असला किंवा कसाही असला तरीही राष्ट्रीयध्वजाचा मान, सन्मान झालाच पाहिजे. त्याबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये...

"आजोबा, तो बघा तिथे पोलिसमामा दिसतोय. मी त्यांना जाऊन सांगू का?" असे विचारत आमच्या उत्तराची वाट न पाहता भारत ताडकन उठला आणि झपाझप पावले टाकत तिकडे निघाल्याचे पाहून मी आणि दिनकरही त्याच्यापाठोपाठ निघालो. आमच्या आधीच पोहोचलेला भारत त्या पोलिसाला म्हणत होता,

"अहो पोलीसमामा, तो.. तो.. माणूस बघा ना, झेंडा उलटा धरून बसलाय हो आणि तो तिकडे बघा, डोक्याला गुंडाळून बसलाय तर काही जण चक्क अंगावर पांघरून बसलेत हो..."

"का.. काय? काही ऐकू येत नाही रे. काही अडचण आलीय का? अरे, पण मला तिकडे येता येत नाही. बघ तर, केवढी मोठी जाळी आहे ही?..." असे काही तरी तो पोलीस सांगत होता. त्याचे आम्हाला ऐकू येत नव्हते तर आमचे त्याला ऐकू जात नव्हते. दोन-तीन वेळा पोलिसासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न फोल ठरल्याचे पाहून भारत मागे फिरला. आम्हाला काहीही न बोलता तो त्या माणसाच्या दिशेने निघाला जो माणूस ध्वज उलटा फडकावत होता. आम्ही दोघेही पुन्हा त्याच्या मागोमाग निघालो. त्या माणसासमोर उभे राहून भारत जोराने ओरडला,

"भारतमाता की..."

"जय!..." त्याच माणसाने नव्हे तर इतर माणसांनी विशेषतः भारतच्या वयाच्या मुलांनी आणि तरुणांनी भारतला जोरदार साथ दिली. तसा भारत त्या माणसाला म्हणाला,

"दादा, तुमच्या हातातील ध्वज बघा ना..."

"काय झाले? " असे विचारत त्या तरुणाने झटकन ध्वज खाली घेतला आणि त्याची चूक त्याच्या लक्षात आली. दुसऱ्या क्षणी तो ओशाळला, खजील झाला. अपराधीपणाची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत असताना त्याने जोरदार घोषणा दिली,

"भारत माता की..." कदाचित भारतची राष्ट्रीयध्वजाबद्दलची आस्था, सन्मान पाहून सर्वांना राष्ट्रप्रेमाचे भरते आले होते.

"जय!.." असे म्हणत सर्वांनी सहर्ष, जोरदार साथ दिली. तितक्यात काही उत्साही तरुणांनी भारतला स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतले आणि सारे भारतमातेचा, तिरंगा ध्वजाचा जयजयकार करीत स्टेडियमवर फिरु लागले. आमचा आनंद गगनात मावत नव्हता...Rate this content
Log in