Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

खतरा आळ

खतरा आळ

13 mins
202


      "हे बघा, सुवर्णा दौत, आत्ताच तुमच्यासमोर तुमच्या पतीने खतरा आळीत सतराशे साठ कोटी रुपये अवैध मार्गाने कमविले असल्याचे सांगितले आहे. तशी त्यांनी लेखी कबुलीही दिली आहे..." तपास अधिकारी सांगत असताना त्यांना थांबवून सुवर्णा दौत यांनी विचारले,

"कदाचित तुमच्या त्रासातून वाचण्यासाठी, तुमच्या दडपणाखाली येऊन ते तसे म्हणत असावेत. त्यांना कबुली देण्याची सवयच नाही आणि इतक्या सहजासहजी ते कोणती गोष्ट मान्य करतील यावर माझा विश्वास नाही. आपले ते खरे म्हणून पटवून देण्यात त्यांचा हात कुणी धरुच शकणार नाही. परंतु एक सांगा, मला इथे का बोलवले आहे."

"का म्हणजे, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात..."

"ते तर आहेच हो. एका जन्माची नव्हे तर साता जन्माचे आमचे नाते आहे. ते कसे नाकारता येईल?

असा पती भाग्यवान बाईलाच मिळतो."

"असा पती? भाग्यवान बाई? अहो, सुवर्णाबाई, ते चोर आहेत. सतरा कोटीपेक्षा अधिक रुपयांची अफरातफर केली आहे त्यांनी..."

"हे बघा, सत्य काय ते न्यायालयात सिद्ध होईल. तोवर ते केवळ आरोपी आहेत, त्यांना चोर तर मुळीच म्हणू नका...."

"ते तर न्यायालयात आम्ही सिद्ध करु परंतु तुम्हालाही शिक्षा होऊ शकते."

"मला? ती कशामुळे? मी काय केले? ती मेली खतरा आळ कुठे होती? कुणाची होती? किती लोकांनी पैसे गुंतवले होते किंवा गुंतवले नव्हते. मला काहीही माहिती नाही. कुणीही उठेल आणि कोणताही आरोप करेल. तुम्हीही कोणतीही शहानिशा न करता एखाद्या व्यक्तीला सरळ अटक करता याला काय अर्थ आहे?"

"कुणीही उठसूठ आरोप केलेला नाही आणि आम्हीही यांना डोळे मिटून अटक केलेली नाही. तुमच्या घरी तुमच्या समक्ष दोन दिवस सतत तपासणी केली. आता बघा, मि. दौत यांच्यावर एका महिलेनेही एक आरोप..." अधिकाऱ्यास थांबवून सुवर्णा ताडकन म्हणाली,

"त्या सटवीबद्दल बोलता होय तुम्ही? विनयभंगाचा आरोपच ना? माझ्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार तर केला नाही ना? विनयभंग म्हणजे काय तर विनयपूर्वक केलेला भंग अर्थात स्पर्श! महत्त्वाचे म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही. माझा नवरा एका पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. दररोज हजारो लोक त्यांना भेटायला येत असतात. त्यात शेकडो बायकाही असतात. तुम्ही जे टीव्हीवर पाहता ते आणि तुमच्यापर्यंत ज्या व्हिडीओ क्लिप पोहचत नाहीत अशाही क्लिप मी पाहते, पण या जमान्यात डोळ्याला दिसेल अशा बातम्यांवर विश्वास ठेवावा की नाही, ठेवावा तर किती ठेवावा हा प्रश्नच आहे. म्हणून या अशा बातम्यांवर दुर्लक्ष करते. ह्यांच्यासारख्या निडर, बेडर, धाडसी नेत्यांजवळ जाण्यासाठी पुरुष कार्यकर्ते तर सोडा पण महिलाही धडपड करतात. अशा धामधूमीत कुणाचा कुठे तर कुणाला कुठे स्पर्श होत असतो आणि एवढ्या प्रचंड गर्दीत कुणाला स्पर्श करावा, स्पर्शसुख मिळवावे अशी भावना निर्माण होणे शक्यच नाही..."

"तरीही त्या बाईंनी दौत यांच्यावर तसा आरोप का करावा?"

"हे तिलाच चांगले माहिती असेल ना? आरोप मी केलाच नाही तर त्यातला सत्यांश, तथ्यांश मला काय कळणार? कधीकधी असे होते की, हे मोठे नेते असल्यामुळे ह्यांच्याकडे काम करुन घेण्यासाठी येणारांची भरपूर गर्दी होते. प्रत्येकाला आश्वासन द्यावेच लागते. प्रत्येकाचे काम होईलच असे नाही, मग काम न झालेली व्यक्ती नाराज होणारच ना, मग नाराजीतून कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करते, कुणी बलात्काराचा, कुणी ते काय म्हणतात ते 'मी... टू'चा किंवा हा असा विनयभंगाचा आरोप करतात. आमचे हे दौत मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक अगदी त्यांच्या पक्षातही भरपूर आहेत. हेच विरोधक अशा कुणाला ना कुणाला, त्यातही एखाद्या स्त्रीला हाताशी धरून असे आरोप करीत असतात."

"मिसेस दौत, तुम्ही वकील आहात का हो? असे गंभीर आरोप होऊनही तुम्ही नवऱ्याची बाजू ठामपणे लढत आहात. बरे, मुख्य मुद्द्यावर येऊ? जेव्हा नवरा कोट्यवधी रुपयांची अफरातफर... नंबर दोनची कमाई घरात आणतो नि बायकोला माहिती नसते, असे कसे होऊ शकते?"

"साहेब, मला एक सांगा, तुमच्या पत्नीला तुमचा पगार माहिती आहे? तुम्ही सांगितलाय कधी? मला माहिती नाही पण तुमच्या अंगावरील कपडे किती किमतीचे आहेत? मी उतरत असताना तुम्ही ज्या गाडीतून उतरलात ना ती गाडी... थांबा. ऐका. या कार्यालयाच्या वाहनतळाकडे जात असताना तुमच्या गाडीच्या पाठीमागे माझी गाडी होती. गाडी सरकारी नव्हती कारण त्यावर तुमच्या पत्नीचे, मुलांची नावे होती... एवढी उच्च दर्जाची, महागडी कार तर तुम्ही स्वतःच्या पगारातून घेऊ शकत नाहीत, भलेही तुमच्या रुबाबाला, पदाला पाहून बँकवाले एका पायावर महागड्या कारसाठी ऋण द्यायला तयार होतील. पण तरीही मला खातरी आहे की, तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. काहीतरी गोलमाल करीत असणार. ही गोलमाल बायकोला माहिती आहे का? मला वाटते एकदा त्यांना फोन करून विचारता काय?"

"अहो, बाई काही भलतेसलते आरोप करु नका हं...."

"का? गडबडलात? असे आरोप तुम्ही जेव्हा इतरांवर करता तेव्हा तेही असेच गडबडत असणार, घाबरत असणार. माझ्या नवऱ्यावर जे आरोप आहेत तेही बिनबुडाचे आहेत ना?"

"बिनबुडाचे कसे? भक्कम पुरावे जमा केले आहेत आम्ही?"

"भक्कम? हे असे विनयभंगाचे? पुरावे तर तुमचे कपडे, राहणीमान, गाड्या, बंगला याबाबतीतही गोळा करता येतात, उभे करता येतात... तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हातात कायदा, सत्ता असताना सारे काही करता येते."

"मला सांगा, तुम्ही काय करता?"

"उत्तम गृहिणी आहे मी. गृहकृत्यदक्ष अशी माझी आमच्या वर्तुळात ख्याती आहे..."

"मग तुमच्या बँकेच्या खात्यात दोन कोटी रुपयांची शिल्लक आहे ती कशी? तुमच्या खात्यात तीन वेळा तीन तीन कोटी रुपये जमा झाले आहेत तर दोन वेळा एक एक कोटी एका खात्यात वर्ग झाले आहेत? अधूनमधून कुणाला पाच लाख, कुणाला दोन लाख पाठवले आहेत तर अनेकदा लाखो रुपये तुमच्या खात्यात जमा तर कधी वर्ग झाले आहेत. याबाबत काही सांगू शकाल? "

"माझे बँकेत खाते? कोट्यवधी रुपयांची आवकजावक? कसे शक्य आहे? माझे बँकेत खाते आहे हे मला आज, आत्ता कळतेय. मला हे खरे वाटत नाही. हाही आरोपच वाटतोय... कुणीतरी केलेला. विनयभंग आणि खतरा आळीप्रमाणे..."

"खरे वाटत नाही? तुम्हाला वाचता येते का?"

"हा काय प्रश्न झाला? अजय दौत यांच्यासारख्या पक्षातील क्रमांक एकच्या नेत्याची बायको आणि अडाणी? मी डबल ग्रॅज्युएट आहे म्हटलं... डिग्र्या आणून दाखवू का? झडतीला घरी आले होते तेव्हा माझ्या डिग्र्या पळवून तर आणल्या नाहीत ना?"

"तर मग सांगा हा फोटो कुणाचा आहे?"

"माझाच आहे. पण या पुस्तकावर का चिकटवला आहे?"

"हे पुस्तक म्हणजे... पासबुक आहे. हे नाव तुमचेच आहे ना?" अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाव वाचून सुवर्णा दौत म्हणाल्या,

"होय! हे नाव माझेच आहे. पासबुकवर कसे?"

"कसे? हे तुमच्या नावे असलेले बँकेचे पासबुक आहे. मी आत्ता सांगितलेले सारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या तुमच्याच खात्यातून झाले आहेत. आता पटलंय का?"

"माझे बँकेत खाते आहे हे मला माहिती नाही असे होऊच शकत नाही. हे बनावट पासबुक आहे. अहो, तुम्ही शांत का बसलात? हे लोक एकानंतर एक खोट्या आरोपांचे बाँब फोडत आहेत नि तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत.... तुमच्यावर या लोकांनी कोणता दबाब तर टाकला नाही ना, पण तुम्ही असे कुणाच्या दबावाखाली येणारे मुळीच नाही आहात. आजवर कुणाला न भिणारे, कुणाला न भीक घालणारे म्हणून सर्वदूर परिचित असणारे तुम्ही, अशा लोकांची काय डाळ शिजू देणार म्हणा. मला खरे सांगा, हे माझ्या नावावर पासबुक कुणी काढले? माझी सही न घेता?"

"काय ही तुमची सही नाही?" असे म्हणत बँक अधिकाऱ्यांनी एक फॉर्म सुवर्णा यांच्या हातात दिला. त्याचे बारकाईने निरीक्षण करून सुवर्णा म्हणाल्या,

"अहो, हे काय ही माझी स्वाक्षरी नाही आणि पती म्हणून वेगळेच कुणाचे नाव टाकले आहे. अच्छा! अच्छा! आले लक्षात! हा सारा या लोकांचा बनावट खेळ आहे. तुम्हाला अडकविण्यासाठी रचलेला सापळा आहे. हे बघा साहेब, या फॉर्मवर माझे नाव नि आडनाव सोडले तर सारे काही खोटे आहे. अगदी आमचा पत्ताही खोटा आहे... नवऱ्याचे नावही माझ्या नवऱ्याचे नाही तर..."

"पण पासबुकवरील फोटो तर तुमचा आहे ना?"

"होय. मघाशीच सांगितले आहे, फोटो माझा आहे. आजकाल बँकेत खाते उघडताना आधार कार्ड आवश्यक असताना वेगळ्याच नावाने खाते उघडल्या जातेय हे माझ्या नवऱ्याच्या विरोधात महाभयंकर कुभांड आहे. अहो, तुम्ही घरी होते तेव्हा तासा- तासाला पत्रकार परिषद घेत होते. आताही एक पत्रकार परिषद घ्या आणि करा यांच्या चक्रव्युहाचा भेद! या अधिकाऱ्यासह, तुमच्या विरोधकांनाही पाठवा खडी पाठवायला. तुम्ही सिंह आहात... सिंह! तुमच्या पत्रकार परिषदेतील डरकाळ्यांनी अनेकांचे धाबे दणाणले जायचे तर कुणी भीतीने थरथर कापत असे. तुम्ही असे शेळीसारखे बसून राहिलात ना तर ही मंडळी तुम्हाला कायमचे आत टाकतील. खतरा आळीत घर देतो म्हणून लोकांना फसवून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचा धादांत खोटा आरोप करत आहेत, विनयभंग केला म्हणून कुण्या तरी ऐऱ्यागैऱ्या बाईला खोटी तक्रार करायला लावतात, त्याप्रमाणे एखादे वेळी कुणाच्या तरी खुनाचा आरोप करून तुम्हाला फासावर लटकावयाला मागेपुढे पाहणार नाहीत. घ्या बरे पत्रकार परिषद. तुम्हाला असे शांत बसलेले, एकटे बसलेले बघवत नाही हो. तुम्हाला सदानकदा पत्रकारांच्या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात पाहायची सवय आहे हो. तुम्ही असे ऐटीत शेकडो पत्रकारांसमोर बसलेले, तुमचे शब्द ऐकण्यासाठी तरसणारे शंभरापेक्षा अधिक माईक पाहताना तुमचा अभिमान वाटायचा हो. तुमच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील तुमचे पाठीराखे नि विरोधकही कान लावून पत्रकार परिषदेतील तुमचा शब्द न शब्द ऐकायचे. तुमचे ते डरकाळी फोडल्याप्रमाणे शब्द ऐकताना जी मजा यायची ना ती आज मुळीच येत नाही हो. चोवीस तास आपल्या घराबाहेर डेरा टाकून बसणारे पत्रकारही आता फिरकत नाहीत हो. बोला. बोला. पत्रकारांशी बोला..."

"नाही. मला पत्रकार परिषद घ्यायला बंदी आहे..."

"अहो, हा तुमचाच आवाज आहे ना, खरे नाही वाटत हो. तो तुमचा खणखणीत आवाज कुठे नि हा मांजरीची म्याँव म्याँव कुठे! चार दिवसात एवढे थकलात? कितीतरी आमरण उपोषणे तुम्ही केली आहेत तुम्ही. एकदा तर तुम्ही सतरा दिवस काही न खातापिता उपोषण केले होते... त्यावेळी तुमच्या विरोधकांनी असा आरोप केला होता की, मध्यरात्रीनंतर तुम्ही भरपेट जेवायचे म्हणून पण तो भाग वेगळा. का हो, साहेब, ह्यांना तुम्ही बरोबर जेवायला देत नाहीत का?"

"तसे काही नाही. तुमची ही सारी बडबड बंद करा नि सांगा तुमच्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली ती का आणि कशासाठी?"

"पुन्हा तेच! तुम्हाला कोट्यवधी रुपये आणि माझे बँक खाते याशिवाय दुसरे काही दिसतच नाही का हो? अहो, खरे सांगा ना यांना की, ते माझ्या नावावर काढलेले खाते कुण्या तरी लफंग्याने काढले आहे म्हणून..."

"ते खाते मीच काढले आहे..."

"काय? खाते माझे तुम्ही काढले? मला न विचारता? माझा फोटो लावून? माझ्या नवऱ्याचे खोटे नाव टाकून? आधार कार्डचा आधार न घेता..."

"हो... हो... तेव्हा आपल्या पक्षाचे सरकार होते. बनावट आधार कार्ड, बँक व्यवस्थापकाला हाताशी धरून काढले खाते..."

"पण का?"

"अग, राजकारणी म्हटलं की, असा बेहिशोबी पैसा अवैध मार्गाने येतो. कितीही मनात नसले तरीही कुणी काम करण्यासाठी, कुणी काम झाल्यावर पैसा देतात. त्याचा हिशोब देता देता नाकीनऊ येतात, तपासाचे षडयंत्र मागे लागते म्हणून अशी व्यवस्था करावी लागते..."

"अशी व्यवस्था? उद्या हे अफरातफरीचे प्रकरण अंगलट येऊ लागले, मोठी सजा होण्याची शक्यता दिसली तर चक्क न्यायालयात सांगाल की, ही माझी बायको नाही, तिने केलेल्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही. स्वतःला सोडविण्यासाठी तुम्ही मला अडकवाल नि मग मोकळे व्हाल... विनयपूर्वक भंग करायला. मला तर आता वाटतेय की, त्या बाईची तक्रार खरी असावी..."

"असावी... नव्हे आहेच... सबळ पुरावे आहेत आमच्याकडे..." तपास अधिकारी बोलत असताना सुवर्णा दौत मध्येच कडाडल्या,

"तुम्ही शांत बसा हो..."

"यांच्या पक्षाचे सरकार असताना आम्ही आजवर शांतच होतो. म्हणून तर यांचे फावले. बरे, एक गोष्ट सांगा, तुमच्या पतीच्या उत्पन्नाचे साधन काय आहे हो? ना नोकरी, ना कोणता धंदा, ना व्यवसाय... केवळ एक नेता..."

"साधासुधा नेता नाही तर फार मोठ्ठा नेता म्हणा..."

"बरे, सुवर्णाताई, मोठ्ठा नेता! पण कधी तुम्ही नवऱ्याला विचारले, आलिशान बंगला, महागडी कार, बँकेच्या लॉकरमध्ये लाखो रुपयांचे दागिने..."

"काय म्हणालात? बँकेच्या लॉकरमध्ये लाखो रुपयांचे दागिने? कसे शक्य आहे?"

"म्हणजे तुम्ही आता असेही म्हणाल की, तुमच्या खात्यात झालेले व्यवहार जसे तुम्हाला माहीत नाहीत तसेच लॉकरमध्ये असलेल्या दागिन्यांची माहितीही तुम्हाला नाही?"

"मुळीच नाही. काय हो, हे म्हणतात ते खरे आहे? बँकेत एवढे दागिने आहेत..." सुवर्णा बोलत असताना अधिकाऱ्यांनी दौत यांना दरडावले,

"मिस्टर दौत, सुरुवातीला बँकेच्या व्यवहाराबाबत कानावर हात ठेवताना मित्राचे पैसे काही दिवसांसाठी ठेवले होते असे म्हणत होता तसे आता ते दागिने कुण्या मैत्रिणीचे आहेत..."

"काय सांगता, ह्यांनी ते दागिने मैत्रिणीचे आहेत असे सांगितले की काय?" सुवर्णाने दरडावून विचारले.

"नाही. अजून तरी तसे सांगितले नाही."

"तुम्ही नाही विचारले? अहो, खरे सांगा, ते दागिने कुणाचे आहेत? कोण आहे ती? तुमचे नि तिचे संबंध काय आहेत? नेहमी विनोदाने म्हणायचे तुम्ही की, आमच्यासारख्या मोठ्या नेत्याला एखादी स्टेपनी ठेवावी लागते. तेव्हा मीही हसण्यावारी नेत होते पण आता हे स्टेपनी प्रकरण बाहेर समजले तर लोक तुम्हाला नाही तर मला हसतील...."

"अग, तसे काही नाही..." दौत बोलत असताना सुवर्णा कडाडून म्हणाली,

"मग ते दागिने माझ्या लॉकरमध्ये का ठेवले आहेत? तेही मला न सांगता..."

"अग, सांगणार होतो, पण वेळच मिळाला नाही..."

"वेळ मिळाला नाही? दहा- पंधरा दिवसांनी घरी येताच विरोधकांची लफडी रंगवून सांगत असता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जमवलेल्या रकमेची नि दागिन्यांची साधी वाच्यताही करता आली नाही? का लपवून ठेवले माझ्यापासून?"

"अहो, दौत यांनी फसवणूक केली आहे तुमची..."

"आता तसेच म्हणावे लागेल. का केलेत असे? का नाही सांगितले मला..."

"अग, आपल्या कुटुंबाला ऐशोआरामात ठेवण्यासाठी केले. आपल्या दोघांच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच. शिवाय लग्न झाले तरी मी बेकारच होतो. त्यावरून आपल्या दोन्हीकडील लोक मला चिडवायचे, हिणवायचे...."

"पण म्हणून... बरे, मी तुमच्या बेकारीबद्दल कधी चकार शब्द तरी काढला का? आहे त्या परिस्थितीत सारे काही करीत होते ना..."

"तुझ्या ह्याच मोठेपणाचे मला वाईट वाटत होते. शहरातील एका पक्षाच्या नेत्याच्या विचाराने, कामाने भारावून गेलो आणि त्या पक्षाची कामे करु लागलो. हळूहळू साहेबांची विशेष मर्जी संपादन करण्यात यश मिळाले कारण माझा पक्ष त्यावेळी आजच्या इतका मोठा नव्हता पण साहेबांमुळे तो सत्तेतही आला होता. पक्ष जसजसा वाढत गेला, माझे पक्षात वजन वाढत गेले आणि मग पैसाही हाती खेळू लागला. एका वेगळ्याच विचाराने, एका धुंदीत तुला भारीभारीच्या साड्या, दागिने घेत गेलो, बाहेर जेवायला नेऊ लागलो..."

"मि. दौत, याचा अर्थ सुवर्णा यांच्या नकली खात्यात आलेला पैसा, लॉकरमध्ये असलेले दागिने याशिवाय अजूनही दागिने आहेत तर! ठीक आहे, तेही शोधून काढता येतील. एक मिनिट, सुवर्णा, ज्यावेळी घरात पैसा खेळू लागला, साड्या, दागिने, महागड्या हॉटेलमध्ये खानपान होऊ लागले त्यावेळी तुम्ही यांना 'पैसा कुठून येतोय' हे विचारले का?"

"नाही. कसे आहे, आम्ही बायका समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत जगतो. माहेरी आणि सुरवातीच्या काळात सासरीही गरिबीच्या काळात ब्र न काढता जगले. परंतु कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात आपणास थाटबाटात, श्रीमंतीचे जीणे जगायला मिळावे ही अभिलाषा होती. त्यामुळे हे जी काही नवीन वस्तू आणत होते त्यामुळे माझी अपेक्षा वाढत गेली..."

"अपेक्षा नाही तर हाव वाढत गेली..."

"ते तुम्ही म्हणणारच ना. पण कोणतेही काम नसलेला नवरा एका मोठ्या नेत्याचा विश्वास मिळवून त्यांचा उजवा हात होतो ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. शिवाय आपल्या आशा आकांक्षा पूर्ण होत आहेत म्हणून..."

"ते जाऊ द्या, तुम्हाला खतरा आळ असेल, बँकेतील दागिने असतील, खात्यातून झालेले व्यवहार असतील याची पुसटशीही कल्पना नव्हती आणि नाही." अधिकाऱ्याने विचारले

"नाही. मुळीच नाही." सुवर्णा ठामपणे म्हणाल्या.

"हे बघा, हे सारे काही ब्रम्हांड तुमच्या पतीने निर्माण केले आहे त्याबद्दल शिक्षाही होऊ शकते..."

"जे दोषी असतील, दोष सिद्ध झाला तर होईल ना... सत्ता नि अधिकार यांच्या विरोधात असल्यामुळे, तुम्ही टाकलेल्या चक्रव्यूहात कदाचित हे अडकतील... पण माझा नवरा इतका लेचापेचा, कच्च्या गुरूचा चेला नाही. त्यांना एक संधी मिळाली ना ते तुमचा डाव तुमच्यावर कसा उलटवतील ते तुम्हाला कळणारही नाही. मीही धीर सोडून हातपाय जोडून बसणारी बाई नाही. वकिलांची फौज उभी करेन आणि माझ्या नवऱ्याला निर्दोष सोडवेन...."

"मि. दौत यांना निर्दोष सोडवायला तुम्ही बाहेर असायला हव्यात ना?"

"म्हणजे?" सुवर्णा दौत यांनी घाईघाईने विचारले.

"सारे व्यवहार, पुरावे तुमच्या विरोधात आहेत. तेव्हा..."

"यांनी कबूल केले त्याप्रमाणे सारे काही यांनी केले आहे तर त्याची शिक्षा मी का भोगावी? अहो, असा केसाने गळा का कापायला निघालात?"

"अग, पण मी माझ्यासाठी काहीच केले नाही. जे काही केले... असेल हिशोबी,बेहिशोबी असेल, कुणाला फसवून केले असेल, मी गुन्हेगार असेल पण केले ते तुझ्यासाठी, कुटुंबासाठी केले..."

"अहो, ते तुमचे कर्तव्य होते. कुटुंबाला खाऊपिऊ घालणे, त्यांची हौसमौज करणे हे कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही ते केले. त्यात आमच्यावर उपकार थोडीच केले... कुटुंबाला काय हवे असते, त्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणे हे कुटुंब प्रमुखाचे काम असते. तेच तुम्ही केले. वेगळे काही केले का? बरे, तुम्हाला काही विचारायची सोय नसते. लगेच आख्खा बंगला डोक्यावर घेता, आकांडतांडव करता. त्यामुळे हे कुठून आणले, त्यासाठी पैसा कुठून आणला हे विचारायची संधी नसते."

"मिस्टर आणि मिसेस दौत, तुमचा हा प्रेमाचा संवाद नंतर. सुवर्णा, तुमचा नवरा तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुम्ही देशातील काय पण विदेशातील वकिलांची फौज जरी उभी केली तरी तुम्हाला सजा होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यातून बाहेर पडायचा मार्ग एकच..."

"आले वळणावर. अहो, मग ताकाला जाऊन भांडं का लपवता, मला न बोलवता यांच्याकडे मागणी केली असती तर तुमच्या अपेक्षेपेक्षा हजारपट रक्कम..." सुवर्णा बोलत असताना अचानक एक अधिकारी ओरडून म्हणाला,

"मिसेस दौत, आम्ही तुमचा प्रामाणिकपणा पाहून तुमच्या नवऱ्याने तुम्हाला अडकवलेल्या जाळ्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आमच्यावरच नाही नाही ते आरोप करताय?"

"मला वाचवण्याचा प्रयत्न? तो कसा?"

"तुम्ही जर आम्हाला मदत केली.... आत्ता जे काही सांगितले म्हणजे मि. दौतांनी तुम्हाला अंधारात ठेवून तुमच्या नावे जे जे काळे धंदे केले ते सारे लिखित स्वरुपात दिले आणि नंतर न्यायालयात पुन्हा सारे कबूल केले तर तुम्ही शंभर टक्के सहीसलामत सुटाल..." अधिकारी सुवर्णाला आश्वस्त करीत असताना टाळ्या वाजवत अजय दौत म्हणाले,

"व्वा, साहेब, व्वा! तुम्ही एका पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवऱ्याची शिकार करता आहात." त्यावर अधिकारी काही बोलणार त्यापूर्वी सुवर्णा तावातावाने म्हणाली,

"तुम्ही तरी दुसरे काय केले? पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून खतरा आळीतील शेकडो लोकांना घरे देतो असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये कमावलेत ना, त्या लोकांचा जीव घेतला ना ? अनेक लोकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारलात ना? तुम्ही असत्य, अप्रामाणिक, गैरकानुनी कामासाठी माझ्या नकळत माझी साथ घेतली ही मंडळी तर सत्यासाठी माझी साथ मागत आहेत..."

"त्यामुळे तुझा पती तुझ्यापासून दुरावला जातोय हे तुझ्या लक्षात येत नाही का?"

"तुम्ही माझ्याजवळ होतातच कधी? अनेक वर्षांपासून म्हणजे साहेबांच्या जवळ गेल्यापासून तुम्ही माझ्याजवळ होतात का? तुमचे साहेबांकडे एक पाऊल पडत असताना तुम्ही माझ्यापासून दहा पावले दूर जात होतात. अमावस्या- पोर्णिमेला कधीतरी... पत्नीचे कर्तव्य म्हणून तुम्हाला साथ दिली... पहिली भारीची साडी किंवा दागिना आणला तेव्हा तुम्हाला जाब विचारला असता, ते नाकारले असते तर कदाचित असे गुन्हेगार म्हणून तुमच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला नसता. अहो, तुम्हाला पैशाची एवढी हाव सुटली होती ना की, तुम्ही चक्क माझ्या वडिलांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशावर डल्ला मारला..."

"हा काय प्रकार आहे?" अधिकाऱ्याने विचारले.

"खतरा आळीतील एक फसवणूक झालेली व्यक्ती म्हणजे माझे वडील. माझे वडील निवृत्त झाले तेव्हा त्यांना भरपूर रक्कम मिळाली. त्यांना त्या पैशातून इथे घर घ्यायचे होते. जावई मोठा माणूस आहे म्हणून बाबांनी यांना विचारले. यांनी 'आपला सासरा, बायकोचा बाप' हा विचार न करता त्यांची सारी रक्कम हडपली. तरीही मी चूप राहिले पण आता नाही. तुम्ही चक्क माझ्या गळ्याला नख लावायला निघालात, मला तुरुंगात खडी पाठवायची तयारी केली. साहेब, तुम्हाला यांची बेहिशोबी रक्कम दहा टक्केच मिळाली आहे, अजून बरेच काही तुम्हाला माहिती नाही. मी सांगते, यांनी मला नाही सांगितले तरीही तुम्ही यांना अटक केल्यानंतर मी यांच्या विश्वासू माणसाकडून सारी माहिती मिळवली आहे. चला. तुम्हाला सारे दाखवते..." सुवर्णा बोलत असताना अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे विजयी नजरेने पाहिले. दुसऱ्या क्षणी सुवर्णासह काही अधिकारी कार्यालयाचे बाहेर पडताच अजय दौत छाती चोळत पसरले.... स्वतःची!

                                ००००


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy