Pratibha Tarabadkar

Tragedy Crime

4.3  

Pratibha Tarabadkar

Tragedy Crime

लढा

लढा

5 mins
411


 बाजारात फारशी गर्दी नव्हती. लता आणि सीमा रमत गमत कुठल्याशा विषयावर गप्पा मारत चालल्या होत्या. बोलता बोलता लता तट्कन थांबली.तिने सीमाला ढोसले आणि समोरुन येणारी एक स्त्री दाखवली.अतिशय आकर्षक अशी ती स्त्री त्यांच्या जवळ आली.तिने लताकडे रोखून पाहिले आणि काही न बोलता ती निघून गेली.सीमाला लताचा आगाऊपणा अजिबात आवडला नाही.तिने लताकडे त्याबद्दल निषेध व्यक्त केला.

  'तुला तिच्या बद्दल वाईट वाटण्याचं काही कारण नाही.'लता तुच्छतेने मान उडवत म्हणाली.'तिचे प्रताप कळले की तुला सुद्धा राग येईल त्या बयेचा!'

    'असं काय केलंय तिनं?'सीमाने विचारले.

  'काय केलंय?'एखादं गुपीत सांगावं तसं लता 'तिच्या कानात कुजबुजली,'अगं, घटस्फोट घेतलाय तिच्या मुलीनं आणि आता यांच्या घरी रहातेय ती!'एखादा मोठा गौप्यस्फोट केल्यावर समोरच्याची प्रतिक्रिया आजमावी तशी लता सीमा कडे बघत राहिली.

  'तो त्यांचा व्यक्तीगत मामला आहे.आपल्याला काय करायचंय?'सीमाच्या या थंड प्रतिसादाने लता एकदम भडकलीच.

  'अगं, अशा माणसांमुळेच घटस्फोटाची कीड आपल्या समाजात पसरत चालली आहे.'लता तावातावाने बोलू लागली तशी बाजारातील येणारे जाणारे त्या जोडीकडे टवकारून पाहू लागले.सीमाने लताला कसेबसे शांत केले.

  काही दिवसांनी देवदर्शन करून मंदिराबाहेर येत असतांना'ती बाई' सीमाला दिसली.सीमाची आणि तिची नजरानजर झाली तसे सीमा खजील झाली.जणू तिच्या मनातील भाव ओळखून ती स्त्री मोकळेपणाने हसली.

'आज एकट्याच? बरोबर मैत्रीण नाही?'

 'नाही.आज तिला काम आहे म्हणून ती आज आली नाही.'सीमा गुळमुळीतपणे म्हणाली.

  'मी तनुजा,तनुजा मुजुमदार.'त्या स्त्री ने स्वतः ची ओळख सांगितली.

'मी सीमा पाटील.'सीमाने प्रती नमस्कार केला.

त्यानंतर तनुजा सीमाला अधूनमधून भेटत राहिली.कधी बाजारात, कधी दुकानात.स्मितहास्याची देवाणघेवाण होता होता दोघींचे सूर जुळले.अर्थात लताच्या अपरोक्ष!

  एकदा तनुजा एका अतिशय सुंदर, नाजूक अशा तरुणीबरोबर दिसली.त्या तरुण मुलीला सीमाने पटकन् ओळखले.कधीकधी देवळात ती देवासमोर ध्यान लावून बसलेली दिसे.

सीमा समोर येताच तनुजा थांबली.'ही जुई,माझी मुलगी.सी.ए. आहे.एका फर्ममध्ये नोकरी करते.'

'नमस्ते मावशी,'जुईने सीमाला हात जोडून नमस्कार केला आणि ती गोडसं हसली.

संध्याकाळी भाजी घेऊन देवदर्शन करायचं आणि जवळच्या बागेत थोडावेळ टेकायचं असा सीमाचा परिपाठ.त्याप्रमाणे ती बागेत शिरली तो समोर तनुजा एकटीच एका बाकावर बसलेली,विचारात हरवलेली.सीमा तिच्या जवळ जाऊन बसली तशी तनुजाने दचकून तिच्या कडे पाहिलं आणि ती कसंनुसं हसली.

 'तुमची जुई फारच गोड आहे बरं का,beauty with brains!'सीमा मनापासून म्हणाली.

 'हंss!'तनुजाने सुस्कारा सोडला.'आपण मुलांच्या फक्त शिक्षणालाच अवास्तव महत्त्व देतो.त्यांना पुढच्या आयुष्यात कठीण प्रसंगी सामोरे कसं जायचं, खंबीर,कणखर बनायचं याचं शिक्षण देत नाही.'

तनुजाच्या गूढ बोलण्याने सीमा गोंधळली.तनुजा पुढे बोलतच होती,'मुलांवर सतत सुविचारांचा मारा करून त्यांना भाबडं बनवतो.पण बाहेरचं जग फार वेगळं आहे.इथे भाबडं, निरागस राहून चालत नाही.जशास तसे वागण्याची तयारी ठेवायची तरच माणूस तगून रहातो.सगळीच माणसं देवमाणसं नसतात, काही काही जण सैतान ही असतात त्यांच्याशी लढा देऊन विरोध करावा लागतो.'

तनुजा जुईच्या घटस्फोटाबद्दल बोलत आहे असे सीमाने अंदाजाने ताडले.

  'एव्हढं थाटात लग्न केलं होतं आम्ही जुईचं,'तनुजाचा गळा दाटून आला होता.'अगदी सालंकृत कन्यादान केलं होतं तर तो सैतान काय म्हणाला ठाऊक आहे? तुझ्या आईबापांनी कन्यादान करून मला दानात दिली आहे तुला मग मी कशीही वापरीन!'

 सीमाचा श्वासच कोंडल्यासारखा झाला.माणसं इतका नीच विचार करू शकतात?चांगलं चौकात उभं करून फटके मारायला हवेत अशा नराधमांना!सीमाच्या शरिराची लाही लाही झाली हे ऐकून.

'हिमनगाचं टोक असते ना तेव्हढंच सांगितलेय तुम्हाला.इतका छळ झाला जुईचा त्या घरात, फक्त तीन महिने राहिली पण फक्त हाडाचा सापळा उरला होता तिचा!'तनुजा आवेगाने बोलत होती.

 'लग्नाआधी चौकशी केली नव्हती का?'सीमाने चाचरत विचारले.

'आपल्या शेजारच्या घरात चोवीस तास आपण नजर ठेवू शकतो? त्यांच्या कडे काय चाललंय याची कितपत माहिती असते आपल्याला?'तनुजाने प्रतिप्रश्न केला.सीमाने नकारार्थी मान हलवली.'एखाद्याचे लग्न जुळत असेल तर कोण त्याच्याबद्दल अप्रिय सत्य सांगेल?'

सीमाला तनुजाचा मुद्दा पटला.

'आम्हीसुद्धा जुईचं लग्न जुळवतांना मुलाचं शिक्षण, नोकरी,रुप, आर्थिक स्थिती....सर्व मुद्दे विचारात घेऊनच होकार दिला होता.जेव्हा त्याचं वागणं समजलं तेव्हा आम्ही किती हादरलो असू याचा विचार करून पहा.जुई तर बिचारी पार कोसळली होती.ताबडतोब आम्ही जुईला घरी घेऊन आलो.

आमच्या पुढे पहिले आव्हान होते जुईला मानसिक आणि शारीरिक रित्या पुन्हा उभारी देणं.'

'घटस्फोट घेतांना समाजाची भीती नाही वाटली?'सीमाने विचारले.तनुजाकडे तिरस्काराने बघत 'समाजाची कीड'म्हणून संबोधणारी लता तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.

 'कुठला समाज?'तनुजा तट्कन म्हणाली.'समाजाला घाबरून आपण रोज कणाकणानं मरणाऱ्या आपल्या मुलीकडे असहाय्यपणे पहात रहायचं? यासाठी तिला वाढवलं,शिक्षण दिलं?अशा वेळी आईवडिलांनी मुलीला आधार द्यायचा नाही तर तो कुणी द्यायचा? उद्या जर छळ असह्य होऊन तिने जिवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर त्याला जबाबदार कोण? उद्या हाच ' सो कॉल्ड ' समाज म्हणेल, खरं म्हणजे तिनं जीव देण्यापेक्षा घटस्फोट घ्यायचा, हल्ली काय सर्रास होतात घटस्फोट!'तनुजा उपहासाने नक्कल करीत म्हणाली.

'अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं,'सीमाने तनुजाला सहमती दर्शवली.

'माझी मैत्रीण लता तुमचा उगाच एव्हढा राग राग करते.तिला या गोष्टी कळल्या तर .....'

 'तिला सगळं माहित आहे', तनुजा सीमाला मध्येच तोडत म्हणाली.'म्हणजे?'सीमा आश्चर्यचकीत झाली.

'तिची मुलगी रश्मी आणि जुई दोघी मैत्रिणी आहेत.'तनुजा हसत म्हणाली.

'तुम्ही पाहिलंय रश्मी कायम लांब बाह्यांचे आणि बंद गळ्याचे कपडेच घालते !'तनुजाने अचानक विषय बदलला.

'हो पाहिलंय खरं.एकदा लताकडे चैत्राचे हळदीकुंकू होते तेव्हा एव्हढ्या उकाड्यात सुद्धा रश्मीने जरीच्या साडीचा पदर अंगभर लपेटून घेतला होता.मी म्हटलं पण तिला, अगं तुला उकडत नाही का ?'

'ती असे अंगभर कपडे लपेटून का घेते माहितीए?'तनुजाने सीमाला विचारले.

'का बरं?'सीमा बुचकळ्यात पडली.

तनुजा क्षणभर थांबली.शब्दांची जुळवाजुळव करत ती सांगू लागली,'रश्मीचा नवरा सॅडीस्ट आहे.ही एक मनोविकृती आहे.समोरचा माणूस वेदनेने विव्हळला की त्यांना आनंद होतो.रश्मीचा नवरा तिला जळत्या सिगारेटचे चटके देतो.'

  'काय?'सीमा ओरडली.तिच्या डोळ्यासमोर रश्मीचा उच्चशिक्षित, रुबाबदार नवरा उभा राहिला.तो रश्मीशी इतक्या क्रूरपणे वागतो?

सीमाच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव ओळखून तनुजा मंदपणे हसली.

'विश्वास बसत नाही ना! कधी कधी सत्य हे कल्पिताहून भयंकर असतं'.

 'पण हे लताला, घरच्यांना माहीत आहे?मग रश्मी घरी का परतून येत नाही?'सीमाला आश्चर्य वाटले.

'काय करेल बिचारी रश्मी,जर आईवडील मुलीच्या जीवापेक्षा समाजाला जास्त महत्त्व देतात तर!'तनुजा निःश्वास सोडत म्हणाली.'चला, निघते मी , खूप उशीर झाला.'तनुजा बाकावरुन उठत म्हणाली.

  'अगं, तुला बातमी कळली का? लताच्या मुलीनं,रश्मीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणे',लता आणि सीमाची कॉमन फ्रेंड शीला सांगत होती.'आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून पोलिस केस झालीय म्हणे.आणि कोणाला सांगू नकोस,'शीला कुजबुजत्या स्वरात म्हणाली,'रश्मीच्या अंगभर चटक्यांचे डाग आहेत.रश्मीचा छळ केला म्हणून तिच्या नवऱ्याला अटक केलीय आणि लता आणि तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय तुम्हाला माहित असूनही त्यावर काही अॅक्शन का घेतली नाही म्हणून पोलिस त्यांना झापत आहेत.'शीला तिखटमीठ लावून बातमी सांगत होती.'कमाल आहे बै या लोकांची.मुलीला एव्हढा त्रास होत होता तर घटस्फोट घ्यायचा ना सरळ! हल्ली काय, सर्रास होतात घटस्फोट!'शीलाची टकळी सुरू होती.

सीमाच्या नजरेसमोर तनुजा उभी होती.समाजाची पर्वा न करता मुलीसाठी ताठ मानेनं लढा देणारी तनुजा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy