लघुकथा २
लघुकथा २
त्याची नजर कधीपासून तिचा पाठलाग करत होती, अस्वस्थपणे. कोणाच्या लक्षात आले तर... ही भीती त्यालाही होतीच. पण काही केल्या स्वतःवर नियंत्रण त्याला मिळवता येत नव्हतं आणि तो आणखीनच अस्वस्थ, घाबरा होत होता.
तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक हात स्थिरावला आणि तो गलितगात्र झाला. कोण? हे बघण्याचं भानही त्याला राहिलं नाही आणि उठून चालू लागण्याची गडबड करत असतानाच त्याच्या कानावर परिचित स्वर पडला,
"आपलीच मुलगी, जुईली आहे ती!" आणि तो गर्रकन वळला. त्याच्यासमोर साक्षात, मूर्तिमंत ती उभी होती, जवळपास वीस-एक वर्षांनंतर. दोघांच्याही लक्षात आलं की दोघांच्याही बाह्य स्वरूपात काहीही बदल झालेले नाहीत. तेवढ्यात जुईली आईकडे हात करत जवळ येऊन पोहचली. थबकली आणि प्रश्नार्थक नजरेने तिने पाहिले.
"आपले बाबा आहेत!" आणि एक कोमल आवाज कानावर आल्यावर त्याचं लक्ष त्या आवाजाच्या मालकिणीकडे गेलं, तसं त्या दोघीनी पहिले त्याच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला मिठी मारली. स्वाभाविकपणे त्याचाही आशीर्वादाचा हात मायेने दोघींच्या केसांवरून फिरत राहिला. असा थोडावेळ गेल्यानंतर जुईली म्हणाली,
"आई, मी नि प्राजक्ता, पुढचं शॉपिंग करून घरी जाऊ की तू घरी आल्यावर परत बाजारात जाऊया?"
"नको जुईली, आपण शॉपिंग उरकून घरी जाऊया. बाबा, तू ये आईसोबत घरी आज जेवायला. बघ तरी तुझ्या मुली कसा स्वयंपाक करतात ते!" म्हणत तिने त्याच्या होकाराची वाटही न बघता जुईलीचा हात धरत प्रस्थान केले.
"तू दोघींनाही तुझ्यासारखंच वाढवलं आहेस गं!" तो समाधानाने म्हणाला. तसं एक सुस्कारा सोडत ती म्हणाली,
"वाढवलं आहे, घडल्या मात्र त्यांच्या त्या. तुझ्या सोबतीने घडवायचं होतं मला त्यांना, ते मात्र स्वप्नच राहिलं." त्याला वाटलं तिच्या शब्दात किंवा बोलण्यात नाराजी आहे, कटुता आहे.
"तुला सांगायचंय मला काही. बोलूयात का आता? वेळ आहे?"
"या दिवसाची तर मी किती वर्षांपासून वाट बघत आहे. वेळ तूच घेतलास आणि अजूनही घेतो आहेस." स्पष्ट पण शांत स्वरात तिने उत्तर दिले.
"आईमुळे! आईला आपण प्रथम मूल दत्तक घेऊन नंतर आपलं होऊ देणं मान्य नव्हतं. तू बरोबर होतीस, मात्र आई जिद्दीने हटून बसणार, त्या गोंडस बाळाचा दुस्वास करणार, असंच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. निर्णय घेणे मला जरुरी वाटलं.
तुझ्यासोबत मी केवळ आर्थिकदृष्ट्या, हिंमत देऊन-घेऊन, अप्रत्यक्षपणे उभा राहू शकत होतो. पण स्पष्टपणे तुला सांगता आलं नाही. आणि एकटाच निर्णय घेऊन मोकळा झालो. पण तरीही, तुला निरोप देताना एक गिफ्ट दिलं होतं, मी लिहिलेली डायरी. वाचलीस का तू?" तो अधिरपणे एका दमात सगळं बोलून गेला आणि एकूणच भावनांच्या रेट्याने थकून ही गेला.
"वाचली, त्याच दिवशी वाचली. तुझे डोळे-चेहराही वाचलाच होता, त्याला शब्दरूप दिलेलं मनाला भिडलं. पण मी ही तेव्हा वेगळ्याच भावनिक प्रवाहात होते, म्हणून परतीची वाट काही वेळासाठी विसरून गेले. तुझं अप्रत्यक्षपणे उभं राहणं मान्य करून, गृहीत धरून टाकलं. वेळप्रसंगी ते वापरून घेतलं.
आई गेल्यानंतर येशील आमच्याकडे किंवा बोलावशील आम्हाला असं वाटलं होतं मला, पण तू अजूनही वेळ घेतो आहेस. मात्र आम्हाला तो देणं आता शक्य वाटत नाही. मुलींनी खूप धीराने-समजुतीने गोष्टी घेतल्या आहेत. पण लहान असताना मला त्यांना सांभाळताना खूप कसरती कराव्या लागल्या. आता त्या करायच्या नाहीत हे मी ठरवलं आहे आणि करवून घ्यायच्या नाहीत- करू द्यायच्या नाहीत हे जुईली-प्राजक्ताने ठरवलं आहे.
आमचा निर्णय झालेला आहे. आणि तुला, त्या जाताना जे जेवणाचं निमंत्रण देऊन गेल्या आहेत, तो माझ्यावरचा विश्वास दाखवून गेल्या आहेत की आपली आई एकतर बाबाला घरी घेऊन येणार किंवा मग आम्हाला बाबाकडे घेऊन जाणार, एक संपूर्ण कुटुंब करणार!" आनंदातीशयाने तिला विसाव्याची गरज भासली म्हणून ती थांबली.
"अगं पण, खरंच शक्य होईल हे? मला जमेल? इतक्या मोठ्या मुलींचा जबाबदार बाप होणं?" शंकीत स्वरात त्याने विचारलं.
"मला काय वाटतं माहीत आहे? आपण प्रत्येक संधी दवडत आलो आहोत, स्वतःला देण्याची आणि समोरच्याला देण्याची ही. मग समोर माणसं असोत, परिस्थिती असो किंवा काहीही.
सासूबाईंनाही बहुदा आपण संधी नाकारली. कदाचित जी भीती, त्यांच्या स्वभावामुळे आपल्याला वाटत होती, त्या तशा वागल्याही नसत्या. काही प्रयोग आपण करून बघायला हवे होते आणि बरंच काही.
तुझं शंकीत होणं रास्त आहे, मात्र यावेळी संधी देऊन बघायची आहे, प्रत्येकाला. तुझं-माझं इथून पुढे नातं, आपलं आईबाप असण्याचं नातं, मोठ्या-वयात येणाऱ्या मुलींसोबत नातं, परिस्थिती, सगळ्या-सगळ्यालाच.
आपणही आजमावून बघुयात न, स्वतःला? जेवढा विचार आपण करतो आहोत, आजमितीला आपल्या गाठीशी असणारे अनुभव, कदाचित आपल्या मुलीही आपल्याला काही शिकवतील, आपल्याकडून शिकतील.
जगुयात की आता एकमेकांच्या साथीने नवरा-बायको, आईवडील, कुटुंब म्हणून. मिळून मात करूया अडचणींवर, परिस्थितीवर. ती पक्वता आली आहे का आपल्यात तपासून बघुयात!" तिने आपुलकीने आणि त्याच्यावर असणाऱ्या विश्वासाने विचारले-सांगितले. त्याच्याकडे बघितलं.
"बाबा, करूयात ना एक सुरुवात आपल्या कुटुंबाची, प्लिज!" दोन लाडिक स्वरातल्या मागणीने त्याचाही विश्वास जागृत झाला. आणि संधी नाकारायची नाही, डावलायची नाही हा निर्णय घेत तो त्याच्या कुटुंबासोबत खंबीरपणे प्रत्यक्षात उभा राहिला.