Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

कथा विकणे आहेत!

कथा विकणे आहेत!

8 mins
158


          कथा विकणे आहेत!

        त्यादिवशी अनेकांच्या भ्रमणध्वनीवरील सर्व माध्यमातून एक संदेश फिरत होता, 'कथा विकणे आहेत!' शीर्षक वाचून प्रत्येक जण आश्चर्यात पडत होता. स्वतःलाच विचारत होता, 'आँ! कथांची चक्क विक्री! हा काय नवीन प्रकार म्हणावा? पाहू तर खरे काय आहे ही विक्रीची आयडिया!' असे म्हणत सारेच त्या शीर्षकांतर्गत दिलेले निवेदन वाचत होते...

     'सध्या आपण सारेच कोरोनामुळे त्रस्त आहोत. जवळपास प्रत्येकाचा किमान एक तरी नातेवाईक, मित्र, परिचित या कोरोनाने हिरावून नेला आहे. व्यवसाय बंद आहेत. अनेकजणांना घरी बसविण्यात आले आहे. तर अनेकांच्या पगाराला कात्री लागली आहे. माझी स्वतःची नोकरी गेली आहे. कसे जगावे कळत नाही.

        मी अपरिचित लेखक आहे. अपरिचित यासाठी की, माझ्याकडे दोनशे कथा टंकलिखित करून तयार आहेत. प्रत्येक कथा वेगळ्या विषयाची, वेगळा बाज घेऊन लिहिलेली आहे. कुणी मानधन देत नाही म्हणून मी कथा कुठेही पाठवल्या नाहीत. कारण लेखनाचा श्रीगणेशा करतानाच मी ठरवले होते की, मानधन मिळेल तिथेच कथा पाठवायची. कदाचित माझ्या या हट्टापायी माझ्या कथा घरातच पडून आहेत. कथासंग्रह काढण्याचे ठरवले तर प्रकाशकांना हवे असलेले चणे मी देऊ शकत नाही. त्यामुळे तोही योग दिसत नाही. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. मी सध्या आर्थिक संकटात आहे आणि माझ्या एकापेक्षा वाचनीय, वास्तववादी, समाजोपयोगी अशी अनेकानेक विशेषणं थिटे पडतील अशा कथा मी विक्रीस काढल्या आहेत. एक कथा केवळ पाचशे रुपयांना मी विकत असून कथा ऑनलाईन विक्री करताना त्यावरील हक्क मी खरेदीदाराला देत असल्याचे पत्रही सोबतच देणार आहे. तसेच खरेदीदाराला हा व्यवहार गुप्त ठेवावा असे वाटत असेल तर दोघांशिवाय अन्य तिसऱ्याला हा व्यवहार समजणार नाही.

      थोडक्यात काय तर केवळ पाचशे रुपयात आपण एका सर्वोत्तम कथेचे मालक, स्वामी, लेखक होऊ शकता. शिवाय अनेक लेखकांचे संपादक, प्रकाशक यांच्याशी साटेलोटे असते त्यामुळे हे लेखक माझी कथा स्वतःच्या नावावर छापून पहिल्याच वेळी घसघशीत मानधन मिळवू शकतात. म्हणजे कथेचे खरेदी मूल्य ते वसूल करु शकतात. अनेक ठिकाणी लागेबांधे असलेल्या लेखकाने चातुर्याने केवळ शीर्षक बदलून तीच कथा इतरत्र मानधन तत्त्वावर छापून आणली तर लेखकाला नफाच नफा! आहात कुठे! ज्याला माझी कथा हवी आहे त्याने सोबतच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर डिजिटल पेमेंटने पाचशे रुपये पाठवून त्याचा स्क्रीन शॉट आणि स्वतःचा ईमेल माझ्या याच व्हाट्सएपवर पाठवावा. त्याचदिवशी आपण दिलेल्या ईमलवर मी विकलेली आणि तुम्ही खरेदी केलेली कथा पाठविण्यात येईल... '

                                                कळावे आपला,

         (प्रकाशात न येऊ शकलेला आणि स्वतःच्या कथांना विक्री करणारा लेखक... प्रकाश!')

        ते निवेदन वाचून त्याखाली प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. सर्वच जण प्रकाशवर ओढवलेल्या संकटाबद्दल दुःख व्यक्त करीत होते. काही जणांनी चक्क प्रकाशवर जी वेळ आली आहे त्याबद्दल सरकारलाच दोषी ठरवले होते. एकाने लिहिले होते,

'प्रकाशभाऊ, अशा अंधकारमय जीवनात आम्ही तुझ्यासोबत आहोत. मी स्वतः तुझ्या पाच कथा विकत घेत आहे. मी जवळपास दीडशे व्हाट्सएप समूहावर आहे. सर्वत्र तुझी ही दुःखभरी कथा पाठवत आहे. दोनशे काय तुझ्या हजार कथा मी यूं खपवून देतो.'

     प्रकाशचे निवेदन माकडाने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेतल्याप्रमाणे सर्वत्र फिरत होते. एका लेखकाने लिहिले, 'ही दुर्दशा एका लेखकाची नाही तर संपूर्ण साहित्य क्षेत्राची आहे. सरकारने प्रकाशच्या सर्व कथा विकत घ्याव्यात आणि प्रकाशला घसघशीत मदत करावी. साहित्यिकांनी गप्प बसू नये. प्रकाशच्या पाठीशी ठाम उभे राहून लेखणी पाजळून सरकारला वेठीस धरावे. प्रकाशला भरघोस शासकीय मदत मिळाल्याशिवाय साहित्यिकांनी एक अक्षरही लिहू नये. लेखनीबंद असे आगळेवेगळे आंदोलन करून शासनाची झोप उडवावी.'

'तसे पाहिले तर माझ्याकडेही असंख्य अप्रकाशित कथा आहेत. सरकारने प्रकाशच्या गोष्टी विकत घ्यायच्या ठरवल्यास मीही माझ्या त्यातल्या त्यात सर्वोत्कृष्ट कथा विक्री करायला तयार आहे.'

'खरे आहे. साहित्यिक सध्या अनंत अडचणीत आहे. वर्तमानपत्रांच्या साहित्य पुरवण्या, साप्ताहिके, मासिके आणि ज्यावर लेखकांच्या उड्या असतात असे बरेच दिवाळी अंकही बंद आहेत त्यामुळे या काळात ज्या ज्या लेखकांनी परिश्रमपूर्वक लेखन केले आहे अशा लेखकांना लेखनभत्ता म्हणून सरकारने तत्वतः अनुदान द्यावे.'

'नाही! अशी विक्री करणे योग्य होणार नाही. लेखकाने कथा विकणे म्हणजे स्वाभिमान गहाण टाकल्याप्रमाणे आहे. शिवाय अशीच प्रथा साहित्य क्षेत्रात रुढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या कुणीही उठेल आणि अनेक संपादकांनी प्रकाशित करण्यासाठी नकार देऊन साभार परत केलेली कथा विकायला काढील. माझा या प्रथेला कडाडून विरोध आहे.'

'माझ्याकडे एक हजारपेक्षा अधिक आशयघन, टिकावू, भावभावनांनी ओतप्रोत, सरस अशा कविता आहेत. त्याही मी विक्रीला काढू इच्छित आहे पण प्रकाश यांच्याप्रमाणे मी माझ्या कवितांचा दर ठरवणार नाही. तर कवितांचा लिलाव करणार आहे. त्यामुळे माझ्या कवितांना भरपूर किंमत मिळेल. आयपीएलमध्ये जसा खेळाडूंचा लिलाव होतो त्याप्रमाणे अर्थात हा लिलाव ऑनलाईन असेल कारण सध्या कोरोना आहे.'

यावर सत्वर एक प्रतिक्रिया आली, 'मुळीच नाही. कथा, कादंबरी, नाटक यांच्या विक्रीला किंवा लिलावाला शासनाने जरुर परवानगी द्यावी. कविता, चारोळ्या, आठोळ्या अशा प्रकारातील साहित्याच्या विक्रीला किंवा लिलावाला हिरवा कंदील दाखवू नये.'

'का हो, कविता या शब्दाचीच तुम्हाला का अलर्जी आहे? कवितेचा लिलाव म्हटला की तुमच्या कपाळावर आठ्या आल्या की काय? असे तर नाही ना की, कुणी कविता नावाच्या मुलीने तुमचा प्रेमभंग केला आहे?'

      स्वतः प्रकाश दिवाणखान्यातील झोपाळ्यावर बसून येत असलेल्या प्रतिक्रियांचा आस्वाद घेत असताना दुपारच्या वामकुक्षीसाठी शयनगृहात गेलेली त्याची पत्नी मेट्रो ट्रेनच्या वेगाने धावत दिवाणखान्यात आली आणि थांबा नसलेल्या रेल्वेस्थानकाच्या समोरून जोरात शिट्टी देत निघून जावी तशा आवाजात तशी कडाडली,

"अहो, हे... हे काय? तुम्ही तुमच्या कथा विकत आहात? एवढे कोणते संकट आले म्हणावे?"

"अग, सध्याची परिस्थिती तुला माहिती आहे ना? कथांच्या विक्रीतून तेवढाच हातभार लागेल संसाराला..."

"असा कितीसा पैसा येणार आहे तुमच्या त्या शंभर ठिकाणाहून साभार परत आलेल्या कथांचा? अनेक स्पर्धांमध्ये चक्क पाचशे-हजार रुपये फिस भरुन कथा पाठवल्या. पारितोषिकांचे सोडा परंतु 'उल्लेखनीय, उत्तम कथा' असा तरी कुणी उल्लेख केलाय का? मोठ्या दिमाखाने लिहिले आहे, मी कुठेही कथा पाठवल्या नाहीत..."

"अग, तो जाहिरातीचा भाग झाला..."

"कशाला फुशारक्या मारता? कुणी म्हणजे कुणी तुमची एकही कथा विकत घेणार नाही. एक मात्र करा, या निवेदनाच्या खाली एक तळटीप टाका. लिहा... 'ज्याला निद्रानाशाचा विकार आहे, झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही त्यांनी गोळी न घेता झोपताना माझी कथा वाचायला घ्यावी. एका क्षणात निद्रावंती प्रसन्न होइल.."

"आईशपथ! काय भारी आयडिया आहे ग. इच्छा नसतानाही माझ्या कथा तू माझ्या आग्रहाखातर वाचतेस आणि बघ कशी साहित्यिक झालीस ते. आता हीही तळटीप टाकतो... 'ज्याला लेखक व्हायचे आहे त्याने माझ्या कथा विकत घेऊन वाचाव्यात. हमखास लेखक व्हाल..."

"अहो, कथांच्या विक्रीतून आलेला पैसा संपल्यानंतर काय करणार आहात? मला विकणार आहात? साहित्य म्हणजे लेखकाचे अपत्य असते. बाईला मुल जन्माला घालताना जशा वेदना होतात तसाच त्रास लेखकाला साहित्य निर्माण करताना होतो. कुठे गेल्या ह्या वल्गना? बरे झाले, लग्नाला चार वर्षे झाले पण सध्याच मुल नको या निर्णयावर मी ठाम आहे म्हणून नाही तर चार वर्षात किमान दोन अपत्यं तरी आपण जन्माला घातली असती. त्यांनाही विकले असते का? गोष्टीरुप संतती तर विकतच आहात तर मग पोटच्या गोळ्यालाही तुम्ही विकले असते?.."

"काही काय बोलतेस तू? बघ तर, आपण बोलत असताना तीस कथांची विक्रीही झाली आहे. पंधरा हजार रुपये माझ्या खात्यात जमाही झाले आहेत..."

"उगाचच बाता मारु नका हं. कशाचेही सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही."

"बघ. हातच्या काकणाला आरसा कशाला?..." असे म्हणत प्रकाशने खरेदीदारांकडून आलेल्या स्क्रीन शॉटची यादी बायकोला दाखवली. तशी हर्षभरीत झालेली बायको म्हणाली,

"काय डोकं आहे बाई तुमचे? आता खरा शोभतो माझा नवरा माझा आणि एक लेखकही! थांबा.."

"अग, आता थांबून चालणार नाही. बघ. अजून वीस म्हणजे एकूण पन्नास कथा हातोहात खपल्या ग. कोणत्याही संपादक, प्रकाशकांची मनधरणी न करता, त्यांच्या नाकावर टिच्चून विक्रीच्या माध्यमातून का होईना घसघशीत मानधन मिळविले की नाही?"

"अहो, मी काय म्हणते, आता ह्या सगळ्या कथा विकल्या म्हणजे आपल्याकडे पुन्हा कथा राहणारच नाही का? एक काम करा ना, आज कोणतीही कथा गिऱ्हाइकांकडे पाठवू नका. आज अख्खी रात्र जागून काढते आणि एक न एक कथा वाचून काढते... ते काय म्हणतात ते अंतिम दर्शन घेतल्याप्रमाणे!"

"अग... अग, थांब! जाऊ नको लांब! कम्माल झाली! अग, दोनशे एकवीस लोकांनी माझ्या कथा विकत घेतल्या आहेत..."

"बाई ग बाई! लैच भारी! अहो, पण एक वांधा झालाच की..."

"तो काय?" प्रकाशने संशयाने विचारले.

"अहो, काय डोकं की खोकं तुमचं! तुम्ही विकायला काढल्या आहेत दोनशे कथा, पैसे पाठवले सव्वा दोनशे लोकांनी... मग?"

"इकडची टोपी तिकडे! एकच कथा दोघा-तिघांना देतो पाठवून. कथेचे शीर्षक, फार तर पात्रांची नावे बदलतो. आहेच काय त्यात. दोन खरेदीदार एकमेकांना थोडीच भेटणार आहेत..."

"हा प्रकाश तर माझ्या डोक्यात पडलाच नाही.."

"प्रकाश डोक्यात पडला नसेल पण चार वर्षांपासून तुझ्या गळ्यात तर पडतोच आहे ना... हा प्रकाश!"

"चला. इश्श! तुमचे आपले काही तरीच!..."

"बाप रे बाप! वीस षटकांच्या सामन्यात धावफलक तीव्र गतीने वाढावा तसा विक्रीचा आकडाही वाढतोच आहे. तीनशे पार गेली की विक्री! आता थांबवावे लागेल."

"अहो, थांबवू नका. कधी नव्हे ती लक्ष्मी धावतपळत, शोधत येत आहे. आता तुम्हीच म्हणालात ना, कथांची शीर्षकं आणि पात्रांची नावे बदलतो म्हणून! आता चक्क कथांचे तुकडे करा..."

"फाडून टाकू?"

"काय पण पात्र माझ्या नशिबी पडलय! अहो, तुकडे करा म्हणजे एका कथेचे दोन तीन भाग करा आणि एकच कथा अनेकांना पाठवा. नाही तरी तुम्ही अमक्या लेखकाच्या चार ओळी, तमक्या लेखकाच्या आठ ओळी जोडून स्वतःची कथा बनवली आहेच की..."

"हे... हे... तुला कसे माहिती?"

"विसरलात? मी एम. ए. मराठी आहे. साहित्याचा अभ्यास आहे. तुम्ही लेखक आहात याचा मला आनंद होता, अभिमान होता. तुम्ही जे कथासंग्रह आणून ठेवले आहेत ना, जोडाजोडी करायला! ती सारी पुस्तके तुम्ही कार्यालयात गेला की, दररोज दुपारी वाचून काढली आहेत. नंतर तुम्ही तुमच्या कथा जबरदस्तीने वाचायला दिल्या. मी पहिली कथा वाचतानाच ओळखले की, हे प्रकरण वेगळेच आहे म्हणजे प्रत्येक पुस्तकातील उतारे एकत्र करून तुम्ही स्वतःची कॉकटेल कथा बनवता ते! म्हणून तुमच्या कथा वाचायला मी कंटाळा करीत असते..."

"माय गॉड! तू पण काय भारी आहेस ग!" प्रकाश म्हणाला.

"चहा असते मस्तपैकी..." असे म्हणत पत्नी आत गेली आणि प्रकाशने संगणकावर बसून कथांना पुन्हा सजवायला सुरवात केली म्हणजे बायको म्हणाली त्याप्रमाणे एकेका कथेचे तिच्या लांबीप्रमाणे दोन- तीन भागात विभागणी केली. लगोलग ग्राहकांच्या ईमेलवर धडाधड त्या कथा पाठवायला सुरवातही केली. चहा- जेवण असे करत करत प्रकाशने रात्री झोपेपर्यंत तीनशे एक्कावन्न कथा पाठवूनही दिल्या. प्रकाशचा 'कथा विक्री' प्रयोग हजार टक्के यशस्वी झाला...

       काही दिवसांनंतर एका साहित्य संस्थेने कथावाचन स्पर्धा ठेवली होती अर्थात कोरोनाचे नियम पाळून! परंतु नियम धाब्यावर बसवायचे असतात याप्रमाणे लेखकांनी स्पर्धेसाठी गर्दी केली. नियमानुसार कथा वाचनाला सुरवात झाली. एकेक स्पर्धक येत होता, स्वतःची कथा वाचून निकालाची वाट पाहत जागेवर जाऊन बसत होता. एका स्पर्धकाने स्वतःची कथा वाचली. तो जागेवर जात असताना दुसरा स्पर्धक कथा वाचनासाठी निघाला असताना दोघांची भेट झाली. खाली उतरणाऱ्या स्पर्धकाने व्यासपीठावर जाणाऱ्या स्पर्धकाला 'अंगठा'युक्त शुभेच्छा दिल्या!

त्या स्पर्धकाने डायसचा ताबा घेऊन कथा वाचायला सुरवात केली. ती कथा ऐकताना परीक्षक, अनेक रसिक, नुकतीच ज्याने कथा वाचन केले होते तोही आश्चर्यात पडला. अजून एका व्यक्तिला फार मोठा धक्का बसला. ती व्यक्ती होती प्रकाश! होय, तोच प्रकाश ज्याने काही दिवसांपूर्वी स्वतःच्या कथांची विक्री केली होती. आश्चर्याचे, धक्का बसण्याचे कारण जी कथा वाचल्या जात होती आणि ज्या स्पर्धकाने अगोदर कथा वाचली होती त्या दोन्ही कथा सारख्याच होत्या... सेम टू सेम! जी व्यक्ती कथेचे वाचन करीत होती ती व्यक्ती आधीच्या कथांचे वाचन होत असताना तिकडे लक्ष न देता स्वतःला जी कथा वाचायची होती तीच कथा पुन्हा पुन्हा वाचत होता... रवंथ करीत होता... कविता संमेलनात बहुतांश कवी जसे स्वतःच्या कवितेचे वाचन झाले की, सभागृहातून निघून जातात त्याप्रमाणे कथावाचन करणारे स्पर्धकही इतर स्पर्धकांच्या कथा ऐकत नव्हते. सर्वांच्या कथा वाचून झाल्यावर निकाल ऐकण्यासाठी नाइलाजाने बसून होते...

      त्यादिवशी घाईघाईने नकळत आपण या दोन्ही स्पर्धकांना कोणताही बदल न करता एकच कथा विकली हा प्रकार लक्षात येताच स्पर्धक म्हणून उपस्थित असलेल्या प्रकाशने तिथून काढता पाय घेतला...          


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy